|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय १० वा
जडभरत व राजा रहूगणाची भेट - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्री शुकदेव म्हणतात - एकदा सिंधुसौवीर देशाचा राजा रहूगण पालखीत बसून चालला होता. तो जेव्हा इक्षुमती नदीच्या किनार्यावर पोहोचला तेव्हा पालखी वाहाणार्या भोयांच्या जमादाराला एका भोयाची आवश्यकता वाटली. भोयाचा शोध करताना दैववशात त्याला हा ब्राह्मण दिसला. याला बघून त्याने विचार केला की, "हा मनुष्य धष्ट-पुष्ट, तरुण व मजबूत अंगापिंडाचा आहे. म्हणून हा बैल किंवा गाढवाप्रमाणे पालखी वाहू शकेल." असा विचार करून वेठबिगारीसाठी त्याने घेतलेल्या इतर भोयांच्या बरोबर यालाही जबरदस्तीने पकडून पालखी वाहाण्यासाठी जुंपले. या कामाला जरी महात्मा भरत योग्य नव्हता, तरीसुद्धा काहीही न बोलता गुपचूपपणे पालखी उचलून तो चालू लागला. (१) आपल्या पायाखाली एखादा जीव चिरडला जाऊ नये, म्हणून तो श्रेष्ठ ब्राह्मण दोन हात अंतर पुढे पाहून चालत असे. म्हणून अन्य भोयांच्या चालीशी याचा मेळ जमत नव्हता. त्यामुळे जेव्हा पालखी वाकडी-तिकडी होऊ लागली, तेव्हा ते पाहून राजा रहूगण पालखी वाहाणार्यांना म्हणाला "अरे भोयांनो ! नीट चाला. पालखी अशी खाली-वर करीत का चालत आहात ?" (२) तेव्हा आपल्या स्वामींचे हे कठोर वचन ऐकून राजा आपल्याला दंड देईल, या भीतीने ते भोई राजाला म्हणाले. महाराज, यात आमचा काहीही दोष नसून आम्ही आपल्या नियमानुसार योग्य रीतीनेच पालखी घेऊन चाललो आहोत. पण हा एक नवीन भोई आताच पालखीला जोडला आहे. तो भरभर चालत नाही, त्यामुळे आम्ही याच्याबरोबर पालखी घेऊन जाउ शकत नाही. (३-४) भोयांचे हे दीनवचन ऐकून राजा रहूगणाने विचार केला की, "संसर्गाने उत्पन्न होणारा दोष एका व्यक्तीत असेल, तर त्याच्याशी संबंध येणार्या सर्व माणसांमध्ये तो (दोष) येऊ शकतो. म्हणून याचा प्रतिकार केला नाही, तर हळू हळू हे सर्व भोई आपली चाल बिघडवतील." असा विचार करून रहूगणाला थोडासा राग आला. त्याने जरी महापुरुषांची सेवा केली होती, तरी क्षत्रिय-स्वभावानुसार जबरदस्तीने त्याची बुद्धी रजोगुणाने व्यापली गेली आणि तो ज्याचे ब्रह्मतेज राखेने झाकलेल्या अग्नीप्रमाणे प्रगट झाले नव्हते, अशा त्या द्विजश्रेष्ठाला उपरोधिकपणे म्हणू लागला. "अरे बंधो, ही पालखी वाहून तू फार थकला आहेस, हे पाहून मला फार वाईट वाटते. या तुझ्या सहकार्यांनी तुला थोडीसुद्धा मदत केली नाही, असे वाटते. इतक्या दूरवरचे अंतर बर्याच वेळापासून तू एकटाच ही पालखी वाहात आहेस. तुझे शरीरसुद्धा विशेष धटेटे-कटेटे आणि ताजेतवाने नाही. शिवाय मित्रा, तू वृद्ध असल्याने दमून गेला आहेस."अशा प्रकारे पुष्कळ उपरोधिक बोलणे ऐकूनही तो पहिल्याप्रमाणेच गुपचूप पालखी उचलून चालू लागला. त्याला या बोलण्याचे काहीच वाईट वाटले नाही. कारण त्याच्या दृष्टीने पंचमहाभूते, इंद्रिये, आणि अंतःकरण यांचा समूह म्हणजे आपले हे अंतिम शरीर (म्हणजे) अविद्येचेच कार्य होय. विविध अंगांनी युक्त असे हे दिसत असून सुद्धा वस्तुतः हे नाहीच, म्हणून त्याविषयीचा त्याचा "मी-माझेपणाचा" मिथ्या आभास संपूर्णपणे नाहीसा झाला होता आणि तो ब्रह्मरूप झाला होता. (५-६) अजूनही पालखी व्यवस्थित नेली जात नाही, असे पाहून रहूगण क्रोधाने लाल होऊन म्हणू लागला-"अरे, हे काय ? तू जिवंत असून मरतुकडयासारखा माझ्या आज्ञेचे उल्लंघन करून माझा अपमान करीत आहेस तू अगदीच निर्लज्ज आहेस. अरे, ज्याप्रमाणे यमराज लोकांना त्यांच्या अपराधासाठी दंड देतात, त्याप्रमाणे मी आता तुला शिक्षा करतो, म्हणजे तू वठणीवर येशील."(७) रहूगणाला आपण राजा असल्याचा अहंकार होता; म्हणून तो अशी पुष्कळशी वायफळ बडबड करीत होता. तो स्वतःला मोठा पंडित समजत असे. म्हणून रज-तमामुळे आलेल्या मस्तीने त्याने भगवंतांच्या प्रीतिपात्र भक्तवर भरताचा तिरस्कार केला. योगेश्वरांच्या लोकविलक्षण आचरणाचा त्याला काहीच पत्ता नव्हता. सर्व प्राण्यांचा सुहृद आणि आत्मा, कोणत्याही प्रकारचा अभिमान नसलेला, ब्रह्मस्वरूप असा तो ब्राह्मण जणू हसत बोलू लागला. (८) ब्राह्मण म्हणाला - हे वीरा, तू वक्रोक्तीने जे म्हणालास, ते योग्यच आहे. त्यात व्यंग्योक्ती मुळीच नाही. भार नावाची काही वस्तू असेल तर ती वाहून नेणार्यासाठी आहे. मार्ग म्हणून काही असेल तर तो चालणार्यासाठी आहे. लठठपणा सुद्धा त्याचाच आहे, हे सर्व शरीरासाठी म्हटले जाते, आत्म्यासाठी नाही. ज्ञानीजन अशा गोष्टी करीत नाहीत. स्थूलता, कृशता, आधी, व्याधी, भूक, तहान, भय, कलह, इच्छा, म्हातारपण, निद्रा, प्रेम, क्रोध, अभिमान आणि शोक हे सर्व धर्म देहाभिमान धरून उत्पन्न होणार्या जीवांमध्ये राहातात, माझ्यामध्ये याचा लवलेशही नाही. हे यशस्वी राजन, तुम्ही जी जगण्या-मरण्याची गोष्ट सांगितलीत ती आदी-अंत असणार्या विकारी पदार्थांमध्ये नियमितपणे असते. जेथे स्वामी-सेवकभाव स्थिर असेल, तेथे आज्ञापालनाचा नियमसुद्धा लागू होतो. आपण राजा आहात आणि मी प्रजा आहे." अशा प्रकारच्या भेद-बुद्धीसाठी मला व्यवहाराखेरीज दुसरे काहीच कारण दिसत नाही. परमार्थदृष्टीने पाहिले तर कोण स्वामी आणि कोण सेवक ? तरीसुद्धा राजन, मी तुमची काय सेवा करू सांगा. वीरवर, मी वेडा, उन्मत्त आणि मूर्खाप्रमाणे आपल्याच स्थितीमध्ये असतो. मला शिक्षा करून तुमच्या हाती काय लागणार ? जर मी मुळातच मूर्ख आणि चुका करणारा असेन तर मला शिक्षा देणे हे दळलेले पीठ पुन्हा दळण्यासारखेच होणार आहे. (९-१३) श्री शुकदेव म्हणतात - मुनिवर, जडभरत यथार्थ तत्त्वाचा उपदेश करीत एवढे उत्तर देऊन गप्प राहिला. त्याचे देहात्मबुद्धीचे कारण अज्ञान नाहीसे झाले होते. म्हणून तो अत्यंत शांत झाला होता. एवढे बोलून भोग भोगून प्रारब्धक्षय करण्यासाठी तो पुन्हा पहिल्याप्रमाणे पालखी खांद्यावर घेऊन चालू लागला. हे परीक्षिता, सिंधु-सौवीर नरेश रहूगणसुद्धा आपल्या पूर्ण श्रद्धेमुळे तत्त्वजिज्ञासेचा पूर्ण अधिकारी होता. जेव्हा त्याने त्या द्विजश्रेष्ठाच्या तोंडून अनेक योगग्रंथांनी समर्थन केलेली आणि हृदयाच्या ग्रंथींचे छेदन करणारी ही वाक्ये ऐकली, तेव्हा तो ताबडतोब पालखीतून खाली उतरला. त्याचा राजमद पूर्णपणे उतरला होता. म्हणून त्याने त्याच्या चरणांवर डोके ठेवून अपराधाची क्षमा मागत म्हटले." आपण ब्राह्मणांचे चिन्ह जानवे धारण केले आहे. अशा प्रकारे गुप्तपणे फिरणारे आपण कोण आहात ? आपण अवधूतांपैकी कोणी आहात का ? आपण कोणाचे पुत्र आहात ? आपला जन्म कोठे झाला आणि इथे आपले येणे कसे झाले ? आपण आमचे कल्याण करण्यासाठी येथे आलेले सत्त्वमूर्ती भगवान कपिलदेव तर नाहीत ना ? मला इंद्राच्या वज्राची, महादेवांच्या त्रिशूलाची किंवा यमराजांच्या दंडाची भीती वाटत नाही. मला अग्नी, सूर्य, चंद्र, वायू किंवा कुबेराच्या शस्त्रांचेही भय वाटत नाही. परंतु ब्राह्मणकुलाच्या अपमानाला मी फार भितो. अशा प्रकारे आपले विज्ञान आणि शक्ती लपवून मूर्खांप्रमाणे वागणारे आपण कोण आहात, ते मला सांगावे. विषयांबद्दल आपण संपूर्णपणे अनासक्त आहात. मला आपला काही थांगपत्ता लागत नाही. साधो, आपल्या योगयुक्त वाक्यांचा बुद्धीने विचार करूनसुद्धा माझा संदेह दूर होत नाही. मी आत्मज्ञानी मुनींचे परम गुरू आणि साक्षात श्रीहरींच्या ज्ञानशक्तीचे अवतार असणार्या योगेश्वर भगवान कपिलांना हे विचारण्यासाठी चाललो होतो की, या लोकी शरण जाण्यासाठी योग्य कोण आहे ? लोकांची स्थिती पाहाण्यासाठी अशा प्रकारे आपले खरे स्वरूप लपवून विहार करणारे ते कपिलमुनी आपणच आहात काय ? घरात आसक्त राहणारा विवेकहीन पुरुष योगेश्वरांची गती कशी जाणू शकेल बरे ? (१४-२०) कर्मांमध्ये श्रम होताना मी स्वतः पाहिले आहे. म्हणून माझे असे अनुमान आहे की, भार खांद्यावर घेऊन चालण्याने आपल्याला निश्चितपणे श्रम होत असतील. मला व्यवहारमार्गच योग्य वाटतो. कारण मिथ्या घडयातून पाणी आणणे इत्यादी कार्ये होत नाहीत. चुलीवर ठेवलेले भांडे जेव्हा अग्नीमुळे तापू लागते, तेव्हा त्यातील पाणी सुद्धा उकळू लागते आणि त्या पाण्याने तांदळाच्या आतील भागसुद्धा शिजतो. याचप्रमाणे आपल्या देह, इंद्रिय, प्राण आणि मन या उपाधींचा स्वीकार केल्यामुळे सान्निध्यामुळे आत्म्यालासुद्धा त्या श्रमाचा अनुभव येतो. आपण जी दंड देणे इत्यादींची व्यर्थता सांगितली, (त्याबाबतीत सांगायचे तर) राजा हा प्रजेचे शासन आणि पालन करण्यासाठी नेमलेला प्रजेचा दासच आहे. त्याने शिक्षा करणे हे पीठ पुन्हा दळण्यासारखे व्यर्थ होऊ शकत नाही. कारण आपल्या धर्माचे पालन करणे ही भगवंतांची सेवाच आहे. ती करणारी व्यक्ती आपली संपूर्ण पापराशी नष्ट करते. (२१-२३) हे दीनबंधो, राजेपणाच्या अभिमानाने उन्मत्त होऊन मी आपल्यासारख्या श्रेष्ठ साधूची अवज्ञा केली आहे. आपण आता माझ्यावर अशी कृपादृष्टी ठेवा की, ज्यामुळे या साधु-अवज्ञारूप अपराधातून मी मुक्त होईन. आपण देहाभिमानशून्य आणि विश्वबंधू श्रीहरींचे अनन्य भक्त आहात. म्हणून सर्वांमध्ये आपली समान दृष्टी असल्याने या मानापमानामुळे आपल्यामध्ये काही विकार उत्पन्न होऊ शकत नाही. तरीसुद्धा आपल्यासारख्या महापुरुषाचा अपमान केल्यामुळे माझ्यासारख्या मनुष्य त्रिशूलधारी महादेवांच्यासारखा प्रभावशाली असला तरी थोडयाच काळात नष्ट होईल. (२५) स्कंध पाचवा - अध्याय दहावा समाप्त |