|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय ९ वा
भरताचा ब्राह्मणकुळात जन्म - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात - शम, दम, तप, स्वाध्याय, वेदाध्ययन, दान, संतोष, सहनशीलता, विनय, विद्या, मत्सर न करणे, आत्मज्ञान आणि आनंद अशा सर्व गुणांनी संपन्न असा अंगिरस गोत्राचा एक ब्राह्मण होता. त्याला ज्येष्ठ पत्नीपासून त्याच्यासारखेच विद्या, शील, आचार, रूप, औदार्य इत्यादी गुणयुक्त नऊ पुत्र झाले आणि कनिष्ठ पत्नीपासून एक पुत्र आणि एक कन्या असे जुळे झाले. या दोघांपैकी जो पुत्र होता, तोच परम भागवत राजर्षि-शिरोमणी भरत होता. मृगशरीराचा त्याग करून शेवटच्या जन्मामध्ये तो ब्राह्मण झाला होता, असे सांगतात. भगवंतांच्या कृपेने या जन्मामध्येसुद्धा आपल्या पूर्वीच्या जन्मपरंपरेचे स्मरण राहिल्यामुळे स्वजनसंगतीने आपला पुन्हा अधःपात होईल या भीतीने त्याने नातलगांची संगत सोडली आणि ज्यांचे श्रवण, स्मरण आणि गुणकीर्तन सर्व प्रकारची कर्मबंधने तोडून टाकते, ते श्रीभगवंतांचे चरणकमलयुगल हृदयात सतत धारण केले. दुसर्यांना मात्र तो स्वतःला वेडा, मूर्ख, आंधळा आणि बहिरा असल्याप्रमाणे दाखवी. (१-३) पित्याचा त्याच्याबद्दलही स्नेहभाव होता. म्हणून ब्राह्मणाने आपल्या वेडसर मुलाचेही शास्त्रानुसार समावर्तनापर्यंतचे सर्व संस्कार केले. आणि उपनयनानंतर त्याची इच्छा नव्हती तरी "शिकविणे हे पित्याचे कर्तव्य आहे" या भावनेने त्याने त्याला शुद्धता, आचमन इत्यादी कर्मांचे शिक्षण दिले. परंतु भरत तर पित्याच्या समक्षच त्याच्या उपदेशाविरुद्ध वागत असे. पावसाळ्यात याचे वेदाध्ययन सुरू करावे अशी पित्याची इच्छा होती. परंतु चैत्र, वैशाख, ज्येष्ठ आणि आषाढ असे चार महिने प्रयत्न करूनही वडील त्याला ओंकार, व्याहृती आणि गायत्रीमंत्र नीट शिकवू शकले नाहीत. (४-५) असे होऊनसुद्धा आपल्या या आत्मवत पुत्रावर अत्यंत प्रेम असल्यामुळे त्याची प्रवृत्ती नसतानाही "पुत्राला चांगल्या प्रकारचे शिक्षण दिले पाहिजे," असा भलताच हटट धरून तो त्याला पावित्र्य, वेदाध्ययन, व्रते, नियम, गुरू आणि अग्नीची सेवा इत्यादी ब्रह्मचर्याश्रमाला आवश्यक नियमांचे शिक्षण देत राहिला. परंतु मुलाच्या बाबतीत त्याची इच्छा पूर्ण झाली नाही आणि स्वतःसुद्धा भगवद्भजन सोडून प्रपंचातच गुरफटून राहिला. तेवढयात नेहमी सावध असणार्या काळाने त्याला ओढून नेले. तेव्हा त्याची धाकटी पत्नी आपल्या दोन्ही मुलांना सवतीकडे सोपवून स्वतः सती होऊन पतिलोकी गेली. (६-७) भरताचे बंधू कर्मकांडच सर्वांत श्रेष्ठ समजत. ते ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत अनभिज्ञ होते; म्हणून त्यांना भरताचा मोठेपणासुद्धा माहित नव्हता. पिता परलोकवासी झाल्यावर त्यांनी त्याला निव्वळ मूर्ख समजून शिकविणे सोडून दिले. जेव्हा सामान्य माणसे त्याला वेडा, मूर्ख किंवा बहिरा म्हणत, तेव्हा तो त्याला अनुरूप बोलत असे. कोणीही त्याच्याकडून कोणतेही काम करून घेण्याची इच्छा करी, तेव्हा तो त्यानुसार करी. कधी वेठबिगाराच्या रूपात, कधी मजुराच्या रूपात. मागितल्यावर किंवा न मागताही जे काही थोडे-फार चांगले, किंवा वाईट अन्न त्याला मिळत असे, ते जिभेची चव न पाहाता तो खात असे. अन्य कोणत्याही कारणाने उत्पन्न न होणारे स्वतःसिद्ध केवल आनंदस्वरूप आत्मज्ञान त्याला प्राप्त झाले होते; म्हणून थंडी-उष्णता, मानापमान इत्यादी द्वंद्वांनी होणार्या सुख-दुःखामध्ये त्याला देहाची जाणीव होत नसे. तो थंडी, उन्हाळा, पाऊस किंवा वादळाच्या वेळी बैलासारखा कपडे न घालताच पडून राही. त्याचे सर्व अंग धष्ट-पुष्ट आणि गलेलठठ होते. तो जमिनीवरच पडून राही. कधी तेल-उटणे लावीत नसे की कधी स्नानही करीत नसे. त्याचे शरीर धुळीने माखल्यामुळे धुळीने झाकलेल्या मौल्यवान रत्नाप्रमाणे त्याचे ब्रह्मतेज झाकले गेले होते. तो आपल्या कमरेला एक मलीन कपडा गुंडाळीत असे. त्याचे जानवेसुद्धा अत्यंत मळलेले होते. त्यामुळे अज्ञानी लोक " हा कोणी नावाचा ब्राह्मण आहे," असे म्हणून त्याचा तिरस्कार करीत. परंतु याच्यावर काहीही विचार न करता तो स्वच्छंदपणे फिरत असे. दुसर्य़ांच्या घरी मजुरी करून पोट भरत आहे असे पाहून त्याला त्याच्या भावांनी शेतातील वाफे व्यवस्थित करण्याच्या कामाला लावले, तेव्हा तो तेही काम करू लागला. परंतु त्या वाफ्याची जमीन सपाट आहे की, उंचवटा-खोली असलेली आहे, लहान आहे की मोठी, याकडेही त्याचे लक्ष नसे. त्याचे भाऊ त्याला तांदळाची कणी, पेंड, भुसा, किडलेले उडीद किंवा भांडयांना लागलेले जळके अन्न जे काही देत, ते घेऊन तो अमृताप्रमाणे समजून खात असे. (८-११) एकदा एका डाकूंच्या सरदाराने पुत्रकामनेने भद्रकालीला मनुष्य-बळी देण्याचा संकल्प केला. त्याने जो पुरुष देण्यासाठी पकडून आणला होता, तो आपल्या नशिबाने त्यांच्या हातून निसटून पळून गेला. त्याला शोधण्यासाठी त्याचे सेवक चहूकडे धावले; परंतु अंधार्या मध्यरात्रीच्या वेळी त्याचा कोठेही पत्ता लागला नाही. याच वेळी दैवयोगाने त्यांची नजर अकस्मात या अंगिरसगोत्राच्या ब्राह्मणकुमारावर पडली. तो वीरासनात बसून हरिण डुकरे इत्यादी प्राण्यांपासून शेताचे रक्षण करीत होता. हा मनुष्यपशू कितीतरी चांगल्या लक्षणांनी युक्त आहे, याच्यामुळे आमच्या धन्याचे कार्य निश्चितच सिद्धीला जाईल, असा विचार करून त्यांचे मुख आनंदाने उल्हसित झाले आणि ते त्याला दोरीने बांधून चंडिकेच्या मंदिरात घेऊन आले. (१२-१४) नंतर त्या चोरांनी आपल्या पद्धतीनुसार विधिपूर्वक त्याला स्नान घालून, नवीन वस्त्रे नेसवून, तसेच अनेक प्रकारची आभूषणे, चंदन, पुष्पमाळा व तिलक इत्यादींनी विभूषित करून चांगल्या तर्हेने जेवू घातले. नंतर धूप, दीप, माळा, लाह्या, पत्री, अंकूर, फळे इत्यादी उपहारसामग्रीसहित बलिदानाच्या पद्धतीनुसार गाणे, स्तुती, मृदंग, व ढोल वाजवणे इत्यादी करीत त्या पुरुषपशूला त्यांनी भद्रकालीच्या समोर बसविले. यानंतर दस्युराजाचा पुरोहित असलेल्या लुटारूने त्या नरपशूच्या रक्ताने देवीला तृप्त करण्यासाठी देवीमंत्रांनी अभिमंत्रित केलेली एक तीक्ष्ण तलवार घेतली. (१५-१६) स्वभावाने चोर रजोगुणी-तमोगुणी तर होतेच. (शिवाय) धनाच्या मदाने त्यांचे चित्त आणखीच उन्मत्त झाले होते. हिंसेची त्यांना स्वाभाविक आवड होती. यावेळी तर ते भगवंतांच्या अंशस्वरूप ब्राह्मणकुलाचा तिरस्कार करून स्वच्छंदपणे कुमार्गाकडे चालले होते. हिंसेच्या बाबतीत ब्राह्मण-वधाचा सर्वथैव निषेध केला आहे. तरीसुद्धा ते साक्षात ब्रह्मभावाला प्राप्त झालेल्या वैरहीन आणि सर्व प्राण्यांचा सुहृद असलेल्या एका ब्रह्मर्षिकुमाराचा बळी देऊ इच्छित होते. हे भयंकर कुकर्म पाहून देवी भद्रकालीच्या मूर्तीत अत्यंत दुःसह ब्रह्मतेजामुळे दाह होऊ लागला आणि ती एकदम मूर्ती फोडून प्रगट झाली. अत्यंत असह्य अशा क्रोधामुळे तिच्या भुवया उंचावल्या होत्या आणि अक्राळ-विक्राळ दाढा आणि मोठे झालेले लाल डोळे यांमुळे तिचा चेहरा अत्यंत भयानक दिसत होता. तिचा तो भयंकर आवेश पाहून असे वाटत होते की, जणू ती या जगाचा संहार करील. तिने क्रोधाने लाल होऊन भीषण हास्य केले आणि उसळी मारून त्याच अभिमंत्रित केलेल्या खड्गाने त्या सर्व पापी लोकांची मस्तके तिने उडविली आणि आपल्या गणांसह त्यांच्या गळ्यांतून वाहाणारे रक्तरूपी मद्य पिऊन अतिपानाने धुंद होऊन उंच स्वराने गात नाचत त्यांच्या मुंडक्यांचेच चेंडू बनवून ती खेळू लागली. महापुरुषांवर केलेला अत्याचाररूप अपराध ‘जशास तसे’ या न्यायाने असाच आपल्यावर उलटतो. परीक्षिता ! ज्यांचे देहाभिमानरूप बळकट बंधन तुटलेले आहे, जे सर्व प्राण्यांचे सुहृद आणि आत्मा तसेच वैरहीन आहेत, साक्षात भगवंतच भद्रकाली इत्यादी भिन्न भिन्न रूपे धारण करून आपल्या कधी न चुकणार्या कालचक्ररूप श्रेष्ठ चक्राने ज्यांचे रक्षण करतात आणि ज्यांनी भगवंतांच्या निर्भय चरणकमलांचा आश्रय घेतला आहे, त्या भगवद्भक्त परमहंसांवर आपले डोके उडविले जाण्याची वेळ आली, तरी ते कोणत्याही प्रकारे व्याकूळ होत नाहीत, यात काही मोठे आश्चर्य नाही. (१७-२०) स्कंध पाचवा - अध्याय नववा समाप्त |