श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ६ वा - अध्याय १७ वा

चित्रकेतूला पार्वतीदेवींचा शाप -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात - ज्या दिशेला भगवान संकर्षण अंतर्धान पावले होते, त्या दिशेला विद्याधर चित्रकेतूने नमस्कार केला आणि तो आकाशमार्गाने स्वच्छंदपणे विहार करू लागला. (१)

महायोगी चित्रकेतू कोटयवधी वर्षेपर्यंत सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करणार्‍या सुमेरू पर्वताच्या दर्‍यांतून विहार करीत राहिला. या काळात त्याच्या शरीरातील बळ आणि इंद्रियांची शक्ती अबाधित राहिली. मोठमोठे मुनी, सिद्ध, चारण त्याची स्तुती करीत असत. त्याच्या प्रेरणेने विद्याधरांच्या स्त्रिया त्याच्याजवळ सर्वशक्तिमान भगवंतांचे गुण आणि लीला यांचे गायन करीत असत. (२-३)

एक दिवस चित्रकेतू भगवंतांनी दिलेल्या तेजस्वी विमानात बसून जात असता मुनींच्या सभेत सिद्ध-चारणांच्या मध्यभागी, भगवान शंकर भगवती पार्वतीला आपल्या मांडीवर घेऊन एका हाताने तिला आलिंगन देत आहेत, असे त्याने पाहिले. ते पाहून चित्रकेतू त्यांच्याजवळ गेला आणि मोठयाने हसू लागला व पार्वतीदेवींना ऐकू जाईल अशा रीतीने म्हणू लागला. (४-५)

चित्रकेतू म्हणाला - हे सार्‍या लोकांना धर्म शिकवणारे त्यांचे गुरू आहेत. हे सर्वश्रेष्ठ असून भर सभेमध्ये आपल्या पत्नीला चिकटून बसले आहेत. हे जटाधारी मोठे तपस्वी, आणि ब्रह्मज्ञान्यांचे सभापती असूनही साधारण मनुष्याप्रमाणे निर्लज्जपणे पत्नीला मांडीवर घेऊन बसले आहेत. सामान्य पुरुषसुद्धा बहुधा एकांतातच स्त्रियांच्या जवळ राहातात. परंतु हे एवढे मोठे तपस्वी असूनही भरसभेत पत्नीला जवळ घेऊन बसले आहेत. (६-८)

श्रीशुकदेव म्हणतात - परीक्षिता, भगवान शंकर अत्यंत विवेकी असल्यामुळे चित्रकेतूचे हे अर्वाच्य बोलणे ऐकूनही हसून गप्प राहिले. त्या सभेत बसलेले त्यांचे भक्तही गप्प रहिले. चित्रकेतूला भगवान शंकरांचे सामर्थ्य माहीत नव्हते. म्हणून तो त्यांच्याविषयी वाटेल ते बोलत होता. संयमीपणाचा गर्व झालेल्या त्याचा हा उद्धटपणा पाहून देवी पार्वती क्रोधाने म्हणाल्या. (९-१०)

पार्वतीदेवी म्हणाल्या - अहो ! या जगात सध्या आमच्यासारख्या दुष्ट आणि निर्लज्जांचा तिरस्कार करून त्यांना शिक्षा करणारा सत्ताधारी हाच आहे काय ? असे वाटते की, ब्रह्मदेव, भृगू, नारद इत्यादी त्यांचे पुत्र, सनकादिक, कपिल मनू इत्यादी महापुरुष धर्माचे रहस्य जाणत नसावेत. म्हणूनच ते धर्ममर्यादेचे उल्लंघन करणार्‍या भगवान शिवांना या गोष्टीपासून परावृत्त करीत नाहीत. हे महापुरुष ज्यांच्या चरणकमलांचे ध्यान करीत असतात, त्या मंगलांनाही मंगल बनविणार्‍या साक्षात जगद्‍गुरू भगवंतांचा आणि त्यांच्या ज्ञानी भक्तांचा या अधम क्षत्रियाने तिरस्कार करून त्यांना दंड देण्याचा विचार केला आहे. म्हणून ह्या उद्धटालाच शासन केले पाहिजे. मोठेपणाचा गर्व असणारा हा घमेंडखोर, ज्यांची उपासना सत्पुरुष करतात, त्या भगवान श्रीहरींच्या चरणकमलांजवळ राहाण्यास योग्य नाही. म्हणून हे दुष्टा, तू पापमय असुरयोनीत जा. पोरटया, त्यामुळे तू पुन्हा या जगात महापुरुषांचा अपराध करू धजणार नाहीस. (११-१५)

श्रीशुकदेव म्हणतात - परीक्षिता, जेव्हा पार्वतींनी चित्रकेतूला असा शाप दिला, तेव्हा तो विमानातून खाली उतरला आणि मस्तक लववून त्यांना प्रसन्न करू लागला. (१६)

चित्रकेतू म्हणाला - हे माते, मी माझ्या ओंजळीत आपल्या शापाचा स्वीकार करतो; कारण देव मनुष्यांना जे काही म्हणतात, ते त्यांच्या प्रारब्धानुसार त्यांना मिळणार्‍या फळाची केवळ पूर्वसूचना असते. अज्ञानाने मोहित झालेला जीव या संसारचक्रात भटकत असता नेहमी सगळीकडे सुख आणि दुःख भोगीतच असतो. आपण किंवा दुसरे सुखदुःख देणारे नसतात. अज्ञानी मनुष्यच आपल्याला किंवा दुसर्‍याला सुखदुःखाचा कर्ता मानतो. हे जग हा सत्त्वादी गुणांचा प्रवाह आहे. यात शाप, कृपा, स्वर्ग, नरक, सुख किंवा दुःख यांना काय अर्थ आहे ? (१७-२०)

एकमात्र परिपूर्ण भगवंतच आपल्या मायेने सर्व प्राण्यांना उत्पन्न करून त्यांच्यासाठी बंधन, मोक्ष, सुख, दुःख इत्यादी निर्माण करतात. भगवान श्रीहरी सर्वांमध्ये समान आणि मायादी दोषरहित आहेत. त्यांना कोणीही प्रिय-अप्रिय, सगा-सोयरा, आपला-परका नाही. त्यांना जर सुखाचा लोभ नाही, तर क्रोध तरी कोठून असणार ? परंतु त्यांच्या मायाशक्तीचे कार्य असलेले पाप आणि पुण्यच प्राण्यांच्या सुख-दुःख, हित-अहित, बंधन-सुटका, जन्म-मृत्यू आणि संसार याला कारणीभूत ठरते. म्हणून हे पतिव्रते देवी, शापातून मुक्त होण्यासाठी मी आपली प्रार्थना करत नाही. आपल्याला मी अयोग्य बोललो असे वाटले, त्याबद्दल मला क्षमा करावी. (२१-२४)

श्रीशुक म्हणतात - हे परीक्षिता, शिव-पार्वतींना अशा रीतीने प्रसन्न करून, ते आश्चर्याने त्याच्याकडे पाहात असता, त्यांच्यासमोरच चित्रकेतू विमानात बसून निघून गेला. तेव्हा भगवान शंकर देवता, ऋषी, दैत्य, सिद्ध आणि गण यांच्यासमोरच पार्वतीला म्हणाले - (२५-२६)

भगवान शंकर म्हणाले - हे सुंदरी, दिव्यलीला करणार्‍या भगवंतांच्या निःस्पृह आणि थोर अशा दासानुदासांचा महिमा तू पाहिलास ना ! जे लोक भगवंतांना शरण जातात, ते कशालाही भीत नाहीत. कारण त्यांना स्वर्ग, मोक्ष आणि नरक हे सारखेच वाटतात. भगवंतांच्या लीलेनेच जीवांचा देहाशी संयोग होऊन त्यांना सुख-दुःख, जन्म-मरण, शाप-वर ही द्वंद्वे प्राप्त होतात. जसे, स्वप्नामध्ये स्वप्न आपल्याहून वेगळे वाटल्यामुळे त्यातील पदार्थ वेगळे वाटतात. किंवा जागेपणी भ्रमामुळेच दोरीच्या ठिकाणी सर्प आहे, असे वाटते. त्याचप्रमाणे मनुष्याला अज्ञानाने आत्म्यामध्येच देव, मनुष्य इत्यादी प्रकारचा भेद वाटतो. ज्यांच्याजवळ ज्ञान आणि वैराग्याची शक्ती आहे आणि ज्यांची भगवान वासुदेवांच्या ठिकाणी भक्ती असते, त्यांच्यासाठी या जगात त्यांच्याखेरीज दुसरी कोणतीच वस्तू आश्रय घेण्याजोगी नाही. मी, ब्रह्मदेव, सनकादिक, नारद, ब्रह्मदेवांचे पुत्र भृगू इत्यादी मुनी आणि श्रेष्ठ देव यांपैकी कोणीही भगवंतांच्या लीलेचे रहस्य जाणू शकत नाहीत. तर मग जे त्यांच्या अंशाचेही अंश असताना स्वतःला त्यांच्यापासून वेगळे आणि स्वतःला कर्ते मानतात, ते त्यांचे स्वरूप कसे जाणू शकतील ? भगवंतांना कोणी प्रिय नाही की कोणी अप्रिय नाही. त्यांना आपला किंवा परका असा कोणी नाही. ते सर्व प्राण्यांचे आत्मा आहेत. म्हणून सर्व प्राण्यांचे प्रियतम आहेत. हा भाग्यवान चित्रकेतू त्यांचा प्रिय भक्त, शांत आणि सर्वत्र समदर्शी आहे. आणि मीसुद्धा भगवान श्रीहरींना प्रिय आहे. म्हणून भगवंतांचे प्रिय भक्त, शांत, समदर्शी अशा महात्म्या पुरुषांच्या बाबतीत तुला मुळीच आश्चर्य वाटू नये. (२७-३५)

श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, भगवान शंकरांचे हे भाषण ऐकून पार्वतीदेवींची चित्तवृत्ती शांत झाली, आणि आश्चर्य मावळले. भगवंतांचा भक्त चित्रकेतूसुद्धा पार्वतीदेवींना उलट शाप देऊ शकत होता. परंतु त्याने त्यांचा शाप मस्तकी धारण केला. हेच साधुपुरुषाचे लक्षण आहे. हाच चित्रकेतू दानवयोनीत त्वष्टयाच्या दक्षिणाग्नीपासून उत्पन्न झाला. तेथे त्याचे वृत्रासुर नाव पडले आणि तेथेसुद्धा हा ज्ञानविज्ञानसंपन्न राहिला. तू मला विचारले होतेस की, वृत्रासुराचा जन्म दैत्ययोनीत का झाला आणि त्याला भगवंतांची भक्ती कशी प्राप्त झाली, त्याचे सर्व विवरण मी तुला सांगितले. महात्म्या चित्रकेतूचा हा पवित्र इतिहास आणि विष्णुभक्तांचे माहात्म्य जो ऐकतो, तो संसारबंधनापासून मुक्त होतो. जो मनुष्य प्रातःकाळी उठून मौन राहून श्रद्धेने, भगवंतांचे स्मरण करीत ह्या इतिहासाचा पाठ करतो, त्याला परमगती प्राप्त होते. (३६-४१)

स्कंध सहावा - अध्याय सतरावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP