श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ५ वा - अध्याय ६ वा

ऋषभदेवांचा देहत्याग -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

राजा परीक्षिताने विचारले - भगवन, योगरूप वायूने प्रज्वलित झालेल्या ज्ञानाग्नीमुळे ज्यांची रागद्वेषादी कर्मबीजे दग्ध झाली आहेत, त्या आत्माराम मुनींना अणिमादी सिद्धी स्वतःहून प्राप्त झाल्या, तरी त्या त्यांना कष्टदायक होत नाहीत. असे असताही भगवान ऋषभांनी त्यांचा स्वीकार का केला नाही ? (१)

श्रीशुकदेव म्हणाले - तुझे म्हणणे बरोबर आहे. परंतु व्यवहारात ज्याप्रमाणे चतुर शिकारी आपण पकडलेल्या हरिणावर विश्वास ठेवीत नाही, त्याचप्रमाणे बुद्धिमान लोक या चंचल चित्तावर विश्वास ठेवीत नाहीत. म्हटलेच आहे की, "या चंचल चित्ताशी कधी मैत्री करू नये. याच्यावर विश्वास ठेवल्यानेच योग्यांचे चिरकाल केलेले श्रेष्ठ तपही क्षीण झाले होते. जसे व्यभिचारिणी स्त्री स्वतःवर विश्वास ठेवलेल्या पतीचा विश्वासघात करते, त्याप्रमाणे जे योगी मनावर विश्वास ठेवतात, त्यांचे मन, काम आणि त्याचे साथीदार क्रोधादी शत्रूंना आक्रमण करण्याची संधी देऊन योग्यांना पथभ्रष्ट करते. काम, क्रोध, मद, लोभ, शोक, मोह, भय, इत्यादी शत्रूंचे, तसेच कर्मबंधनाचे मूळ मनच आहे. मग कोणताही बुद्धिमान पुरुष त्याच्यावर विश्वास कसा ठेवील ? (२-५)

म्हणूनच भगवान ऋषभदेव इंद्रादी सर्व लोकपालांचेसुद्धा जरी भूषण होते, तरी ते वेडयांप्रमाणे बैराग्यासारख्या वेष, भाषा, आणि आचरणाने आपला दैवी प्रभाव झाकून ठेवून राहात होते. शेवटी, योग्यांच्या देहत्यागाचा विधी शिकविण्यासाठी त्यांनी आपले शरीर त्या रीतीने टाकून देण्याची इच्छा केली. आपल्या अंतःकरणामध्ये अभेदरूपाने स्थित असलेल्या परमात्म्याला अभिन्नरूपाने पाहात त्यांनी वासनामुक्त होऊन लिंगदेहाचा अभिमान टाकून दिला. अशा प्रकारे लिंगदेहाच्या अभिमानाने मुक्त भगवान ऋषभदेवांचे शरीर केवळ योगमायेच्या इच्छेमुळे अभिमानाचा आभास पांघरून या पृथ्वीवर फिरत राहिले. ते योगायोगाने कोकण, वेंकटाचल, कुटक इत्यादी दक्षिण कर्नाटक देशांमध्ये गेले आणि तोंडात दगडाचा तुकडा ठेवून तसेच विखुरलेले केस व वेडयांप्रमाणे दिगंबर अवस्थेत कुटकाचलाच्या वनामध्ये फिरू लागले. याचवेळी झंझावाताने एकमेकांवर घासलेल्या वेळूंमुळे प्रचंड वणवा भडकला आणि त्याने सार्‍या वनाला लपेटून ऋषभदेवांसह भस्मसात केले. (६-८)

ज्यावेळी कलियुगामध्ये अधर्माची वृद्धी होईल, त्यावेळी कोकण, वेंकटाद्री आणि कुटक देशाचा मंदमती राजा अर्हत तेथील लोकांकडून ऋषभदेवांच्या कोणत्याही आश्रमरहित आचरणाचा वृत्तांत ऐकून ते आचरण स्वतः शिकेल आणि लोकांच्या पूर्वकर्मानुसार कोणतेही भय न बाळगता, स्वधर्माचरणाचा त्याग करून आपल्या बुद्धीने अनुचित आणि नास्तिकतापूर्ण कुमार्गाचा प्रचार करील. परिणामी कलियुगात देवमायेने मोहित झालेले अनेक अधम लोक आपल्या शास्त्राने सांगितलेली पवित्रता आणि आचरण सोडून देतील. अधर्मप्रधान कलियुगाच्या प्रभावाने बुद्धिहीन झाल्यामुळे ते स्नान न करणे, आचमन न करणे, अस्वच्छ राहणे, केस उपटणे इत्यादी ईश्वराचा तिरस्कार करणार्‍या नास्तिक धर्माचा मनमानीपणे स्वीकार करतील आणि विशेषतः वेद, ब्राह्मण आणि भगवान यज्ञपुरुषाची निंदा करू लागतील. आपल्या या वेदांना मान्य नसलेल्या नवीन स्वच्छंदी प्रवृत्तीमध्ये अंधविश्वास ठेवून ते तसे वागतील आणि स्वतःच घोर नरकात जाऊन पडतील. (९-११)

रजोगुणाने परिपूर्ण अशा लोकांना मोक्षमार्गाचे शिक्षण देण्यासाठीच हा ऋषभदेवांचा अवतार झाला होता. त्याच्या गुणांचे वर्णन करीत लोक असे म्हणतात की, अहो ! सात समुद्र असणार्‍या पृथ्वीच्या सर्व द्वीप आणि वर्षे यांमध्ये हे भारतवर्ष मोठी पुण्यभूमी आहे. कारण येथील लोक श्रीहरींच्या कल्याणकारक अवतार-चरित्रांचे गायन करतात. अहो ! महाराज प्रियव्रतांचा वंश सुयशाने उजळलेला आहे. ज्यामध्ये पुराणपुरुष श्री आदिनारायणांनी ऋषभावतार घेऊन मोक्षप्राप्ती करून देणार्‍या परमहंसधर्माचे आचरण केले. अहो ! या जन्मरहित भगवान ऋषभदेवांच्या मार्गाने दुसरा कोणताही योगी मनाने सुद्धा कसा चालू शकेल ? कारण योगीजन ज्या योगसिद्धींच्या प्राप्तीसाठी उत्सुक होऊन निरंतर प्रयत्‍न करीत राहातात, त्या आपोआप प्राप्त होऊन सुद्धा यांनी त्यांना मिथ्या समजून त्यांचा त्याग केला होता. (१२-१५)

अशा प्रकारे संपूर्ण वेद, लोक, देवता, ब्राह्मण आणि गायींचे परमगुरू भगवान ऋषभदेवांचे हे विशुद्ध चरित्र मी तुला ऐकविले. हे माणसांचे सर्व पाप नाहीसे करणारे आहे. जो मनुष्य हे परम-मंगलमय पवित्र चरित्र एकाग्रचित्ताने श्रद्धापूर्वक नेहमी ऐकतो किंवा दुसर्‍याला ऐकवितो, त्या दोघांचीही भगवान वासुदेवांमध्ये अनन्य भक्ती निर्माण होते. पंडित निरनिरळ्या पापांमुळे उत्पन्न होणार्‍या सांसारिक तापांनी अत्यंत तापलेले आपले अंतःकरण ह्या भक्तिसरितेमध्ये निरंतर धुऊन काढतात. यामुळे त्यांना जी परम शांती मिळते, ती इतकी आनंददायी असते की, ते लोक नंतर तिच्या बदल्यात स्वतःहून प्राप्त झालेल्या मोक्षरूप परम पुरुषार्थाचाही आदर करीत नाहीत. भगवंतांचे आप्त झाल्यामुळेच त्यांचे सर्व पुरुषार्थ सिद्ध होतात. (१६-१७)

राजन, भगवान श्रीकृष्ण स्वतः पांडवांचे आणि यदुवंशीयांचे रक्षणकर्ते, गुरू, इष्टदेव, सुहृद आणि कुलपती होते. ते कधी कधी त्यांचे आज्ञाधारक सेवकसुद्धा होत असत. अशा प्रकारे भगवान भक्तांची दुसरी अनेक कार्ये करतात. प्रसंगी त्यांना मुक्तीसुद्धा देतात. परंतु भक्तियोग सहजासहजी देत नाहीत. (१८)

नेहमी विषयभोगांची अभिलाषा केल्याकारणाने आपल्या खर्‍याखुर्‍या कल्याणाबद्दल अनंत काळापर्यंत जाणीव नसलेल्या लोकांना ज्यांनी करुणा येऊन निर्भय आत्मज्ञानाचा उपदेश केला आणि जे स्वतः नेहमी अनुभवाला येणार्‍या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीमुळे सर्व प्रकारच्या इच्छांपासून मुक्त होते, त्या भगवान ऋषभदेवांना नमस्कार असो. (१९)

स्कंध पाचवा - अध्याय सहावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP