|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय ७ वा
भरताचे चरित्र - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात - महाराज भरत मोठे भगवद्भक्त होते. भगवान ऋषभदेवांनी पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपल्या संकल्पानुसार त्यांची नियुक्ती केली. त्यांच्या आज्ञेत राहून भरतांनी विश्वरूपाची कन्या पंचजनी हिच्याशी विवाह केला. जशी तामस अहंकारापासून शब्दादी पाच भूततन्मात्रे उत्पन्न होतात, त्याचप्रमाणे पंचजनीपासून त्यांना सुमती, राष्ट्रभृत, सुदर्शन, आवरण आणि धूम्रकेतू नावाचे पाच पुत्र झाले. ते तंतोतंत त्यांच्यासारखेच होते. ज्या देशाचे नाव अगोदर ‘अजनाभवर्ष’ होते, त्याच या देशाला भरताच्या वेळेपासून ‘भारतवर्ष’ म्हणतात. (१-३) महाराज भरत बहुश्रुत होते. आपल्या पूर्वजांप्रमाणे स्वधर्माने वागून ते आपापल्या कर्तव्यात तत्पर असलेल्या प्रजेचे अत्यंत प्रेमाने पालन करू लागले. त्यांनी होता, अध्वर्यू, उद्गाता आणि ब्रह्मा या चार ऋत्विजांच्या द्वारा केले जाणारे प्रकृती आणि विकृती असे दोन्ही प्रकारचे अग्निहोत्र, दर्श, पूर्णमास, चातुर्मास्य, पशू आणि सोम असे लहान-मोठे यज्ञ योग्यवेळी श्रद्धापूर्वक करून यज्ञ आणि क्रतुरूप श्रीभगवंतांचे पूजन केले. अशा प्रकारे अंग आणि क्रियांसह भिन्न भिन्न यज्ञांच्या अनुष्ठानांच्या वेळी जेव्हा अध्वर्यू आहुती देण्यासाठी हवी हातात घेत असत, तेव्हा यजमान भरत त्या यज्ञकर्माने होणार्या पुण्यरूप फळाला यज्ञपुरुष भगवान वासुदेवांना अर्पण करीत. वास्तविक ते परब्रह्मच इंद्रादी सर्व देवतांचे प्रकाशक, मंत्रांचे अर्थस्वरूप आणि त्या देवतांचेसुद्धा नियंत्रक असल्याकारणाने मुख्य कर्ता आणि प्रधान देव आहे. अशा प्रकारे आपल्या भगवदर्पणबुद्धिरूप कुशलतेने हृदयातील रागद्वेषादी दोषांचे निर्मूलन करीत ते सर्व यज्ञभोक्त्या देवतांचे भगवंतांच्या अवयवांच्या रूपात चिंतन करीत. अशा तर्हेने केलेल्या कर्माच्या भगवदर्पणाने त्यांचे अंतःकरण शुद्ध झाले. तेव्हा त्यांना अंतर्यामीरूपाने हृदयाकाशातच अभिव्यक्त होणार्या ब्रह्मस्वरूप, महापुरुषांच्या आकाराने युक्त, तसेच श्रीवत्स, कौस्तुभ, वनमाला, चक्र, शंख आणि गदा यांनी सुशोभित आणि नारदादी भक्तांच्या हृदयात चित्राप्रमाणे निश्चलतेने राहाणार्या भगवान वासुदेवांच्या ठिकाणी दिवसेंदिवस वेगाने वाढणारी उत्कृष्ट भक्ती प्राप्त झाली. (४-७) अशा प्रकारे एक कोटी वर्षांनी राज्यभोगाचे आपले प्रारब्ध क्षीण झाले आहे, असे जाणून त्यांनी आपण भोगलेली वंशपरंपरागत संपत्ती पुत्रांना योग्य तर्हेने वाटून दिली. नंतर आपल्या सर्वसंपत्तिसंपन्न राजमहालातून निघून ते पुलहाश्रमात हरिहर क्षेत्री गेले. या पुलहाश्रमात राहणार्या भक्तांवर भगवंतांचे फार प्रेम असल्यामुळे ते आजही त्यांना त्यांच्या इष्ट रूपामध्ये भेटतात. खाली आणि वर अशा दोन्ही बाजूंना नाभीप्रमाणे चिन्ह असणारे शालग्राम असणारी चक्रनदी (गंडकी) नावाची प्रसिद्ध नदी येथील ऋषींचे आश्रम सर्व बाजूंनी पवित्र करीत असते. (८-१०) त्या पुलहाश्रमाच्या उपवनात एकांत स्थानी एकटयानेच राहून ते अनेक प्रकारची पाने, फुले, तुलसीदल, पाणी आणि कंदमुळे-फळे इत्यादी अर्पण करून भगवंतांची आराधना करू लागले. यामुळे त्यांचे अंतःकरण सर्व विषयाभिलाषांपासून परावृत्त होऊन शांत झाले आणि त्यांना परमानंद प्राप्त झाला. अशा रीतीने जेव्हा ते नियमपूर्वक भगवंतांची आराधना करू लागले, तेव्हा त्यांचा प्रेमावेग इतका वाढला की, त्यांचे हृदय द्रवून शांत झाले. आनंदाच्या ऊर्मीमुळे शरीरावर रोमांच येऊ लागले. भक्तीच्या उद्रेकाने डोळ्यांमधून प्रेमाश्रू वाहू लागले. त्यामुळे इतर काही दिसेनासे झाले. शेवटी जेव्हा आपल्या प्रियतमाच्या लालसर चरणारविंदांच्या ध्यानामुळे भक्तियोग पूर्णत्वाला पोचला, तेव्हा परमानंदाने तुडुंब भरलेल्या हृदयरूप गंभीर सरोवरामध्ये बुद्धी बुडून गेल्यामुळे त्यांना आपण करीत असलेल्या भगवत्पूजेचेही स्मरण राहिले नाही. अशा प्रकारे ते भगवत्सेवेतच तत्पर राहात असत. शरीरावर कृष्णमृगचर्म धारण करीत असत आणि त्रिकाल स्नानानंतर ओले राहिल्याने त्यांची केस भुरकट कुरळ्या जटांसारखे झाले होते. त्यामुळे ते अधिकच सुंदर दिसत. उगवणार्या सूर्यमंडलामध्ये ज्योतिर्मय परम पुरुष भगवान नारायणांची ते सूर्यासंबंधी ऋचांनी आराधना करीत व म्हणत असत. "भगवान सूर्यांचे कर्मफलदायक तेज प्रकृतीच्याही पलीकडचे आहे. त्यांनीच संकल्पाने या जगाची उत्पत्ती केली आहे. नंतर तेच अंतर्यामीरूपाने प्रविष्ट होऊन आपल्या चित्शक्तीने विषयलोलुप जीवांचे रक्षण करतात. आम्ही त्या बुद्धिप्रवर्तक तेजाला शरण आहोत." (११-१४) स्कंध पाचवा - अध्याय सातवा समाप्त |