श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ५ वा - अध्याय ५ वा

ऋषभांचा आपल्या पुत्रांना उपदेश आणि स्वतः अवधूतवृत्ती धारण करणे -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीऋषभदेव म्हणाले - पुत्रांनो, हे मनुष्यशरीर या मर्त्य लोकात दुःखमय विषयभोग प्राप्त करण्यासाठी नाही. हे भोग तर विष्ठा भक्षण करणार्‍या डुक्कर-कुत्री इत्यादींनाही मिळतात. या शरीराने ज्यामुळे अंतःकरण शुद्ध होईल, असे दिव्य तपच केले पाहिजे, कारण त्यामुळेच अनंत ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. शास्त्रांनी महापुरुषांच्या सेवेला मुक्तीचे तर स्त्रीसक्त कामी लोकांच्या सहवासाला नरकाचे द्वार म्हटले आहे. समचित्त, परमशांत, क्रोधहीन, सर्वांचे हितचिंतक आणि सदाचारसंपन्न जे आहेत, त्यांनाच महापुरुष म्हटले जाते. किंवा मज परमात्म्यावर प्रेम करणे हाच एकमेव पुरुषार्थ मानणारे, केवळ विषय़ांचीच चर्चा करणार्‍या लोकांविषयी तसेच स्त्री, पुत्र, धन इत्यादी सामग्रींनी संपन्न घरांविषयी ज्यांना अनास्था आहे आणि जे लौकिक कार्यांमध्ये केवळ शरीरनिर्वाहापुरतेच प्रवृत्त होतात, तेच महापुरुष होत. मनुष्य निश्चितच प्रमादवश होऊन कुकर्मे करू लागतो. इंद्रियांना तृप्त करण्यासाठीच त्याची अशी प्रवृत्ती होते. मी हे योग्य समजत नाही. कारण यामुळेच आत्म्याला हे नाशवंत आणि दुःखदायक शरीर प्राप्त होते. जोपर्यंत जीवाला आत्मतत्त्वाबद्दल जिज्ञासा निर्माण होत नाही, तोपर्यंत अज्ञानाने देहादिकांमुळे त्याचे स्वरूप लपलेले असते. जोपर्यंत हा लौकिक-वैदिक कर्मांमध्ये गढलेला असतो, तोपर्यंत मनामध्ये कर्मांच्या वासनाही शिल्लक असतात आणि त्यामुळेच देहबंधन प्राप्त होते. अशा प्रकारे अविद्येने आत्मस्वरूप झाकले गेल्याने कर्मवासनांच्या अधीन असलेले चित्त मनुष्याला पुन्हा कर्मांमध्येच प्रवृत्त करते. म्हणून जोपर्यंत मज वासुदेवात प्रीती निर्माण होत नाही, तोपर्यंत तो देहबंधनातून सुटू शकत नाही. स्वार्थामुळे वेडा झालेला जीव जोपर्यंत विवेकदृष्टिचा आश्रय घेऊन इंद्रियांचे चोचले पुरविणे हे व्यर्थ आहे, असे समजत नाही, तोपर्यंत आत्मस्वरूपाचे विस्मरण झाल्याने, तो अज्ञानामुळे विषयप्रधान असे घर इत्यादींमध्ये आसक्त होऊन राहतो आणि निरनिराळे क्लेश सहन करतो. (१-७)

स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये जो परस्परांचा पतिपत्‍नीभाव आहे, त्यालाच ज्ञानी लोक हृदयाचे अभेद्य बंधन समजतात. त्यामुळेच जीवाला घर, शेत, पुत्र, स्वजन, आणि धन इत्यादींमध्येसुद्धा ‘मी ’ आणि ‘माझे ’ पणाचा मोह उत्पन्न होतो. कर्मवासनांमुळे घटट झालेली ही हृदय-ग्रंथी (गाठ) सैल होते, त्यावेळी हा पुरुष दांपत्यभावातून निवृत्त होतो आणि संसाराला कारण असणार्‍या अहंकाराचा त्याग करून सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होऊन परमपदाची प्राप्ती करून घेतो. पुत्रांनो, संसारसागरातून पार होण्यासाठी कुशल, धैर्यवान, उद्योगी अशा सत्त्वगुणविशिष्ट माणसाने सर्वांचा आत्मा आणि गुरुस्वरूप अशा माझ्यात भक्तिभाव ठेवून मला शरण यावे. तसेच आसक्तीचा त्याग करावा. सुख-दुःखादी द्वंद्वे सहन करावीत. जीवाला सर्व योनींमध्ये दुःख भोगावेच लागते, असा विचार करावा. तत्त्वजिज्ञासेने, तपाने, सकाम कर्मांचा त्याग करून माझ्यासाठीच कर्मे करावीत. माझ्या कथा नेहमी श्रवण करून माझ्या भक्तांशी सहवास ठेवून माझ्या गुणांचे कीर्तन करावे. कोणाशीही वैर न करता समतेने व शांतीने वागावे. शरीर, घर, इत्यादींबाबतीत मी-माझेपणाच्या भावनेचा त्याग करण्याची इच्छा धरावी. अध्यात्मशास्त्राच्या अनुशीलनाने, एकांतात वास करून प्राण, इंद्रिये, मन यांना ताब्यात ठेवून शास्त्र आणि सत्पुरुषांच्या वचनांवर श्रद्धा ठेवावी. पूर्ण ब्रह्मचर्य पाळून कर्तव्यकर्मांमध्ये नेहमी तत्पर असावे. वाणीवर संयम ठेवावा. सगळीकडे माझीच सत्ता आहे असे जाणून अनुभवज्ञानसहित तत्त्वविचार आणि योगसाधन करून अहंकाररूप आपल्या लिंगशरीराला माझ्यात लीन करावे. मनुष्याने दक्ष राहून अविद्येमुळे उत्पन्न झालेल्या या हृदयग्रंथिरूप बंधनाला शास्त्रोक्त रीतीने वरील साधनांनी पूर्णपणे तोडून टाकावे. कारण कर्मसंस्कार राहाण्याचे मन हेच ठिकाण आहे. त्यानंतर साधनांचाही त्याग करावा. (८-१४)

ज्याला माझ्या लोकाची प्राप्ती किंवा माझा अनुग्रह हवा असेल, त्या राजाने प्रजेला, गुरूने शिष्यांना आणि पित्याने पुत्रांना असाच उपदेश करावा. जर ते अज्ञानामुळे अशा उपदेशानुसार न वागता काम्य कर्म हाच परम पुरुषार्थ मानीत राहिले, तरीसुद्धा त्यांच्यावर क्रोध न करता त्यांना समजावून सांगून काम्यकर्मांमध्ये प्रवृत्त होऊ देऊ नये. जसे एखाद्या आंधळ्या माणसाला जाणून-बुजून खडडयात ढकलावे, त्याप्रमाणे हे होईल. यामुळे कोणता पुरुषार्थ साध्य होईल बरे ? आपले खरे कल्याण कशात आहे, ते लोकांना समजत नाही. म्हणूनच ते निरनिराळ्या कामनांमध्ये अडकून तुच्छ क्षणिक सुखासाठी आपापसात वैर बाळगतात. यामुळे अनंत दुःखांची प्राप्ती होते, या गोष्टीचा हे मूर्ख कधीच विचार करीत नाहीत. जसे डोळस मनुष्य अयोग्य वाटेने जाणार्‍या आंधळ्याला तिकडे जाऊ देत नाही, त्याचप्रमाणे अज्ञानी माणूस अविद्येमुळे दुःखाकडे जात असलेला पाहून कोणता दयाळू आणि ज्ञानी पुरुष जाणून-बुजून त्याला त्या दिशेने जाऊ देईल ? जो मनुष्याला भगवद्‌भक्तीचा उपदेश करून जन्म-मृत्यूच्या फासातून सोडवीत नाही, तो गुरू गुरु नव्हे, स्वजन स्वजन नव्हे, पिता पिता नव्हे, माता माता नव्हे, देव देव नव्हे आणि पती पती नव्हे. (१५-१८)

माझ्या या अवतार-शरीराचे रहस्य जाणणे साधारण लोकांच्या बुद्धीच्या पलीकडचे आहे. शुद्ध सत्त्व हेच माझे हृदय आहे आणि त्यात धर्माचेच अधिष्ठान आहे. अधर्माला मी फार मागे ढकलले आहे, म्हणूनच सत्पुरुष मला "ऋषभ" असे म्हणतात. तुम्ही सर्वजण माझ्या त्या शुद्ध सत्त्वमय हृदयापासून उत्पन्न झालेले आहात, म्हणून मत्सराचा त्याग करून आपला मोठा भाऊ भरत याची सेवा करा. त्याचे सेवा करणे म्हणजेच माझी सेवा करणे होय आणि हेच तुमचे प्रजापालन करणे होय. सर्व स्थावर वस्तूंमध्ये वृक्ष श्रेष्ठ आहेत, त्यांच्यापेक्षा चालणारे जीव श्रेष्ठ होत, त्यातसुद्धा कीटक इत्यादींपेक्षा ज्ञानयुक्त पशू इत्यादी श्रेष्ठ आहेत. पशूंपेक्षा मनुष्य, मनुष्यांपेक्षा प्रमथगण, प्रमथांपेक्षा गंधर्व, गंधर्वांपेक्षा सिद्ध आणि सिद्धांपेक्षा देवतांचे अनुयायी किन्नरादी श्रेष्ठ आहेत. त्यांच्यापेक्षा असुर, असुरांपेक्षा देव आणि देवांपेक्षाही इंद्र श्रेष्ठ आहे. इंद्रापेक्षाही ब्रह्मदेवांचे पुत्र दक्ष इत्यादी प्रजापती श्रेष्ठ आहेत. ब्रह्मदेवांच्या पुत्रांमध्ये रुद्र सर्वश्रेष्ठ आहेत. ते ब्रह्मदेवापासून उत्पन्न झाले आहेत, म्हणून ब्रह्मदेव त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. तेसुद्धा माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत आणि माझी उपासना करतात, म्हणून मी त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. परंतु ब्राह्मण (तर) माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत, कारण मी त्यांना पूज्य मानतो. (१९-२२)

हे विप्रांनो, दुसर्‍या कोणत्याही प्राण्याला मी ब्राह्मणांच्या बरोबरीने सुद्धा समजत नाही. तर त्यांच्यापेक्षा अधिक कसा मानू शकेन ? लोक श्रद्धापूर्वक ब्राह्मणांच्या मुखामध्ये जे अन्न इत्यादी घालतात, ते जसे मी प्रसन्नतेने ग्रहण करतो, तसा अग्निहोत्रात हवन केलेल्या द्रव्याचा मी स्वीकार करीत नाही. ज्यांनी या लोकात अध्ययन इत्यादी करून माझ्या वेदरूपी अत्यंत सुंदर आणि पुरातन मूर्तीला धारण केले आहे, तसेच जे परम पवित्र (अशा) सत्त्वगुण, शम, दम, सत्य, दया, तप, तितिक्षा, आणि ज्ञान आदी आठ गुणांनी संपन्न आहेत, त्या ब्राह्मणांपेक्षा अधिक श्रेष्ठ आणखी कोण असू शकेल ? ब्रह्मदेव इत्यादींपेक्षाही श्रेष्ठ आणि अनंत तसेच स्वर्ग-मोक्षाचा अधिपती अशा माझ्याकडून माझे निष्काम भक्त काहीही इच्छित नाहीत; तर राज्य इत्यादी अन्य वस्तूंची ते कशाला इच्छा करतील ? (२३-२५)

पुत्रांनो, तुम्ही सर्व चराचर भूतमात्रांना माझेच शरीर समजून शुद्ध बुद्धीने पदोपदी त्यांची सेवा करा, तीच माझी खरी पूजा होय. मन, वचन, दृष्टी आणि अन्य इंद्रियांच्या कर्मांचे फळ म्हणजे माझे याप्रकारे पूजन करणे होय. याखेरीज मनुष्य स्वतःला महामोहमय कालपाशापासून सोडवून घेऊ शकत नाही. (२६-२७)

श्रीशुकदेव म्हणतात - जरी ऋषभदेवांचे पुत्र स्वतः सर्व प्रकारे सुशिक्षित होते, तरी लोकांना शिक्षण देण्याच्या उद्देशाने महाप्रभावशाली परम सुहृद, भगवान ऋषभांनी अशा प्रकारे त्यांना उपदेश केला. ऋषभदेवांच्या शंभर पुत्रांमध्ये भरत सर्वांत ज्येष्ठ होता. तो भगवंतांचा परम भक्त आणि भगवद्‌भक्त-परायण होता. पृथ्वीचे पालन करण्यासाठी ऋषभदेवांनी त्याला राजसिंहासनावर बसविले आणि ते स्वतः उपशमशील, निवृत्तिपरायण, महामुनींच्या भक्ती, ज्ञान, आणि वैराग्यरूप परमहंसांना उचित अशा धर्मांचे शिक्षण देण्यासाठी पूर्ण विरक्त झाले. फक्त शरीर हीच वस्तू जवळ ठेवली आणि घरात राहूनही सर्वांचा त्याग केला. आता तर वस्त्रांचाही त्याग करून ते सर्वथैव दिगंबर झाले. त्यावेळी त्यांचे केस विखुरलेले होते. वेष वेडयासारखा होता. अशा स्थितीत त्यांनी अग्निहोत्रीय अग्नींना आपल्यातच लीन करून घेऊन ते संन्यासी झाले आणि ब्रह्मावर्त देशाच्या बाहेर पडले. त्यांनी संपूर्णपणे मौन धरले होते. लोकांनी काही विचारले तरी ते बोलत नसत. जड, आंधळे, बहिरे, मुके, पिशाच्च किंवा वेडयासारखे चाळे करीत ते अवधूत बनून इकडे तिकडे भटकू लागले. कधी शहरात, कधी खेडयात, कधी खाणी, शेतकर्‍यांच्या वस्त्या, बगीचे, डोंगरातील गावे, सेनेच्या छावण्या, गायींचे गोठे, गवळ्यांच्या वस्त्या, यात्रेकरूंच्या धर्मशाळा इत्यादी जागी राहात. कधी डोंगरात, जंगलात किंवा आश्रमात भटकत असत. ते कोणत्याही रस्त्याने चालले तरी वनात फिरणार्‍या हत्तीला माशा सतावतात, त्याप्रमाणे मूर्ख आणि दुष्ट लोक त्यांच्या पाठोपाठ जाऊन त्यांना त्रास देत असत. कोणी धमकावीत, कोणी मारपीट करीत, कोणी त्यांच्यावर लघवी करीत, कोणी थुंकत, कोणी दगड मारीत, कोणी विष्ठा किंवा धूळ फेकीत, कोणी दुर्गंध सोडीत, कोणी खरे-खोटे बोलून त्यांचा तिरस्कार करीत, परंतु या गोष्टींकडे ते अजिबात लक्ष देत नसत. त्याचे कारण असे होते की भ्रमामुळे सत्य मानल्या गेलेल्या या मिथ्या शरीराविषयी त्यांचे किंचितसुद्धा ‘मी-माझेपण ’ नव्हते. कार्य-कारणरूप अशा संपूर्ण प्रपंचाचे साक्षी होऊन आपल्या परमात्मस्वरूपातच अखंड चित्तवृत्ती ठेवून ते एकटेच पृथ्वीवर विहार करीत होते. तरीसुद्धा त्यांचे हात, पाय, छाती, मोठमोठे बाहू, खांदे, गळा आणि अंगयष्टी अतिशय कोमल होती. त्यांच्या स्वभावानुसारच त्यांचे सुंदर मुख मधुर हास्याने स्वाभाविकपणे आणखीच सुंदर दिसत होते. ताज्या कमलदलाप्रमाणे असलेले डोळे मोठे पाणीदार, विशाल आणि थोडेसे लालसर होते. त्यातील बुबुळे शीतल आणि संताप नाहीसा करणारी होती. त्या डोळ्यांमुळे ते अतिशय सुंदर दिसत होते. गाल, कान, गळा आणि नाक लहान-मोठे नसून समान आणि आकर्षक होते. तसेच त्यांच्या अस्फुट हास्ययुक्त मनोहर मुखकमलाची शोभा पाहून नागरी स्त्रियांच्या चित्तामध्ये कामदेवाचा संचार होत असे. परंतु त्यांच्या तोंडावर जे भुर्‍या रंगाचे लांब-लांब पुष्कळसे कुरळे केस विखुरलेले होते, त्यामुळे आणि बैराग्याप्रमाणे धुळीने माखलेल्या देहामुळे ते पिशाचग्रस्त मनुष्यासारखे दिसत होते. (२८-३१)

योगसाधनेमध्ये हा समाज विघ्नरूप असून किळसवाण्या वेषाने राहाणे, हाच यावरील उपाय आहे हे जाणून भगवान ऋषभदेवांनी अजगराची वृत्ती धारण केली. ते पडल्याजागीच खाणे-पिणे, चावणे आणि मल-मूत्र त्याग करीत आणि आपल्या टाकलेल्या त्या मल-मूत्रातच लोळत असत. (परंतु) त्यांच्या मल-मूत्राला दुर्गंधी (तर) नव्हतीच, पण चांगला सुगंध होता. वायू तो सुगंध घेऊन चारी बाजूंच्या दहा योजनेपर्यंतचा सर्व प्रदेश सुगंधित करीत असे. अशा रीतीने गाय, हरिण, कावळे इत्यादींसारखी वृत्ती स्वीकारून ते त्यांच्याचप्रमाणे कधी चालत, कधी उभ्या-उभ्याने, कधी बसून तर कधी झोपूनच खाणे-पिणे आणि मल-मूत्रत्याग करीत असत. परीक्षिता, परमहंसांना त्यागाच्या आदर्शाची शिकवण देण्यासाठी, भगवान ऋषभदेवांनी अशा प्रकारे अनेक प्रकारच्या योगचर्यांचे आचरण केले. ते नेहमी सर्वश्रेष्ठ महान आनंदाचा अनुभव घेत असत. त्यांच्या दृष्टीने निरूपाधिक रूपाने सर्व प्राण्यांचा आत्मा आपल्या आत्मस्वरूप भगवान वासुदेवांशी कोणत्याही प्रकारचा भेद ठेवीत नव्हता. म्हणून त्यांचे सर्व पुरुषार्थ पूर्ण झाले होते. आकाशगमन, मनोवेगाने जाणे, शरीर अंतर्धान पावणे, परकायाप्रवेश, लांबच्या अंतरावरील ऐकणे आणि लांबचे दृश्य पाहणे अशा सर्व प्रकारच्या सिद्धी आपणहून त्यांची सेवा करण्यासाठी त्यांच्याजवळ आल्या, परंतु त्यांनी त्यांचा मनापासून मुळीच स्वीकार केला नाही. (३२-३५)

स्कंध पाचवा - अध्याय पाचवा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP