श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ५ वा - अध्याय ४ था

ऋषभदेवांचे राज्यशासन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकाचार्य म्हणतात - नाभीच्या पुत्राचे शरीर जन्मापासूनच भगवान विष्णूंच्या वज्र, अंकुश, इत्यादी चिन्हांनी युक्त होते. समता, शांती, वैराग्य, ऐश्वर्य इत्यादी महान गुणांमुळे त्यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच होता. हे पाहून मंत्री इत्यादी अधिकारी, प्रजा, ब्राह्मण आणि देवता यांना प्रकर्षाने वाटू लागले की, यांनीच पृथ्वीचे राज्य करावे. त्यांचे सुंदर आणि सुडौल शरीर, विपुल कीर्ती, तेज, बल, ऐश्वर्य, यश, पराक्रम, आणि शौर्य या गुणांमुळे महाराज नाभीने त्यांचे नाव ऋषभ (श्रेष्ठ) असे ठेवले. (१-२)

देवराज इंद्राने एकदा ईर्ष्येमुळे त्यांच्या राज्यात पाऊस पाडला नाही, तेव्हा योगेश्वर भगवान ऋषभदेवांनी इंद्राच्या मूर्खपणाचा उपहास करून आपल्या योगमायेच्या प्रभावाने आपले राज्य - अजनाभखंडामध्ये भरपूर पाऊस पाडला. आपल्या मनासारखा उत्तम पुत्र झाल्याने नाभी अत्यंत आनंदित झाला आणि आपल्याच इच्छेनुसार मनुष्यशरीर धारण करणार्‍या पुराणपुरुष श्रीहरींचे लालन-पालन करीत त्यांच्याच लीलाविलासाने मंत्रमुग्ध होऊन "बाबा-बाळा" असे सद्‍गदित होऊन म्हणत त्यातच मोठे सुख मानू लागला.(३-४)

मंत्रिमंडळ, नागरिक, आणि राष्ट्रातील जनता ऋषभदेवांवर अत्यंत प्रेम करीत आहे असे पाहून नाभिराजाने धर्ममर्यादेचे रक्षण करण्यासाठी त्यांना राज्याभिषेक करून ब्राह्मणांच्या देखरेखीवर सोपविले आणि आपण स्वतः पत्‍नी मेरुदेवीसह बदरिकाश्रमाला निघून गेला. तेथे इतरांना पीडा होणार नाही अशा तीव्र तपश्चर्येने आणि समाधियोगाने भगवान वासुदेवांच्या नरनारायणरूपाची आराधना करीत योग्य वेळ आल्यावर त्यांच्याच स्वरूपात तो लीन होऊन गेला. (५)

परीक्षिता, राजा नाभीच्या संबंधात ही लोकोक्ती प्रसिद्ध आहे - ज्याच्या शुद्ध कर्माने संतुष्ट होऊन साक्षात श्रीहरी त्याचे पुत्र झाले होते, त्या राजर्षी नाभीच्या उदार कर्मांचे अनुकरण दुसरा कोण करू शकेल ? ज्याच्या दक्षिणा इत्यादींनी संतुष्ट होऊन ब्राह्मणांनी आपल्या मंत्रबलाने ज्याला यज्ञशाळेत यज्ञपुरुष श्रीविष्णूंचे दर्शन करविले, त्या महाराज नाभीसारखा ब्राह्मणभक्तसुद्धा कोण असू शकेल ?(६-७)

भगवान ऋषभदेवांनी आपला देश अजनाभ-खंडाला कर्मभूमी मानून लोकसंग्रहासाठी काही काळपर्यंत गुरुगृही वास केला. गुरुदेवांना यथोचित दक्षिणा देऊन गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यासाठी त्यांची आज्ञा घेतली. नंतर लोकांना गृहस्थाश्रमधर्माचे शिक्षण देण्यासाठी देवराज इंद्रांनी दिलेली त्यांची कन्या जयंती हिच्याशी विवाह केला आणि श्रौत-स्मार्त अशा दोन्ही प्रकारच्या शास्त्रोपदिष्ट कर्मांचे आचरण करीत आपल्यासारख्या शंभर पुत्रांना जन्म दिला. त्यामध्ये महायोगी भरत सर्वांत ज्येष्ठ आणि सर्वांपेक्षा अधिक गुणवान होता. त्याच्याच नावावरून या अजनाभ खंडाला लोक भारतवर्ष म्हणू लागले. त्याहून लहान कुशावर्त, इलावर्त, ब्रह्मावर्त, मलय, केतू, भद्रसेन, इंद्रस्पृक्, विदर्भ, आणि कीकट हे नऊ राजकुमार उरलेल्या इतर नव्वद भावांपेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ होते. त्यांच्यापेक्षा लहान कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस, आणि करभाजन हे नऊ राजकुमार भागवतधर्माचा प्रचार करणारे मोठे भगवद्‌भक्त होते. भगवंतांच्या महिम्याने युक्त आणि परम शांतीने परिपूर्ण अशा यांचे उत्तम चरित्र आम्ही नारद-वसुदेव संवादप्रसंगी पुढे (एकादश स्कंधामध्ये) सांगू. जयंतीचे यांच्यापेक्षा लहान एक्क्याऐंशी पुत्र पित्याच्या आज्ञेचे पालन करणारे, अतिशय विनम्र, महान वेदज्ञ आणि नेहमी यज्ञ करणारे होते. पुण्यकर्मांचे अनुष्ठान केल्यामुळे ते शुद्ध होऊन ब्राह्मण झाले होते. (८-१३)

पूर्णपणे स्वतंत्र, स्वतः नेहमी सर्व प्रकारच्या अनर्थपरंपरांपासून मुक्त, केवळ आनंदानुभवस्वरूप, साक्षात ईश्वर असूनसुद्धा भगवान ऋषभदेव अज्ञानी लोकांप्रमाणे कर्म करीत कालानुसार प्राप्त धर्माचे आचरण करून त्यांनी त्याचे तत्त्व न जाणणार्‍या लोकांना त्याचे शिक्षण दिले. त्याचबरोबर समचित्त, शांत, सुहृद, आणि करुणामय राहून धर्म, अर्थ, यश, संतान, भोग-सुख, आणि मोक्ष हे सर्व प्राप्त करीत गृहस्थाश्रमामध्ये राहाणार्‍या लोकांना आचरणाचे धडे दिले. कारण महापुरुष जस-जसे आचरण करतात, त्याचप्रमाणे दुसरे लोक त्यांचे अनुकरण करतात. सर्व धर्मांचे साररूप वेदाचे गूढ रहस्य ते जाणत होते, तरीसुद्धा ते ब्राह्मणांनी सांगितलेल्या विधानानुसार सामदानादी उपायांनी जनतेचे पालन करीत होते. त्यांनी शास्त्र आणि ब्राह्मणांच्या उपदेशानुसार निरनिराळ्या देवतांना उद्देशून द्रव्य, देश, काल, वय, श्रद्धा आणि ऋत्विज यांनी सुसंपन्न असे सर्व प्रकारचे शेकडो यज्ञ केले. भगवान ऋषभदेवांच्या शासनकालामध्ये या देशातील कोणताही मनुष्य आपल्यासाठी कोणाकडूनही आपल्या राजाबद्दल दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या प्रेमाशिवाय आणखी कोणत्याही वस्तूची कधीही इच्छा करीत नसे, एवढेच काय, पण कोणाच्या कोणत्याही वस्तूकडे ढुंकुनदेखील पाहात नसे. एक वेळ भगवान ऋषभदेव फिरत फिरत ब्रह्मावर्त देशामध्ये पोहोचले. तेथे मोठमोठया ब्रह्मर्षींच्या सभेमध्ये त्यांनी प्रजेसमोरच आपल्या समचित्त तसेच विनम्र प्रेमळ आणि संयमी मुलांना शिक्षण देण्यासाठी पुढील उपदेश केला. (१४-१९)

स्कंध पाचवा - अध्याय चवथा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP