|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय ३ रा
नाभिराजाचे चरित्र - श्रीशुकाचार्य म्हणतात - नाभिराजाने भार्या मेरुदेवीसह पुत्रकामनेने एकाग्रतापूर्वक भगवान यज्ञपुरुषाचे पूजन केले. भगवान जरी द्रव्य, देश, काल, मंत्र, ऋत्विज, दक्षिणा आणि विधी, या साधनांनी संपन्न यज्ञाने प्राप्त होत नसले, तरी ते भक्तवत्सल असल्यामुळे जेव्हा नाभीने श्रद्धापूर्वक व विशुद्ध भावाने त्यांची आराधना केली, तेव्हा त्यांचे चित्त आपल्या भक्ताचा इच्छित हेतू साध्य करण्यासाठी उत्सुक झाले. त्यांचे स्वरूप जरी सर्वथैव स्वतंत्र असले, तरी त्यांनी प्रवर्ग्यकर्माचे अनुष्ठान सुरू होताच नाभीच्या मन आणि नेत्रांना आनंद देणार्या अवयवांनी युक्त अशा अतिसुंदर हृदयाकर्षक रूपात स्वतःला प्रगट केले. त्यांनी रेशमी पीतांबर परिधान केला होता. वक्षःस्थळावर सुमनोहर श्रीवत्सचिन्ह शोभून दिसत होते. हातांमध्ये शंख, चक्र, गदा, पद्म तसेच गळ्यात वनमाला आणि कौस्तुभ मणी शोभून दिसत होता. संपूर्ण शरीराच्या अंगप्रत्यंगांची कांती वाढविणार्या किरणांनी आच्छादलेल्या मणिमय मुकुट, कुंडले, कंकणे, कमरपटटा, हार, बाजूबंद, नूपुर इत्यादी अलंकारांनी ते शोभून दिसत होते. परम तेजस्वी चतुर्भुजमूर्ती अशा पुरुषोत्तमांना प्रगट झालेले पाहून ऋत्विज, सदस्य आणि यजमान इत्यादी सर्व लोक, जसे निर्धन धनराशी प्राप्त झाल्यावर अत्यंत आनंदित होतात, तसे आनंदित झाले. नंतर सर्वांनी मस्तक नमवून अत्यंत आदराने प्रभूंची पूजा केली आणि त्यांची स्तुती केली. (१-३) ऋत्विज म्हणाले - पूज्यतम, आम्ही आपले भक्त आहोत. आपण आम्हांला नेहमीच पूजनीय आहात. परंतु आम्ही आपली पूजा करणे काय जाणणार ? आम्ही तर आपणांस वारंवार नमस्कार करतो. एवढेच आम्हांला महापुरुषांनी शिकविले आहे. आपण प्रकृती आणि पुरुष यांच्यापलीकडील आहात. तीन गुणांचे कार्य असलेल्या प्रपंचात बुद्धी गुंतल्याने आपले गुणगान करण्यास असमर्थ असलेला असा कोणता पुरुष आपल्या प्राकृत नाम, रूप आणि आकृतीच्याद्वारा साक्षात परमेश्वर अशा आपल्या स्वरूपाचे निरूपण करू शकेल ? करायचेच झाले तर, सर्व लोकांचे दुःख निरसन करणार्या आपल्या परम मंगलमय गुणांपैकी काही गुणांचेच वर्णन करू शकेल. परंतु प्रभो, जरी आपल्या भक्तांनी प्रेम-सद्गद वाणीने स्तुती करीत पाणी, पवित्र पाने, तुळशी, दूर्वा यांनी आपली पूजा केली, तरी आपण सर्व प्रकारे संतुष्ट होता. (४-६) आम्हांला तर प्रेमाशिवाय या द्रव्य-कालादी अनेक अंगांच्या यज्ञाशी आपला काही संबंध आहे, असे वाटत नाही. कारण आपल्या स्वतःपासूनच क्षणाक्षणाला जो सर्व पुरुषार्थांचे फलस्वरूप असा परमानंद स्वभावतःच नेहमी प्रगट होत असतो, त्याचे आपणच साक्षात स्वरूप आहात. अशा प्रकारे आपल्याला जरी या यज्ञादिकांची काही अपेक्षा नसली तरी अनेक प्रकारच्या कामनांच्या पूर्ततेची इच्छा करणार्या आमच्यासाठी तर मनोरथसिद्धीचे योग्य साधन हेच आहे ना ? आपण ब्रह्मदेवादी श्रेष्ठ देवांपेक्षाही श्रेष्ठ आहात. आमचे परम कल्याण कशात आहे, हेसुद्धा आम्ही जाणत नाही आणि आमच्याकडून आपली यथायोग्य पूजासुद्धा झाली नाही. तरीपण ज्याप्रमाणे ज्ञानी पुरुष न बोलावताही केवळ करुणाभावाने उद्युक्त होऊन अज्ञानी पुरुषांकडे जातात, त्याचप्रमाणे आपणसुद्धा आम्हांला आपले परमपद मोक्ष आणि आमच्या इच्छित वस्तू देण्यासाठी इतर यज्ञ इच्छिणार्या देवतांप्रमाणे येथे प्रगट झाला आहात. हे पूज्यतम, ब्रह्मदेवादी समस्त वर देणार्यांमध्ये श्रेष्ठ असूनही आपण राजर्षी नाभीच्या या यज्ञशाळेत साक्षात आमच्यासमोर प्रगट झाला आहात, हाच आपण आम्हांला सर्वश्रेष्ठ वर दिला आहे. आता आम्ही आणखी कोणता वर मागावा ? (७-१०) प्रभो, आपल्या गुणसमुच्चयाचे गायन परम मंगलमय आहे. ज्यांनी वैराग्याने प्रज्वलित झालेल्या ज्ञानाग्नीच्या द्वारे आपल्या अंतःकरणातील राग-द्वेषादी संपूर्ण मळ जाळून टाकले आहेत, तसेच ज्यांचा स्वभाव आपल्यासारखाच शांत आहे, ते आत्माराम मुनीसुद्धा नेहमी आपल्या गुणांचेच गायन करीत असतात. म्हणून आम्ही आपणाकडे एवढाच वर मागतो की, कोठेतरी पडल्यावर, ठेच लागल्यावर, शिंक आल्यावर, किंवा जांभई आल्यानंतर, संकटाचे वेळी, त्याचबरोबर तापाने फणफणलेल्या वेळी अगर मरणसमयी आम्हांला आपले स्मरण होणे कठीण असले, तरी कोणत्याही प्रकारे का होईना आपल्या सर्व दोषांचा नाश करणार्या "भक्तवत्सल", "दीनबंधू" इत्यादी गुणवाचक नावांचे आम्ही उच्चारण करू शकू. (११-१२) जसे एखाद्या कंगाल मनुष्याने धन वाटणार्या उदार पुरुषाकडे जाऊनही त्याच्याकडे केवळ भुसाच मागावा, त्याचप्रमाणे हा राजर्षी नाभी संतानप्राप्ती हाच परम पुरुषार्थ मानून आपल्यासारखाच पुत्र व्हावा, या इच्छेने स्वर्ग किंवा मोक्षही देऊ शकणार्या आपली आराधना करीत आहे. आपल्या मायेचा अंत कोणाला लागत नाही आणि ती कोणाला वशही होत नाही, यात काही आश्चर्य नाही. ज्या लोकांनी महापुरुषांच्या चरणांची सेवा केली नाही, त्यांच्यापैकी असा कोण आहे की जो मायेला वश झाला नाही किंवा त्याच्या बुद्धीवर तिने आवरण घातले नाही आणि विषयरूप विषाच्या वेगाने त्याचा स्वभाव दूषित केला नाही ? देवाधिदेवा, आपण भक्तांची मोठमोठी कामे करता. मंदबुद्धी अशा आम्ही कामनेला वश होऊन या तुच्छ कामासाठी आपल्याला आवाहन केले, हा आपला अनादरच होय. परंतु आपण समदर्शी असल्याने आम्हा अज्ञानी लोकांच्या या अविचाराबद्दल आम्हांला क्षमा करावी. (१३-१५) श्रीशुकाचार्य म्हणतात - महाराज वर्षाधिपती नाभीच्या पूज्य ऋत्विजांनी प्रभूंच्या चरणांना वंदन करून जेव्हा वरील स्तोत्राने त्यांची स्तुती केली, तेव्हा देवश्रेष्ठ श्रीहरी त्यांची करुणा येऊन असे म्हणाले. (१६) श्रीभगवान म्हणाले - ऋषींनो, आपण सर्वजण सत्यवादी महात्मे आहात. राजर्षी नाभीला माझ्यासारखाच पुत्र व्हावा, असा मोठा दुर्लभ वर आपण मागितलात. मुनींनो, माझ्यासारखा तर मीच आहे; कारण मी अद्वितीय आहे. तरीसुद्धा ब्राह्मणांचे वचन खोटे होता कामा नये. कारण ब्राह्मणकुल म्हणजे माझे मुखच होय. म्हणून मी स्वतःच माझ्या अंशकलेने आग्नीध्रनंदन नाभीच्या घरी अवतार घेईन. कारण माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. (१७-१८) श्रीशुक म्हणतात - महाराणी मेरुदेवी ऐकत असता तिच्या पतीला असे म्हणून भगवान अंतर्धान पावले. विष्णुदत्त परीक्षिता, महर्षींनी त्या यज्ञात अशा प्रकारे प्रसन्न केल्यानंतर महाराज नाभींचे कल्याण करण्यासाठी श्रीभगवंत महाराणी मेरुदेवीच्या ठिकाणी दिगंबर संन्यासी आणि ऊर्ध्वरेता मुनींचा धर्म प्रगट करण्यासाठी, शुद्धसत्त्वमय रूपाने प्रगट झाले. (१९-२०) स्कंध पाचवा - अध्याय तिसरा समाप्त |