|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय २ रा
आग्नीध्र-चरित्र - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुकाचार्य म्हणतात - अशा रीतीने पिता प्रियव्रत तपश्चर्येत गढून गेल्यानंतर राजा आग्नीध्र त्याच्या आज्ञेचे पालन करीत जंबुद्वीपातील प्रजेचे धर्मानुसार पुत्रवत पालन करू लागला. एकदा पितृलोकाच्या इच्छेने पुत्रप्राप्तीसाठी पूजासाहित्य घेऊन अप्सरांचे क्रीडास्थान असलेल्या मंदराचलाच्या एका दरीत तो गेला आणि एकाग्र चित्ताने प्रजापतींचे पती श्रीब्रहदेव यांची तपश्चर्येने आराधना करू लागला. आदिदेव भगवान ब्रह्मदेवांनी त्याची अभिलाषा जाणून आपल्या सभेतील गायिका पूर्वचित्ती नावाच्या अप्सरेला त्याच्याकडे पाठविले. आग्नीध्राच्या आश्रमाच्या जवळ एक अतिशय रमणीय असे उपवन होते. तेथे ती अप्सरा विहार करू लागली. त्या उपवनामध्ये निरनिराळ्या घनदाट वृक्षांच्या फांद्यांवर सुवर्णलता पसरलेल्या होत्या. त्यांच्यावर पुष्कळ प्रकारच्या जमिनीवरील पक्ष्यांच्या जोडया मधुर आवाजात कूजन करीत होत्या. त्यांच्या किलबिलाटाने आनंदित झालेले पाणकोंबडे, करडुवा, कलहंस इत्यादी पाणपक्षी वेगवेगळ्या तर्हेने कूजन करीत होते. त्यामुळे तेथील कमल-पुष्पांनी सुशोभित निर्मल सरोवरे दुमदुमली होती. (१-४) पूर्वचित्तीच्या विलासी हालचालींनी आणि पदन्यासांनी पायांतील नुपुरांचा झंकार होत होता. तो मनोहर ध्वनी ऐकून राजकुमार आग्नीध्राने समाधियोगाने बंद केलेले आपले कमलकळीप्रमाणे असलेले सुंदर डोळे किलकिले करून पाहिले, तो जवळच त्याला ती अप्सरा दिसली. भुंग्याप्रमाणे ती एकेका फुलाजवळ जाऊन त्याचा वास घेत होती. तसेच देव व मनुष्यांचे मन आणि डोळे आल्हादित करणार्या आपल्या विलासपूर्ण हालचाली, क्रीडा, लज्जा, विनम्र कटाक्ष, सुमधुर वाणी, आणि अंगविक्षेप, पुरुषांच्या मनाचा दरवाजा कामदेवाच्या प्रवेशासाठी उघडीत होते. ती जेव्हा हसून बोलत असे, तेव्हा जणू काही तिच्या मुखातून अमृतमय मधुर मध वाहात आहे, असे वाटत होते. तिच्या निःश्वासाच्या सुगंधाने मदांध होऊन भ्रमर तिच्या मुखाभोवती फिरत होते. तेव्हा त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी म्हणून ती झपाझप चालत असताना तिचे स्तन, वेणी आणि कमरपटटा हलत असल्यामुळे सुंदर दिसत होते. हे सर्व पाहून कामदेवाने आग्नीध्राच्या हृदयात प्रवेश करण्याची संधी घेतली. आणि कामातुर तो तिच्या अधीन होऊन तिला प्रसन्न करण्यासाठी वेडयाप्रमाणे म्हणू लागला. (५-६) "मुनिवर्य तुम्ही कोण आहात ? या पर्वतावर तुम्ही काय करू इच्छिता ? परमपुरुष नारायणांची आपण माया तर नाही ना ? मित्रा, बिनदोरीची ही दोन धनुष्ये (भुवया) तू का धारण केली आहेस ? यामध्ये तुझा काही हेतू आहे की, या संसाररूपी अरण्यात माझ्यासारख्या बेसावध हरिणांची तू शिकार करू इच्छितोस ? (तिच्या नेत्र-कटाक्षांकडे पाहून) तुझे हे दोन (कटाक्ष) बाण अतिशय सुंदर आणि धारदार आहेत. कमलदलाप्रमाणे हे शांत असून पंख नसले तरी सुंदर आहेत. वनात विहार करीत असताना हे (बाण) तू कोणावर सोडू इच्छितोस ? तुझ्याशी सामना करू शकेल, असा कोणी इथे दिसत नाही. तुझा हा पराक्रम आमच्यासारख्या मंदबुद्धींचे कल्याण करो (म्हणजे झाले). (भ्रमरांकडे पाहून) भगवन, तुझ्या चारी बाजूंनी जे हे शिष्यगण अध्ययन करीत आहेत, ते तर निरंतर रहस्यमय सामगान करीत जणू भगवंतांची स्तुतीच करीत आहेत आणि ऋषिगण जसे वेदांच्या शाखांना अनुसरतात, तसे हे सर्वजण तुझ्या वेणीतून पडलेल्या फुलांचे सेवन करीत आहेत. (नूपुरांच्या आवाजाला उद्देशून) ब्रह्मन, तुझ्या चरणरूप पिंजर्यात जो कवडा आहे, त्याचा आवाज तर ऐकू येतो, परंतु रूप दिसत नाही. (कमरपटटा असलेल्या पिवळ्या साडीतील अंगकांती पाहून) तुझ्या नितंबावर हे कदंब फुलांचे तेज कोठून आले ? यांच्यावर तर फिरणार्या कोलितासारखे गोलाकार मंडळ दिसत आहे. परंतु तुझे वल्कल कोठे आहे ? (कुंकुममंडित स्तनांना उद्देशून) द्विजवर, तुझ्या या दोन सुंदर उंचवटयात काय भरले आहे ? यात काहीतरी अमूल्य असले पाहिजे. म्हणूनच तू त्यांचे ओझे वाहात आहेस. तेथे माझी दृष्टी खिळून राहिली आहे. आणि हे सुंदरा, या उंचवटयांवर तू हा लालसर लेप कसला लावला आहेस ? याच्या सुगंधाने माझा सगळा आश्रम दरवळला आहे. मित्रवर, मला तुझा देश तरी दाखव. जेथील निवासी आपल्या वक्षःस्थळावर असे अद्भुत अवयव धारण करतात, त्यांनी आमच्यासारख्यांचे चित्त प्रक्षुब्ध होते. तसेच मुखामध्ये ते हावभावयुक्त मधुर भाषण, अधरामृत इत्यादी अद्भुत वस्तू बाळगतात." (७-१२) हे प्रियवर, तू काय खातोस की ज्यामुळे तुझ्या मुखातून हवन केल्यासारखा सुगंध पसरला आहे ? तू विष्णूंचा अंश आहेस का ? कारण तुझ्या कानांत डोळ्यांची उघडझाप न करणार्या माशासारखी दोन कुंडले आहेत. तुझे मुख एखाद्या सुंदर सरोवराप्रमाणे आहे. त्यांत (चंचल नेत्र हे) भयभीत मासे, (दंतपंक्ती हे ) शुभ्र हंस आणि (कुरळे केस हे) भुंगे आहेत. तू जेव्हा आपल्या कोमल हातांनी थप्पड मारून हा चेंडू आपटतेस, तेव्हा इकडे-तिकडे जाणारा तो चेंडू माझ्या डोळ्यांबरोबर मनालाही चंचल करतो. तुझा हा मोकळा सुटलेला केशसंभार तू का बांधून ठेवीत नाहीस ? अरे, हा वारा तरी किती दुष्ट आहे ! तो वारंवार तुझे कटिवस्त्र उडवीत आहे ! हे तपोधना, तपश्चर्या करणार्यांचे तप भ्रष्ट करणारे हे रूप तुला कोणत्या तपाच्या प्रभावाने मिळाले आहे ? मित्रा, काही दिवस माझ्या बरोबर राहून तू तपश्चर्या कर किंवा विश्वविस्तार करण्याच्या इच्छेने ब्रह्मदेवांनी तर माझ्यावर ही कृपा केली नाही ना ? ब्रह्मदेवाने दिलेल्या प्रिय अशा तुला मी सोडणार नाही. तुझ्यावर खिळलेले माझे डोळे दुसरीकडे पाहू इच्छित नाहीत. हे सुंदरी ! तुला पाहिजे तेथे तू मला घेऊन चल. मी तुझ्याबरोबर येतो. तुझ्या सुंदर मैत्रिणीही आपल्या बरोबरच राहतील. (१३-१६) श्रीशुक म्हणतात - देवांसारखा बुद्धिमान आग्नीध्र स्त्रियांना प्रसन्न करण्यात मोठाच कुशल होता. याप्रमाणे त्याने प्रेमयुक्त गोड गोड गोष्टी बोलून त्यायोगे त्या अप्सरेला प्रसन्न करून घेतले. शौर्यवान लोकांत अग्रगण्य अशा आग्नीध्राची बुद्धी शील, रूप, वय, ऐश्वर्य, आणि औदार्य यांनी आकर्षित होऊन ती अप्सरा त्या जंबूद्वीपाधिपतीबरोबर कित्येक हजार वर्षेपर्यंत पृथ्वी आणि स्वर्गांतील भोग भोगीत राहिली. त्यानंतर आग्नीध्राला तिच्यापासून नाभी, किंपुरुष, हरिवर्ष, इलावृत, रम्यक, हिरण्मय, कुरू, भद्राश्व, आणि केतुमाल नावाचे नऊ पुत्र झाले. (१७-१९) अशा रीतीने दरवर्षी एक याप्रमाणे नऊ वर्षात क्रमाने नऊ पुत्रांना जन्म देऊन पूर्वचित्ती त्यांना राजभवनातच सोडून ब्रह्मदेवांच्या सेवेला गेली. हे आग्नीध्राचे पुत्र मातेच्या कृपेमुळे स्वभावतःच सुडौल आणि सशक्त शरीराचे होते. आग्नीध्राने जंबूद्वीपाचे विभाग करून त्यांच्यासारख्याच नावाचे नऊ भूखंड बनविले आणि ते एकेका पुत्राकडे सोपविले. नंतर ते सर्वजण आपापल्या राज्याचा उपभोग घेऊ लागले. दिवसेंदिवस भोग भोगूनसुद्धा महाराज आग्नीध्र अतृप्तच होता. तो त्या अप्सरेलाच परम-पुरुषार्थ समजत होता. म्हणून त्याने वैदिक कर्मांनी जेथे पितृगण आपापल्या सुकृतानुसार निरनिराळे भोग भोगतात, त्या अप्सरालोकाची प्राप्ती करून घेतली. पिता परलोकवासी झाल्यानंतर त्या नऊ भावांनी मेरूच्या मेरुदेवी, प्रतिरूपा, उग्रदंष्ट्री लता, रम्या, श्यामा, नारी, भद्रा, आणि देववीती नावाच्या नऊ कन्यांशी विवाह केला. (२०-२३) स्कंध पाचवा - अध्याय दुसरा समाप्त |