|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय १ ला
प्रियव्रत-चरित्र - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] परीक्षिताने विचारले - मुनिवर्य, महाराज प्रियव्रत भगवद्भक्त असून आत्माराम होता. ज्यात गुंतल्यामुळे मनुष्याला आपल्या स्वरूपाची विस्मृती होते आणि तो कर्मबंधनाने बांधला जातो, त्या गृहस्थाश्रमात तो कसा रमला ? हे विप्रवर, अशा निःसंग महापुरुषांचा गृहस्थाश्रमाविषयी असा आग्रह असणे मुळीच योग्य वाटत नाही. हे विप्रश्रेष्ठ, ज्यांचे चित्त पुण्यकीर्ती श्रीहरींच्या चरणांच्या शीतल छायेच्या आश्रयामुळे शांत झाले आहे, अशा महापुरुषांची कुटुंबाविषयी खरे म्हणजे आसक्ती असत नाही. ब्रह्मन, महाराज प्रियव्रताने स्त्री, घर आणि पुत्र इत्यादींमध्ये आसक्त राहूनसुद्धा कोणत्या प्रकारे सिद्धी प्राप्त करून घेतली आणि कशामुळे त्याची भगवान श्रीकृष्णांमध्ये अविचल भक्ती निर्माण झाली, याविषयी मला मोठा संशय आहे. (१-४) श्रीशुकाचार्य म्हणाले - राजन, तुझे म्हणणे अगदी योग्य आहे. ज्यांचे चित्त पवित्रकीर्ती श्रीहरींच्या चरणकमलमकरंदाच्या रसामध्ये डुंबत असते, ते कोणत्याही विघ्नांमुळे अडथळा आला तरी भगवद्भक्त परमहंसांना प्रिय भगवंतांचा कथा-श्रवणरूपी कल्याणमय मार्ग सहसा सोडीत नाहीत. राजन, राजकुमार प्रियव्रत मोठा भगवद्भक्त होता. श्रीनारदांच्या चरणांची सेवा केल्यामुळे त्याला सहजच परमार्थतत्त्वाचा बोध आला होता. तो ब्रह्मज्ञानाची दीक्षा घेणार होता, परंतु त्याचे वडील स्वायंभुव मनूंनी पृथ्वीपालन करण्यासाठी शास्त्रात सांगितलेल्या सर्व श्रेष्ठ गुणांनी तो संपन्न आहे, असे पाहून त्याला राज्य चालवण्याची आज्ञा केली. परंतु प्रियव्रताने अखंड समाधियोगाने आपली सर्व इंद्रिये आणि क्रिया भगवान वासुदेवांच्या चरणी समर्पण केल्या होत्या. जरी पित्याच्या आज्ञेचे उल्लंघन करणे उचित नव्हते, तरी राज्य करताना आपले आत्मस्वरूप मिथ्या प्रपंचानेही आच्छादित होऊन जाईल, या विचाराने राज्यपद स्वीकारण्यात त्याला रस वाटला नाही. (५-६) तेव्हा मनात नेहमी या गुणमय प्रपंचाच्या वाढीचाच विचार करणारे आणि त्यामुळेच सर्व जगाचे मनोगत जाणणारे आदिदेव स्वयंभू भगवान ब्रह्मदेव चारी वेद आणि मरीची इत्यादी आपल्या पार्षदांना बरोबर घेऊन सत्यलोकातून खाली उतरले. आकाशात ठिकठिकाणी विमानांत बसलेले इंद्रादी मुख्य देव त्यांचे पूजन करीत होते. तसेच सिद्ध, गंधर्व, साध्य चारण आणि मुनिजन यांचे समूह त्यांची स्तुती करीत होते. अशा प्रकारे ठिकठिकाणी आदरसत्कार स्वीकारीत, ते चंद्राप्रमाणे, गंधमादन पर्वताची खिंड प्रकाशित करीत प्रियव्रताजवळ येऊन पोहोचले. हंस हे वाहन पाहून देवर्षी नारद आपले पिता भगवान ब्रह्मदेव आलेले आहेत, हे जाणून स्वायंभुव मनू आणि प्रियव्रतासह ताबडतोब उठून उभे राहिले आणि त्या सर्वांनी हात जोडून त्यांना नमस्कार केला. हे परीक्षिता, नारदांनी त्यांची पूजा केली आणि गोड शब्दांनी त्यांचे गुण, अवतार आणि मोठ मोठे विजय यांचे वर्णन केले. तेव्हा आदिपुरुष भगवान ब्रह्मदेवांनी प्रियव्रताकडे मंद हास्ययुक्त दयार्द्र दृष्टीने पाहिले व म्हटले. (७-१०) श्रीब्रह्मदेव म्हणाले - पुत्रा, मी तुला सत्य सिद्धांत सांगतो, तो ऐक. अनाकलनीय लीला करणार्या श्रीहरींच्या बाबतीत तू कोणत्याही प्रकारे दोषदृष्टीने पाहू नकोस. मी, महादेव, तुझे पिता स्वायंभुव मनू आणि तुझे गुरू हे महर्षी नारदसुद्धा त्यांच्या अधीन राहून त्यांच्याच आज्ञेचे पालन करतात. त्यांची इच्छा कोणीही देहधारी तप, विद्या, योगबल, बुद्धिबल, अर्थशक्ती, धर्मशक्ती यांच्या जोरावर स्वतः किंवा कोण्या दुसर्याच्या साहाय्याने टाळू शकत नाही. सर्व जीवांना त्याच अव्यक्त ईश्वराने दिलेले शरीर जन्म, मरण, शोक, मोह, भय आणि सुख-दुःखांचा भोग घेण्यासाठी तसेच कर्म करण्यासाठी नेहमी धारण करावे लागते. वत्सा, ज्याप्रमाणे नाकात वेसण घातलेला पशू मनुष्यांनी लादलेले ओझे वाहातो, त्याचप्रमाणे परमात्म्याच्या वेदवाणीरूप दोरीने गुण व कर्मे यांत जखडलेले आम्ही सर्वजण त्यांच्याच इच्छेनुसार कर्मांनी त्यांची पूजा करीत राहतो. आमचे गुण आणि कर्म यांनुसार प्रभूंनी आम्हांला ज्या योनीमध्ये जन्माला घातले आहे, तिचा स्वीकार करून ते जसे आम्हांला ठेवतील, त्यानुसार आम्ही सुख किंवा दुःख भोगीत राहतो. जसे एखाद्या आंधळ्याला डोळसाचे अनुकरण करावे लागते, तसे आम्हांला त्यांच्या इच्छेनुसार करावे लागते. (११-१५) जसे मनुष्याला जाग आल्यावरही त्याला स्वप्नात अनुभवलेल्या पदार्थांचे स्मरण होते, तसेच मुक्त पुरुषसुद्धा प्रारब्धाचा भोग भोगीत भगवंतांच्या इच्छेनुसार आपले शरीर धारण करतोच. पण या अवस्थेत मीपण नसल्यामुळे विषयवासनांच्या ज्या संस्कारांमुळे दुसरा जन्म होतो, तो जन्म त्याला येत नाही. जो पुरुष इंद्रियांच्या अधीन असतो, तो जंगलातून भ्रमण करीत राहिला, तरी त्याला जन्म-मरणाचे भय असतेच. कारण न जिंकलेले मन आणि इंद्रियरूपी सहा शत्रू त्याचा पिच्छा सोडीत नाहीत. जो बुद्धिमान पुरुष इंद्रियांना जिंकून आपल्या आत्म्यातच रममाण होतो, त्याचा गृहस्थाश्रमसुद्धा त्याचे काहीही बिघडवू शकत नाही. ज्याला या सहा शत्रूंना जिंकण्याची इच्छा असेल, त्याने अगोदर घरात राहूनच त्यांना वश करण्याचा प्रयत्न करावा. किल्ल्यात सुरक्षित राहून युद्ध करणारा राजा, आपल्या प्रबळ शत्रूंना जिंकतो आणि जेव्हा या शत्रूंचे सामर्थ्य अत्यंत क्षीण होते, तेव्हा तो शहाणा राजा स्वतःच्या इच्छेनुसार वागू शकतो. श्रीभगवंतांच्या चरणकमलांच्या कळ्यारूप किल्ल्यात राहून जरी तू या सहा शत्रूंना जिंकले आहेस, तरीसुद्धा प्रथम त्या पुराणपुरुषाने दिलेल्या भोगांचा उपभोग घे आणि नंतर निःसंग होऊन आपल्या आत्मस्वरूपात स्थिर हो. (१६-१९) श्रीशुकाचार्य म्हणतात - त्रैलोक्याचे गुरू श्रीब्रह्मदेव जेव्हा असे म्हणाले, तेव्हा स्वतःचे लहानपण लक्षात घेऊन परमभागवत प्रियव्रताने नम्रपणे मस्तक झुकवले. आणि "जशी आज्ञा" असे म्हणून मोठया आदराने त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानली. तेव्हा स्वायंभुव मनूंनी प्रसन्न मनाने भगवान ब्रह्मदेवांची शास्त्रोक्त पूजा केली. नंतर ब्रह्मदेव मन आणि वाणीचा विषय नसलेल्या, आपला आश्रय आणि सर्व व्यवहारांच्या पलीकडील अशा परब्रह्माचे चिंतन करीत आपल्या लोकी गेले. त्यावेळी प्रियव्रत आणि नारद सरळ मनाने त्यांचेकडे पाहात राहिले होते. (२०-२१) ब्रह्मदेवांच्या कृपेने अशा रीतीने आपले मनोरथ पूर्ण झाल्यानंतर मनूंनी देवर्षी नारदांच्या आज्ञेनुसार संपूर्ण पृथ्वीच्या रक्षणाचा भार प्रियव्रतावर सोपविला आणि ते विषयरूपी विषारी जलाने भरलेल्या गृहस्थाश्रमरूपी दुस्तर जलाशयातील भोगेच्छांपासून परावृत्त झाले. भगवंतांच्या इच्छेने आता पृथ्वीपती महाराज प्रियव्रत राज्य करू लागला. जे संपूर्ण जगाला बंधनातून सोडविण्यास समर्थ आहेत, त्या आदिपुरुष भगवंतांच्या चरणयुगुलांचे निरंतर ध्यान करीत राहिल्याने जरी त्याचे रागद्वेषादी सर्व मळ नष्ट झाले होते आणि हृदय अत्यंत शुद्ध झाले होते, तरीसुद्धा ज्येष्ठांचा मान राखण्यासाठी तो पृथ्वीचे राज्य करू लागला. त्यानंतर त्याने विश्वकर्मा प्रजापतीची कन्या बर्हिष्मतीशी विवाह केला. तिच्यापासून त्याला दहा पुत्र झाले. ते सर्वजण त्याच्याप्रमाणे शीलवान, गुणी, कर्मनिष्ठ, रूपवान आणि पराक्रमी होते. त्याला सर्वांत लहान ऊर्जस्वती नावाची एक कन्याही झाली. आग्नीध्र, इध्मजिव्ह, यज्ञबाहू, महावीर, हिरण्यरेता, घृतपृष्ठ, सवन, मेधातिथी, वीतिहोत्र, आणि कवी अशी त्या पुत्रांची नावे होती. ही सर्व नावे अग्नीची आहेत. त्यांपैकी कवी, महावीर, आणि सवन हे तिघे नैष्ठिक ब्रह्मचारी झाले. लहानपणापासूनच आत्मविद्येचा अभ्यास करीत त्यांनी शेवटी संन्यासाश्रम स्वीकारला. या निवृत्तिपरायण महर्षींनी संन्यासाश्रमात राहूनसुद्धा सर्व जीवांचे अधिष्ठान आणि संसारबंधनाला भ्यालेल्या लोकांना आश्रय देणार्या भगवान वासुदेवांच्या चरणारविंदांचे निरंतर चिंतन केले. त्यामुळे प्राप्त झालेल्या अखंड आणि श्रेष्ठ भक्तियोगामुळे त्यांचे अंतःकरण पूर्ण शुद्ध झाले व त्यात श्रीभगवंतांचा आविर्भाव झाला. तेव्हा देहादी उपाधींची निवृत्ती झाल्याने त्यांचा आत्मा सर्व जीवांच्या आत्मभूत अंतरात्म्यामध्ये एकरूप झाला. प्रियव्रताच्या दुसर्या पत्नीलाही उत्तम, तामस आणि रैवत असे तीन पुत्र झाले. ते आपापल्या नावांच्या मन्वंतरांचे अधिपती झाले. (२२-२८) अशा प्रकारे कवी इत्यादी तीन पुत्र निवृत्तिपरायण झाल्यानंतर महात्म्या राजा प्रियव्रताने अकरा अर्बुद वर्षेपर्यंत पृथ्वीवर शासन केले. ज्या ज्या वेळी तो आपल्या अप्रतिबंध पराक्रमयुक्त हातांनी धनुष्याची दोरी ओढून टणत्कार करी, त्यावेळी भयभीत होऊन सर्व धर्मद्रोही लोक परागंदा होत. प्राणप्रिय बर्हिष्मतीच्या दिवसेंदिवस वाढणार्या आनंददायी स्त्रीसुलभ हावभाव, लाजरे मंद हास्ययुक्त कटाक्ष आणि मनोहर क्रीडा इत्यादींमुळे प्रियव्रत जणू विवेकहीन, आत्मविस्मृती झालेल्या माणसांप्रमाणे सर्व भोग भोगू लागला. (२९) एकदा त्याने पाहिले की, भगवान सूर्य सुमेरू पर्वताची प्रदक्षिणा करीत असता पृथ्वीचा अर्धाच भाग प्रकाशात राहतो आणि अर्ध्या भागात अंधार असतो, तेव्हा त्याला हे आवडले नाही. तेव्हा भगवंतांच्या उपासनेमुळे अलौकिक प्रभावशाली अशा त्याने "मी रात्रीचा सुद्धा दिवस करीन," असे ठरवून सूर्याप्रमाणेच वेगवान व तेजस्वी रथात बसून, दुसरा जणू सूर्यच अशा रीतीने सूर्याच्या पाठोपाठ पृथ्वीच्या सात प्रदक्षिणा केल्या. त्यावेळी त्याच्या रथाच्या चाकांनी जे खडडे पडले, तेच सात समुद्र झाले. त्यांपासून सात द्वीपे बनली. त्यांची क्रमशः नावे जंबू, प्लक्ष, शाल्मली, कुश, क्रौंच, शाक आणि पुष्कर अशी आहेत. त्यांमध्ये पहिल्यापेक्षा नंतरच्या द्वीपांचा विस्तार दुप्पट आहे. आणि ही समुद्राच्या बाहेरच्या भागात पृथ्वीच्या चारी बाजूंना पसरलेली आहेत. हे सात समुद्र क्रमशः खारे पाणी, उसाचा रस, मदिरा, तूप, दूध, ताक आणि गोडया पाण्याने भरलेले आहेत. हे सातही समुद्र बेटांच्या खंदकांप्रमाणे आहेत. आणि विस्ताराच्या बाबतीत आपल्या आतील द्वीपांच्या बरोबरीचे आहेत. त्यांपैकी एकेका समुद्राने क्रमशः वेगवेगळ्या सात द्वीपांना बाहेरून वेढलेले आहे. बर्हिष्मतीपती महाराज प्रियव्रताने आपल्याला अनुकूल असलेले आपले पुत्र आग्नीध्र, इध्मजिव्ह, यज्ञबाहू, हिरण्यरेता, घृतपृष्ठ, मेधातिथी आणि वीतिहोत्र या एकेकांना क्रमशः वरील एकेका द्वीपाचा राजा बनविले. त्याने आपली कन्या ऊर्जस्वती हिचा विवाह शुक्राचार्यांशी करून दिला. तिच्यापासून शुक्रकन्या देवयानीचा जन्म झाला. राजन, ज्यांनी भगवच्चरणारविंदांच्या धुळीच्या प्रभावाने शरीराच्या तहान-भूक, शोक-मोह, आणि म्हातारपण-मृत्यु या सहा विकारांना किंवा मनासहित सहा इंद्रियांना जिंकले आहे, त्या भगवद्भक्तांचा असा पुरुषार्थ दिसणे ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. कारण वर्णबहिष्कृत पुरुषसुद्धा भगवंतांच्या नावाचा फक्त एक वेळ उच्चार केल्याने तत्काल संसारबंधनातून मुक्त होतो. (३०-३५) अशा प्रकारे अतुलनीय बल-पराक्रमाने युक्त असूनही महाराज प्रियव्रत, एकदा देवर्षी नारदांच्या चरणांना शरण जाऊनही पुन्हा दैववशात प्राप्त झालेल्या प्रपंचात गुंतल्याने कष्टी झाला आणि मनोमन विरक्त होऊन म्हणू लागला. ‘अरेरे ! फार वाईट झाले, माझ्या इंद्रियांनी मला या अविद्याजनित विषम विषयरूप अंधार्या विहिरीत ढकलले आहे. बस ! पुरे झाले हे ! मी तर पत्नीच्या हातातील खेळणे बनलो आहे. माझा धिक्कार असो !’ असे म्हणून त्याने स्वतःलाच दोष दिला. परमआराध्य श्रीहरींच्या कृपेने त्याची विवेकशक्ती जागृत झाली. त्याने ही पृथ्वी आपल्याला अनुकूल असणार्या पुत्रांना वाटून दिली आणि जिच्याबरोबर त्यांनी निरनिराळे भोग भोगले होते, त्या आपल्या राणीला साम्राज्य-लक्ष्मीसह मृतदेहाप्रमाणे सोडून दिले आणि हृदयात वैराग्य धारण करून भगवंतांच्या लीलांचे चिंतन करीत, त्या प्रभावाने श्रीनारदांनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे पुन्हा मार्गक्रमण सुरू केले. (३६-३८) प्रियव्रताविषयी खालील लोकोक्ती प्रसिद्ध आहे - "राजा प्रियव्रताने जी कर्मे केली, ती सर्व शक्तिमान ईश्वराशिवाय दुसरा कोण करू शकेल ? त्याने रात्रीचा अंधार नाहीसा करण्याचा प्रयत्न करीत आपल्या रथाच्या चाकांनी बनलेल्या खडडयांपासून सात समुद्र बनविले. प्राण्यांच्या सोयीसाठी द्वीपांच्या द्वारा पृथ्वीचे विभाग केले आणि प्रत्येक द्वीपामध्ये वेगवेगळ्या नद्या, पर्वत आणि वन इत्यादींनी त्यांच्या सीमा निश्चित केल्या. तो भगवद्भक्तांचा भक्त होता. त्याने पाताळलोक, देवलोक, मृत्युलोक तसेच कर्म आणि योगशक्तीने प्राप्त झालेले ऐश्वर्य नरकतुल्य मानले." (३९-४१) स्कंध पाचवा - अध्याय पहिला समाप्त |