श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय ३१ वा

प्रचेतांना श्रीनारदांचा उपदेश आणि त्यांना परमपदाचा लाभ -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

मैत्रेय म्हणतात - नंतर जेव्हा प्रचेतांना विवेक उत्पन्न झाला, तेव्हा त्यांना भगवंतांच्या वचनाचे स्मरण झाले आणि आपली पत्‍नी मारिषाला पुत्राजवळ सोडून ते ताबडतोब घराच्या बाहेर पडले. जेथे जाजली मुनींनी सिद्धी प्राप्त करून घेतली होती, त्या पश्चिम दिशेच्या समुद्राच्या तटावर ते जाऊन पोहोचले. आणि "समस्त भूतांमध्ये एकच आत्मतत्त्व विराजमान आहे," असे ज्ञान ज्यामुळे होते त्या आत्मविचाररूप ब्रह्मसत्राची त्यांनी दीक्षा घेतली. त्यांनी प्राण, मन, वाणी, आणि दृष्टी स्वाधीन करून शरीराला निश्चल आणि ताठ स्थितीत ठेवून आसनजय साधला व मग चित्त विशुद्ध परब्रह्मामध्ये लीन केले. अशा स्थितीत त्यांना देव आणि असुर दोघांनाही वंदनीय असणार्‍या श्रीनारदांनी पाहिले. नारदांना आलेले पाहून प्रचेता उठून उभे राहिले आणि प्रणाम करून आदरसत्कारपूर्वक देशकालानुसार त्यांनी त्यांची यथासांग पूजा केली. जेव्हा नारद सुखपूर्वक बसले, तेव्हा ते त्यांना म्हणाले. (१-४)

प्रचेता म्हणाले- हे देवर्षी, आपले स्वागत असो. मोठया भाग्याने आज आम्हांला आपले दर्शन झाले. ब्रह्मन, आपला संचार हा सूर्याप्रमाणे सर्व जीवांना ज्ञानाने अभयदान देण्यासाठीच होत असतो. प्रभो, गृहस्थाश्रमात आसक्त राहिल्याकारणाने, भगवान शंकर आणि भगवान श्रीविष्णूंनी आम्हांला जो उपदेश केला होता, तो आम्ही खरोखरच विसरलो आहोत. म्हणून ते परमार्थतत्त्वाचा साक्षात्कार करवणारे अध्यात्मज्ञान आपण आमच्या हृदयामध्ये पुन्हा प्रकाशित करावे. त्यायोगे हा दुस्तर संसारसागर आम्ही सहज पार करू. (५-७)

मैत्रेय म्हणतात - देवर्षी नारदांचे चित्त नेहमी भगवान श्रीकृष्णांमध्येच लागून राहिलेले असते. प्रचेतांनी असे विचारल्यावर ते त्यांना म्हणाले. (८)

नारद म्हणाले- राजांनो, ज्याच्या द्वारा सर्वात्मा सर्वेश्वर श्रीहरींचे सेवन केले जाते, मनुष्याचा तोच जन्म, तेच कर्म, तेच आयुष्य, तेच मन आणि तीच वाणी या लोकी सफल होते. आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार करून देणार्‍या श्रीहरींची प्राप्ती ज्यामुळे होत नाही, त्या, माता-पित्यांची पवित्रता, मौंजीबंधन आणि यज्ञदीक्षा यांनी प्राप्त होणार्‍या तीन प्रकारच्या श्रेष्ठ जन्मांचा, वेदोक्त कर्मांचा, देवतांप्रमाणे दीर्घ आयुष्याचा, शास्त्रज्ञानाचा, तपाचा, वाणीच्या चतुराईचा, अनेक प्रकारच्या गोष्टी स्मरणात ठेवण्याच्या शक्तीचा, तीव्र बुद्धीचा, बलाचा, इंद्रियांच्या सामर्थ्याचा, योगाचा, सांख्यज्ञानाचा, संन्यास आणि वेदाध्ययनाचा तसेच व्रत-वैराग्यादी अन्य कल्याणसाधनांचासुद्धा मनुष्याला काय उपयोग आहे ? सर्व प्रकारच्या कल्याणांचे अंतिम ध्येय आत्मप्राप्तीच आहे आणि आत्मज्ञान प्रदान करणारे श्रीहरीच संपूर्ण प्राण्यांचे प्रिय आत्मा आहेत. जसे वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्यानंतर त्याचे खोड, फांद्या, उपशाखा इत्यादी सर्वांचे पोषण होते आणि जसे जेवणाने प्राणांना तृप्त करण्यामुळे सर्व इंद्रिये पुष्ट होतात, तसेच श्रीभगवंतांची पूजा हीच सर्वांची पूजा होय. जसे पाणी सूर्याच्या उष्णतेने उत्पन्न होते आणि उन्हाळ्यात त्याच्याच किरणात ते प्रवेश करते तसेच सर्व चराचर भूतमात्र पृथ्वीपासून उत्पन्न होतात व पुन्हा तीतच विलीन होतात, त्याचप्रमाणे चेतन-अचेतन असा हा संपूर्ण प्रपंच श्रीहरींपासूनच उत्पन्न होतो आणि त्यांच्यातच विलीन होतो. वस्तुतः हे विश्व श्रीभगवंतांचे ते शास्त्रप्रसिद्ध सर्व-उपाधि-विरहित स्वरूपच आहे. जसे सूर्याची प्रभा त्याच्यापासून वेगळी नाही, त्याप्रमाणे कधी कधी गंधर्वनगरीप्रमाणे भासणारे हे जग भगवंतांपासून वेगळे नाही. तसेच जसे जागृतावस्थेत इंद्रिये क्रियाशील असतात, परंतु झोपेत त्यांची शक्ती लीन झालेली असते, त्याचप्रमाणे हे जग सर्गकालात भगवंतांपासून प्रगट होते आणि कल्पांत झाल्यावर त्यांच्यामध्येच विलीन होते. खरे पाहाता, भगवंतांच्या ठिकाणी द्रव्य, क्रिया आणि ज्ञानरूपी विविध अहंकारांच्या कार्यांची तसेच त्यांच्यामुळे होणार्‍या भेद व भ्रमाची सत्ता मुळीच नाही. राजे हो ! जसे ढग, अंधार आणि प्रकाश- हे आकाशातून क्रमाने प्रगट होतात आणि त्यातच विलीन होतात, परंतु आकाश त्यापासून लिप्त होत नाही. त्याचप्रमाणे या सत्त्व, रज आणि तमोमय शक्ती कधी परब्रह्मापासून उत्पन्न होतात आणि कधी त्यात लीन होऊन जातात. अशा प्रकारे यांचा प्रवाह चालूच असतो. परंतु यामुळे आकाशाप्रमाणे निःसंग असणार्‍या परमात्म्यामध्ये कोणताही विकार उत्पन्न होत नाही. म्हणून ब्रह्मदेव आदी सर्व लोकपालांचे सुद्धा अधीश्वर असलेल्या श्रीहरींना आत्म्याहून भिन्न न मानता तुम्ही त्यांचे भजन करा. कारण तेच सर्व देह धारण करणार्‍यांचे एकमात्र आत्मा आहेत. तेच जगताचे निमित्तकारण काल, उपादान कारण प्रधान आणि नियंता पुरुषोत्तम आहेत. तसेच आपल्या कालशक्तीने तेच या गुणांच्या प्रवाहरूप प्रपंचाचा संहार करतात. (९-१८)

सर्व जीवांवर दया करण्याने, जे काही मिळेल तेवढयात संतुष्ट राहिल्याने, तसेच सर्व इंद्रियांना विषयांपासून निवृत्त करून शांत केल्याने, ते भक्तवत्सल भगवान लवकरच प्रसन्न होतात. सर्व प्रकारच्या वासना नाहीशा झाल्याने ज्यांचे अंतःकरण शुद्ध झाले आहे, त्या संतांच्या हृदयात वृद्धिंगत होत जाणार्‍या भगवंतांच्या चिंतनाने आकर्षित होऊन अविनाशी श्रीहरी येतात आणि आपली भक्ताधीनता सार्थ करीत हृदयाकाशाप्रमाणे तिथून निघून जात नाहीत. भगवंतांना सर्वस्व मानणार्‍या अनासक्त पुरुषांवरच भगवंत प्रेम करतात. कारण ते भक्तिरस जाणणारे आहेत. जे लोक आपले शास्त्रज्ञान, धन, कुल आणि कर्मांच्या मदाने उन्मत्त होऊन निःस्पृह अशा साधुजनांचा तिरस्कार करतात, त्या दुर्बुद्धी लोकांनी केलेल्या पूजेचा भगवंत स्वीकार करीत नाहीत. भगवंत आत्मानंदाने परिपूर्ण आहेत. निरंतर आपल्या सेवेत राहाणारी लक्ष्मी आणि तिची इच्छा करणारे नरपती आणि देव यांची त्यांना अजिबात पर्वा नाही. असे असूनही ते आपल्या भक्तांच्या अधीन होऊनच राहातात. अहो, अशा करुणासागर श्रीहरींना, कोणताही कृतज्ञ पुरुष, थोडया वेळेपुरतासुद्धा कसा सोडू शकेल ? (१९-२२)

मैत्रेय म्हणतात - प्रचेतांना या उपदेशाबरोबरच भगवान नारदांनी भगवंतांसंबंधी आणखी बर्‍याचशा गोष्टी सांगितल्या आणि ते ब्रह्मलोकाला निघून गेले. संपूर्ण जगाचा पापरूपी मल दूर करणारे भगवच्चरित्र त्यांच्या तोंडून ऐकून प्रचेतागणसुद्धा भगवंतांच्या चरणकमलांचेच चिंतन करून भगवद्धामाला गेले. हे विदुरा, श्रीनारद आणि प्रचेतांच्या भगवत्कथांसंबंधीच्या संवादाविषयी आपण मला जे विचारले होते, ते मी आपल्याला सांगितले. (२३-२५)

श्रीशुकाचार्य म्हणतात - राजन, स्वायंभुव मनूचा पुत्र उत्तानपाद याच्या वंशाचे वर्णन झाले. आता प्रियव्रताच्या वंशाचे विवरणही ऐक. राजा प्रियव्रताने श्रीनारदांपासून आत्मज्ञानाचा उपदेश ग्रहण करूनसुद्धा राज्यभोग घेतला होता. तसेच शेवटी ही संपूर्ण पृथ्वी आपल्या पुत्रांमध्ये वाटून देऊन ते भगवंतांच्या परमधामाला गेले होते. (२६-२७)

इकडे श्रीमैत्रेयांच्या मुखाने ही भगवद्‌गुणानुवादयुक्त पवित्र कथा ऐकून विदुर प्रेममग्न झाला. भक्तिभावाचा उद्रेक झाल्याने त्याच्या डोळ्य़ांतून आसवांच्या धारा वाहू लागल्या आणि त्याने हृदयात भगवच्चरणांचे स्मरण करीत मुनिवर मैत्रेयांच्या चरणांवर आपले मस्तक ठेवले. (२८)

विदुर म्हणाला - महायोगिन, आपण दयाळू आहात. आज आपण मला अज्ञानांधकारातून जेथे अनासक्तांचे सर्वस्व श्रीहरी विराजमान होतात, तेथे पोहोचविले आहे. (२९)

श्रीशुकाचार्य म्हणतात - मैत्रेयांना प्रणाम करून विदुराने त्यांची आज्ञा घेतली आणि नंतर शांत चित्ताने आपल्या बंधुजनांना भेटण्यासाठी तो हस्तिनापुराला गेला. राजन, भगवंतांना शरण आलेल्या परमभागवत राजांचे हे चरित्र जो मनुष्य ऐकेल, त्याला दीर्घ आयुष्य, धन, सुयश, कल्याण, सद्‌गती आणि ऐश्वर्याची प्राप्ती होईल. (३०-३१)

स्कंध चवथा - अध्याय एकतिसावा समाप्त
स्कंध चौथा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP