श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय ३० वा

प्रचेतांना भगवान श्रीविष्णूंचे वरदान -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

विदुराने विचारले - ब्रह्मन, आपण राजा प्राचीनबर्हीच्या ज्या पुत्रांचे वर्णन केले होते, त्यांनी रुद्रगीत गाऊन श्रीहरींची स्तुती करून कोणती सिद्धी प्राप्त केली ? हे बार्हस्पत्य, मोक्षाधिपती श्रीनारायणांचे अत्यंत प्रिय असे भगवान शंकर यांचे योगायोगाने सान्निध्य मिळाल्यामुळे प्रचेतांनी मुक्ती तर मिळविली असेलच; पण त्यापूर्वी त्यांनी या लोकात किंवा परलोकात काय मिळविले, ते सांगावे.(१-२)

मैत्रेय म्हणाले - पित्याची आज्ञा पालन करणार्‍या प्रचेतांनी समुद्रात उभे राहून रुद्रगीताच्या जपयज्ञरूप तपश्चर्येने श्रीहरींना प्रसन्न करून घेतले. दहा हजार वर्षांनंतर पुराणपुरुष श्रीनारायण आपल्या शांत तेजाने त्यांचे क्लेश दूर करीत त्यांच्यासमोर प्रगट झाले. गरुडाच्या खांद्यावर बसलेले श्रीभगवान मेरुपर्वताच्या शिखरावर असलेल्या काळ्या ढगासारखे दिसत होते. त्यांच्या अंगावर पीतांबर आणि गळ्यामध्ये कौस्तुभमणी शोभून दिसत होता. आपल्या दिव्य तेजाने ते सर्व दिशांतील अंधार नाहीसा करीत होते. चमकणार्‍या सुवर्णालंकारांनी त्यांचे गाल आणि मनोहर मुखकमल शोभत होते. त्यांच्या मस्तकावर झगमगणारा मुकुट शोभत होता. प्रभूंच्या आठ हातात आठ आयुधे होती. देव, मुनी आणि पार्षदगण सेवा करीत होते आणि गरुड हाच किन्नर पंखांच्या सामयुक्त ध्वनीने त्यांची कीर्ती गात होता. त्यांच्या दीर्घ व पुष्ट आठ हातांच्यामध्ये लक्ष्मीबरोबर स्पर्धा करणारी वनमाला विराजत होती. आदिपुरुष श्रीनारायणांनी येऊन शरणागत प्रचेतांकडे दयादृष्टीने पाहिले आणि मेघाप्रमाणे गंभीर वाणीने ते म्हणाले. (३-७)

श्रीभगवान म्हणाले - राजपुत्रांनो, तुमचे कल्याण असो. तुमचे आपापसात मोठे प्रेम असल्यामुळे तुम्ही सर्वजण एकाच धर्माचे पालन करीत आहात. तुमच्या या प्रेमामुळे मी प्रसन्न झालो आहे. वर मागा. जो मनुष्य दररोज सायंकाळी तुमचे स्मरण करील, त्याचे आपल्या भावांशी स्वतःवर असावे तसे प्रेम राहील. तसेच सर्व जीवांचे बाबतीत मैत्रीचा भाव निर्माण होईल. जे लोक प्रातःकाळी आणि सायंकाळी एकाग्रचित्ताने रुद्रगीताच्या द्वारे माझी स्तुती करतील, त्यांना मी इच्छित वर आणि शुद्ध बुद्धी प्रदान करीन. तुम्ही मोठया प्रसन्नतेने आपल्या पित्याची आज्ञा शिरोधार्य मानलीत, यामुळे तुमची श्रेष्ठ कीर्ती सर्व लोकांत पसरेल. तुम्हांला एक विख्यात पुत्र होईल. तो गुणांचे बाबतीत कोणत्याही प्रकारे ब्रह्मदेवांपेक्षा कमी असणार नाही आणि आपल्या संतानाने तिन्ही लोकांना तो पूर्णत्व देईल. (८-१२)

राजकुमारांनो, कंडू ऋषींच्या तपश्चर्येचा भंग करण्यासाठी इंद्राने पाठविलेल्या प्रम्लोचा अप्सरेला कमलनयना कन्या झाली होती. तिला सोडून प्रम्लोचा स्वर्गलोकी गेली, तेव्हा वृक्षांनी त्या कन्येचे पालन-पोषण केले. भुकेने व्याकूळ होऊन ती रडू लागली, तेव्हा औषधींचा राजा चंद्र याने तिची दया येऊन तिच्या तोंडामध्ये आपली अमृतवर्षाव करणारी तर्जनी दिली. माझे भक्त असणार्‍या तुमच्या वडिलांनी तुम्हांला संतान उत्पन्न करण्याची आज्ञा केली आहे. म्हणून तुम्ही लवकरच त्या सुंदर कन्येशी विवाह करा. तुम्ही सर्वजण एकाच धर्माचे पालन करीत आहात आणि तुमचा स्वभावही एकसारखा आहे. म्हणून तुमच्या सारखाच धर्म आणि स्वभाव असणारी ती सुंदर कन्या तुम्हा सर्वांची पत्‍नी होईल. तसेच तुम्हा सर्वांवर तिचे सारखेच प्रेम असेल. तुम्ही सर्वजण माझ्या कृपेने दहा लाख दिव्य वर्षांपर्यंत पूर्ण बलवान राहाल आणि अनेक प्रकारचे पृथ्वीवरचे आणि स्वर्गातीलही भोग भोगाल. शेवटी माझ्या अविचल भक्तीमुळे हृदयातील वासनारूप मळ जळून गेल्यानंतर तुम्ही इह-परलोकातील नरकतुल्य भोगांना विटून त्यांचा त्याग कराल आणि माझ्या परमधामी जाल. ज्या लोकांची कर्मे भगवदर्पणबुद्धीने होतात आणि ज्यांचा सारा वेळ माझ्या कथावार्तांमध्येच व्यतीत होतो, ते गृहस्थाश्रमात असूनही घर त्यांच्या बंधनाला कारणीभूत होत नाही. ब्रह्मवेत्त्या वक्त्यांच्याकडून माझ्या कथा ऐकल्यामुळे ज्ञानस्वरूप परब्रह्म असा मी त्यांच्या हृदयात नित्य-नूतन भासत राहातो आणि मला प्राप्त करून घेतल्यानंतर जीवांना मोह होऊ शकत नाही, शोक नाही की हर्षही नाही. (१३-२०)

मैत्रेय म्हणतात - भगवंतांच्या दर्शनामुळे प्रचेतांचा रज-तमो-गुणामुळे उत्पन्न होणारा मल नाहीसा झाला होता. सर्व पुरुषार्थांचे आश्रय आणि सर्वांचे परम सुहृद श्रीहरी त्यांना असे म्हणाले, तेव्हा ते हात जोडून सद्‌गदित वाणीने म्हणू लागले. (२१)

प्रचेता म्हणाले - प्रभो, आपण भक्तांचे क्लेश नाहीसे करणारे आहात. वेद आपल्या श्रेष्ठ गुण आणि नामांचे निरूपण करतात. आपला वेग मन आणि वाणीच्या वेगापेक्षाही अधिक आहे. तसेच आपले स्वरूप सर्व इंद्रियांच्या गतीच्याही पलीकडचे आहे. आम्ही आपल्याला वारंवार नमस्कार करीत आहोत. आपण आपल्या स्वरूपात स्थिर राहात असल्याकारणाने नित्य-शुद्ध आणि शांत आहात. मनरूप निमित्तकारणामुळे आपल्यात आणि आमच्यात आम्हांला खोटाच द्वैताचा भास होत आहे. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लयासाठी आपण मायेच्या गुणांचा स्वीकार करूनच ब्रह्मा, विष्णू, आणि महादेव ही रूपे धारण करीत आहात. आम्ही आपणांस नमस्कार करतो. आपण विशुद्ध सत्त्वस्वरूप आहात. आपले ज्ञान संसारबंधन तोडून टाकते. आपणच सर्व भागवतांचे प्रभू वसुदेवनंदन भगवान श्रीकृष्ण आहात. आपणांस नमस्कार असो. आपल्याच नाभीतून ब्रह्मांडरूप कमळ प्रगट झाले होते. आपल्या गळ्यात कमळपुष्पांची माळ शोभून दिसत आहे. तसेच आपले चरण कमळाप्रमाणे कोमल आहेत. कमलनयना ! आपणास नमस्कार असो. कमलपुष्पातील केसराप्रमाणे स्वच्छ पीतांबर आपण धारण केलेला आहे. आपण समस्त भूतांचे आश्रयस्थान आहात तसेच सर्वांचे साक्षी आहात. आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत. (२२-२६)

भगवन, आपले हे स्वरूप सर्व दुःखे नाहीसे करणारे आहे. अविद्या, अस्मिता, रागद्वेषादी क्लेशांनी त्रासलेल्या आमच्यासमोर आपण हे प्रगट केले आहे. यापेक्षा अधिक कृपा कोणती असणार ? अमंगलाचा नाश करणार्‍या प्रभो, दीनांवर दया करणार्‍या प्रभूंनी वेळोवेळी "हे आपले आहेत" असे मानून त्यांचे स्मरण ठेवावे. यामुळे त्यांच्या भक्तांचे चित्त शांत होते. आपण तर क्षुद्रातिक्षुद्र प्राण्यांच्याही अंतःकरणात अंतर्यामीरूपाने विराजमान आहात. मग आपले उपासक आम्ही ज्या ज्या कामना करतो, त्या आपणाला कशा कळणार नाहीत ? हे जगदीश्वरा ! आपन मोक्षाचा मार्ग दाखविणारे आणि स्वतः पुरुषार्थस्वरूप आहात. आपण आमच्यावर प्रसन्न आहात, हाच आमचा अभीष्ट वर होय. हे नाथ, तरीही आम्ही एक वर आपणाकडे मागतो. प्रभो, आपण प्रकृतीच्या पलीकडील आहात आणि आपल्या विभूतींचाही काही अंत लागत नाही, म्हणूनच आपण अनंत म्हणविले जाता. भुंग्याला सहजपणे जर पारिजातक वृक्षाची प्राप्ती झाली, तर तो दुसर्‍या वृक्षाकडे कशाला जाईल ? मग साक्षात आपल्या चरणांची प्राप्ती झाल्यावर आम्ही आणखी काय मागावे ? जोपर्यंत आपल्या मायेने मोहित होऊन आम्ही आपल्या कर्मांनुसार संसारात फिरत राहू, तोपर्यंत जन्मोजन्मी आम्हांला आपल्या प्रेमी भक्तांची संगती मिळत राहो. आम्ही भगवद्‌भक्तांच्या क्षणभर संगतीच्या तुलनेत स्वर्ग किंबहुना मोक्षही तुच्छ मानतो. तर मानवी भोगांची त्यापुढे काय कथा ? जेथे नेहमी भगवंतांच्या मधुर कथा होत राहातात, तेथे त्यांच्या श्रवणाने भोग-तृष्णा शांत होते, प्राण्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे वैर किंवा उद्वेग राहात नाही. कारण चांगल्या कथांच्याद्वारा निष्कामभावाने, संन्यासी लोकांचे एकमात्र आश्रय साक्षात श्रीनारायणांचे वारंवार गुणगान होत राहाते. आपले ते भक्तजन तीर्थक्षेत्रे पवित्र करण्याच्या उद्देशाने पृथ्वीवर पायीच भ्रमण करतात. मग त्यांचा सहवास संसाराने भयभीत झालेल्यांना का बरे आवडणार नाही ? (२७-३७)

भगवन, आपले प्रिय सखा भगवान शंकरांच्या क्षणभर सहवासानेच आज आम्हांला आपले साक्षात दर्शन झाले. जन्म-मरणरूप असाध्य रोगाचे आपण श्रेष्ठतम वैद्य आहात; म्हणून आम्ही आपलाच आश्रय घेतला आहे. प्रभो, आम्ही जे काही उत्तम अध्ययन केले आहे. निरंतर सेवाशुश्रूषा करून गुरू, ब्राह्मण आणि वृद्धांना प्रसन्न केले आहे, दोषबुद्धी टाकून श्रेष्ठ पुरुष, हितचिंतक, बंधुवर्ग तसेच समस्त प्राण्यांना वंदन केले आहे आणि अन्नाचा त्याग करून दीर्घकालपर्यंत पाण्यात उभे राहून तप केले आहे.ते सर्व सर्वव्यापक अशा आपल्या पुरुषोत्तमांच्या संतोषाला कारण होवो, हाच आम्ही वर मागत आहोत. स्वामी, आपल्या थोरवीचा अंत न लागताही मनू, ब्रह्मदेव, भगवान शंकर तसेच तप आणि ज्ञानाने शुद्धचित्त झालेले अन्य पुरुष नेहमी आपली स्तुती करीत राहातात. म्हणून आम्हीसुद्धा आपल्या बुद्धीनुसार आपले यशोगान गात आहोत. आपण सगळीकडे समान, शुद्धस्वरूप आणि परमपुरुष आहात. आपण सत्त्वमूर्ती भगवान वासुदेव आहात. आपणांला नमस्कार असो. (३८-४२)

मैत्रेय म्हणतात - प्रचेतांनी अशी स्तुती केल्यावर शरणागतवत्सल श्रीभगवान प्रसन्न होऊन ‘तथास्तु ’ म्हणाले. अनंत सामर्थ्यसंपन्न श्रीहरींच्या दर्शनाने प्रचेतांचे डोळे तृप्त झाले नव्हते, म्हणून त्यांना ते जावेसे वाटत नव्हते, तरीसुद्धा ते आपल्या परमधामाकडे गेले. यानंतर प्रचेतांनी समुद्राबाहेर येऊन पाहिले की, सगळ्या पृथ्वीला उंच उंच वृक्षांनी वेढले आहे, जणू काही स्वर्गाकडे जाणारा मार्ग रोखून धरण्यासाठीच ते इतके उंच झाले होते. हे पाहून ते वृक्षांवर अतिशय रागावले. तेव्हा पृथ्वीला वृक्ष-वेलींनी रहित करण्यासाठी काळाग्निरुद्र जसा प्रलयकाली सोडतो, तसा प्रचंड वायू आणि अग्नी त्यांनी आपल्या मुखातून सोडला. ब्रह्मदेवांनी पाहिले की, ते सर्व वृक्षांना जाळीत आहेत. तेव्हा ते तेथे आले आणि त्यांनी प्राचीनबर्हीच्या मुलांना युक्तीने समजावून शांत केले. यानंतर जे काही वृक्ष शिल्लक होते, त्यांनी भिऊन ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून ती कन्या आणून प्रचेतांना दिली. ब्रह्मदेवांच्या आज्ञेनुसार प्रचेतांनीसुद्धा त्या मारिषा नावाच्या कन्येशी विवाह केला. तिच्याचपासून ब्रह्मदेवांचा पुत्र दक्ष याने महादेवांची अवज्ञा केल्यामुळे आपल्या पहिल्या शरीराचा त्याग करून नवा जन्म घेतला. जेव्हा कालक्रमानुसार पूर्वसर्ग नष्ट झाला, तेव्हा याच दक्षाने चाक्षुष मन्वन्तर आल्यानंतर भगवंतांच्या प्रेरणेने आपल्या इच्छेनुसार नवी प्रजा उत्पन्न केली. यानेच जन्म होताच, आपल्या कांतीने सर्व तेजस्वी लोकांचे तेज हिरावून घेतले. कर्म करण्यामध्ये हा अत्यंत दक्ष होता. यावरून त्याचे ‘दक्ष ’ हे नाव पडले. ब्रह्मदेवांनी याला प्रजापतींचा नायक या पदावर अभिषिक्त करून सृष्टीचे रक्षण करण्यासाठी त्याची नियुक्ती केली आणि यानेच दुसर्‍या प्रजापतींना आपापल्या कार्यात नियुक्त केले. (४३-५१)

स्कंध चवथा - अध्याय तिसावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP