|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ४ था - अध्याय २९ वा
पुरंजनोपाख्यानाचे तात्पर्य - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] प्राचीनबर्ही म्हणाला - भगवन, आपल्या म्हणण्याचे तात्पर्य पूर्ण्पणे मला समजले नाही. विवेकी पुरुषच याचे तात्पर्य समजू शकतात. कर्माने मोहित झालेले आम्ही नाही. (१) श्रीनारद म्हणाले - पुरंजन (नगर निर्माण करणारा) जीव आहे, जो आपल्यासाठी एक, दोन, तीन, चार किंवा अनेक पायांचे किंवा बिनपायांचे शरीररूप नगर तयार करतो. अविज्ञात नावाने ओळखला जाणारा त्या जीवाचा जो सखा, तो ईश्वर आहे. कारण कोणत्याही प्रकारचे नाव, गुण, किंवा कर्मांनी जीवांना त्याचा पत्ता लागत नाही. जीवाने जेव्हा सुख-दुःखरूपी सर्व विषय भोगण्याची इच्छा केली, तेव्हा त्याने दुसर्या कोणत्याही शरीरापेक्षा नऊ दारे, दोन हात आणि दोन पायांचा मानवदेहच पसंत केला. बुद्धीलाच तू पुरंजनी नावाची स्त्री समज. हिच्यामुळेच देह आणि इंद्रिये यांच्यामध्ये मी-माझेपणाचा भाव निर्माण होतो आणि पुरुष हिच्या आश्रयाने या शरीरात इंद्रियांच्या द्वारे विषय उपभोगतो. ज्यांच्यामुळे सर्व प्रकारचे ज्ञान आणि कर्मे होतात, ती दहा इंद्रियेच याचे मित्र होत. इंद्रियांच्या वृत्ती तिच्या सखी होत. प्राण, अपान, व्यान, उदान, समान, या पाच वृत्तींचा प्राणवायू हाच नगराचे रक्षण करणारा पाच फणा असलेला सर्प होय. दोन्ही प्रकारच्या इंद्रियांचे नायक मन यालाच अकरावा महाबलवान योद्धा समजावे. शब्दादी पाच विषयच पांचालदेश आहे, ज्यामध्ये ते नऊ दारे असलेले नगर वसलेले आहे. (२-७) त्या नगरात एकेका स्थानावर दोन-दोन दारे सांगितली होती, ती म्हणजे दोन डोळे, दोन नाकाची छिद्रे आणि दोन कर्णछिद्रे होत. त्यांच्या जोडीने मुख, लिंग आणि गुदा हे तीन आणखी त्यात मिळवून नऊ दारे होतात. यांच्याद्वारेच तो जीव इंद्रियांसह बाह्य विषयांकडे जातो. यांपैकी जे दोन डोळे, दोन नाकाची छिद्रे आणि एक मुख ही पाच पूर्वेकडील दारे होत. उजव्या कानाला दक्षिणेकडील आणि डाव्या कानाला उत्तरेकडील दार समजावे. गुदा आणि लिंग ही खालच्या बाजूची दोन छिद्रे पश्चिमेकडील दारे होत. खद्योता आणि आविर्मुखी नावाची एका ठिकाणी जी दोन दारे सांगितली होती, ते डोळे होत. तसेच रूप (म्हणजे) विभ्राजित नावाचा देश आहे, ज्याचा जीव या दारांमार्फत डोळ्यांच्या सहाय्याने अनुभव घेतो. (डोळ्यांनाच सुरुवातीला द्युमान नावाचा मित्र म्हटले आहे.) नाकाची दोन्ही छिद्रे नलिनी आणि नालिनी नावाची दारे होत आणि नाकाचा विषय गंध हाच सौरभ देश होय. तसेच घ्राणेंद्रिय (म्हणजेच) अवधूत नावाचा मित्र होय. मुख म्हणजेच मुख्य नावाचे दार होय. त्यात राहणारे वागिंद्रिय विपण नावाचा मित्र होय आणि रसनेंद्रिय रसविद् नावाचा मित्र आहे. वाणीचे कार्य ‘आपण ’ होय व वेगवेगळ्या प्रकारचे अन्न बहूदन आहे. तसेच उजवा कान पितृहू आणि डावा कान देवहू म्हणविला जातो. कर्मकांडरूप प्रवृत्तिमार्गाचे शास्त्र आणि उपासनाकांडरूप निवृत्तिमार्गाचे शास्त्र म्हणजेच अनुक्रमे दक्षिण आणि उत्तर पांचालदेश आहे. ही (शास्त्रे) श्रवणेंद्रियरूप श्रुतधराच्या साहाय्याने ऐकून जीव अनुक्रमे पितृयान आणि देवयान मार्गाने जातो. लिंग हे आसुरी नावाचे पश्चिमेकडील दार आहे, स्त्रीसंग (हा) ग्रामक नावाचा देश आहे आणि लिंगामध्ये राहाणारे उपस्थेंद्रिय दुर्मद नावाचा मित्र आहे. गुदा (हे) निऋति नावाचे पश्चिमेकडील दार होय. नरक वैशस नावाचा देश आहे आणि गुदामध्ये स्थित पायु इंद्रिय लुब्धक नावाचा मित्र आहे. याखेरीज दोन पुरुष आंधळे असल्याचे सांगितले होते, त्याचेसुद्धा रहस्य ऐक. ते म्हणजे हात आणि पाय होत. यांच्याच साहाय्याने जीव अनुक्रमे सर्व कामे करतो आणि इकडे तिकडे जातो. हृदय अंतःपुर आहे. त्यात राहणारे मन हे विषूची नावाचा प्रधान सेवक आहे. मनाच्या सत्त्वादी गुणांमुळेच मनाला प्रसन्नता, हर्ष किंवा मोह होतो. बुद्धी ज्या ज्या प्रकारे स्वप्नावस्थेत विकाराला प्राप्त होते आणि जागृत अवस्थेत इंद्रियादिकांना विकृत करते, तिच्या गुणांनी लिप्त होऊन आत्मा (जीव) सुद्धा त्या त्या रूपात त्या वृत्तींचे अनुकरण करण्यास भाग पाडला जातो. वास्तविक तो त्यांचा निर्विकार साक्षीदार आहे. (८-१७) शरीर रथ आहे.ज्ञानेंद्रियरूपी पाच घोडे त्याला जुंपलेले आहेत.संवत्सररूप कालाप्रमाणे न थांबणारा त्याचा वेग आहे असे दिसते, मात्र त्याची गती दिसत नाही. पुण्य आणि पाप ही दोन प्रकारची कर्मे त्याची चाके आहेत, तीन गुण ध्वजा होत आणि पाच प्राण लगाम आहेत. मन लगाम आहे, बुद्धी सारथी आहे, हृदय बसण्याचे ठिकाण आहे. सुख-दुःखादी द्वंद्वे जोखड आहेत, इंद्रियांचे पाच विषय त्यात ठेवलेली आयुधे आहेत आणि त्वचा इत्यादी धातू त्याचे आवरण आहे. पाच कर्मेंद्रिये त्याच्या पाच प्रकारच्या गती आहेत. या रथावर चढून हा जीव मृगजळाप्रमाणे खोटया विषयांच्या पाठीमागे धावतो. अकरा इंद्रिये त्याची सेना आहे आणि पाच ज्ञानेंद्रियांच्या द्वारा त्या त्या इंद्रियांच्या विषयांना ग्रहण करणे हेच त्याचे शिकार खेळणे होय. (१८-२०) ज्याच्या द्वारा काळाचे ज्ञान होते ते संवत्सर म्हणजेच चंडवेग नावाचा गंधर्वराज होय. त्याच्या अधीन असणारे जे तीनशे साठ गंधर्व म्हणून सांगितले आहेत, ते दिवस होत आणि तीनशे साठ गंधर्व-स्त्रिया रात्री होत. हे आळीपाळीने फिरत राहून मनुष्याचे आयुष्य हरण करतात. वृद्धावस्थाच साक्षात कालकन्या होय. तिला कोणीही पुरुष पसंत करीत नाही. तेव्हा मृत्यूरूप यवनराजाने लोकांचा संहार करण्यासाठी तिचा बहीण म्हणून स्वीकार केला. मानसिक क्लेश आणि शारीरिक कष्ट हेच त्या यवनराजाचे पायदळ आहे. तसेच प्राण्यांना क्लेश देउन तत्परतेने मृत्यूच्या मुखात घेऊन जाणारे शीत आणि उष्ण हे दोन प्रकारचे ज्वर म्हणजेच प्रज्वार नावाचा त्याचा भाऊ होय. (२१-२३) अशा प्रकारे हा देहाभिमानी जीव अज्ञानाने आच्छादित होऊन अनेक प्रकारचे आधिदैविक, आधिभौतिक व आध्यात्मिक कष्ट भोगीत शंभर वर्षेंपर्यंत मनुष्य शरीरात पडून राहातो. खरे पाहाता तो निर्गुण आहे; परंतु प्राण, इंद्रिये आणि मनाच्या धर्मांना आपलेच आहेत असे समजून, मी-माझेपणाच्या अभिमानाने बांधला जाऊन क्षुद्र विषयांचे चिंतन करीत निरनिराळी कर्मे करीत राहातो. तो जरी स्वयंप्रकाश असला तरीसुद्धा जोपर्यंत सर्वांचे परमगुरू आत्मस्वरूप श्रीभगवंतांच्या स्वरूपाला जाणत नाही, तोपर्यंत प्रकृतीच्या गुणांमध्येच बांधलेला राहतो. त्या गुणांचा अभिमानी असल्यामुळे तो पराधीन होऊन सात्त्विक, राजस आणि तामस कर्मे करतो आणि त्या कर्मांनुसार निरनिराळ्या योनींमध्ये जन्म घेतो. तो कधी सात्त्विक कर्मांच्या योगाने प्रकाशमान अशा स्वर्गलोकी जातो, कधी राजस कर्मांच्यामुळे दुःखमय रजोगुणी लोकात जातो. तेथे त्याला विविध कर्मांचे क्लेश भोगावे लागतात. आणि कधी तमोगुणी कर्मांच्या द्वारा शोकमय तामसी योनींमध्ये जन्म घेतो. अशा प्रकारे आपली कर्मे आणि गुणांच्या अनुसार देवयोनी, मनुष्ययोनी किंवा पशु-पक्षीयोनींत जन्म घेऊन तो अज्ञानांध जीव कधी पुरुष, कधी स्त्री तर कधी नपुंसक होतो. भुकेने व्याकूळ झालेला बिचारा कुत्रा दारोदार भटकत आपल्या प्रारब्धानुसार कुठे काठीचा मार खातो, तर कुठे अन्न खातो, त्याप्रमाणे हा जीव चित्तामध्ये अनेक प्रकारच्या वासना घेऊन उच्च-नीच मार्गाने वर-खाली किंवा मध्यम लोकात भटकत आपल्या कर्मानुसार सुख-दुःखे भोगीत राहतो. (२४-३१) आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक या तीन प्रकारच्या दुःखापैकी कोणत्याही एकातून जीवाची सर्वथैव सुटका होऊ शकत नाही. जरी असे कधी वाटले, तरी ती फक्त तात्कालिक आहे. एखाद्याने डोक्यावर भारी बोजा घेऊन जाताना तो कधी खांद्यावर घ्यावा, त्याप्रमाणे दुःखातून सुटण्याच्या सर्व प्रतिक्रिया समजाव्या. जरी एखाद्या उपायाने मनुष्याची एका प्रकारच्या दुःखातून सुटका झाली, तरी दुसरे दुःख त्याच्या डोक्यावर येऊन स्वार होते. हे राजा, ज्याप्रमाणे एका स्वप्नातून पडणारे दुसरे स्वप्न हा स्वप्नातून कायमची सुटका करून घेण्याचा उपाय होऊ शकत नाही, त्याप्रमाणे कर्मफल भोगातून कायमची सुटका होण्याचा कर्म हा मुळीच उपाय होऊ शकत नाही. कारण कर्म आणि कर्मफलभोग दोन्हीही अविद्येने युक्त असतात. जसे आपल्या मनोमय लिंगशरीराने स्वप्नावस्थेत विहार करणार्या प्राण्याला स्वप्नामध्ये प्रत्यक्ष पदार्थ नसतानाही त्यांचा भास होतो, तसेच हे दिसणारे पदार्थ खरोखर नसतानाही अज्ञान-निद्रा असेपर्यंत खरेच वाटतात आणि जीवाला जन्म-मरणरूप संसारापासून मुक्ती मिळत नाही. (म्हणून यापासून कायमची सुटका होण्याचा आत्मज्ञान हाच एकमेव उपाय आहे.) (३२-३५) ज्या अविद्येमुळे परमार्थस्वरूप आत्म्यालाही जन्म-मरणरूप अनर्थपरंपरा प्राप्त झाली आहे. तीपासून सुटका, गुरुस्वरूप श्रीहरीविषयी नितांत भक्ती निर्माण झाल्यावरच होऊ शकते. भगवान वासुदेवांमध्ये एकाग्रतापूर्वक सम्यक ज्ञानाने निर्माण केलेला भक्तिभावच ज्ञान आणि वैराग्य निर्माण करतो. हे राजर्षी, हा भक्तिभाव, भगवंतांच्या कथांच्या आश्रयाला राहातो. म्हणून जो श्रद्धापूर्वक त्या कथा दररोज ऐकतो किंवा वाचतो, त्याला अगदी लवकर त्याची प्राप्ती होते. राजा, ज्या ठिकाणी भगवद्गुण सांगण्यासाठी आणि ऐकण्यासाठी तत्पर असणारे विशुद्ध चित्ताचे भक्तजन राहातात, त्या साधु-समाजात सगळीकडून महापुरुषांच्या मुखातून निघालेल्या श्रीमधुसूदन भगवंतांच्या चरित्ररूप शुद्ध अमृताच्या अनेक नद्या वाहात असतात. जे लोक अतृप्त चित्ताने ऐकण्यासाठी तत्पर होऊन आपल्या कानांनी त्या अमृताचे सेवन करून तृप्त होतात, त्यांना तहान-भूक, भय, शोक आणि मोह काहीच बाधा करू शकत नाहीत. अरेरे ! नैसर्गिकरित्या प्राप्त होणार्या तहान-भूक या विघ्नांनी सदैव घेरलेला जीवसमुदाय श्रीहरींच्या कथामृतसागरावर का बरे प्रेम करीत नाही ? साक्षात प्रजापतींचेही पती असलेले ब्रह्मदेव, भगवान शंकर, स्वायंभुव मनू, दक्षादी प्रजापतिगण, सनकादिक नैष्ठिक ब्रह्मचारी, मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतू, भृगू, वसिष्ठ आणि मी असे जितके ब्रह्मज्ञानी मुनी आहेत, ते सर्वजण वाङ्मयात पारंगत असूनही तप, उपासना आणि समाधीच्या द्वारे सर्वसाक्षी परमेश्वराला पाहाण्याचा प्रयत्न करीत असले, तरी पाहू शकले नाहीत. अनंत वेदांचा अभ्यास करून मंत्रांमध्ये सांगितलेल्या वज्रधारी इत्यादी गुणांनी युक्त इंद्रादी देवतांच्या रूपांमध्ये असणार्या त्या परमात्म्याचे यज्ञांनी पूजन करणारेसुद्धा त्याच्या स्वरूपाला जाणत नाहीत. हृदयामध्ये वारंवार चिंतन केल्याने भगवान ज्यावेळी ज्याच्यावर कृपा करतात, त्याचवेळी तो लौकिक व्यवहार आणि वैदिक कर्मांविषयीचा दुराग्रह सोडून देतो. (३६-४६) बर्हिष्मन, तू या कर्मांमध्ये परमार्थबुद्धी ठेवू नकोस. ही कर्मे ऐकण्यास गोड वाटतात; परंतु परमार्थाला स्पर्शही करीत नाहीत. केवळ अज्ञानामुळेच ही परमार्थासारखी वाटतात. बुद्धी मलिन झालेले जे कर्मकांडी लोक वेदांना कर्मपर समजतात, ते त्यांचे मर्म जाणत नाहीत. याचे कारण जेथे भगवान जनार्दन आहेत, तेच आपले स्वरूपभूत आत्मा आहेत, हे तत्त्व ते जाणत नाहीत. पूर्वेकडे टोके असलेल्या दर्भांनी संपूर्ण पृथ्वीला आच्छादित करून व अनेक पशूंचा वध करून तू मोठा कर्माभिमानी आणि गर्विष्ठ झाला आहेस. परंतु वास्तविक तुला कर्म किंवा उपासना यांपैकी कशाचेही रहस्य माहीत नाही. ज्यामुळे श्रीहरींना प्रसन्न केले जाऊ शकते, तेच वास्तविक कर्म आहे आणि जिच्यामुळे भगवंतांमध्ये चित्त स्थिर होते, तीच उपासना आहे. श्रीहरी सर्व देह धारण करणार्यांचे आत्मा, नियमन करणारे आणि स्वतंत्रपणे कारण आहेत. म्हणून त्यांचे चरणच मनुष्यांचे एकमेव आश्रयस्थान आहेत आणि त्यापासूनच संसारातील सर्वांचे कल्याण होऊ शकते. ज्याच्यापासून कोणाला जराही भीती वाटत नाही, तोच त्याचा प्रियतम आत्मा होय. हे जो पुरुष जाणतो, तोच ज्ञानी होय आणि जो ज्ञानी आहे तोच गुरू व तोच साक्षात श्रीहरी होय. (४७-५१) श्रीनारद म्हणतात - पुरुषश्रेष्ठा, आतापर्यंत जे काही सांगितले, त्यातून तुझ्या प्रश्नाचे उत्तर दिले गेले. आता मी एक तुला चांगल्याप्रकारे निश्चित केलेले गुप्त साधन सांगतो. लक्षपूर्वक ऐक. एका बागेमध्ये एक हरीण हरिणीसह कोवळे गवत खात फिरत आहे. भुंग्यांचा मधुर गुंजारव ते ऐकत आहे. त्याच्या समोरच, दुसरे जीव मारून पोट भरणारे लांडगे त्याच्याकडे पाहात आहेत. आणि पाठीमागून एका शिकार्याने त्याचा वध करण्यासाठी त्याच्यावर बाण सोडला आहे, परंतु हरिण इतके बेसावध आहे की, त्याला याचा पत्तासुद्धा नाही. अशा या हरिणाचा विचार कर. (५२-५३) राजा, या रूपकाचा आशय ऐक. मरणाच्या जबडयातील हे हरीण तू आहेस. तू आपल्या दशेवर विचार कर. या स्त्रिया फुलांप्रमाणे दिसण्यात सुंदर आहेत, या स्त्रियांचे राहाण्याचे घर म्हणजे पुष्पवाटिका आहे. यामध्ये राहून तू फुलांमधील मध आणि सुगंधाप्रमाणे क्षुद्र सकाम कर्मांचे फळ म्हणून, जीभ आणि जननेंद्रियाला प्रिय वाटणार्या भोजन आणि स्त्रीसंग इत्यादी तुच्छ भोगांना शोधीत आहेस. स्त्रियांच्या संगतीत राहून आपले मन तू त्यांच्यामध्येच गुंतवून ठेवले आहेस. स्त्री-पुत्रादिकांचे मधुर भाषण म्हणजेच भुंग्यांचा मधुर गुंजारव होय. तुझे कान त्यातच अत्यंत आसक्त झाले आहेत. समोरच लांडग्यांच्या कळपाप्रमाणे काळाचे अंश रात्रंदिवस तुझे आयुष्य हिरावून घेत आहेत. परंतु तू त्याची काहीही पर्वा न करता गृहस्थसुखामध्ये दंग होऊन राहिला आहेस. तुझ्या मागे गुप-चुपपणे आलेला शिकारी काळ आपल्या लपविलेल्या बाणाने तुझे हृदय लांबूनच घायाळ करू पाहातो आहे. अशा प्रकारे स्वतःला हरिणाच्या स्थितीत आहोत, असे समजून तू आपले चित्त हृदयात स्थिर कर आणि नदीप्रमाणे प्रवाहित होणार्या श्रवणेंद्रियाच्या बाह्य वृत्तीला चित्तामध्ये स्थापन कर. (अंतर्मुख हो). जेथे कामी पुरुषांची चर्चा चालू असते, तो गृहस्थाश्रम सोडून परमहंसांचा आश्रय (असणार्या) श्रीहरींना प्रसन्न कर आणि हळू हळू सर्व विषयांपासून परावृत्त हो. (५४-५५) प्राचीनबर्ही म्हणाला - भगवन, आपण कृपा करून मला जो उपदेश केला, तो मी ऐकला व विशेषरूपाने त्याच्यावर विचारसुद्धा केला. मला कर्माचा उपदेश करणार्या या आचार्यांना निश्चितच याचे ज्ञान नाही. नाहीतर त्यांनी मला त्याचा उपदेश का बरे केला नसता ? हे देवर्षे, आत्मतत्त्वाविषयी माझ्या आचार्यांनी माझ्या मनात जो संशय निर्माण केला होता, त्याचे आपण पूर्णपणे निराकरण केलेत. या विषयात इंद्रियांची गती नसल्यामुळे मंत्रद्रष्टया ऋषींनासुद्धा मोह होतो. वेदवेत्त्यांचे म्हणणे ठिकठिकाणी ऐकिवात आहे की, "पुरुष या लोकात ज्याच्या द्वारे कर्म करतो, ते स्थूल शरीर इथेच सोडून कर्मानेच बनलेल्या दुसर्या देहाने परलोकात त्याचे फळ भोगतो. पण जी जी कर्मे इथे केली जातात, ती तर दुसर्याच क्षणी अदृश्य होतात. तीच फळ देण्यासाठी परलोकात जाऊ शकत नाहीत." (५६-५९) श्रीनारद म्हणाले - ज्या मनःप्रधान लिंगशरीराच्या साहाय्याने मनुष्य कर्म करतो, ते मरणानंतरही त्याच्याबरोबरच राहाते. म्हणून ते परलोकात प्रत्यक्षपणे स्वतः त्याच्या द्वारा कर्मांचे फळ भोगते. मनुष्य या स्थूल शरीराचा स्वप्नात अभिमान सोडून देतो; परंतु याच्यासारख्याच किंवा याच्यापेक्षा भिन्न प्रकारच्या पशु-पक्षी इत्यादी शरीराने तो मनामध्ये संस्काररूपाने असलेल्या कर्मांचे फळ भोगीत असतो. या मनाच्या द्वारा जीव ज्या पुत्रादींना "हे माझे आहेत" आणि देहादींना "हा मी आहे" असे म्हणतो, तोच त्यांच्यासाठी केलेल्या पाप-पुण्यादिक कर्मांना स्वतःची कर्मे मानतो आणि त्यामुळेच त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. ज्याप्रमाणे ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांच्या कृत्यांमुळे त्यांना प्रेरणा देणार्या चित्ताचे अनुमान केले जाते, त्याचप्रमाणे चित्ताच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्तींमुळे पूर्वजन्माच्या कर्मांचे सुद्धा अनुमान करता येते. कधी कधी असे अनुभवास येते की, ज्या वस्तूचा या शरीराने कधीही अनुभव घेतला नाही, जी कधी पाहिली नाही किंवा ऐकली नाही, ती जशी असते तसाच तिचा स्वप्नात अनुभव घेतला जातो. राजन, तू असे निश्चित समज की, लिंगदेहाच्या अभिमानी जीवाला त्या वस्तूचा अनुभव पूर्वजन्मी आलेला आहे. कारण जी वस्तू अनुभवली नसेल, तिची मनात वासना निर्माण होऊ शकत नाही. (६०-६५) राजन, तुझे कल्याण असो ! मनुष्याचे पूर्वीचे रूप आणि भावी शरीरादिकांविषयी मनच सांगू शकते. आणि ज्यांचा पुनर्जन्म होणार नाही, त्यांच्या विदेहमुक्तीविषयीही त्यांचे मनच सांगते. कधी कधी स्वप्नामध्ये देश, काल किंवा क्रिया यांसंबंधी अशा गोष्टी पाहिल्या जातात की ज्या पूर्वी कधी पाहिल्या किंवा ऐकल्या नव्हत्या. (जसे पर्वताच्या शिखरावर समुद्र, दिवसा तारे किंवा आपले डोके छाटलेले पाहणे इत्यादी दिसण्यास निद्रादोष हेच कारण मानले पाहिजे.) इंद्रियांनी अनुभव घेण्याजोगे पदार्थच मनाच्या समोर वारंवार येतात आणि भोग संपल्यावर नाहीसे होतात. ज्याचा इंद्रियांना अनुभव येत नाही, असा कोणताही पदार्थ नाही. कारण सर्व जीवांना मन आहे. जर एखादे वेळी भगवच्चिंतनात रममाण झालेले मन विशुद्ध सत्त्वात स्थिर झाले, तर त्या मनाला भगवंतांचा संसर्ग झाल्यामुळे लगेच सर्व विश्वाचेही ज्ञान होऊ शकते. जसे राहू दिसत नसतानाही प्रकाशमय चंद्राच्या संसर्गाने दिसू लागतो. जोपर्यंत गुणांपासून उत्पन्न झालेली बुद्धी, मन, इंद्रिये आणि शब्दादी विषयांचा समूह यांपासून हा अनादी लिंगदेह बनलेला आहे, तोपर्यंत जीवाचा स्थूलदेहाविषयी असलेला ‘मी-माझे ’ हा भाव जात नाही. सुषुप्ती, मूर्च्छा, अत्यंत दुःख, मृत्यू आणि तीव्र ताप आलेला असतानाही इंद्रियांच्या व्याकुळतेमुळे ‘मी-माझे ’ हे स्पष्टपणे जाणवत नसले, तरी त्यावेळीसुद्धा त्याचा अभिमान असतोच. ज्याप्रमाणे अमावास्येच्या रात्री चंद्र असूनही दिसत नाही, त्याचप्रमाणे तारुण्यात स्पष्टपणे प्रतीत होणारे अकराही इंद्रियांचे कार्य गर्भावस्था आणि बाल्यावस्थेमध्ये ती इंद्रिये असूनसुद्धा (त्यांचा पूर्ण विकास न झाल्याकारणाने) प्रतीत होत नाही. जसे स्वप्नात कोणत्याही वस्तूचे अस्तित्व नसतानाही भासणारे पदार्थ जागे झाल्याशिवाय नाहीसे होत नाहीत, त्याप्रमाणे सांसारिक वस्तू मिथ्या असल्या तरी त्यांचे चिंतन करणार्या जीवाची संसारातून सुटका होत नाही. (६६-७३) अशा प्रकारे पंचतन्मात्रांनी बनलेला आणि सोळा तत्त्वांच्या रूपाने विकसित झालेला हा तीन गुणांचा समूह म्हणजेच लिंगशरीर होय. हे चेतनाशक्तीने युक्त झाले की त्यालाच जीव म्हणतात. याच्या द्वाराच पुरुष निरनिराळे देह धारण करतो व त्यांचा त्याग करतो. तसेच त्याच्यामुळेच तो हर्ष, शोक, भय, दुःख, आणि सुख यांचा अनुभव घेतो. ज्याप्रमाणे जळू जोपर्यंत दुसरे गवताचे पाते पकडीत नाही, तोपर्यंत पहिले सोडीत नाही, त्याचप्रमाणे जीव मरणकाल जवळ आल्यावर जोपर्यंत देहप्राप्तीला कारण असणारी कर्मे संपून दुसरे शरीर धारण करीत नाही, तोपर्यंत पहिल्या शरीराचा अभिमान सोडीत नाही. राजन, हे मनःप्रधान लिंगशरीरच जीवाच्या जन्माचे कारण आहे. जीव जेव्हा इंद्रियांनी भोगलेल्या भोगांचे चिंतन करीत वारंवार त्यांच्यासाठीच कर्मे करतो, तेव्हा ती कर्मे होत राहिल्याने अविद्येमुळे तो देहादिकांच्या कर्मांनी बांधला जातो. म्हणून त्या कर्मबंधनातून सुटण्यासाठी संपूर्ण विश्व भगवद्रूप आहे असे समजून सर्व प्रकारे श्रीहरींचे भजन कर. त्यांच्यापासूनच या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय होतो. (७४-७९) मैत्रेय म्हणतात - भागवतश्रेष्ठ श्रीनारदांनी राजा प्राचीनबर्हीला जीव आणि ईश्वराच्या स्वरूपाचे दिग्दर्शन केले. नंतर ते त्याचा निरोप घेऊन सिद्धलोकी गेले. राजर्षी प्राचीनबर्हीसुद्धा प्रजापालनाची जबाबदारी पुत्रांवर सोपवून तपस्या करण्यासाठी कपिलाश्रमाकडे गेला. तेथे त्या वीरवराने सर्व विषयांची आसक्ती सोडून एकाग्र मनाने भक्तिपूर्वक श्रीहरींच्या चरणकमलांचे चिंतन करीत सरूपतामुक्ती मिळविली. (८०-८२) पुण्यशील विदुरा, देवर्षी नारदांनी रूपकाने सांगितलेले हे आत्मज्ञान जो पुरुष ऐकेल किंवा दुसर्याला ऐकवेल त्त्याची या लिंगदेहाच्या बंधनातून सुटका होईल. देवर्षी नारदांच्या मुखातून बाहेर पडलेले हे आत्मज्ञान भगवान मुकुंदांच्या यशाशी संबंधित असल्यामुळे त्रैलोक्याला पवित्र करणारे, अंतःकरण शुद्ध करणारे तसेच सर्वोत्कृष्ट फल देणारे आहे. जो पुरुष हे ऐकेल, तो सर्व बंधनांतून मुक्त होईल आणि पुन्हा या संसारचक्रात त्याला भटकावे लागणार नाही. गृहस्थाश्रमी पुरंजनाच्या रूपकाने अप्रत्यक्ष सांगितलेले हे अद्भुत आत्मज्ञान मी प्राप्त केले. हे समजल्याने बुद्धियुक्त जीवाचा देहाभिमान नाहीसा होतो. तसेच त्याचा परलोकात जीव कोणत्या प्रकारे कर्मांचे फळ भोगतो, हा संशयही नाहीसा होतो. (८३-८५) स्कंध चवथा - अध्याय एकोणतिसावा समाप्त |