श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय २८ वा

पुरंजनाला स्त्रीजन्म आणि अविज्ञाताच्या उपदेशाने त्याला मुक्ती मिळणे -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीनारद म्हणाले - राजा, नंतर भय नावाच्या यवनराजाचे आज्ञाधारक सैनिक, प्रज्वार आणि कालकन्येसह या पृथ्वीतलावर संचार करू लागले. हे राजा, वयोवृद्ध साप संरक्षण करीत असलेल्या आणि जगातील सर्व प्रकारच्या सुखसामग्रीने संपन्न असलेल्या पुरंजनपुरीला वेगाने हल्ला करून त्यांनी एकदा घेरले. नंतर जिच्या जाळ्यात अडकून पुरुष ताबडतोब निःसत्त्व होऊन जातो, ती कालकन्या (जरा) त्या पुरीचा बळेच उपभोग घेऊ लागली. त्यावेळी ते यवनसुद्धा (रोग) कालकन्येकडून उपभोगल्या जाणार्‍या त्या पुरीला सर्व बाजूंनी वेढा देऊन, निरनिराळ्या दारातून आत घुसून त्या पुरीचा विध्वंस करू लागले. ती पुरी अशी पीडित केली जाऊ लागल्याने, तिच्या मालकीचा अभिमानी, कुटुंबाविषयी ममता बाळगणारा राजा पुरंजन यालासुद्धा निरनिराळे क्लेश सतावू लागले. (१-५)

कालकन्येने आलिंगन दिल्याने त्याची सर्व संपत्ती गेली आणि विषयासक्त झाल्यामुळे तो अत्यंत दीन झाला, त्याची विवेकशक्ती नाहीशी झाली. गंधर्वांनी आणि यवनांनी जबरदस्तीने त्याचे सर्व ऐश्वर्य लुटून नेले. त्याला दिसले की, सर्व नगर छिन्नविच्छिन्न झाले आहे. मुलगे, नातू, सेवक आणि अमात्यवर्ग प्रतिकूल होऊन आपला अनादर करू लागले आहेत. पत्‍नीचे प्रेम आटले आहे. आपल्या देहाला कालकन्येने स्वतःच्या अधीन करून ठेवले आहे. आणि पांचालदेश शत्रूंच्या हाती गेला आहे. हे सर्व पाहून राजा पुरंजन अत्यंत चिंतातुर झाला आणि त्या संकटातून बाहेर पडण्याचा कोणताही उपाय त्याला दिसेना. कालकन्येने जे निःसार करून टाकले होते, त्या भोगांच्या लालसेने तो दीन झाला होता. आपली पारलौकिक गती आणि बंधुजनांच्या स्नेहापासून वंचित राहून त्याचे चित्त केवळ पत्‍नी आणि पुत्र यांच्या पालन-पोषणामध्येच लागून राहिले होते. गंधर्व आणि यवनांनी घेरलेली आणि कालकन्येने दुर्दशा केलेली ती नगरी सोडण्याची त्याची इच्छा नसतानाही त्याला ती सोडण्याच्या तयारीला लागावे लागले. एवढयात भयाचा थोरला भाऊ प्रज्वार याने आपल्या भावाचे प्रिय करण्यासाठी त्या सर्व नगरीला आग लावून दिली. (६-११)

जेव्हा ती नगरी जळू लागली, तेव्हा नगरवासी, सेवकवर्ग, पुत्र-पौत्र आणि पत्‍नीसह कुटुंबवत्सल पुरंजनाला फार दुःख झाले. नगरी कालकन्येच्या हातात गेल्याचे पाहून तिचे रक्षण करणार्‍या सर्पालाही फार दुःख झाले. कारण त्याचे निवासस्थानसुद्धा यवनांनी ताब्यात घेतले होते आणि प्रज्वार त्याच्यावरही आक्रमण करू लागला होता. जसे जळत्या वृक्षाच्या ढोलीतून तेथे राहाणारा साप बाहेर जाऊ इच्छितो, त्याप्रमाणे त्या नगरीचे रक्षण करण्यास तो असमर्थ झाला, तेव्हा अंगाचा थरकाप झालेल्या त्याला मोठया कष्टाने तेथून जावेसे वाटले. त्याचे सर्व अंग शिथिल झाले आणि गंधर्वांनी त्याची सर्व शक्ती नष्ट केली. शिवाय तो जात आहे, असे पाहून यवन-शत्रूंनी त्याला अडविले, तेव्हा तो दुःखी होऊन रडू लागला. (१२-१५)

गृहासक्त झालेला पुरंजन देह, घर इत्यादींमध्ये मी-माझेपणाचा भाव ठेवल्याने अत्यंत बुद्धिहीन झाला होता. स्त्रीच्या प्रेमपाशात अडकून तो अत्यंत दीन झाला होता. आता त्यांचा वियोग होण्याची वेळ आली, तेव्हा तो आपली कन्या, पुत्र, नातवंडे, नातसुना, जावई, नोकर-चाकर, घर, खजिना, शिवाय इतर अनेक ज्या पदार्थांमध्ये त्याची ममता शिल्लक होती, त्या सर्वांविषयी अशी चिंता करू लागला. "अरेरे ! मी जेव्हा परलोकात जाईन, तेव्हा माझी पत्‍नी असहाय होऊन आपला निर्वाह कसा करील ? मुलाबाळांची चिंताच हिला खाऊन टाकील. मी जेवल्याशिवाय ही जेवत नसे. स्नान केल्याशिवाय स्नान करीत नसे. नेहमी माझ्या सेवेत तत्पर राहात असे. मी रुसलो, तर ती भयभीत होत असे आणि मी तिला फटकारू लागलो, तर ती भीतीने गप्प बसत असे. माझ्याकडून काही चूक झाली, तर ती मला सावध करीत असे. माझ्याविषयी तिला इतके प्रेम आहे की जेव्हा मी कधी परप्रांतात जात असे, तेव्हा ही विरहव्यथेने क्षीण होत असे. ही वीरमाता असली तरी माझ्या पश्चात ही घरचे व्यवहार चालवू शकेल काय ? केवळ माझ्यावर अवलंबून असणारे हे कन्या-पुत्र मी गेल्यावर कसे जिवंत राहू शकतील ? समुद्रात नाव फुटल्यावर प्रवाशांची जी अवस्था होते, तशी यांची अवस्था होईल. (१६-२१)

असा शोक करणे उचित नसूनसुद्धा अज्ञानाने पुरंजन दीन होऊन स्त्री-पुत्रांसाठी शोकाकुल होत होता. त्याचवेळी त्याला पकडण्यासाठी भय नावाचा यवनराज तेथे येऊन थडकला. पशूप्रमाणे बांधून जेव्हा यवनलोक त्याला आपल्या ठिकाणी घेऊन चालले, तेव्हा त्याचे सेवक अत्यंत असहाय आणि शोकाकुल होऊन त्याच्याबरोबर गेले. यवनांनी अडविलेला सर्पसुद्धा ती नगरी सोडून सर्वांच्या बरोबर गेला. तो तेथून जाताच सर्व नगरी छिन्न-विच्छिन्न होऊन आपल्या मूळ स्वरूपात विलीन झाली. अशा रीतीने महाबलाढय यवनराजाने बळेच ओढून नेऊनसुद्धा राजा पुरंजनाला अज्ञानामुळे आपला हितेच्छू आणि जुना मित्र अविज्ञात याची आठवण झाली नाही.(२२-२५)

त्या निर्दयी राजाने ज्या पशूंना यज्ञात बळी दिले होते, ते त्याने दिलेल्या यातनांची आठवण होऊन क्रोधाने त्याला कुर्‍हाडींनी तोडू लागले. अनेक वर्षे विवेकहीन अवस्थेत अपार अंधकारात तो निरंतर कष्ट भोगीत राहिला. स्त्रीच्या आसक्तीने त्याची अशी दुर्दशा झाली होती. पुरंजनाच्या मनात अंतसमयीसुद्धा स्त्रीचाच विचार होता. म्हणून पुढील जन्मात तो नृपश्रेष्ठ विदर्भराजाच्या घरी सुंदर कन्येच्या रूपाने जन्माला आला. शत्रूंची नगरे जिंकणार्‍या पांडयनरेश मलयध्वजाने युद्धात सर्व राजांना जिंकून सर्वांत पराक्रमी वराला वरू इच्छिणार्‍या या विदर्भकन्येशी विवाह केला. मलयध्वजाला तिच्यापासून एक श्यामलोचना कन्या आणि तिच्याहून लहान सात पुत्र झाले. ते पुढे द्रविडदेशाचे सात राजे झाले. राजा, नंतर त्यांच्यापैकी प्रत्येक पुत्राला अनेक पुत्र झाले, त्यांचे वंशजच या पृथ्वीचा मन्वन्तराच्या शेवटापर्यंत तसेच नंतरही उपभोग घेतील. मलयध्वजाच्या व्रतस्थ असणार्‍या पहिल्या कन्येबरोबर अगस्त्य ऋषींचा विवाह झाला. त्यांना तिच्यापासून दृढच्युत नावाचा पुत्र झाला आणि दृढच्युताचा पुत्र इध्मवाह होय. (२६-३२)

राज्याची पुत्रांमध्ये वाटणी करून शेवटी राजर्षी मलयध्वज भगवान श्रीकृष्णांची आराधना करण्याच्या इच्छेने मलयपर्वतावर निघून गेला. चंद्रिका ज्याप्रमाणे चंद्राच्या पाठोपाठ जाते, त्याप्रमाणे मोहक डोळे असलेली वैदर्भी आपले घर, पुत्र आणि सर्व भोगांचा त्याग करून पांडयनरेशाच्या पाठोपाठ गेली. तेथे चंद्रवसा, ताम्रपर्णी आणि वटोदका नावाच्या तीन नद्या होत्या. तो दररोज त्या नद्यांच्या पवित्र जलात स्नान करून आपले शरीर आणि अंतःकरण पवित्र करीत असे. तेथे राहून त्यांनी कंदमुळे, बी, मुळे, फळे, फुले, पाने, गवत आणि पाण्यावरच निर्वाह करीत कडक तप केले. त्यामुळे हळू हळू त्यांचे शरीर फारच कृश झाले. मलयध्वजाने सगळीकडे समदृष्टी ठेवून थंडी-ऊन, पाऊस-वारा, तहान-भूक, प्रिय-अप्रिय, सुख-दुःख इत्यादी सर्व द्वंद्वांवर विजय मिळविला. तप आणि उपासना करून वासना नाहीशा केल्या. तसेच यम-नियमांचे पालन करून इंद्रिये, प्राण, आणि मन यांना वश करून तो आत्म्यामध्ये ब्रह्मभावना करू लागला. अशा प्रकारे शंभर दिव्य वर्षे तो एखाद्या खुंटाप्रमाणे निश्चलपणे एकाच ठिकाणी बसून राहिला. भगवान वासुदेवांमध्ये आत्यंतिक प्रेम निर्माण झाल्याने त्याला शरीरादींचे सुद्धा भान राहिले नाही. राजा, गुरुस्वरूप साक्षात भगवान श्रीहरींनी उपदेश केलेल्या आणि आपल्या अंतःकरणात सर्व बाजूंनी स्फुरण पावणार्‍या विशुद्ध ज्ञानदीपामुळे, अंतःकरणाच्या वृत्तींचा प्रकाशक आत्मा, स्वप्नावस्थेप्रमाणे देहादी सर्व उपाधींमध्ये व्याप्त असून त्यापासून वेगळाही आहे, असा अनुभव घेऊन तो सर्व बाजूंनी उदासीन झाला. नंतर आपल्या आत्म्याला परब्रह्मामध्ये आणि परब्रह्माला आत्म्यामध्ये अभिन्नरूपाने पाहून शेवटी हे चिंतनही सोडून देऊन तो पूर्णपणे शांत झाला. (३३-४२)

राजा, यावेळी पतिपरायणा वैदर्भी सर्व प्रकारच्या भोगांचा त्याग करून आपला परमधर्मज्ञ पती मलयध्वज याची मोठया प्रेमाने सेवा करीत होती. ती वल्कले धारण करीत असे. व्रते, उपवास केल्यामुळे तिचे शरीर अत्यंत कृश झाले होते आणि डोक्यावरील केसांचा गुंता झाल्याकारणाने त्यांना गाठी पडल्या होत्या. त्यावेळी ती आपल्या पतीजवळ ज्वाळा नसलेल्या अग्नीप्रमाणे शांत दिसत होती. तिच्या पतीचे प्राणोत्क्रमण झाले होते. परंतु तो नेहमीप्रमाणे स्थिर आसनावर बसलेला होता. हे तिला माहीत नसल्यामुळे त्याच्याजवळ जाऊन ती नेहमीप्रमाणे त्याची सेवा करू लागली. चरण चुरतेवेळी जेव्हा तिला आपल्या पतीच्या चरणात मुळीच उष्णता नाही, असे जाणवले, तेव्हा तिचे चित्त कळपातून दूर गेलेल्या हरिणीप्रमाणे व्याकूळ झाले. त्या निर्जन वनात आपण एकटीच आणि दीन-अवस्थेत आहोत असे पाहून ती अत्यंत शोकाकुल झाली आणि आपल्या अश्रुधारांनी स्तन भिजवीत जोरजोराने रडू लागली. ती म्हणाली- "राजर्षे ! उठा ! उठा ! समुद्राने वेढलेली ही पृथ्वी लुटारू आणि अधार्मिक राजे यांच्यामुळे भयभीत झाली आहे. आपण हिचे रक्षण करा." पतीबरोबर वनात गेलेली ती अबला अशा प्रकारे शोक करीत पतीच्या चरणांवर पडून रडून आसवे गाळू लागली. लाकडांची चिता रचून तिच्यावर पतीचे शव ठेवले आणि ती चिता पेटवून शोक करणार्‍या तिने सती जाण्याचा निश्चय केला. राजा, त्याचवेळी तिचा एक पूर्वीचा मित्र असलेला आत्मज्ञानी ब्राह्मण आला. त्या रडत असलेल्या अबलेला मधुर वाणीने समजावीत तो म्हणाला. (४३-५१)

ब्राह्मण म्हणाला - तू कोण आहेस ? कुणाची मुलगी आहेस ? आणि तू ज्याच्यासाठी शोक करीत आहेस तो हा पडलेला पुरुष कोण आहे ? तू मला ओळखत नाहीस काय ? तू पूर्वी ज्याच्याबरोबर विहार करीत होतीस, तो मी तुझा मित्र आहे. (ही स्त्री पूर्वजन्मीचा पुरंजन होती.) सखे, कधी काळी तुझा अविज्ञात नावाचा सखा होता, याची तुला आठवण आहे का ? मला सोडून तू पृथ्वीवरील भोग भोगण्यासाठी निवासस्थानाच्या शोधासाठी आला होतास. आर्य, पूर्वी तू आणि मी एकमेकांचे मित्र तसेच मानस निवासी हंस होतो. हजारो वर्षेंपर्यंत निवास-स्थानाशिवायच आपण दोघे राहात होतो. परंतु मित्रा, विषयभोगांच्या इच्छेने तू मला सोडून या पृथ्वीवर निघून आलास. इथे फिरत असता तू एका स्त्रीने स्थापन केलेले स्थान पाहिलेस. तिथे पाच बगीचे, नऊ दरवाजे, एक द्वारपाल, तीन तट, सहा वैश्यकुळे आणि पाच बाजार होते. ते स्थान पाच उपादान कारणांनी बनलेले होते आणि त्याची स्वामिनी एक स्त्री होती. महाराज, इंद्रियांचे पाच विषयच त्याचे पाच बगीचे होते. नऊ इंद्रिय-छिद्रे हे नऊ दरवाजे होते. तेज, जल, अन्न, हे तीन तट होते. मन आणि पाच ज्ञानेंद्रिये ही सहा वैश्यकुळे होती, क्रियाशक्तिरूप पाच कर्मेंद्रियेच बाजार होते, पाच महाभूतेच त्याचे कधीही क्षीण न होणारे उपादान कारण होते आणि बुद्धिशक्ती त्याची स्वामिनी होती. ते असे नगर होते की, जेथे प्रवेश केल्यानंतर पुरुष ज्ञानशून्य होऊन आपल्या स्वरूपाला विसरतो. हे राजा, त्या नगरातील त्या स्वामिनीच्या फंदात पडून तिच्याबरोबर विहार करीत करीत तूही आपल्या स्वरूपाला विसरलास आणि तिच्याच संगतीने तुझी ही दुर्दशा झाली आहे. (५२-५९)

तू त्या विदर्भराजाची कन्या नाहीस की, हा वीर मलयध्वज तुझा पती नाही. जिने तुला नऊ दारांच्या नगरात बंद केले होते, त्या पुरंजनीचा पती सुद्धा तू नाहीस. तू पहिल्या जन्मात आपल्याला पुरुष समजत होतास आणि आता सती स्त्री मानतोस. ही सर्व मी पसरलेली मायाच आहे. वास्तविक तू पुरुष नाहीस की स्त्री नाहीस. आपण दोघे तर हंस आहोत. आपले जे वास्तविक स्वरूप आहे, त्याचा अनुभव घे. मित्रा, जो मी (ईश्वर) आहे, तोच तू (जीव) आहेस. तू माझ्यापासून वेगळा नाहीस. तूच मी आहे, असे तू जाण. ज्ञानी पुरुष आपल्या दोघात किंचितसेही अंतर मानीत नाहीत. जसे एक पुरुष आपल्या शरीराचे प्रतिबिंब आरशात आणि दुसर्‍या व्यक्तीच्या डोळ्यांत निरनिराळ्या रूपाने पाहातो, त्याचप्रमाणे एकच आत्मा विद्या आणि अविद्येच्या उपाधीच्या भेदामुळे स्वतःला ईश्वर आणि जीव अशा दोन प्रकारांत पाहातो. अशा प्रकारे जेव्हा हंसाने (ईश्वराने) त्याला सावध केले, तेव्हा तो मानस हंस (मनोपाधिक जीव) आपल्या स्वरूपात स्थिर झाला आणि त्याला आपल्या मित्राच्या वियोगामुळे विसरलेल्या ज्ञानाची पुन्हा आठवण झाली. प्राचीनबर्ही, मी तुला परोक्षरूपाने (रूपकाने) या आत्मज्ञानाची दिशा दाखविली आहे; कारण जगत्कर्त्या जगदीश्वराला अप्रत्यक्ष वर्णनच अधिक प्रिय असते. (६०-६५)

स्कंध चवथा - अध्याय अठ्ठाविसावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP