श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय २७ वा

पुरंजनपुरीवर चंडवेगाची चढाई आणि कालकन्येचे चरित्र -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीनारद म्हणतात - महाराज, अशा प्रकारे त्या सुंदरीने अनेक प्रकारचे नखरे करून पुरंजनाला संपूर्णपणे आपल्या ताब्यात घेऊन त्याला आनंदित करीत स्वतः रमू लागली. तिने उत्तम रीतीने स्नान करून अनेक प्रकारचे मांगलिक शृंगार केले आणि खाऊन पिऊन तृप्त होऊन ती राजाजवळ आली. राजाने जवळ आलेल्या त्या सुंदर राणीचे अभिनंदन केले. पुरंजनीने राजाला आलिंगन दिले आणि राजाने तिला मिठी मारली. नंतर एकांतात मनाप्रमाणे रहस्यमय गोष्टी करीत तो तिच्यावर असा मोहित झाला की, त्या कामिनीमध्ये चित्त गुंतल्याकारणाने दिवस-रात्रीचे भान न राहता पुढे जाणार्‍या काळाच्या दुस्तर गतीचा त्याला काहीच पत्ता लागला नाही. मदाने बेहोष झालेला मनस्वी पुरंजन आपल्या प्रियेच्या बाहूंवर डोके ठेवून मौल्यवान शय्येवर पडून राही. ती रमणीच त्याला त्याच्या जीवनाचे सर्वस्व वाटत होती. अज्ञानाने झाकला गेल्याकारणाने त्याला आत्मा किंवा परमात्मा यांचे काहीच ज्ञान राहिले नाही. (१-४)

राजा, अशा रीतीने कामातुर चित्ताने तिच्याबरोबर विहार करता करता राजा पुरंजनाचे तारुण्य अर्ध्या क्षणासारखे निघून गेले. हे प्रजापते, त्या पुरंजनीपासून राजा पुरंजनाला अकराशे पुत्र आणि एकशे दहा कन्या झाल्या. ते सर्वजण माता-पित्याचे यश वाढविणारे आणि सुशीलता, औदार्य इत्यादी गुणांनी युक्त होते. ते पौरंजनी नावाने प्रख्यात झाले. एवढ्यात त्या सम्राटाच्या दीर्घ आयुष्याचा निम्मा कालावधी निघून गेला. नंतर पांचालराज पुरंजनाने पितृवंशाची वृद्धी करणार्‍या पुत्रांचा वधूंबरोबर आणि कन्यांचा त्यांना योग्य अशा वरांशी विवाह लावून दिला. पुत्रांपैकी प्रत्येकाला शंभर-शंभर पुत्र झाले. ते पुरंजनाच्या वंशवृद्धीला प्राप्त होऊन तो वंश सर्व पांचाल देशात फैलावला. ते पुत्र, नातू, घर, खजिना, सेवक आणि मंत्री इत्यादींविषयी गाढ ममता उत्पन्न होऊन तो या विषयांतच बद्ध झाला. नंतर तुझ्याप्रमाणे त्यानेसुद्धा अनेक प्रकारच्या भोगांच्या इच्छेने यज्ञदीक्षा घेऊन निरनिराळ्या पशुहिंसामय घोर यज्ञांनी देवता, पितर आणि भूतपती यांची आराधना केली. अशा रीतीने तो आयुष्यभर आत्म्याचे कल्याण करणार्‍या कर्मांबद्दल बेफिकीर आणि कुटुंबपालनात व्यग्र राहिला. शेवटी स्त्री-लंपट पुरुषांना अप्रिय वाटणारा वृद्धावस्थेचा काळ आला. (५-१२)

राजा, चंडवेग नावाचा एक गंधर्वराज आहे. तीनशेसाठ महाबलवान गंधर्व त्याच्या आधिपत्याखाली राहतात. त्यांच्याबरोबर त्यांच्या बरोबरीने राहणार्‍या सावळ्या आणि गोर्‍या वर्णाच्या तितक्याच गंधर्वस्त्रिया राहातात. त्या आळीपाळीने नगतात फिरून भोगविलास सामग्रीने भरलेल्या नगरीला लुटतात. चंडवेगाच्या सेवकांनी जेव्हा पुरंजनाची नगरी लुटण्यास प्रारंभ केला, तेव्हा पाच फण्यांच्या प्रजागर नागाने त्यांना अडविले. पुरंजनपुरीचे रक्षण करणारा हा महाबलवान सर्प शंभर वर्षांपर्यंत एकटाच त्या सातशे वीस गंधर्व-गंधर्वीं बरोबर युद्ध करीत राहिला. पुष्कळ वीरांबरोबर एकटयानेच युद्ध केल्यामुळे आपला एकमात्र संबंधी साप बलहीन झालेला पाहून राष्ट्र आणि नगरात राहाणार्‍या लोकांसह पुरंजनाला अतिशय चिंता वाटू लागली. तो इतके दिवस पांचाल देशात दूतांनी आणलेला कर घेऊन विषयभोगात मग्न राहात असे. स्त्रीच्या अधीन झाल्याने या खात्रीने येणार्‍या संकटाची त्याला जाणीव झाली नाही. (१३-१८)

बर्हिष्मन, याच दिवसात कालाची एक कन्या (जरा) वरसंशोधनासाठी त्रैलोक्यात भटकत होती. तरीपण कोणालाही ती आवडत नव्हती. ती अभागी असल्याने लोक तिला ‘दुर्भगा’ म्हणत. एकदा राजर्षी पुरूने वडिलांना आपले यौवन देण्यासाठी स्वेच्छेनेच तिच्याशी विवाह केला होता. त्यामुळे प्रसन्न होऊन तिने त्याला राज्यप्राप्तीचा वर दिला होता. एक दिवस मी ब्रह्मलोकातून पृथ्वीवर आलो, तेव्हा फिरता-फिरता ती मला भेटली. मी नैष्ठिक ब्रह्मचारी आहे हे जाणूनही माझ्याशी विवाह करावा, असे तिला वाटले. मी तिला नाकारले, तेव्हा अत्यंत रागाने तिने मला असह्य असा शाप दिला की, तू माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाहीस, म्हणून तू एका ठिकाणी स्थिर राहू शकणार नाहीस. (१९-२२)

तेव्हा माझ्याबाबतीत निराश होऊन त्या कन्येने माझ्याच संमतीने यवनराज भय याच्याकडे जाऊन त्याला मनोमन पतिरूपाने वरले. ती म्हणाली, ‘वीरवर ! आपण यवनांमध्ये श्रेष्ठ आहात, मी आपल्याला पती म्हणून वरू इच्छिते. जीवांनी आपल्या बाबतीत केलेला संकल्प कधी निष्फळ होत नाही. जो मनुष्य, लोक आणि शास्त्राच्या दृष्टीने देण्यायोग्य वस्तूचे दान करीत नाही आणि जो शास्त्रदृष्टीने अधिकारी असूनही असे दान घेत नाही, ते दोघेही दुराग्रही आणि मूर्ख होत. म्हणून त्यांना पश्चात्ताप करावा लागतो. महाराज, यावेळी मी आपल्या सेवेसाठी हजर आहे. आपण माझा स्वीकार करून माझ्यावर अनुग्रह करावा. दीनांवर दया करणे हा पुरुषांचा सर्वश्रेष्ठ धर्म होय.’ (२३-२६)

कालकन्येचे म्हणणे ऐकून, विधात्याचे एक गुप्त कार्य करण्याच्या इच्छेने यवनराज हसत-हसत तिला म्हणाला. योगदृष्टीने पाहून मी तुझ्यासाठी एक पती निश्चित केला आहे. तू सर्वांचे अनिष्ट करणारी असल्याने कोणालाच आवडत नाहीस आणि म्हणून कोणी तुझा स्वीकार करीत नाही. म्हणून तू हा कर्मामुळे मिळणारा लोक गुप्तरूपाने भोग. तू माझी सेना घेऊन जा. तिच्या साहाय्याने तू सर्व प्रजेचा नाश करशील. प्रज्वार नावाचा हा माझा भाऊ आहे आणि तू माझी बहीण हो. तुम्हा दोघांबरोबर मी गुप्तरूपाने भयंकर सेना घेऊन लोकांमध्ये संचार करीन. (२७-३०)

स्कंध चवथा - अध्याय सत्ताविसावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP