श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय २६ वा

राजा पुरंजनाचे शिकारीसाठी वनात जाणे आणि राणीला राग येणे -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीनारद म्हणतात - एक दिवस हा पुरंजन सोन्याचे चिलखत घालून विशाल धनुष्य आणि अक्षय भाते घेऊन अकराव्या सेनापतीसह पाच घोडयांच्या भरधाव धावणार्‍या रथात बसून पंचप्रस्थ नावाच्या वनात गेला. त्या रथाला दोन दांडया, दोन चाके, एक धुरा, तीन ध्वजदंड, पाच दोरखंड, एक लगाम, एक सारथी, एक आसन, दोन जू, पाच आयुधे आणि सात आवरणे होती. तो पाच प्रकारच्या चालींनी चालत असे. तसेच तो सोन्याने मढविला होता. आपल्या प्रियतमेला क्षणभरसुद्धा सोडणे राजाला कठीण होते, तरीसुद्धा त्यादिवशी शिकारीच्या नादाने तो तिची पर्वा न करता मोठया गर्वाने धनुष्य-बाण घेऊन शिकार करू लागला. त्यावेळी त्याची आसुरी वृत्ती वाढल्याने त्याचे हृदय इतके कठोर आणि दयाशून्य झाले होते की, त्याने आपल्या तीक्ष्ण बाणांनी पुष्कळशा जंगली प्राण्यांचा वध केला. जर राजाला पशूच्या मांसाची अत्यंत आसक्ती असेल तर त्याने शास्त्रविहित कर्मांसाठीच वनामधील शास्त्रविहित पशूचाच जरुरीपुरताच वध करावा. असे सांगून शास्त्राने स्वैर प्रवृत्तीला आळा घातला आहे. राजा, जो हे जाणणारा मनुष्य अशा प्रकारे शास्त्रविहित कर्मांचे आचरण करतो, तो त्या ज्ञानामुळे कर्मांनी लिप्त होत नाही. नाहीतर, स्वेच्छेने कर्म केल्याने मनुष्य अभिमानामुळे कर्मांमध्ये बांधला जातो. तसेच गुणप्रवाहरूप संसारचक्रात सापडून विवेकबुद्धी नष्ट झाल्यामुळे अधम योनीमध्ये जन्म घेतो. (१-८)

पुरंजनाच्या निरनिराळ्या पंखांच्या बाणांनी छिन्न-विच्छिन्न होऊन अनेक जीव दुःखाने प्राण सोडू लागले. त्याचा तो संहार पाहून दयाळू माणसे दुःखी झाली. ती हे सहन करू शकली नाहीत. तेथे ससे, डुक्कर, रेडे, गौरेडे, कृष्णमृग, साळी, मेध्य तसेच इतरही पुष्कळशा पशूंचा वध करता करता राजा थकून गेला. तेव्हा तो तहान-भुकेने अत्यंत व्याकूळ होऊन वनातून राजमहालात परतला. तेथे त्याने स्नान व भोजन करून थोडी विश्रांती घेऊन थकवा नाहीसा केला. नंतर गंध, चंदन, पुष्पमाळा वगैरे घालून अंगावर अलंकार चढविले. तेव्हा त्याला आपल्या प्रियतमेची आठवण आली. तो भोजनाने तृप्त होऊन आनंदित झालेला गर्विष्ठ राजा कामाने व्यथित होऊन आपल्या सुंदर पत्‍नीला शोधू लागला; पण ती त्याला कुठे दिसली नाही. (९-१३)

हे प्राचीनबर्ही, तेव्हा विषण्ण होऊन अंतःपुरातील स्त्रियांना त्याने विचारले. सुंदरींनो, आपल्या स्वामिनीसह तुम्ही पूर्वीप्रमाणेच कुशल आहात ना ? या घरातील वैभव पहिल्यासारखे आनंददायी का वाटत नाही बरे ! घरामध्ये माता किंवा पतिपरायण भार्या नसेल तर ते घर चाकाविना रथासारखेच होय. मग कोणता बुद्धिमान पुरुष तेथे लाचारपणे राहाणे पसंत करील ? मी दुःखसमुद्रात बुडाल्यावर माझ्या विवेकबुद्धीला पदोपदी जागी करणारी आणि मला त्या संकटातून वाचविणारी ती सुंदरी कोठे आहे, ते मला सांगा. (१४-१६)

स्त्रिया म्हणाल्या - हे शत्रुंजय महाराज, आज आपल्या प्रियेने काय योजले आहे, ते आम्हांला माहीत नाही. बिछान्याऐवजी आज ती जमिनीवरच पडून आहे. (१७)

श्रीनारद म्हणतात - राजन, त्या स्त्रीच्या संगाने राजा पुरंजनाचा विवेक नष्ट झाला होता, म्हणून आपली राणी जमिनीवर अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेली पाहून तो अत्यंत व्याकूळ झाला. दुःखी झालेल्या त्याने आपल्या मधुर शब्दांनी तिला पुष्कळ समजाविले, परंतु त्याला आपल्या प्रेयसीच्या मनात प्रणयकोप झाल्याचे काही चिह्न दिसले नाही. मनधरणी करण्यात तो तरबेज होता; म्हणून आता पुरंजनाने हळू हळू तिची मनधरणी करणे सुरू केले. त्याने प्रथम तिचे पाय धरले आणि नंतर मांडीवर बसवून घेऊन मोठया प्रेमाने तो म्हणू लागला. (१८-२०)

पुरंजन म्हणाला - हे सुंदरी, स्वामी ज्यांना अपराध करूनही आपले समजून शिकवण देण्यासाठी उचित शिक्षा करीत नाहीत, ते सेवक खात्रीने भाग्यहीनच होत. स्वामीने सेवकाला केलेली शिक्षा म्हणजे त्याच्यावर केलेली कृपाच होय. हे, जे सेवक मूर्ख असतील त्यांना क्रोधामुळे समजत नाही. सुंदर दंतपंक्ती आणि मनोहर भुवयांमुळे शोभिवंत दिसणार्‍या हे मनस्विनी, आता राग आवर आणि एक वेळ मला आपला समजून प्रेमपूर्ण, लाजेने झुकलेले आणि मधुर हास्ययुक्त असे आपले सुंदर मुख मला दाखव. अहाहा ! भुंग्यांच्या रांगेप्रमाणे असणारे काळे कुरळे केस, उभार नासिका आणि सुमधुर वाणीमुळे तुझे मुख कसे मनमोहक दिसत आहे ! हे वीरपत्‍नी, जर दुसर्‍या कोणी तुझा अपराध केला असेल, तर मला सांग. जर तो अपराधी ब्राह्मणकुलातील नसेल तर मी त्याला आता लगेच शिक्षा करतो. भगवंतांचे भक्त सोडून मला या त्रैलोक्यात किंवा त्याच्याबाहेर असा कोणी दिसत नाही की जो तुझा अपराध करून निर्भय आणि आनंदाने राहील. प्रिये, मी आजपर्यंत कधीही तुझे मुख कुंकुमविरहित, म्लान झालेले, क्रोधामुळे भीतिदायक झालेले, कांतिहीन आणि स्नेहशून्य असे पाहिले नाही. तसेच कधीही तुझे सुंदर स्तन शोकाश्रूंनी भिजलेले व तोंडल्यासारखे ओठ स्निग्ध केशराच्या लालीविरहित आहेत असे पाहिले नाहीत. सवयीच्या आहारी जाऊन मी तुला न विचारताच शिकारीसाठी गेलो, म्हणून मी अपराधी आहे खास. तरीसुद्धा आपला समजून तू माझ्यावर प्रसन्न हो. कामदेवाच्या विषम बाणांनी अधीर होऊन जो नेहमी तुझ्या अधीन राहतो, त्या आपल्या प्रिय पतीला योग्य कामासाठी कोणती कामिनी स्वीकारणार नाही ? (२१-२६)

स्कंध चवथा - अध्याय सव्विसावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP