|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ४ था - अध्याय २५ वा
पुरंजन आख्यानाचा प्रारंभ - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] मैत्रेय म्हणतात - या उपदेशानंतर प्रचेतांनी शंकरांची पूजा केली. यानंतर ते राजकुमारांच्यादेखत तेथेच अंतर्धान पावले. सर्व प्रचेतांनी पाण्यात उभे राहून भगवान रुद्रांनी सांगितलेल्या स्तोत्राचा जप करीत दहा हजार वर्षे तपश्चर्या केली. या दिवसांत राजा प्राचीनबर्हीचे चित्त कर्मकांडात रममाण झाले होते. अध्यात्मविद्याविशारद परम कृपाळू नारदांनी त्याला उपदेश दिला. ते म्हणाले की, ‘राजन, या कर्मांच्या योगाने तू आपले कोणते कल्याण करून घेऊ इच्छितोस ? दुःखाचा आत्यंतिक नाश आणि परमानंदाची प्राप्ती याचे नाव कल्याण आहे. ते तर कर्मांमुळे होत नाही.’ (१-४) राजा म्हणाला- देवर्षे, माझी बुद्धी कर्मांमध्ये आसक्त असल्याने मला परम कल्याणाबद्दल काहीही कल्पना नाही. आपण मला विशुद्ध ज्ञानाचा उपदेश करावा, ज्यामुळे मी या कर्मबंधनातून सुटू शकेन. जो अज्ञानी मिथ्याधर्म असलेल्या गृहस्थाश्रमात रममाण होऊन पुत्र, स्त्री आणि धन यांनाच परम पुरुषार्थ मानतो, तो संसाराच्या अरण्यातच भटकत राहिल्याकारणाने ते परम कल्याण प्राप्त करू शकत नाही. (५-६) श्रीनारद म्हणाले - हे राजा, तू यज्ञामध्ये निर्दयपणे ज्या हजारो पशूंचा बळी दिलास, त्यांना आकाशात पहा. हे सर्व तू दिलेले क्लेश आठवीत बदला घेण्यासाठी तुझी वाट पाहात आहेत. तू मेल्यानंतर परलोकात जाशील, तेव्हा हे अत्यंत क्रोधाने तुला आपल्या लोखंडी शिंगांनी भोसकतील. याविषयी मी तुला एक प्राचीन इतिहास सांगतो. ते पुरंजनाचे चरित्र आहे. तू ते माझ्याकडून लक्षपूर्वक ऐक. (७-९) राजन, पूर्वी पुरंजन नावाचा एक मोठा कीर्तिमान राजा होऊन गेला. अविज्ञात नावाचा त्याचा एक मित्र होता. त्याची करणी कोणीही जाणू शकत नव्हता. आपल्याला राहण्यासाठी योग्य असे ठिकाण शोधण्यासाठी पुरंजन राजा पृथ्वीवर सगळीकडे फिरला. परंतु त्याला कोठेही अनुरूप स्थान न मिळाल्याने तो काहीसा खिन्न झाला. त्याला निरनिराळ्या भोगांची लालसा होती, त्यांसाठी त्याने पृथ्वीवरील जेवढी नगरे बघितली, त्यांपैकी एकही त्याच्या पसंतीस उतरले नाही. (१०-१२) एक दिवस त्याने हिमालयाच्या दक्षिणेकडील शिखरांवर एक नऊ दारे असलेले नगर पाहिले. ते सर्व सुलक्षणांनी संपन्न होते. सर्व बाजूंनी तट, बागबगीचे, मार्ग, खंदक, खिडक्या आणि राजद्वारांनी सुशोभित असे ते नगर होते. ते सोने, चांदी तसेच लोखंडी शिखरांच्या भवनांनी भरलेले होते. त्यांच्या महालांतील फरशा नीलम, स्फटिक, वैडूर्य, मोती, पाचू आणि लाल यांनी बनविलेल्या होत्या. नागांची राजधानी भोगवती हिच्या कांतीप्रमाणे त्या नगरीची कांती होती. तेथे जिकडे तिकडे अनेक सभागृहे, चौक, सडका, क्रीडाभवने, बाजार, विश्रामस्थाने, ध्वज, पताका आणि प्रवाळांचे चबुतरे दिसत होते. (१३-१६) त्या नगराच्या बाहेर दिव्य वृक्ष आणि वेली यांनी भरलेला एक बगीचा होता. त्यामध्ये एक सरोवर होते. त्यात अनेक पक्षी किलबिलत होते आणि भ्रमर गुंजारव करीत होते. सरोवराच्या तटावर जी झाडे होती, त्यांच्या डहाळ्या आणि पाने शीतल निर्झरांच्या जलकणांनी युक्त अशा वसंतातील वायूने हालत होती आणि अशा प्रकारे ती तटावरील भूमीची शोभा वाढवीत होती. तेथील वन्य पशूसुद्धा मुनिजनांप्रमाणे अहिंसादी व्रतांचे पालन करणारे होते. म्हणून त्यांच्यापासून कोणाला काहीही त्रास होत नसे. तेथे चालणार्या कोकिळकूजनामुळे वाटेवरून जाणार्य़ा लोकांना तो बगीचा आपल्याला बोलवीत आहे, असे वाटत होते (१७-१९) राजाने तेथे योगायोगाने आलेल्या एका सुंदर स्त्रीला पाहिले. तिच्याबरोबर दहा सेवक होते आणि त्यातील प्रत्येकजण शंभर नायिकांचा पती होता. एक पाच फण्यांचा साप रक्षक म्हणून तिचे सर्व बाजूंनी रक्षण करीत होता. ती सुंदरी किशोरी होती आणि विवाहासाठी एका श्रेष्ठ पुरुषाच्या शोधात होती. तिचे नाक, दंतपंक्ती, गाल आणि मुख अतिशय सुंदर होते. तिच्या एकसारख्या असणार्य़ा कानांमध्ये कुंडले झळकत होती. तिचा वर्ण सावळा होता, कटिप्रदेश मोहक होता. तिने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती, तिच्यावर सोन्याचा कमरपट्टा होता. आणि चालताना तिच्या पायातील नूपुरे झंकारत होती. ती एखाद्या देवीसारखीच दिसत होती. हत्तीसारखी चाल असलेली ती बाला किशोरावस्थेची सूचना देणार्या आपल्या गोल एकसारख्या आणि एकमेकांना भिडलेल्या स्तनांना लाजेमुळे पदराने झाकून घेत होती. (२०-२४) तिच्या प्रेम व्यक्त करणार्या चंचल भुवयांनी आणि स्नेहयुक्त कटाक्षबाणांनी घायाळ होऊन वीर पुरंजनाने, लज्जायुक्त स्मित हास्याने अधिक सुंदर दिसणार्या तिला मधुर वाणीने म्हटले."हे कमलदललोचने, तू कोण आहेस ? कुणाची कन्या आहेस ? सुंदरी, तू येथे कोठून आलीस ? अग बावरे, या नगरीजवळ तू काय करू इच्छितेस ? हे सारे मला सांग. हे सुनयने, हे अकरा महावीर कोण आहेत आणि या मैत्रिणी तसेच तुझ्या पुढे चालणारा हा सर्प कोण आहे ? हे सुंदरी, तू लज्जादेवी आहेस की उमा, सरस्वती की रमा आहेस ? इथे वनामध्ये मुनीप्रमाणे एकांतवासात राहून तू आपल्या पतीला शोधीत आहेस काय ? तू त्याच्या चरणांची कामना करीत आहेस, हे ऐकूनच तो धन्य होईल. (बरे ! तू जर लक्ष्मी असशील ) तर तुझ्या हातातील कमळ कुठे पडले ? (२५-२८) हे सुभगे, तू यांपैकी कोणी नाहीसच. कारण तुझे पाय पृथ्वीवर टेकले आहेत. बरे, तू जर कोणी मानवी असशील तर लक्ष्मी ज्याप्रमाणे भगवान विष्णूंच्याबरोबर वैकुंठाची शोभा वाढविते, त्याप्रमाणे तू माझ्याबरोबर या श्रेष्ठ नगरीला अलंकृत कर. कारण मी मोठा वीर आणि पराक्रमी आहे. परंतु आज तुझ्या कटाक्षांनी माझा मनावरचा ताबा सुटला आहे. तुझा लज्जित आणि रतिभावाने भरलेला सहास्य नेत्रसंकेत पाहिल्याने हा शक्तिशाली कामदेव मला पीडा देऊ लागला आहे. म्हणून हे सुंदरी, तू आता माझ्यावर कृपा कर. हे शुचिस्मिते, सुंदर भुवया आणि आकर्षक डोळ्यांनी सुशोभित असणारे तुझे मुखकमल या लांब सडक काळ्या कुरळ्या केसांनी घेरलेले आहे. तुझ्या मुखातून निघालेले शब्द मोठे गोड आणि मन वेधून घेणारे आहेत, पण ते मुख आज लज्जेमुळे माझ्याकडे पाहात नाही. जरा मान वर करून तुझ्या मुखाचे दर्शन तरी मला दे. (२९-३१) श्रीनारद म्हणाले - वीरवरा, पुरंजनाने जेव्हा अधीर होऊन अशी प्रार्थना केली, तेव्हा त्या बालेनेसुद्धा त्याला प्रतिसाद दिला. राजाला पाहून तीसुद्धा मोहित झाली होती. ती म्हणू लागली, हे नरश्रेष्ठ, आपल्या मातापित्यांची परस्परांना माहिती नाही आणि आपण एकमेकांचे नाव व गोत्र हेसुद्धा जाणत नाही. वीरवरा, आज आपण सगळे या नगरामध्ये आहोत; याखेरीज मला दुसरे काहीही माहीत नाही. आपल्याला राहाण्यासाठी हे नगर कोणी वसविले हे देखील मला माहीत नाही. प्रियतमा, हे पुरुष माझे मित्र आणि स्त्रिया माझ्या मैत्रिणी आहेत. तसेच ज्यावेळी मी झोपलेली असते, त्यावेळी हा सर्प जागा राहून या नगरीचे रक्षण करतो. हे शत्रुदमना, आपण येथे आलात ही माझ्या भाग्याची गोष्ट आहे. आपले कल्याण असो ! आपल्याला विषयभोगांची इच्छा आहे, तिच्या पूर्तीसाठी मी माझ्या मित्र- मैत्रिणींसह सर्व प्रकारचे भोग आपल्याला देईन. प्रभो, या नऊ दारे असलेल्या नगरीमध्ये मी दिलेल्या इच्छित भोगांचा उपभोग घेत आपण शेकडो वर्षे निवास करावा. बरे ! आपल्याला सोडून मी आणखी कोणाबरोबर रममाण होऊ ? दुसरे कोणीच रतिसुख जाणत नाहीत. दिलेल्या भोगांचा भोग घेत नाहीत. परलोकाचा विचार करीत नाहीत किंवा उद्या काय होईल याकडे लक्ष देत नाहीत. म्हणून ते पशुतुल्य आहेत. अहो ! या लोकी गृहस्थाश्रमातच धर्म, अर्थ, काम, संतान-सुख, मोक्ष, सुयश, आणि स्वर्गादी दिव्य लोकांची प्राप्ती होऊ शकते. संसाराचा त्याग केलेले संन्यासी तर या सर्वांची कल्पनाही करू शकत नाहीत. असे सांगतात की, या लोकातच पितर, देव, ऋषी, मनुष्य आणि सर्व प्राणी तसेच आपले कल्याण करणारा गृहस्थाश्रमच आहे. हे वीरशिरोमणे, आपणहून आलेल्या आपल्यासारख्या सुप्रसिद्ध, इष्ट वस्तू देणार्या सुंदर पतीला माझ्यासारखी कोणती स्त्री वरणार नाही ? हे महाबाहो, आपल्या नागासारख्या गोल बाहूंमध्ये स्थान मिळविण्यासाठी कोणत्या कामिनीचे चित्त लालचावणार नाही ? आपण तर आपल्या मधुर हास्यमय करुणापूर्ण दृष्टीने माझ्यासारख्या अनाथांचे मानसिक दुःख शांत करण्यासाठीच या पृथ्वीवर विहार करीत आहात. (३२-४२) श्रीनारद म्हणतात - राजन, अशा रीतीने त्या दांपत्याने एकमेकांच्या म्हणण्याचे समर्थन करून शंभर वर्षेपर्यंत त्या नगरीत राहून आनंद उपभोगला. जिकडे तिकडे गायक लोक सुमधुर स्वरात राजा पुरंजनाची कीर्ती गात असत. जेव्हा उन्हाळा येई, तेव्हा तो अनेक स्त्रियांबरोबर सरोवरात जाऊन जलक्रीडा करीत असे. त्या नगरीला जी नऊ दारे होती, त्यांपैकी नगरीच्या वरच्या बाजूला सात आणि खालच्या बाजूला दोन होती. त्या नगरीचा जो कोणी राजा असेल, त्याला निरनिराळ्या देशांना जाण्यासाठी ही दारे बनविली गेली होती. राजा, यांपैकी पाच पूर्वेकडे, एक दक्षिणेकडे, एक उत्तरेकडे आणि दोन पश्चिम दिशेकडे होती. त्यांच्या नावांचे मी आता वर्णन करतो. पूर्वेकडे खद्योता आणि आविर्मुखी नावाची दोन दारे एकाच ठिकाणी बनविली होती. त्या दारांतून पुरंजन राजा आपला मित्र द्युमान याच्याबरोबर विभ्राजित नावाच्या देशाला जात असे. तसेच त्या बाजूला नलिनी आणि नालिनी नावाची दोन दारे एकाच ठिकाणी बनविली होती. त्या दारांतून तो अवधूताबरोबर सौरभ नावाच्या देशाला जात असे. पूर्वदिशेला मुख्या नावाचे जे पाचवे दार होते, त्यातून तो रसज्ञ आणि विपण यांच्याबरोबर अनुक्रमे बहूदन आणि आपण नावाच्या देशांना जात असे. नगरीच्या दक्षिणेला जे पितृहू नावाचे दार होते, त्यातून पुरंजन राजा श्रुतधर याच्याबरोबर दक्षिणपांचाल देशाला जात होता. उत्तरेकडे जे देवहू नावाचे दार होते, त्यातून तो श्रुतधराबरोबरच उत्तरपांचाल देशाला जात होता. पश्चिम दिशेला आसुरी नावाचा दरवाजा होता, त्यातून तो दुर्मद याच्याबरोबर ग्रामक देशाला जात होता. तसेच निऋती नावाचे जे दुसरे पश्चिमद्वार होते, त्यातून तो लुब्धकाबरोबर वैशस नावाच्या देशाला जात होता. या नगरीत राहणार्यांपैकी निर्वाक आणि पेशस्कृत नावाचे दोन नागरिक अंध होते. राजा पुरंजन डोळे असणार्या नागरिकांचा राजा असूनही तो यांच्या साहाय्याने सगळीकडे जात असे व सर्व प्रकारची कार्ये करीत असे. (४३-५४) जेव्हा तो आपला प्रधान सेवक विषूचीन याच्याबरोबर अंतःपुरात जात असे तेव्हा त्याला स्त्री-पुत्र यांच्यामुळे होणारा मोह, प्रसन्नता आणि आनंद या भावनांचा अनुभव येत असे. निरनिराळ्या कर्मांमध्ये त्याचे चित्त गुंतले होते आणि कामाच्या अधीन झाल्यामुळे फसलेला तो मूर्ख, राणी जे जे काम करी तेच तोही करीत असे. ती जेव्हा मद्यपान करीत असे, तेव्हा हाही मदिरापान करून धुंद होत असे. जेव्हा भोजन करीत असे, तेव्हा हाही भोजन करू लागे. जेव्हा ती काही खात असेल, तेव्हा हाही तोच पदार्थ खात असे. अशा प्रकारे कधी ती गात असता गाऊ लागे, रडत असता रडे, हसत असता हसे आणि बोलल्यावर बोलू लागत असे. ती पळू लागली, तर हाही पळत असे. उभी राहिली तर आपणही उभा राही. झोपली तर आपणही झोपे आणि बसली तर आपणही बसून राही. कधी ती ऐकू लागे तेव्हा हाही ऐकत असे. पाहात असेल तर पाहू लागे, हुंगत असेल तर हुंगू लागे. आणि तिने एखाद्या वस्तूला स्पर्श केला, तर हाही स्पर्श करीत असे. कधी त्याची प्रिया शोकाकुल होई, तेव्हा हा आपणही अत्यंत दीन होऊन व्याकूळ होत असे, जेव्हा ती प्रसन्न असेल तेव्हा आपणही प्रसन्न होऊन जाई आणि तिच्या आनंदित होण्याने हाही आनंदित होत असे. अशा प्रकारे राणीने त्याला फसविले. सर्व प्रजेनेसुद्धा त्याला फसविले आणि हाही मूर्ख लाचार होऊन इच्छा नसतानाही खेळण्यासाठी घरी पाळलेल्या माकडाप्रमाणे तिचे अनुकरण करीत राहिला. (५५-६२) स्कंध चवथा - अध्याय पंचविसावा समाप्त |