|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ४ था - अध्याय २४ वा
पृथूची वंशपरंपरा आणि प्रचेतांना भगवान रुद्रांचा उपदेश - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] मैत्रेय म्हणतात - पृथूच्या नंतर त्याचा पुत्र परम यशस्वी विजिताश्व सम्राट झाला. त्याला आपल्या लहान भावांबद्दल प्रेम होते. म्हणून त्याने चौघांना एकेका दिशेचे राज्य दिले. त्याने हर्यक्षाला पूर्व, धूम्रकेशाला दक्षिण, वृकाला पश्चिम आणि द्रविणाला उत्तर दिशेचे राज्य दिले. त्याने इंद्रापासून अंतर्धान होण्याची शक्ती प्राप्त करून घेतली होती. म्हणून त्याला अंतर्धान असेही म्हणतात. त्याच्या पत्नीचे नाव शिखंडिनी होते. तिच्यापासून त्याला तीन पुत्र झाले. त्यांची नावे पावक, पवमान आणि शुची अशी होती. पूर्वी वसिष्ठांनी शाप दिल्यामुळे वरील नावाच्या अग्नींनीच त्यांच्या रूपात जन्म घेतला होता. पुढे योगमार्गाने हे पुन्हा अग्निरूप झाले. (१-४) नभस्वती नावाच्या पत्नीपासून अंतर्धानाला हविर्धान नावाचा एक पुत्र झाला. इंद्राने पित्याच्या अश्वमेध यज्ञातील घोडा पळवून नेला, हे कळूनही त्याने त्याचा वध केला नाही. राजा अंतर्धान याने कर घेणे, शिक्षा करणे, दंड वसूल करणे ही राजाची कर्तव्ये अत्यंत कठोर आणि दुसर्यांना कष्ट देणारी आहेत असे समजून एका दीर्घकाळ चालणार्या यज्ञाच्या दीक्षेच्या निमित्ताने आपले राज्य सोडून दिले. त्या यज्ञांतही त्या आत्मज्ञानी राजाने पूर्णपुरुष परमात्म्याची आराधना करून स्थिर समाधीने भगवंतांचा दिव्य लोक प्राप्त करून घेतला(५-७) हे विदुरा, हविर्धान याची पत्नी हविर्धानी हिने बर्हिषद, गय, शुक्ल, कृष्ण, सत्य आणि जितव्रत नावाच्या सहा पुत्रांना जन्म दिला. कुरुश्रेष्ठ विदुरा, यामध्ये हविर्धानाचा मुलगा महाभाग बर्हिषद यज्ञादी कर्मकांड आणि योगाभ्यासात प्रवीण होता. त्याने प्रजापतीचा अधिकार प्राप्त करून घेतला. त्याने एका ठिकाणानंतर दुसर्या ठिकाणी असे पाठोपाठ इतके यज्ञ केले की, ही सर्व भूमी पूर्वेकडे टोक करून पसरलेल्या दर्भांनी झाकून गेली. (यानंतर तो प्राचीनबर्ही नावाने प्रसिद्ध झाला.) (८-१०) राजा प्राचीनबर्हीने ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार समुद्राची कन्या शतद्रुती हिच्याशी विवाह केला होता. सर्वांगसुंदर किशोरी शतद्रुती सुंदर वस्त्रालंकारांनी नटून-थटून जेव्हा विवाह-मंडपात सप्तपदी घालत होती, तेव्हा स्वतः अग्निदेवसुद्धा शुकीवर जसा मोहित झाला होता तसा तिच्यावर मोहित झाला. नवविवाहिता शतद्रुतीने आपल्या नूपुरांच्या झंकारांनीच दिशा-दिशांतील देव, असुर, गंधर्व, मुनी, सिद्ध, मनुष्य आणि नाग (अशा) सर्वांना वश करून घेतले. शतद्रुतीपासून प्राचीनबर्हीला प्रचेता नावाचे दहा पुत्र झाले. ते सर्वजण धर्मज्ञ आणि एकसारखेच नाव आणि आचरण असणारे होते. जेव्हा पित्याने त्यांना संतान उत्पन्न करण्याची आज्ञा केली, तेव्हा त्या सर्वांनी तपश्चर्या करण्यासाठी समुद्रात प्रवेश केला. तेथे दहा हजार वर्षे तप करून त्यांनी तपाचे फळ देणार्या श्रीहरींची आराधना केली. घरून तपश्चर्येसाठी जात असताना वाटेत श्रीमहादेवांनी त्यांना दर्शन देऊन कृपापूर्वक ज्याचा उपदेश केला होता, त्याचेच ते एकाग्रतापूर्वक ध्यान, जप आणि पूजन करीत राहिले. (११-१५) विदुराने विचारले - ब्रह्मन, वाटेत प्रचेतांचा श्रीमहादेवांच्याबरोबर कोणता वार्तालाप झाला आणि त्यांच्यावर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना जो उपदेश केला, तो अर्थपूर्ण उपदेश आपण मला सांगावा. ब्रह्मर्षे, शंकरांच्या बरोबर भेट होणे, देहधार्यांना अतिशय कठीण आहे. इतरांचे कशाला ? मुनिजनसुद्धा सर्व प्रकारची आसक्ती सोडून स्वतःला प्रिय असणार्या त्यांची प्राप्ती करून घेण्यासाठी त्यांचे निरंतर ध्यान करतात. परंतु त्यांनाही ते प्राप्त होत नाहीत. जरी भगवान शंकर आत्माराम असले, तरीसुद्धा या लोकसृष्टीच्या रक्षणासाठी ते आपल्या घोररूपा शक्तीसह सर्वत्र संचार करीत असतात. (१६-१८) मैत्रेय म्हणाले- साधुस्वभाव प्रचेतागण पित्याची आज्ञा शिरोधार्य मानून तप करण्याचे मनात ठरवून पश्चिम दिशेकडे गेले. चालता-चालता त्यांनी समुद्राप्रमाणे विशाल असे एक सरोवर पाहिले. ते महापुरुषांच्या चित्ताप्रमाणे अतिशय स्वच्छ होते आणि त्यात राहाणारे मासे इत्यादी जीवसुद्धा प्रसन्न दिसत होते. त्यामध्ये नीलकमळे, लालकमळे, रात्री, दिवसा आणि सायंकाळी उमलणारी कमळे तसेच इंदीवर इत्यादी अनेक प्रकारची सुंदर कमळे होती. त्याच्या तटावर हंस, सारस, चकवे, कारंडव इत्यादी जलपक्षी विहार करीत होते. त्याच्या चारी बाजूंनी निरनिराळे वृक्ष आणि वेली होत्या. त्यावर धुंद भ्रमर गुंजारव करीत होते. त्यांच्या मधुर आवाजाने आनंदित होऊन जणू त्यांच्या अंगावर रोमांच आले होते. कमळकोशाचे परागपुंज वायूच्या हालचालीने चारी बाजूंना उडत होते. तेथे मृदंग, पखवाज इत्यादी वाद्यांसह अनेक दिव्य राग-रागिणींच्या गायनाचा मधुर ध्वनी ऐकून त्या राजकुमारांना अतिशय आश्चर्य वाटले. इतक्यात त्यांनी असे पाहिले की, देवाधिदेव भगवान शंकर आपल्या गणांसह त्या सरोवराच्या बाहेर येत आहेत. त्यांचे शरीर तापलेल्या सुवर्ण-राशीप्रमाणे कांतिमान आहे. कंठ निळा असून तीन नेत्र आहेत. ते भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी उत्सुक आहेत. देवांसह अनेक गंधर्व त्यांचे सुयश गात आहेत. त्यांना पाहून प्रचेतांना मोठे आश्चर्य वाटले आणि त्यांनी शंकरांच्या चरणांना नमस्कार केला. तेव्हा शरणागतांचे भय हरण करणारे धर्मवत्सल भगवान शंकर आपल्या दर्शनाने आनंदित झालेल्या त्या धर्मज्ञ आणि शीलसंपन्न राजकुमारांवर प्रसन्न होऊन त्यांना म्हणाले. (१९-२६) श्रीमहादेव म्हणाले - तुम्ही राजा प्राचीनबर्हीचे पुत्र आहात. तुमचे कल्याण असो. तुम्ही जे काही करू इच्छिता, ते मला माहीत आहे. तुमच्यावर कृपा करण्यासाठीच मी तुम्हांला दर्शन दिले आहे. जी व्यक्ती अव्यक्त प्रकृती आणि जीवसंज्ञक पुरुष या दोन्हींचे नियामक भगवान वासुदेव यांना शरण जाते, ती मला अत्यंत प्रिय आहे. आपल्या वर्णाश्रमधर्माचे चांगल्या प्रकारे पालन करणारा पुरुष शंभर जन्मांनंतर ब्रह्मपदाला प्राप्त होतो. यापेक्षाही अधिक पुण्य झाल्यावर तो मला प्राप्त होतो. परंतु जो भगवंतांचा अनन्य भक्त आहे, तो मृत्यूनंतर सरळ भगवान विष्णूंच्या त्या सर्व प्रपंचातीत परमपदाला प्राप्त होतो. जेथे मी आणि इतर देव आपला अधिकार संपल्यानंतर प्राप्त होतात. तुम्ही भगवद्भक्त असल्याकारणाने मला भगवंतांइतकेच प्रिय आहात. त्याचप्रमाणे भगवंतांच्या भक्तांना सुद्धा माझ्यापेक्षा अधिक प्रिय कोणी असत नाही. आता मी तुम्हांला एक अतिशय पवित्र, मंगलकारक आणि कल्याणकारक स्तोत्र सांगतो. याचा तुम्ही शुद्ध भावनेने जप करा. (२७-३१) मैत्रेय म्हणतात - तेव्हा नारायणपरायण, करुणार्द्रहृदय, भगवान शिवांनी आपल्यासमोर हात जोडून उभे असलेल्या राजपुत्रांना हे स्तोत्र ऐकविले. (३२) भगवान रुद्र म्हणाले - भगवन, आपला उत्कर्ष उच्चकोटीच्या आत्मज्ञान्यांना निजानंदाचा लाभ व्हावा यासाठी आहे. त्याने माझेसुद्धा कल्याण होवो. आपण नेहमी आपल्या निरतिशय परमानंद स्वरूपातच स्थित असता. अशा सर्वात्मक आत्मस्वरूप आपल्याला नमस्कार असो. आपण पद्मनाभ अर्थात सर्व लोकांचे आदिकारण आहात. सूक्ष्म भूते आणि इंद्रियांचे नियंता, शांत, अविकारी आणि स्वयंप्रकाश वासुदेव अर्थात चित्ताचे अधिष्ठाता आहात. आपणांस नमस्कार असो. आपणच अव्यक्त, अनंत आणि मुखाग्नीच्या द्वारा संपूर्ण लोकांचा संहार करणारे, अहंकाराचे अधिष्ठाता संकर्षण आहात. तसेच जगाच्या उत्कृष्ट ज्ञानाचे उगमस्थान असणार्या बुद्धींचे अधिष्ठाता प्रद्युम्न आहात. आपणांस नमस्कार असो. आपणच इंद्रियांचे स्वामी, मनस्तत्त्वाचे अधिष्ठाता अनिरुद्ध आहात. आपण आपल्या तेजाने जग व्यापणारे सूर्यदेव आहात. आपण पूर्ण असल्यामुळे आपणांस वृद्धी किंवा क्षय नाही. आपणांस नमस्कार असो. आपण स्वर्ग आणि मोक्षाचे द्वार तसेच निरंतर पवित्र हृदयात राहाणारे आहात. आपणच सुवर्णरूप वीर्याने युक्त आणि चातुर्होत्र कर्माचे साधन असून त्याचा विस्तार करणारे अग्निदेव आहात. आपणांस नमस्कार असो. पितर आणि देवांचे अन्न सोम आपण आहात. तसेच तिन्ही वेदांचे अधिष्ठाता आहात. आपणच सर्व प्राण्यांना तृप्त करणारे जलरुप आहात. आपणांस नमस्कार असो. आपण सर्व प्राण्यांचे देह, पृथ्वी आणि विराट स्वरूप आहात. तसेच त्रैलोक्याचे रक्षण करणारे मानसिक, इंद्रियविषयक आणि शारीरिक शक्तिस्वरूप वायू आहात. आपणांस नमस्कार असो. आपण आपला जो शब्द हा गुण त्याच्या द्वारा सर्व पदार्थांचे ज्ञान करून देणारे व आत-बाहेर व्यापून असणारे आकाश आहात. त्याचप्रमाणे अतिशय पुण्याने प्राप्त होणारे परम तेजोमय स्वर्ग-वैकुंठादी लोक आपणच आहात. आपणांस नमस्कार असो. आपण पितृलोकाची प्राप्ती करून देणारे प्रवृत्तिकर्मरूप आणि देवलोकाच्या प्राप्तीचे साधन निवृत्तिकर्मरूप आहात. तसेच अधर्माचे फलस्वरूप दुःखदायक मृत्यू आपणच आहात. आपणांस नमस्कार असो. नाथ, आपणच पुराणपुरुष व सांख्य आणि योगाचे अधीश्वर भगवान श्रीकृष्ण आहात. आपण सर्व कामनापूर्तींचे कारण मंत्रमूर्ती आणि महान धर्मस्वरूप आहात. आपली ज्ञानशक्ती कुंठित होणारी नाही. आपणांस नमस्कार असो. आपणच कर्ता, करण आणि कर्म या तिन्ही शक्तींचे एकमात्र आश्रय आहात. आपणच अहंकाराचे अधिष्ठाता रुद्र आहात, आपणच ज्ञान आणि क्रियास्वरूप आहात. आपल्यापासूनच परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी या चार प्रकारच्या वाणींची अभिव्यक्ती होते. आपणांस नमस्कार असो. (३३-४३) प्रभो, आम्हांला आपल्या दर्शनाची अभिलाषा आहे. म्हणून आपले भक्तजन ज्याचे पूजन करतात, आणि जे आपल्या निजजनांना अत्यंत प्रिय आहे, ते आपले अनुपम रूप आम्हांला दाखवा. आपल्या गुणांनी आपले ते रूप सर्व इंद्रियांना तृप्त करणारे आहे. पावसाळ्यातील मेघाप्रमाणे ते रूप स्निग्ध, श्याम आणि सर्व सौंदर्याचे सार-सर्वस्व आहे. सुंदर चार विशाल हात, अत्यंत मनोहर मुखारविंद, कमलदलाप्रमाणे नेत्र, सुंदर भुवया, डौलदार नाक, मनमोहक दंतपंक्ती, सुंदर गाल, मनोहर मुखमंडल आणि समान दोन कान यांनी आपले रूप अधिकच सुंदर दिसत आहे. प्रेमपूर्ण मोहक हास्य, कुरळे केस, काळ्या काळ्या कुरळ्या केसांच्या बटा, कमलपुष्पातील केसराप्रमाणे फडफडणारा पीतांबर, झगमगणारी कुंडले, चमकणारा मुगुट, हातात कंकण, हार, नूपुरे, आणि मेखला इत्यादी अलंकार, तसेच शंख, चक्र, गदा, पद्म, वनमाळा, आणि कौस्तुभमणी यांमुळे अपूर्व शोभायमान दिसणारे दर्शन आम्हांला द्या. ज्यांचे खांदे सिंहाप्रमाणे पुष्ट आहेत, ज्यांच्यावर हार, केयूर आणि कुंडले यांची कांती झगमगत असते, तसेच कौस्तुभमण्याच्या कांतीने सुशोभित अशी मान आहे, ज्यांचे श्यामल वक्षःस्थळ श्रीवत्सचिन्हाच्या रूपाने लक्ष्मीचे नित्य निवासस्थान असल्याने सोन्याचा कस अजमावणार्या कसोटीच्या शोभेवरही मात करीत आहे, ज्यांचे त्रिवलीने सुशोभित, पिंपळाच्या पानाप्रमाणे सुडौल पोट श्वासोच्छ्वासामुळे हलण्याने अतिशय मनोहर दिसत आहे, त्यावर भोवर्याप्रमाणे गोलाकार जी नाभी आहे, ती इतकी खोल आहे की, त्यातून उत्पन्न झालेले हे विश्व पुन्हा त्यातच लोप पावू इच्छित आहे, श्यामवर्ण कटिप्रदेशावर पीतांबर आणि सुवर्णमेखला शोभायमान झाली आहे, समान आणि सुंदर पाय, पिंडर्या, जांघ आणि घोटयांमुळे ज्यांचे शरीर अतिशय सुडौल दिसत आहे, आपल्या चरणांची शोभा शरद्ऋतूतील कमलदलाच्या कांतीलाही मागे टाकील अशी आहे, त्यांच्या नखांतून जो प्रकाश बाहेर पडत आहे, तो जीवांचा अज्ञानांधकार ताबडतोब नाहीसा करतो. आपण आम्हांला कृपा करून भक्तांचे भय हरण करणार्या आणि (त्यांना) आश्रयस्वरूप अशा रूपाचे दर्शन घडवा. जगद्गुरो, आम्हां अज्ञानाने वेढलेल्या प्राण्यांना आपल्या प्राप्तीचा मार्ग सांगणारे आपणच आमचे गुरू आहात. (४४-५२) प्रभो, चित्तशुद्धीची इच्छा करणार्या माणसांनी आपल्या या रूपाचे नेहमी ध्यान केले पाहिजे. या रूपाची भक्ती हीच स्वधर्माचे पालन करणार्या पुरुषांना अभय देणारी आहे. स्वर्गाचा राजा इंद्रही आपल्यालाच प्राप्त करू इच्छितो. तसेच आत्मज्ञान्यांची गतीही आपणच आहात. आपण अभक्त देहधार्यांसाठी अत्यंत दुर्लभ आहात. केवळ भक्तिमान लोकच आपल्याला प्राप्त करून घेऊ शकतात. सत्पुरुषांनाही दुर्लभ अशा अनन्यभक्तीने प्राप्त न होणार्या भगवंतांना प्रसन्न करून घेणारा कोणता भक्त त्यांच्या चरणकमलांशिवाय दुसर्या साधनाची अपेक्षा करील ? आपल्या अपूर्व उत्साह आणि पराक्रमाने फडफडणार्या भुवयांच्या इशार्याने संपूर्ण विश्वाचा संहार करणारा काळसुद्धा आपल्या चरणांना शरण गेलेल्या प्राण्यांवर आपला अधिकार चालवू शकत नाही. भगवंतांच्या अशा प्रेमी भक्तांचा अर्धा क्षण जरी सत्संग घडला, तरी त्याच्या तुलनेत मी स्वर्ग आणि मोक्षाची पर्वा करीत नाही. मग मर्त्यलोकातील तुच्छ भोगांबद्दल काय बोलावे ? प्रभो, आपले चरण संपूर्ण पापराशी नष्ट करणारे आहेत. ज्यांनी आपली कीर्ती आणि तीर्थे यांमध्ये अंतर्बाह्य स्नान करून आपली मानसिक आणि शारीरिक अशी दोन्ही प्रकारची पापे धुऊन टाकली आहेत, तसेच जे इतरांबद्दल दया, राग-द्वेषविरहित चित्त आणि सरळपणा इत्यादी गुणांनी युक्त आहेत, अशा भक्तजनांचा सत्संग नेहमी आम्हांस मिळावा, एवढीच आमची इच्छा आहे. हीच आपली आमच्यावर मोठी कृपा होईल. ज्या भक्ताचे चित्त भक्तियोगाने परिपूर्ण आणि शुद्ध होऊन बाह्य विषयांकडे ओढ घेत नाही किंवा अज्ञानरूपी गुहा असलेल्या प्रकृतीत लीन होत नाही, तो अनायासेच आपल्या स्वरूपाचे दर्शन घेतो. ज्यामध्ये हे सर्व जग दिसते आणि जे या संपूर्ण जगात भासमान होत आहे, ते आकाशाप्रमाणे विस्तृत आणि परम प्रकाशमय ब्रह्मतत्त्व आपणच आहात. (५३-६०) भगवन, आपली माया अनेक प्रकारची रूपे धारण करते. हिच्याद्वारा आपण जगांची अशी निर्मिती, पालन आणि संहार करता की ही जणू एखादी खरी वस्तू आहे. परंतु यामुळे आपल्यामध्ये कोणताही विकार उत्पन्न होत नाही. मायेमुळे इतरांमध्ये भेदबुद्धी निर्माण होते, पण आपल्यावर तिचे काही चालत नाही. कारण आपण स्वतंत्र आहात, याचा आम्हांला प्रत्यय आहे. आपले स्वरूप पंचमहाभूते, इंद्रिये, आणि अंतःकरण यांचे प्रेरक या रूपाने दृश्य स्थितीला येते. जे कर्मयोगी सिद्धी प्राप्त करण्यासाठी निरनिराळ्या कर्मांच्या द्वारे आपल्या या सगुण साकार स्वरूपाचे श्रद्धापूर्वक चांगल्या रीतीने पूजन करतात, तेच वेद व शास्त्रे योग्य तर्हेने जाणणारे होत. प्रभो, आपणच अद्वितीय आदिपुरुष आहात. सृष्टीच्या पूर्वी आपली मायाशक्ती सुप्तावस्थेत असते. नंतर तिच्याच द्वारे सत्त्व, रज आणि तमोरूप गुणांमध्ये भेद निर्माण होतो आणि त्यापाठोपाठ त्याच गुणांपासून महत्तत्त्व, अहंकार, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, देव, ऋषी आणि सर्व प्राण्यांनी युक्त अशा या जगाची उत्पत्ती होते. नंतर आपण आपल्याच मायाशक्तीने रचलेल्या या जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज्ज अशा चार प्रकारच्या शरीरांमध्ये अंशरूपाने प्रवेश करता आणि मधमाशी ज्याप्रमाणे आपणच उत्पन्न केलेल्या मधाचा आस्वाद घेते, त्याप्रमाणे आपण ज्या अंशाने इंद्रियांच्या द्वारा या तुच्छ विषयांचा भोग घेता, त्या आपल्या अंशालाच शरीरांतील पुरुष किंवा जीव असे म्हणतात. (६१-६४) प्रभो, आपले स्वरूप प्रत्यक्ष नसले तरी अनुमानाने समजते. प्रलयकाळी कालस्वरूप आपणच प्रचंड वेगाने पृथ्वी इत्यादी पंचमहाभूतांना त्यांच्याच द्वारा विचलित करून सर्व लोकांचा संहार करता. जसा वायू आपल्या असह्य वेगाने मेघांच्या द्वाराच मेघांना नष्ट करतो. भगवन, हा मोहग्रस्त जीव "मला हे करावयाचे आहे, ते करावयाचे आहे," या चिंतेमध्ये असतो. त्याचा लोभ आणि विषयांची लालसा वाढतच असते. परंतु कालरूप आपण नेहमी सावध असता. भुकेने व्याकूळ झालेला साप ज्याप्रमाणे उंदराला एकदम पकडतो, त्याप्रमाणे कालस्वरूपाने आपण या जीवाला गिळंकृत करता. आपली अवहेलना केल्यास स्वतःचे आयुष्य व्यर्थ जाईल, असे मानणारा कोणता विद्वान आपल्या चरणांना विसरेल बरे ! काळाच्या भीतीने त्यांची पूजा आमचे पिता ब्रह्मदेव आणि स्वायंभुवादी चौदा मनू कोणताही विचार न करता करीत असतात. ब्रह्मन, अशा प्रकारे सर्व जग रुद्ररूप काळाच्या भीतीने व्याकूळ झाले आहे. म्हणून हे परमात्मन, हे तत्त्व जाणणार्या आमचे आपणच सर्वथैव निर्भय आश्रय आहात. (६५-६८) हे राजकुमारांनो, विशुद्धभावाने स्वधर्माचे आचरण करीत, भगवंतांमध्ये चित्त लावून मी सांगितलेल्या या स्तोत्राचा तुम्ही जप करीत राहा, तुमचे कल्याण असो. सर्व भूतांतर्यामी व तुमच्या अंतःकरणामध्ये असलेल्या परमात्मा श्रीहरीचेच तुम्ही वारंवार स्तवन आणि चिंतन करीत पूजन करा. मी तुम्हांला सांगितलेले हे योगादेश नावाचे स्तोत्र मनामध्ये धारण करून मुनिव्रताचे आचरण करीत याचा एकाग्रतेने आदरपूर्वक अभ्यास करा. हे स्तोत्र पूर्वी जगद्विस्तार करू इच्छिणार्या, प्रजापतींचे पती भगवान ब्रह्मदेवांनी, प्रजा उत्पन्न करण्याची इच्छा करणार्या आम्हां भृगू वगैरे पुत्रांना ऐकविले होते. जेव्हा आम्हा प्रजापतींना प्रजेचा विस्तार करण्याची आज्ञा झाली, तेव्हा याच्या द्वारा आम्ही आपले अज्ञान घालवून अनेक प्रकारची प्रजा उत्पन्न केली होती. आतासुद्धा जो भगवत्परायण पुरुष याचा एकाग्र चित्ताने दररोज जप करील, त्याचे तत्काळ कल्याण होईल. या लोकी सर्व प्रकारच्या कल्याण-साधनांमध्ये मोक्षदायक ज्ञानच सर्वश्रेष्ठ आहे. ज्ञाननौकेत बसलेला पुरुष अनायासेच हा दुस्तर संसारसागर पार करून जातो. भगवंतांची आराधना करणे जरी कठीण असले तरी मी सांगितलेल्या या स्तोत्राचा जो श्रद्धापूर्वक पाठ करील, तो त्यांना प्रसन्न करून घेईल. सर्व कल्याणसाधनांचे प्राप्तव्य एक भगवंतच आहेत. म्हणून मी गायिलेल्या या स्तोत्राने त्यांना प्रसन्न करून जो कोणी जे काही मागेल, ते त्याला प्राप्त होईल. जो पुरुष प्रातःकाळी उठून श्रद्धापूर्वक हात जोडून हे ऐकेल किंवा ऐकवील, तो सर्व प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त होईल. हे राजकुमारांनो, परमपुरुष परमात्म्याचे मी तुम्हांला हे जे स्तोत्र ऐकविले, त्याचा एकाग्रचित्ताने जप करीत तुम्ही मोठे तप करावे. ते पूर्ण झाल्यावर यापासूनच तुम्हांला इच्छित फळ प्राप्त होईल. (६९-७९) स्कंध चवथा - अध्याय चोविसावा समाप्त |