श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय २३ वा

राजा पृथूची तपश्चर्या आणि परलोकगमन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

मैत्रेय म्हणतात - अशा प्रकारे महामनस्वी प्रजापती पृथूने स्वतः अन्न वगैरे निर्माण केले. नगरे, गावे इत्यादी राहाण्याची व्यवस्था करून स्थावर-जंगम अशा सर्वांची उपजीविकेची सुविधा करून दिली. तसेच साधुजनांना उचित अशा धर्माचेही पालन केले. आपण वृद्ध झालो असून उताराला लागलेलो आहोत आणि ज्यासाठी आपला जन्म होता, त्या प्रजारक्षणरूप ईश्वराच्या आज्ञेचे पालनही झालेले आहे. म्हणून आता आपल्याला "मोक्षासाठी प्रयत्‍न केला पाहिजे." असा विचार करीत त्याने विरहामुळे जणू रडणार्‍या आपल्या मुलीचा-पृथ्वीचा भार आपल्या मुलांवर सोपविला आणि सर्व प्रजेला विमनस्क अवस्थेत सोडून तो आपल्या पत्‍नीसह एकटाच तपोवनाकडे गेला.पहिल्यांदा गृहस्थाश्रमात पृथ्वीवर विजय मिळवण्याचे त्याने जसे व्रत घेतले होते, त्याचप्रमाणे तेथे सुद्धा वानप्रस्थ आश्रमाच्या नियमानुसार तो कठोर तपस्येला लागला. काही दिवस त्याने कंदमुळे फळे खाऊन घालविली. काही काळ वाळलेली पाने खाऊन तो राहिला. काही पंधरवडे पाण्यावरच राहिला आणि त्यानंतर केवळ वायूवर निर्वाह करू लागला. वीरवर पृथू उन्हाळ्यात पंचाग्नीचे सेवन करीत, पावसाळ्यात मोकळ्या मैदानात राहून शरीरावर पाऊस घेत, हिवाळ्यात गळ्याइतक्या पाण्यात उभे राहात, तसेच दररोज मातीच्या जमिनीवरच झोपत मुनिवृत्तीने राहात होता. त्याने शीत-उष्ण इत्यादी सर्व प्रकारची द्वंद्वे सहन केली. तसेच वाणी आणि मनाचा संयम करून ब्रह्मचर्याचे पालन करीत प्राण आपल्या स्वाधीन करून घेतले. अशा रीतीने त्याने श्रीकृष्णांची आराधना करण्यासाठी उत्तम तप केले. अशा प्रकारे त्याचे तप क्रमाने वाढत गेले आणि त्या प्रभावाने कर्ममल नाहीसा झाल्याने त्याचे चित्त पूर्णपणे शुद्ध झाले. प्राणायामाने मन आणि इंद्रिये ताब्यात आल्यामुळे त्याचे वासनाजनित बंधनसुद्धा तुटले. तेव्हा भगवान सनत्कुमारांनी त्याला ज्या श्रेष्ठ अध्यात्मयोगाचे शिक्षण दिले होते, त्यानुसार राजा पृथू पुरुषोत्तम श्रीहरींची आराधना करू लागला. अशा तर्‍हेने भगवत्परायण होऊन श्रद्धापूर्वक सदाचरणाचे पालन करीत नेहमी साधन केल्याने परब्रह्म परमात्म्यामध्ये त्याची अनन्यभक्ती निर्माण झाली. (१-१०)

त्याच्या या भगवंतांच्या उपासनेने अंतःकरण शुद्ध, सात्विक झाल्यावर निरंतर भगवच्चिंतनाच्या प्रभावाने प्राप्त झालेल्या अनन्य भक्तीमुळे त्याला वैराग्ययुक्त ज्ञान प्राप्त झाले आणि त्या तीव्र ज्ञानाच्या द्वारे संशयाला कारण असणार्‍या जीवाच्या उपाधिभूत पाचही कोशांना त्याने नष्ट केले. एवढे झाल्यावर देहात्मबुद्धीची निवृत्ती आणि परमात्मस्वरूप श्रीकृष्णांची अनुभूती आल्याने अन्य सर्व प्रकारच्या सिद्धी इत्यादींपासूनही तो उदासीन झाला. त्यामुळे ज्याच्या सहाय्याने त्याने प्रथम आपल्या जीवकोशाचा नाश केला होता, त्या तत्त्वज्ञानासाठीसुद्धा प्रयत्‍न करणे त्याने सोडून दिले. कारण जोपर्यंत साधकाला योगमार्गाच्या द्वारे श्रीकृष्ण-कथामृतामध्ये प्रेम उत्पन्न होत नाही, तोपर्यंत केवळ योगसाधनेने त्याचा मोह दूर होत नाही. यानंतर जेव्हा त्याचा अंतकाल जवळ आला, तेव्हा वीरवर पृथूने आपले चित्त दृढतापूर्वक परमात्म्यामध्ये स्थिर करून तो ब्रह्मभावात स्थिर राहिला आणि वेळ आल्यावर त्याने आपल्या शरीराचा त्याग केला. त्याने टाचेने गुदद्वार दाबून धरून प्राणवायूला हळू हळू मूलाधारापासून वर आणीत आणीत त्याला क्रमशः नाभी, हृदय, वक्षःस्थळ, कंठ (येथील चक्रांतून वर नेत) मस्तकात (असणार्‍या सहस्रारात) स्थिर केले. नंतर त्याला पुन्हा वरच्या बाजूला नेत क्रमशः ब्रह्मरंध्रामध्ये स्थिर केले. नंतर पूर्ण निरिच्छ होऊन त्याने शरीरातील प्राणवायूला समष्टिवायूमध्ये, शरीराला पृथ्वीमध्ये, तेजाला तेजामध्ये, आकाशाला महाकाशात आणि द्रव पदार्थांना पाण्यामध्ये विलीन केले. पुन्हा पृथ्वीला पाण्यामध्ये, पाण्याला तेजामध्ये, तेजाला वायूमध्ये आणि वायूला आकाशात विलीन केले. त्यानंतर मनाला इंद्रियांमध्ये, इंद्रियांना त्यांच्या कारणरूप तन्मात्रांमध्ये आणि तन्मात्रांना अहंकारात लीन करून अहंकाराला महत्तत्त्वामध्ये लीन केले. त्यानंतर सर्व गुणांची अभिव्यक्ती करणार्‍या त्या महत्तत्त्वाला मायोपाधिक जीवामध्ये स्थिर केले. त्यानंतर त्या जीवाच्या मायारूप उपाधीला सुद्धा त्याने ज्ञान आणि वैराग्याच्या प्रभावाने आपल्या शुद्ध ब्रह्मस्वरूपात स्थिर होऊन टाकून दिले. (११-१८)

पृथूची पत्‍नी महाराणी अर्ची हीसुद्धा त्याच्याबरोबर वनात गेली होती. पायांनी जमिनीला स्पर्शसुद्धा करू न शकण्याइतकी ती कोमल होती. तरीसुद्धा तिने आपल्या पतीचे व्रत आणि नियम यांचे पालन करीत त्यांची खूप सेवा केली आणि मुनिवृत्तीला अनुसरून कंदमुळे इत्यादींवर निर्वाह केला. यामुळे जरी ती अतिशय दुर्बळ झाली होती, तरीसुद्धा प्रिय पतीच्या हस्तस्पर्शाने सन्मानित होऊन त्यातच ती आनंद मानीत असल्याकारणाने तिला कोणत्याही प्रकारचे कष्ट होत नव्हते. आता पृथ्वीचे स्वामी आणि आपले प्रियतम महाराज पृथू यांचा देह निष्प्राण झालेला पाहून त्या सतीने काही वेळ विलाप केला. नंतर पर्वताच्या शिखरावर एक चिता रचून तो देह त्या चितेवर ठेवला. यानंतर अंत्यक्रिया करून तिने नदीमध्ये स्नान केले; आपल्या अलौकिक कार्य करणार्‍या पतीला जलांजली देऊन आकाशस्थित देवतांना वंदन केले, तसेच तीन वेळा चितेला प्रदक्षिणा घालून पतिदेवांच्या चरणांचे ध्यान करीत अग्नीमध्ये प्रवेश केला. परमसाध्वी अर्चीने आपला पती वीरवर पृथू याच्या बरोबर सहगमन केलेले पाहून हजारो वरदायिनी देवींनी आपापल्या पतींसह तिची स्तुती केली. तेथे देवतांची वाद्ये वाजू लागली. त्यावेळी त्या मंदराचलाच्या शिखरावर त्या देवांगना फुलांचा वर्षाव करीत आपापसात म्हणू लागल्या. (१९-२४)

देवी म्हणाल्या - अहो ! धन्य आहे या स्त्रीची ! ज्याप्रमाणे श्रीलक्ष्मी यज्ञेश्वर भगवान विष्णूंची सर्वभावे सेवा करते, त्याचप्रमाणे हिने आपला पती राजराजेश्वर पृथूची सेवा केली. आपल्या अचिंत्य कर्मांच्या प्रभावाने निश्चितच ही सती आम्हांला ओलांडून आपल्या वैन्य पतीबरोबर उच्चतर लोकी जाऊ लागली आहे. या लोकी थोडयाच दिवसांचे आयुष्य असूनही जे लोक भगवंतांचे परमपद प्राप्त करण्याचे आत्मज्ञान प्राप्त करून घेतात, त्यांना या संसारात कोणता पदार्थ दुर्मिळ आहे ? म्हणून जो पुरुष महत्प्रयासाने भूलोकी मोक्षाचे साधनस्वरूप मनुष्यशरीर मिळाल्यानंतरही विषयांमध्ये आसक्त असतो, तो निश्चितच आत्मघातकी समजावा. अरेरे ! खराच फसला म्हणायचा ! (२५-२८)

मैत्रेय म्हणतात - देवांगना अशा प्रकारे स्तुती करीत असताना भगवंतांच्या ज्या परमधामाला आत्मज्ञान्यांमध्ये श्रेष्ठ भगवत्प्राण महाराज पृथू गेला, त्याच पतिलोकाला महाराणी अर्चीसुद्धा गेली. परमभागवत पृथू असेच प्रभावशाली होते. त्यांचे चरित्र अत्यंत श्रेष्ठ आहे. मी त्यांचे तुझ्यासमोर वर्णन केले. जो पुरुष हे परमपवित्र चरित्र श्रद्धापूर्वक एकाग्रचित्ताने वाचतो, ऐकतो किंवा ऐकवितो, त्यालासुद्धा महाराज पृथूंचे पद प्राप्त होते. याचा सकामभावाने पाठ केल्यास ब्राह्मण ब्रह्मतेज प्राप्त करतो, क्षत्रिय पृथ्वीपती होतो, वैश्य व्यापार्‍यांत श्रेष्ठ होतो आणि शूद्र उत्तम संत होतो. स्त्री असो किंवा पुरुष, जो कोणी हे चरित्र आदराने तीन वेळा ऐकतो, तो संतानहीन असेल तर पुत्रवान, धनहीन असेल तर माहाधनी, कीर्तिहीन असेल तर यशस्वी आणि मूर्ख असेल तर पंडित होतो. हे चरित्र मनुष्यमात्राचे कल्याण करणारे आणि अमंगल दूर करणारे आहे. हे धन, यश आणि आयुष्याची वृद्धी करणारे, स्वर्गप्राप्ती करून देणारे व कलियुगाचे दोष नाहीसे करणारे आहे. हे धर्म इत्यादी चतुर्वर्गाची प्राप्ती करून देण्यासही सहाय्यक आहे. म्हणून जे लोक धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांनी मिळणारी सिद्धी प्राप्त करू इच्छितात, त्यांनी याचे श्रद्धापूर्वक श्रवण केले पाहिजे. जो राजा विजय मिळविण्यासाठी प्रस्थान करतेवेळी हे चरित्र ऐकून त्यांच्यावर स्वारी करील, तेव्हा पृथूच्या पुढे येऊन राजे लोक जसे नजराणे सादर करीत असत, तसे नजराणे घेऊन याच्यापुढे ठेवतील. मनुष्याने अन्य सर्व आसक्ती सोडून भगवंतांचे ठिकाणी विशुद्ध भक्तिभाव ठेवून महाराज पृथूचे हे चरित्र ऐकावे, ऐकवावे आणि वाचावे. विदुरा, भगवंतांचे माहात्म्य प्रगट करणारे हे परम पवित्र चरित्र मी आपणास ऐकविले. याच्यावर निष्ठा ठेवणारा माणूस महाराज पृथूसारखी गती प्राप्त करून घेतो. जो पुरुष या पृथू-चरित्राचे दररोज आदरपूर्वक, निष्कामभावाने श्रवण आणि कीर्तन करतो, त्याला ज्यांचे चरण संसारसागर पार करण्यासाठी नावेप्रमाणे आहेत, त्या श्रीहरींविषयी आत्यंतिक प्रेम निर्माण होते. (२९-३९)

स्कंध चवथा - अध्याय तेविसावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP