श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय २२ वा

पृथूंना सनकादिकांचा उपदेश -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

मैत्रेय म्हणतात - ज्यावेळी प्रजाजन परम पराक्रमी पृथूंची अशी स्तुती करीत होते, त्याचवेळी सूर्याप्रमाणे तेजस्वी असे चार मुनीश्वर तेथे आले. राजा व त्याच्या सेवकांनी ते सिद्धेश्वर आपल्या दिव्य कांतीने सर्व लोकांना पापापासून मुक्त करीत आकाशातून उतरून येत असलेले पाहिले. जसा विषयी जीव विषयांकडे ओढला जातो, त्याप्रमाणे सनकादिकांचे दर्शन होताच राजाचे प्राण त्यांच्याकडे ओढले गेले आणि जणू काही त्यांना थांबविण्यासाठीच ते आपले सभासद आणि सेवक यांच्यासह एकदम उठून उभे राहिले. जेव्हा ते मुनिगण अर्घ्य स्वीकारून आसनावर बसले, तेव्हा सुसंस्कृतांत अग्रगण्य पृथूंनी त्यांच्या महिम्याने प्रभावित होऊन, विनयाने मान झुकवून त्यांची यथासांग पूजा केली. नंतर त्यांचे चरणोदक आपल्या डोक्यावर शिंपडले. अशा प्रकारे शिष्टसंमत आचारांचा आदर आणि पालन करून त्यांनी सदाचारी लोकांनी कसे वागावे हेच दाखविले. सनकादिक मुनीश्वर शंकरांचेही ज्येष्ठ बंधू होते. आपापल्या कुंडांत अग्नी शोभून दिसतो, त्याप्रमाणे ते सुवर्णसिंहासनावर शोभून दिसत होते. श्रद्धा व संयम यांनी युक्त असणार्‍या पृथूने प्रेमपूर्वक त्यांना म्हटले. (१-६)

पृथू म्हणाले - मंगलमूर्ती मुनीश्वरांनो, आपले दर्शन योग्यांनाही दुर्लभ आहे. असे असून आपण स्वतः आपले दर्शन मला द्यावे, असे कोणते पुण्य माझ्या हातून घडले आहे ? ज्याच्यावर ब्राह्मण किंवा गणांसहित श्रीशंकर किंवा श्रीविष्णू प्रसन्न होतील, त्याला इहलोकात किंवा परलोकात कोणती वस्तू दुर्लभ आहे ? जरी समस्त लोकांमध्ये आपला संचार असला तरी पण अनधिकारी लोक आपल्याला पाहू शकत नाहीत. जसे या दृश्य प्रपंचाचे कारण महत्तत्त्व इत्यादी सर्वत्र असूनही ते सर्वसाक्षी आत्म्याला पाहू शकत नाहीत. ज्यांच्या घरामध्ये आपल्यासारखे पूज्य पुरुष, ज्यांचे पाणी, धान्य, जमीन, स्वतः गृहस्वामी किंवा सेवक इत्यादींचा मनापासून स्वीकार करतात, ते गृहस्थ धनहीन असूनही भाग्यवान होत. ज्यांच्या घरामध्ये कधी भगवद्‌भक्तांच्या चरणोदकाचे थेंब पडले नाहीत, ते सर्व प्रकारच्या ऋद्धि-सिद्धींनी परिपूर्ण असले, तरी ज्याच्यावर साप वास्तव्य करतात, अशा वृक्षांप्रमाणेच होत. मुनीश्वरांनो, आपले स्वागत असो. आपण बाल्यावस्थेपासूनच मुमुक्षूंच्या मार्गाने जात एकाग्र चित्ताने ब्रह्मचर्यादी महान व्रतांचे मोठया श्रद्धेने आचरण करीत आहात. हे स्वामींनो, आम्ही आमच्या कर्मांनुसार विपत्तींचे क्षेत्र अशा या संसारात पडलो असून फक्त इंद्रियभोगांनाच पुरुषार्थ मानीत आहोत. यांतून आमच्या सुटकेचा काही उपाय आहे काय ? आपल्याला खुशालीविषयी प्रश्न करणे योग्य नाही. कारण आपण नेहमीच आत्म्यामध्ये रममाण असता. बरे-वाईट या बुद्धीच्या वृत्ती आपल्यामध्ये कधीच असत नाहीत. दुःखी जीवांचे हित करणार्‍या आपल्यावर विश्वास ठेवून मी आपल्याला हे विचारू इच्छितो की, या संसारात मनुष्याचे कोणत्या उपायाने सुलभतेने कल्याण होऊ शकेल ? जे अजन्मा भगवान नारायण आत्मवान पुरुषांमध्ये आत्मरूपाने प्रकाशित होतात आणि उपासकांच्या हृदयात आपले स्वरूप प्रगट करणारे आहेत, ते आपल्या भक्तांवर कृपा करण्यासाठी आपल्यासारख्या सिद्ध पुरुषांच्या रूपाने या पृथ्वीवर भ्रमण करतात, हे निश्चित. (७-१६)

मैत्रेय म्हणतात - पृथूंचे हे सयुक्तिक, गंभीर, मोजके, आणि मधुर भाषण ऐकून श्रीसनत्कुमार प्रेमाने मंद हास्य करीत म्हणाले. (१७)

श्रीसनत्कुमार म्हणाले - महाराज, आपणांस सर्व माहीत असूनही सर्व प्राण्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आपण विचारलीत. साधुपुरुषांची बुद्धी अशीच असते, हेच खरे आहे. सत्पुरुषांची संगत श्रोता आणि वक्ता अशा दोघांनाही प्रिय असते. कारण त्यांच्यात होणारी प्रश्नोत्तरे सर्वांचे कल्याण करतात. राजन, भगवंतांच्या चरणकमलांच्या गुणानुवादात तुमचे अविचल प्रेम आहे, हे निश्चित. सर्वांना हे प्राप्त होणे कठीण आहे. पण हे प्राप्त झाल्यावर ते हृदयातील वासनारूप मल सर्वथा नष्ट करते. त्यामध्ये, आत्म्यापासून भिन्न असलेल्या देहादिकांबद्दल वैराग्य निर्माण होणे, आणि आत्मस्वरूप निर्गुण ब्रह्मामध्ये दृढ प्रेम असणे हेच कल्याणाचे साधन पूर्ण विचार करणार्‍या शास्त्रांत निश्चित केले गेले आहे. गुरू आणि शास्त्र-वचनांवर विश्वास ठेवल्याने, भागवत धर्मांचे आचरण करण्याने, तत्त्वजिज्ञासेने, ज्ञानयोगाच्या निष्ठेने, योगेश्वर श्रीहरींच्या उपासनेने, नेहमी पुण्यकीर्ती भगवंतांच्या पवित्र कथा ऐकण्याने, जे लोक धन आणि इंद्रियांच्या भोगातच रममाण झाले आहेत, त्यांच्या गोष्टींमध्ये प्रेम न ठेवण्याने, त्यांना प्रिय असणार्‍या पदार्थांचा संग्रह न करण्य़ाने, भगवद्‌गुणामृताचे पान करण्याखेरीज इतर वेळी आत्म्यामध्येच संतुष्ट राहून एकांतात राहाण्याविषयी प्रेम ठेवण्याने, कोणत्याही जीवाला कष्ट न देण्याने, निवृत्तिनिष्ठेने, आत्महिताचे अनुसंधान ठेवीत असतांना श्रीहरींच्या पवित्र चरित्ररूप श्रेष्ठ अमृताचे आस्वादन करण्याने, निष्कामभावाने यम-नियमांचे पालन करण्याने, कधीही कोणाचीही निंदा न करण्याने, योगक्षेमासाठी प्रयत्‍न न करण्याने, शीतोष्णादी द्वंद्वे सहन करण्याने, भक्तांच्या कानांना सुख देणार्‍या श्रीहरींच्या गुणांचे वारंवार वर्णन करण्याने आणि वाढत जाणार्‍या भक्तिभावाने, मनुष्याला कार्य-कारणरूप संपूर्ण जड प्रपंचाविषयी वैराग्य निर्माण होते; आणि आत्मस्वरूप निर्गुण परब्रह्मामध्ये अनायासे त्याला प्रीती निर्माण होते. परब्रह्मामध्ये आत्यंतिक प्रेम निर्माण झाल्यावर पुरुष सद्‌गुरूंना शरण जातो. नंतर ज्ञान आणि वैराग्याच्या प्रबळ वेगामुळे वासनाशून्य झालेल्या, अविद्या इत्यादी पाच प्रकारच्या क्लेशांनी युक्त अशा अहंकारात्मक आपल्या लिंगशरीराला तो, लाकडातून प्रगट झालेला अग्नी, नंतर त्यालाच जाळतो, तसा जाळतो. अशा रीतीने लिंगदेहाचा नाश झाल्यावर तो त्याच्या कर्तृत्वादी सर्व गुणांपासून मुक्त होतो. नंतर जसे स्वप्नात निरनिराळे पदार्थ पाहूनही त्यातून जागे झाल्यावर त्याला त्यातील एकही पदार्थ प्रत्यक्ष दिसत नाही, तसे त्याला शरीराच्या बाहेर दिसणारे आणि अंतःकरणात अनुभवाला येणारे पदार्थ दिसत नाहीत. ही स्थिती प्राप्त होण्याच्या अगोदर हे पदार्थच जीवात्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये राहून त्यांच्यामध्ये भेद दाखवीत होते. (१८-२७)

जोपर्यंत अंतःकरणरूप उपाधी असते, तोपर्यंत पुरुषाला जीवात्मा, इंद्रियांचे विषय आणि या दोघांचा संबंध प्रस्थापित करणारा अहंकार याचा अनुभव येतो, त्यानंतर नाही. बाह्य जगातही आपण असे पाहातो की, पाणी, आरसा, इत्यादी निमित्तामुळेच आपले बिंब आणि प्रतिबिंब असा भेद दिसतो, इतर वेळी नाही. विषयचिंतनात मग्न असणार्‍य़ांचे मन विषयांकडे ओढ असणार्‍या इंद्रियांकडून जेव्हा आपल्याकडे ओढून घेतले जाते, तेव्हा जसे सरोवराच्या काठावर उगवलेले गवत आपल्या मुळातून त्याचे पाणी शोषून घेते तसे ते मन बुद्धीची विचारशक्ती आटवते. विचारशक्ती नष्ट झाल्यावर स्मृती राहात नाही आणि स्मृतीचा नाश झाल्यावर ज्ञान शिल्लक राहात नाही. या ज्ञानाच्या नाशालाच पंडित लोक " आपणच आपला नाश करणे " असे म्हणतात. आत्म्यामुळेच इतर पदार्थांमध्ये प्रेम असल्याचा बोध होतो, त्या आत्म्याचा आपल्यामुळेच नाश झाल्याने स्वार्थांची जी हानी होते, तिच्या एवढी मोठी अन्य कोणतीच हानी या लोकात नाही. (२८-३२)

धन आणि इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करणे हे मनुष्याच्या सर्व प्रकारच्या पुरुषार्थाचा नाश करणारे आहे. कारण यांच्या चिंतनाने तो ज्ञान आणि विज्ञानापासून भ्रष्ट होऊन स्थावर योनींमध्ये जन्म घेतो. म्हणून ज्याला अज्ञानांधकारातून बाहेर पडावयाचे आहे, त्या पुरुषाने विषयांमध्ये कधीही आसक्ती ठेवता कामा नये. कारण ती धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांच्या प्राप्तीला अत्यंत बाधक ठरणारी आहे. या चार पुरुषार्थांमध्ये मोक्ष सर्वश्रेष्ठ समजला जातो, कारण अन्य तीन पुरुषार्थांना काळाचे भय नेहमी लागलेले असते. प्रकृतीमध्ये गुणक्षोभ झाल्यानंतर जितके काही उत्तम आणि अधम पदार्थ प्रगट झाले आहेत, त्यांपैकी टिकून राहील असा एकही नाही. कारण काल या सर्वांचे अस्तित्व नाहीसे करतो. (३३-३६)

म्हणून राजा ! जो भगवान, देह, इंद्रिय, प्राण, बुद्धी आणि अहंकाराने वेढलेल्या सर्व स्थावर-जंगम प्राण्यांच्या हृदयांमध्ये जीवांचा नियामक, अंतर्यामी आणि आत्मरूपाने सर्वत्र प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रकाशित होत आहे, त्यालाच तू " तो मीच आहे " असे जाणून घे. ज्याप्रमाणे माळ आहे असे ज्ञान झाल्यावर त्यात सर्पबुद्धी राहात नाही, त्याचप्रमाणे विवेक आल्यावर ज्याचा कुठेही पत्ता लागत नाही, असा हा मायामय प्रपंच ज्यामध्ये कार्य-कारणरूपाने प्रतीत होतो आणि जो स्वतः कर्मफल-कलुषित प्रकृतीच्या पलीकडे आहे, त्या नित्यमुक्त निर्मल आणि ज्ञानस्वरूप परमात्म्याला मी प्राप्त होत आहे. संत ज्यांच्या चरणकमलांच्या बोटाच्या किंचितशा छटेचे स्मरण करून कर्मामुळे तयार झालेल्या अहंकाररूप हृदयग्रंथीला छिन्न-विच्छिन्न करून टाकतात, तसे सर्व इंद्रियांचा प्रत्याहार करून आपले अंतःकरण निर्विषय करणारे संन्यासीसुद्धा करू शकत नाहीत. अशा त्या सर्वांचा आश्रय असणार्‍या वासुदेवाचे तू भजन कर. जे लोक मन आणि इंद्रियरूप मगरींनी भरलेला हा संसारसागर योग इत्यादी अवघड साधनांनी पार करू इच्छितात, त्यांना तसे करणे कठीण आहे. कारण त्यांना नावाडी म्हणून श्रीहरींचा आश्रय नाही. म्हणून तू भगवंतांच्या आराधनीय चरणकमलांची नाव बनवून सहजपणे हा अवघड सागर पार कर. (३७-४०)

मैत्रेय म्हणतात - ब्रह्मदेवाचे पुत्र असणार्‍या आत्मज्ञानी सनत्कुमारांकडून अशा प्रकारे आत्मतत्त्वाचा उपदेश मिळवून महाराज पृथू त्यांची अतिशय प्रशंसा करीत म्हणाले. (४१)

पृथू म्हणाले - भगवन, दीनदयाळ श्रीहरींनी माझ्यावर अगोदरच कृपा केली होती. तिचे फळ देण्यासाठी आज आपले आगमन झाले आहे. दयाळू असे आपण ज्यासाठी आला होतात, ते चांगल्या त‍र्‍हेने पार पाडले आहे. आता त्या बदल्यात आपणास मी काय देऊ ? माझ्याजवळ तर शरीर आणि त्याबरोबर जे काही आहे, तो सर्व महापुरुषांचाच प्रसाद आहे. ब्रह्मन ! प्राण, स्त्री, पुत्र, सर्व प्रकारच्या सामग्रींनी भरलेले हे राजभवन, राज्य, सेना, पृथ्वी आणि खजिना हे सर्व मी आपल्याच चरणांवर समर्पित केलेले आहे. वास्तविक सेनापतित्व, राज्य, दंडविधान आणि लोकांवर शासन करण्याचा अधिकार, वेद-शास्त्र जाणणार्‍या ब्राह्मणांचाच आहे. ब्राह्मण आपलेच अन्न खातात, आपलेच वस्त्र नेसतात आणि आपलीच वस्तू दान म्हणून देतात. दुसरे क्षत्रिय इत्यादी वर्ण त्यांच्याच कृपेने अन्न वगैरे मिळवितात. आपण वेदांचे जाणकार आहात. आपण अध्यात्मतत्त्वाचा विचार करून आम्हांला निश्चितरूपाने समजावून दिले आहे की, भगवंतांची कोणत्या प्रकारची भक्ती त्यांना प्राप्त करण्याचे मुख्य साधन आहे. आपण अत्यंत कृपाळू आहात. म्हणून आपल्या या दीनोद्धाररूप कर्मानेच आपण सर्वदा संतुष्ट असावे. आपल्या या उपकाराची परतफेड कोण कशी करू शकेल ? त्यासाठी प्रयत्‍न करणे म्हणजे सुद्धा स्वतःचे हसे करून घेणे होय. (४२-४७)

मैत्रेय म्हणतात - नंतर आदिराज पृथूंनी आत्मज्ञान्यांच्यामध्ये श्रेष्ठ सनकादिकांची पूजा केली. नंतर त्यांच्या शीलाची प्रशंसा करीत ते सर्व लोकांच्या देखत आकाशमार्गाने निघून गेले. महात्म्यांमध्ये अग्रगण्य महाराज पृथू, त्यांच्यापासून आत्मबोध प्राप्त करून घेऊन चित्ताच्या एकाग्रतेने आत्म्यामध्येच स्थित राहून स्वतः कृतकृत्य झाल्याचा अनुभव घेऊ लागले. ते ब्रह्मार्पणबुद्धीने वेळ, स्थान, शक्ती, न्याय आणि धन यांनुसार सर्व कर्मे करीत असत. अशा रीतीने एकाग्र चित्ताने सर्व कर्मांचे फळ परमात्म्याला अर्पण करून आत्म्याला कर्मांचा साक्षी आणि प्रकृतीहून वेगळा मानून ते सर्वथा अलिप्त राहिले. ज्याप्रमाणे सूर्य सर्वत्र प्रकाश देऊनही वस्तूंच्या गुणदोषांपासून अलिप्त राहातो, त्याचप्रमाणे सार्वभौ‌म साम्राज्यलक्ष्मीने संपन्न आणि गृहस्थाश्रमात राहूनही ते अहंकारशून्य असल्यामुळे इंद्रियांच्या विषयात आसक्त झाले नाहीत. (४८-५२)

अशा प्रकारे आत्मनिष्ठ राहून सर्व कर्मे योग्य रीतीने पार पाडीत असता त्यांना पत्‍नी ‘अर्ची ’ पासून अनुरूप असे पाच पुत्र झाले. त्यांची नावे विजिताश्व, धूम्रकेश, हर्यक्ष, द्रविण आणि वृक अशी होती. महाराज पृथू भगवंतांचे अंश होते. ते एकटेच सर्व लोकपालांचे गुण धारण करीत असत. आपले औदार्य, प्रिय व हितकर वचन, मनोहर मूर्ती आणि सौ‌म्य गुणांच्या द्वारा प्रजेचे मनोरंजन करीत राहिल्याने दुसरा चंद्रच जणू, असे समजून त्यांचे ‘राजा ’ हे नाव सार्थ झाले. सूर्य ज्याप्रमाणे उन्हाळ्यात पृथ्वीवरील पाणी खेचून पावसाळ्यात पुन्हा त्याचा पृथ्वीवर वर्षाव करतो, तसेच आपल्या किरणांनी सर्वांना उष्णता देतो, त्याचप्रमाणे ते कररूपाने प्रजेचे धन घेऊन तेच प्रजेच्या हितासाठी खर्च करीत. ते तेजाच्या बाबतीत अग्नीसारखे असह्य, इंद्राप्रमाणे अजिंक्य, पृथ्वीप्रमाणे क्षमाशील, आणि स्वर्गाप्रमाणे मनुष्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे होते. प्रजाजनांना तृप्त करण्यासाठी ते मेघाप्रमाणे त्यांना इच्छित धन देत. ते समुद्राप्रमाणे गंभीर आणि पर्वतराज सुमेरूप्रमाणे धैर्यवानसुद्धा होते. (५३-५८)

दुष्टांचे दमन करण्यामध्ये ते यमराजाप्रमाणे, आश्चर्यपूर्ण वस्तूंचा संग्रह करण्यामध्ये हिमालयाप्रमाणे, खजिन्याच्या समृद्धीसाठी कुबेराप्रमाणे आणि धन सुरक्षित ठेवण्यामध्ये वरुणाप्रमाणे होते. शारीरिक बल, इंद्रियांची क्षमता आणि पराक्रम याबाबतीत सर्वांच्या अंतर्यामी वायूप्रमाणे तसेच असह्य तेजाच्या बाबतीत भगवान शंकरांच्या समान होते. सौंदर्याच्या बाबतीत कामदेवाप्रमाणे, उत्साहामध्ये सिंहाप्रमाणे, वात्सल्यामध्ये मनूप्रमाणे आणि मनुष्यांचे आधिपत्य करण्यामध्ये सर्वसमर्थ अशा ब्रह्मदेवाप्रमाणे होते. ब्रह्मविचारांच्या बाबतीत बृहस्पती, इंद्रियजय साधण्यात साक्षात श्रीहरी होते. गाय, गुरुजन, ब्राह्मण, आणि भगवद्‌भक्तांची भक्ती, संकोच, विनय, शील आणि परोपकार या गुणांमध्ये मात्र स्वतःसारखेच अजोड होते. लोक त्रैलोक्यात सगळीकडे उच्च स्वराने त्यांच्या कीर्तीचे गुणगान करीत असत. याकारणाने स्त्रियांच्या कानामध्ये ते अशा प्रकारे पोहोचले होते की, जसे सत्पुरुषांच्या हृदयात श्रीराम प्रविष्ट होतात. (५९-६३)

स्कंध चवथा - अध्याय बाविसावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP