श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय २१ वा

महाराज पृथूंचा आपल्या प्रजेला उपदेश -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

मैत्रेय म्हणतात - त्यावेळी महाराज पृथूंचे नगर सगळीकडे मोत्यांचे हार, फुलांच्या माळा, रंगी-बेरंगी वस्त्रे, सोन्याचे दरवाजे आणि अत्यंत सुगंधित धूपांनी सुगंधित झाले होते. त्यातील गल्ल्या, चौक, आणि सडका, चंदन आणि केशरयुक्त सुगंधित पाण्याने सिंचन केलेल्या होत्या. तसेच त्या फुले, अक्षता, फळे, यवांकुर, साळीच्या लाह्या आणि दिवे अशा मांगलिक वस्तूंनी सजविल्या होत्या. तेथे चौका-चौकांत लावलेले फळे-फुले यांच्या गुच्छांनी युक्त केळीचे खांब आणि सुपारीच्या झाडांनी ते नगर फारच मनोहर दिसत होते. तसेच सगळीकडे आंब्याच्या तोरणांनी ते विभूषित केले होते. जेव्हा महाराजांनी नगरात प्रवेश केला, तेव्हा दिवे, भेटवस्तू आणि अनेक प्रकारची मांगलिक सामग्री घेऊन आलेले प्रजाजन तसेच कुंडलांनी सुशोभित सुंदर कन्या त्यांना सामोर्‍या आल्या. शंख, दुंदुभी इत्यादी वाद्ये वाजू लागली. ऋत्विज वेदघोष करू लागले, बंदीजनांनी स्तुती आरंभिली. हे सर्व पाहून आणि ऐकूनसुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचा अहंकार निर्माण झाला नाही. अशा प्रकारे वीरवर पृथूंनी राजमहालात प्रवेश केला. वाटेमध्ये सगळीकडे नगरवासी आणि देशवासीयांनी त्यांचे अभिनंदन केले. परम यशस्वी महाराजांनीसुद्धा त्यांना प्रसन्नतापूर्वक इच्छित वर देऊन संतुष्ट केले. महाराज पृथू महापुरुषांना आणि सर्वांना पूजनीय होते. त्यांनी अशा प्रकारची अनेक औदार्याची कर्मे करीत पृथ्वीचे राज्य केले आणि शेवटी आपल्या विपुल यशाचा विस्तार करून भगवंतांचे परमपदही प्राप्त करून घेतले. (१-७)

सूत म्हणतात - शौनका ! अशा प्रकारे मैत्रेयांच्या तोंडून पृथूचे अनेक प्रकारच्या गुणांनी संपन्न आणि गुणवानांनी प्रशंसा केलेले विस्तृत सुयश ऐकून परम भागवत विदुराने त्यांची प्रशंसा करीत म्हटले. (८)

विदुर म्हणाला - ब्रह्मन, ब्राह्मणांनी पृथूला राज्याभिषेक केला. समस्त देवांनी भेटवस्तू दिल्या. त्यांनी आपल्या बाहूंमध्ये वैष्णव तेज धारण करून त्या बाहूंनी पृथ्वीचे दोहन केले. त्यांच्या त्या पराक्रमामुळे मिळालेल्या विषयभोगांद्वारेच आजही सर्व राजे तसेच लोकपालांसह समस्त लोक स्वतःच्या इच्छेनुसार जीवननिर्वाह करीत आहेत. असा कोण शहाणा असेल की, जो त्यांची पवित्र कीर्ती ऐकू इच्छित नाही ? म्हणून आता आपण मला त्यांचे आणखी पवित्र चरित्र ऐकवावे. (९-१०)

मैत्रेय म्हणाले - महाराज पृथू गंगा आणि यमुनेच्या मध्यवर्ती देशात निवास करून आपल्या पुण्यकर्मांचा क्षय करण्यासाठी प्रारब्धानुसार प्राप्त झालेले भोगच भोगीत होते. ब्राह्मणवंश आणि भगवंतांशी संबंधित विष्णुभक्तांना सोडून त्यांचे सात द्वीपांमधील सर्व पुरुषांवर अखंड आणि अबाधित शासन होते. एकदा त्यांनी एका महायज्ञाची दीक्षा घेतली. त्यावेळी तेथे देव, ब्रह्मर्षी आणि राजर्षींचा फार मोठा समाज एकत्र आला होता. त्या समाजात महाराज पृथूंनी त्या पूजनीय अतिथींचा यथायोग्य सत्कार केला आणि नंतर त्या सभेत नक्षत्रमंडलात चंद्र असावा, त्याप्रमाणे ते उभे राहिले. त्यांची शरीरयष्टी उंच, बाहू पुष्ट आणि लांब, रंग गोरा, नेत्र कमलाप्रमाणे अरुणवर्णाचे, नाक तरतरीत, मुख मनोहर, स्वरूप सौ‌म्य, खांदे उंच आणि हास्ययुक्त सुंदर दंतपंक्ती शोभत होत्या. त्यांची छाती रुंद, कमरेचा पाठीमागील भाग पुष्ट आणि पोट पिंपळाच्या पानाप्रमाणे सुडौल असून वळ्यांमुळे आणखीच सुंदर दिसत होते. नाभी भोवर्‍याप्रमाणे गंभीर होती, शरीर तेजस्वी होते. जांघा सोन्याप्रमाणे दैदीप्यमान होत्या. तसेच पायांची ठेवण उभार होती. त्यांचे मस्तकावरील केस बारीक, कुरळे, काळे आणि सुंदर होते. मान शंखाप्रमाणे चढ-उतार असणारी आणि वळ्यांनी युक्त होती. त्यांनी बहुमूल्य रेशमी वस्त्रे आणि शेला परिधान केला होता. दीक्षेच्या नियमानुसार त्यांनी सर्व अलंकार काढून ठेवले होते. त्यामुळे त्यांच्या शरीराच्या अंग-प्रत्यंगांची शोभा आपल्या स्वाभाविक रूपात स्पष्ट झळकत होती. त्यांनी शरीरावर काळविटाचे कातडे आणि हातामध्ये दर्भ धरले होते. त्यामुळे त्यांच्या शरीराची कांती अधिकच वृद्धिंगत झाली होती. त्यांनी आपली सर्व नित्यकर्मे यथासांग पूर्ण केली. राजा पृथूने सर्व सभेला जणू काही हर्ष-वर्षावाने ओलेचिंब करीत आपल्या शीतल आणि स्नेहपूर्ण नेत्रांनी चारी बाजूंना बघितले आणि नंतर आपले भाषण सुरू केले. त्यांचे भाषण अत्यंत सुंदर, आकर्षक शब्दांनी युक्त, स्पष्ट, मधुर, गंभीर आणि निःसंदिग्ध असे होते. जणू काही सर्वांना उपकृत करण्यासाठी ते आपले अनुभव कथन करीत होते. (११-२०)

पृथू म्हणाले - सज्जनहो, आपले कल्याण असो. आपण सर्व उपस्थित महानुभाव लोकहो, माझी प्रार्थना ऐका. जिज्ञासू पुरुषांनी संतसमाजामध्ये आपले मनोगत प्रगट करावे. या लोकी प्रजाजनांचे शासन, त्यांचे रक्षण, त्यांच्या उपजीविकेची सोय, तसेच त्यांना वेगवेगळेपणाने आपापल्या मर्यादेत ठेवण्यासाठी माझी राजा म्हणून नियुक्ती केलेली आहे. वेदज्ञ मुनींच्या मतानुसार, संपूर्ण कर्मांचे साक्षी श्रीहरी प्रसन्न झाल्यावर ज्या लोकाची प्राप्ती होते, तो मला मिळावा. या माझ्या मनोरथपूर्तीसाठी मी त्यांचे यथावत पालन करीन. जो राजा प्रजेला धर्ममार्गाचे शिक्षण न देता केवळ त्यांच्याकडून कर वसूल करण्यातच धन्यता मानतो, तो आपल्या प्रजेच्या पापाचाच भागीदार होतो आणि आपले ऐश्वर्य घालवून बसतो. म्हणून हे प्रिय प्रजाजनहो, आपल्या या राजाचे परलोकात हित करण्यासाठी आपण एकमेकांविषयींची दोष पाहाण्याची दृष्टी सोडून, हृदयात भगवंतांचे स्मरण करीत आपापल्या कर्तव्याचे पालन करीत राहा. कारण त्यातच तुमचा स्वार्थ आहे आणि याप्रकारे माझ्यावरही तुमचा अनुग्रह होईल. विशुद्धचित्त देव, पितर आणि महर्षिगण हो ! आपणही माझ्या या प्रार्थनेला दुजोरा द्या. कारण कोणतेही कर्म असो, मृत्यूनंतर त्याचा कर्ता, उपदेश करणारा आणि समर्थन करणारा, या सर्वांना त्याचे समान फळ मिळते. माननीय सज्जनहो, काही श्रेष्ठ महानुभावांच्या मतानुसार कर्माचे फळ देणारे भगवान यज्ञपतीच आहेत; कारण इहलोक आणि परलोक या दोन्ही ठिकाणी कर्मफलस्वरूप काही काही भोगभूमी आणि शरीरे फार तेजस्वी दिसतात. मनू, उत्तानपाद, महीपती ध्रुव, राजर्षी प्रियव्रत, आमचे आजोबा अंग तसेच ब्रह्मदेव, शिव, प्रह्लाद, बली आणि या कोटीतील अन्यान्य महानुभावांच्या मते धर्म-अर्थ-काम-मोक्षरूप चतुर्वर्ग, स्वर्ग व मोक्ष यांची एकरूपता होण्यासाठी कर्मफलदाते म्हणून भगवान गदाधरांचीच आवश्यकता आहे. याविषयी केवळ मृत्यूचा नातू वेन इत्यादी काही शोचनीय अशा धर्मविन्मुख लोकांचीच मतभिन्नता आहे. म्हणून त्यांच्या मताचा विचार करणे योग्य नाही. (२१-३०)

ज्यांच्या चरणकमलांच्या सेवेसाठी निरंतर वाढणारी अभिलाषा, त्यांच्याच चरणनखातून निघालेल्या गंगेसमान संसारतापाने संतप्त झालेल्या जीवांचा सर्वजन्माचा संचित मनोमल तत्काळ नष्ट करते, ज्यांच्या चरणांचा आश्रय घेणारा पुरुष सर्व प्रकारचे मानसिक दोष धुऊन टाकतो, तसेच वैराग्य आणि तत्त्वसाक्षात्काररूप सामर्थ्य मिळवून पुन्हा या दुःखमय संसारात पडत नाही, शिवाय ज्यांचे चरणकमल सर्व प्रकारच्या कामना पूर्ण करणारे आहेत, त्या प्रभूंचे आपण आपापल्या चरितार्थाला उपयुक्त अशी वर्णाश्रमोचित अध्यापनादी कर्मे, तसेच ध्यान, स्तुती, पूजा इत्यादी मानसिक, वाचिक व शारीरिक क्रियांच्याद्वारे पूजन करा. हृदयात कोणत्याही प्रकारची वासना ठेवू नका. तसेच हे निश्चित समजा की, आम्हांला आमच्या अधिकारानुसार याचे फळ निश्चित प्राप्त होईल. (३१-३३)

भगवान स्वरूपतः विशुद्ध, विज्ञानघन आणि सर्व विशेषणरहित आहेत. परंतु या कर्ममार्गामध्ये तेच जव, तांदूळ इत्यादी द्रव्ये, शुक्लादी गुण, कुटणे इत्यादी क्रिया आणि मंत्र व त्यांचे अर्थ, संकल्प, पदार्थ, शक्ती, तसेच ज्योतिष्टोम आदी नामांनी संपन्न होणार्‍या, अनेक विशेषणयुक्त यज्ञाच्या रुपांत प्रकाशित होतात. ज्याप्रमाणे एकच अग्नी निरनिराळ्या लाकडांमध्ये त्यांच्या आकारानुसार भासतो, त्याचप्रमाणे ते सर्वव्यापक प्रभू परमानंद-स्वरूप असूनही प्रकृती, काल, वासना आणि अदृष्ट यांपासून उत्पन्न झालेल्या शरीरातील विषयाकार झालेल्या बुद्धीमध्ये स्थिर होऊन, त्या यज्ञ-यागादी क्रियांच्या फळरूपाने अनेक प्रकारचे आहेत, असे वाटते. अहो, या पृथ्वीतलावरील माझे जे प्रजाजन, यज्ञभोक्त्यांचे अधीश्वर, सर्वगुरू श्रीहरींचे एकनिष्ठ भावाने आपापल्या धर्मांनुसार निरंतर पूजन करतात, ते माझ्यावर मोठीच कृपा करतात. सहनशीलता, तपस्या आणि ज्ञान या विशिष्ट गुणांमुळे विष्णुभक्त आणि ब्राह्मणांचे वंश स्वभावतःच उज्ज्वल असतात. त्यांच्यावर राजकुलाने स्वतःचे तेज, धन, ऐश्वर्य इत्यादी समृद्धीमुळे असलेला आपला अधिकार गाजवू नये. ब्रह्मदेव इत्यादी सर्व देवांमध्ये अग्रगण्य, ब्राह्मणभक्त, पुराणपुरुष श्रीहरींनी सुद्धा नेहमी यांच्या चरणांना वंदन करून अविचल लक्ष्मी आणि जगाला पवित्र करणारी कीर्ती प्राप्त केली आहे. सर्वांतर्यामी, स्वयंप्रकाश, ब्राह्मणप्रिय श्रीहरी ब्राह्मणांची सेवा करण्यानेच परम संतुष्ट होतात. म्हणून आपण सर्वांनी सर्व प्रकारे नम्रतापूर्वक त्यांच्या या धर्माचे निष्ठेने पालन करण्यासाठी ब्राह्मणकुलाची सेवा केली पाहिजे. यांची नित्य सेवा केल्याने लवकरच चित्त शुद्ध झाल्याकारणाने मनुष्य परम शांतिरूप मोक्ष प्राप्त करून घेतो. म्हणून या जगात जो हविर्द्रव्य घेणार्‍या देवतांचे मुख होऊ शकेल, असा या ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ कोण आहे ? उपनिषदांची वचने एकमेव ज्यांना लागू होतात, ते भगवान अनंत, यज्ञीय देवतांच्या नावाने तत्त्वज्ञानी पुरुषांनी ब्राह्मणांच्या मुखामध्ये श्रद्धापूर्वक हवन केलेले पदार्थ जसे आवडीने ग्रहण करतात, तसे चेतनाशून्य अग्नीत अर्पण केलेल्या पदार्थांना ग्रहण करीत नाहीत. सभ्यगण हो, जसे स्वच्छ आरशामध्ये प्रतिबिंब स्पष्ट दिसते, त्याप्रमाणे ज्याच्यामुळे या संपूर्ण प्रपंचाचे यथायोग्य ज्ञान होते, त्या नित्य, शुद्ध आणि सनातन वेदांना जे परमार्थतत्त्वाच्या ग्रहणासाठी श्रद्धा, तप, मंगलमय आचरण स्वाध्यायविरोधी असलेल्या बोलण्याचा त्याग तसेच संयम आणि समाधीचा अभ्यास यांद्वारा धारण करतात, त्या ब्राह्मणांच्या चरणकमलांची धूळ मी आयुष्यभर आपल्या मुकुटावर धारण करीन. कारण ती नेहमी डोक्यावर ठेवल्याने मनुष्याचे सर्व पाप तत्काळ नष्ट होते आणि सर्व गुण त्याची सेवा करू लागतात. त्या गुणवान, शीलसंपन्न, कृतज्ञ आणि गुरुजनांची सेवा करणार्‍या पुरुषाजवळ सर्व प्रकारची संपत्ती आपणहून जाते. म्हणून माझी तर अशीच इच्छा आहे की, ब्राह्मणकुल, गोवंश आणि भक्तांसह श्रीभगवान माझ्यावर सदैव प्रसन्न असोत. (३४-४४)

मैत्रेय म्हणतात - महाराज पृथूंचे हे भाषण ऐकून देवता, पितर आणि ब्राह्मण आदी सर्व साधुजन अतिशय प्रसन्न झाले आणि ‘वाहवा, वाहवा ’ म्हणून त्यांची प्रशंसा करू लागले. ते म्हणाले, "पिता आपल्या पुत्राच्या द्वारे पुण्यलोकाची प्राप्ती करून घेतो" हे श्रुतिवचन यथार्थ आहे. पापी वेन ब्राह्मणांच्या शापाने मारला गेला होता. असे असूनही याच्या पुण्यबलाने त्याचा नरकवास टळला. असाच हिरण्याकशिपूसुद्धा भगवंतांची निंदा केल्यामुळे नरकात पडणार होता, परंतु आपला पुत्र प्रह्लाद याच्या पुण्याईमुळे तो वाचला. वीरवर पृथूमहाराज, आपण तर पृथ्वीचे पिताच आहात आणि सर्व लोकांच्या एकमात्र स्वामी श्रीहरींचे ठिकाणी आपली तशीच अविचल भक्ती आहे. म्हणून आपण अनंत वर्षेपर्यंत जीवित असावे. आपले सुयश मोठे पवित्र आहे. आपण उदारकीर्ती ब्राह्मणांना देव मानणार्‍या श्रीहरींच्या कथांचा प्रचार करीत आहात. आज आपल्यामुळेच आम्ही स्वतःला भगवंतांच्याच राज्यात आहोत, असे समजतो. स्वामिन, आपल्या प्रजेवर प्रेम करणे हा दयाळू महापुरुषांचा स्वभावच असतो. म्हणून आपण आपल्या आश्रितांना असा उपदेश करणे यात काही मोठे आश्चर्य नाही. आम्ही प्रारब्धाच्या योगे विवेकहीन होऊन संसाराच्या अरण्यात भटकत होतो. परंतु प्रभो, आज आपण आम्हांला या अज्ञानांधकाराच्या पलीकडे घेऊन गेलात. आपण शुद्ध सत्त्वमय परमपुरुष आहात. आपण ब्राह्मण व क्षत्रिय या दोन्ही वर्णांत प्रविष्ट होऊन सर्व जगाचे रक्षण करीत आहात. अशा आपणांस आमचा नमस्कार असो. (४५-५२)

स्कंध चवथा - अध्याय एकविसावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP