|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ४ था - अध्याय १८ वा
पृथ्वीचे दोहन - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] मैत्रेय म्हणतात - विदुरा ! यावेळी महाराज पृथूंचे ओठ रागाने थरथर कापत होते. त्यांची अशी स्तुती करून पृथ्वीने आपले हृदय विचारपूर्वक स्थिर केले आणि ती भीत भीत त्यांना म्हणाली. प्रभो, आपण आपला राग शांत करावा आणि मी जी प्रार्थना करीत आहे, ती लक्षपूर्वक ऐकावी. कारण बुद्धिमान पुरुष भ्रमराप्रमाणे सर्व ठिकाणांहून सार ग्रहण करतात. तत्त्वज्ञानी मुनींनी या लोकात आणि परलोकात मनुष्यांचे कल्याण करण्यासाठी पुष्कळ उपाय शोधून काढले आणि ते उपयोगात आणले आहेत. त्या प्राचीन ऋषींनी सांगितलेले उपाय याही काळात जो पुरुष श्रद्धापूर्वक चांगल्या तर्हेने आचरणात आणतो, तो सुलभपणे इच्छित फळ प्राप्त करून घेतो. परंतु जो अज्ञानी पुरुष त्यांचा अनादर करून आपल्या मनाने कल्पिलेल्या उपायांचा अवलंब करतो, त्याचे केलेले सर्व उपाय वारंवार निष्फळ होतात. राजन, पूर्वी ब्रह्मदेवांनी जे धान्य इत्यादी उत्पन्न केले होते, ते यम-नियमादी व्रतांचे पालन न करणारे दुराचारी लोकच खाऊन टाकतात, असे मी पाहिले आहे. लोकरक्षक अशा आपण राजेलोकांनी माझे पालन आणि आदर करणे सोडून दिले; म्हणूनच सर्व लोक चोरांप्रमाणे झाले आहेत. त्यामुळेच यज्ञासाठी लागणार्या औषधी मी लपवून ठेवल्या आहेत. आता पुष्कळ कालावधी झाल्याने माझ्या पोटात ती धान्ये निश्चितच जीर्ण झाली आहेत. पूर्वीच्या आचार्यांनी सांगितलेल्या उपायांनी आपण ती बाहेर काढावीत. हे वीर, जर आपल्याला सर्व प्राण्यांचे कल्याण आणि बलाची वृद्धी करणारे अन्न हवे असेल, तर आपण मला योग्य असे वासरू, दोहनपात्र आणि दोहन करणार्याची व्यवस्था करा. मी त्या वासराला स्नेहाने पान्हा पाजून दुधाच्या रूपाने आपणा सर्वांना इच्छित वस्तू देईन. राजन, तुम्ही मला सपाट केले पाहिजे. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतरसुद्धा माझ्यावर इंद्राने केलेल्या वर्षावाचे पाणी सगळीकडे टिकून राहील. माझ्या पोटातील आर्द्रता जाणार नाही. हे तुमच्या दृष्टीने अतिशय मंगलकारक होईल. (१-११) पृथ्वीने सांगितलेल्या या प्रिय आणि हितकारी वचनांचा स्वीकार करून महाराज पृथूने स्वायंभुव मनूला वासरू बनविले आणि आपल्या हातावरच सर्व धान्यांची धार काढली. पृथूप्रमाणेच इतर समजूतदार लोकसुद्धा सगळीकडून सार ग्रहण करतात. म्हणून त्यांनी पृथूने वश केलेल्या पृथ्वीकडून आपापल्या इच्छित वस्तू प्राप्त करून घेतल्या. हे विदुरा, ऋषींनी बृहस्पतीला वासरू बनवून वाणी, मन आणि श्रोत्ररूप पात्रात पृथ्वीच्या वेदरूप पवित्र दुधाचे दोहन केले. देवतांनी इंद्राची वासरू म्हणून कल्पना करून सुवर्णमय पात्रात अमृत, मनोबल, इंद्रियबल, आणि शारीरिक बलरूपी दुधाचे दोहन केले. दैत्य आणि दानवांनी असुरश्रेष्ठ प्रह्लादाला वासरू बनवून लोखंडी पात्रात मद्य आणि आसवरूप दुधाचे दोहन केले. गंधर्व आणि अप्सरांनी विश्वावसूला वासरू बनवून कमलरूप पात्रामध्ये संगीतमाधुर्य आणि सौंदर्यरूप दुधाचे दोहन केले. श्राद्धदेव पितृगणांनी अर्यमाला वासरू बनविले आणि मातीच्या कच्च्या मडक्यात श्रद्धापूर्वक कव्यरूप दुधाचे दोहन केले. नंतर कपिलदेवांना वासरू बनवून आकाशरूप पात्रामध्ये सिद्धांनी अणिमादी अष्टसिद्धी, तसेच विद्याधरांनी आकाशगमन आदी विद्यांचे दोहन केले. किंपुरुष इत्यादी इतर मायावी योनींनी मयदानवाला वासरू बनविले आणि अंतर्धान पावणे, विचित्र रूप धारण करणे इत्यादी संकल्परूप मायेचे दूधरूपाने दोहन केले. (१२-२०) अशाच प्रकारे यक्ष-राक्षस, भूत-पिशाचादी मांसाहार करणार्य़ांनी भूतनाथ रुद्राला वासरू बनवून कपालरूप पात्रात रक्तरूप दुधाचे दोहन केले. बिनफण्याचे साप, फण्याचे साप, नाग आणि विंचू इत्यादी विषारी प्राण्यांनी तक्षकाला वासरू बनवून मुखरूप पात्रात विषरूपी दुधाचे दोहन केले. पशूंनी बैलाला वासरू बनवून वनरूप पात्रामध्ये गवतरूप दुधाचे दोहन केले. मोठमोठया दाढा असणार्या मांसभक्षी जीवांनी सिंहरूप वासराद्वारा आपल्या शरीररूप पात्रात कच्च्या मांसरूपी दुधाचे दोहन केले. तसेच पक्ष्यांनी गरुडाला वासरू बनवून किडे-पतंग असे हालचाल करणारे आणि फळे इत्यादी स्थिर पदार्थांचे दूधरूपाने दोहन केले. वृक्षांनी वडाच्या झाडाला वासरू बनवून अनेक प्रकारच्या रसरूपी दुधाचे दोहन केले आणि पर्वतांनी हिमालयरूप वासराच्या द्वारा आपल्या शिखररूप पात्रामध्ये अनेक प्रकारच्या धातूंचे दोहन केले. पृथ्वी सर्व इच्छित वस्तू देणारी आहे आणि यावेळी ती पृथूच्या अधीन होती. म्हणून तिच्यापासून सर्वांनी आपापल्या जातीच्या प्रमुखाला वासरू बनवून निरनिराळ्या पात्रांमध्ये भिन्न भिन्न पदार्थांचे दुधाच्या रूपाने दोहन केले. (२१-२६) कुरुश्रेष्ठ विदुरा, अशा प्रकारे पृथू इत्यादी सर्व अन्न ग्रहण करणार्य़ांनी वेगवेगळी दोहनपात्रे आणि वासरांच्या द्वारे आपापले भिन्न भिन्न अन्नरूप दूध पृथ्वीपासून दोहून घेतले. यामुळे महाराज पृथू इतके प्रसन्न झाले की, सर्व इच्छित वस्तू देणार्या पृथ्वीबद्दल त्यांना आपल्या कन्येप्रमाणे स्नेह उत्पन्न झाला आणि त्यांनी तिचा आपल्या कन्येच्या रूपाने स्वीकार केला. यानंतर राजाधिराज पृथूने आपल्या धनुष्याच्या टोकाने पर्वतांना फोडून हे बहुतेक भूमंडल सपाट केले. ते पित्याप्रमाणे आपल्या प्रजेचे पालन-पोषण करण्याच्या व्यवस्थेत गुंतले होते. त्यांनी या सपाट भूमीचे प्रजेसाठी सगळीकडे यथायोग्य निवासस्थानांचे विभाग तयार केले. अनेक गावे, कसबे, नगरे, किल्ले, गौळवाडे, पशूंचे गोठे, छावण्या, खाणी, खेडी आणि पहाडाच्या पायथ्याशी गावे वसविली. पृथूंच्या अगोदर या पृथ्वीतलावर नगरे, गावे, इत्यादी विभाग नव्हते. सर्व लोक आपापल्या सोयीनुसार बेधडक इकडे तिकडे राहात होते.(२७-३२) स्कंध चवथा - अध्याय अठरावा समाप्त |