श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय १९ वा

पृथूंचे अश्वमेध यज्ञ -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

मैत्रेय म्हणतात - मनूच्या ब्रह्मावर्त क्षेत्रामध्ये, जेथे सरस्वती नदी पूर्वाभिमुखी होऊन वाहाते, तेथे राजा पृथूने शंभर अश्वमेध यज्ञांची दीक्षा घेतली. हे पाहून भगवान इंद्रांना वाटले की, या यज्ञामुळे पृथू माझ्याहून वरचढ होतील, म्हणून त्यांना त्यांचा यज्ञमहोत्सव सहन झाला नाही. महाराज पृथूंच्या यज्ञात सर्वांचे अंतरात्मा, सर्व लोकपूज्य, जगदीश्वर भगवान हरींनी यज्ञेश्वररूपाने साक्षात दर्शन दिले होते. त्यांच्याबरोबर ब्रह्मदेव, रुद्र, तसेच आपापल्या अनुयायांसह लोकपालसुद्धा आले होते. त्यावेळी गंधर्व, मुनी आणि अप्सरा प्रभूंची कीर्ती गात होते. सिद्ध, विद्याधर, दैत्य, दानव, यक्ष, सुनंद-नंद इत्यादी भगवंतांचे प्रमुख पार्षद आणि जे सदैव भगवंतांच्या सेवेसाठी उत्सुक असतात ते कपिल, नारद, दत्तात्रेय आणि सनकादिक योगेश्वरसुद्धा त्यांच्याबरोबर आले होते. हे भारता, त्या यज्ञात यज्ञसामग्री देणार्‍या भूमीने कामधेनुरूप होऊन यजमानाच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. नद्या सर्व प्रकारच्या रसांना वाहून आणीत होत्या, तसेच ज्यांपासून मध गळत होता, असे मोठमोठे वृक्ष दूध, दही, अन्न, तूप इत्यादी वेगवेगळी सामग्री समर्पण करीत होते. समुद्र पुष्कळशा रत्नांच्या राशी, पर्वत भक्ष्य-भोज्य-चोष्य आणि लेह्य या चार प्रकारचे अन्न तसेच लोकपालांसहित संपूर्ण लोक निरनिराळे नजराणे समर्पण करीत होते. (१-९)

श्रीहरींनाच आपला प्रभू मानणार्‍या पृथूंचा हा उत्कर्ष देवराज इंद्राला सहन झाला नाही. म्हणून त्याने त्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी महाराज पृथू शेवटच्या यज्ञाने भगवान यज्ञपतींची आराधना करीत होते, तेव्हा इंद्राने ईर्ष्येने पेटून गुप्तरूपाने त्यांच्या यज्ञाचा घोडा पळविला. इंद्राने अधर्मामध्ये धर्माचा भ्रम उत्पन्न करणारा पाखंडी वेष धारण केला होता. या वेषात तो घोडयाला घेऊन मोठया वेगाने आकाशमार्गाने चालला होता. (तेवढयात) त्याच्याकडे भगवान अत्रींची दृष्टी गेली. त्यांच्या सांगण्यावरून महाराज पृथूचा महारथी पुत्र, इंद्राला मारण्यासाठी त्याच्या मागोमाग धावला आणि अतिशय क्रोधाने म्हणाला-"अरे थांब. थांब." इंद्राच्या डोक्यावर जटा होत्या आणि शरीराला भस्म लावलेले होते. त्याचा असा वेष पाहून पृथूकुमार त्याला मूर्तिमंत धर्मच समजला. म्हणून त्याने त्याच्यावर बाण सोडला नाही. जेव्हा तो इंद्रावर वार न करताच परत आला, तेव्हा अत्रींनी पुन्हा इंद्राला मारण्याची त्याला आज्ञा केली-"वत्सा,! या देवाधम इंद्राने तुमच्या यज्ञामध्ये विघ्न आणले आहे. तू याला ठार कर. अत्रिमुनींनी असे सांगताच पृथूकुमाराला अतिशय क्रोध आला, इंद्र अतिशय वेगाने आकाशातून चालला होता. त्यावेळी जटायूने रावणाचा पाठलाग करावा, तसा पृथूकुमार इंद्रामागोमाग धावला. ते पाहून इंद्राने आपला वेष आणि घोडा सोडून देऊन तो तिथेच अंतर्धान पावला आणि तो वीर आपला यज्ञपशू (घोडा) घेऊन पित्याच्या यज्ञशाळेत परत आला. हे विदुरा, त्याचा हा अद्भुत पराक्रम पाहून महर्षींनी त्याचे नाव "विजिताश्व" असे ठेवले. (१०-१८)

यज्ञपशूला ‘यूप ’ आणि ‘चषाल ’ यांना बांधले होते. शक्तिशाली इंद्राने घोर अंधार पसरविला आणि त्यात लपून तो पुन्हा त्या घोडयाला त्याच्या सोन्याच्या साखळीसह घेऊन गेला. अत्रिमुनींनी पुन्हा तो आकाशात वेगाने जात असल्याचे पृथूकुमाराला दाखविले. परंतु त्याच्याजवळ कपाल आणि खट्‌वांग पाहून पृथूकुमाराने त्याला अडविले नाही. आता अत्रींनी राजकुमाराला पुन्हा प्रोत्साहित केले. तेव्हा त्याने रागाने इंद्रावर सोडण्यासाठी धनुष्याला बाण जोडला. हे पाहताच इंद्राने तो वेष आणि घोडा सोडून देऊन तो तेथेच अंतर्धान पावला. वीर विजिताश्व आपला घोडा घेऊन पित्याच्या यज्ञशाळेत परत आला. तेव्हापासून इंद्राचा तो निंद्य वेष अज्ञानी लोकांनी ग्रहण केला. घोडा पळवून नेण्याच्या इच्छेने इंद्राने जी जी रूपे धारण केली होती, ती पापाचे खंड असल्यामुळे त्याला पाखंड म्हणू लागले. येथे "खंड" शब्द चिह्नाचा निर्देश करणारा आहे. अशा प्रकारे पृथूच्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी यज्ञपशूला चोरून नेतेवेळी इंद्राने जे पुष्कळ वेळा ग्रहण करून नंतर टाकले होते, त्या नग्न राहाणे, रक्तांबर धारण करणे इत्यादी पाखंडी आचरणामध्ये (अज्ञानी) माणसांची बुद्धी बहुतेक आसक्त होते. आणि त्यांच्या चतुर युक्तिवादाने वास्तविक हे धर्माभास असूनही लोक भ्रमाने यांना धर्म समजून यांमध्ये आसक्त होतात. (१९-२५)

इंद्राच्या या वाकडया चालीचा अंदाज आल्यावर परम पराक्रमी महाराज पृथूंना फार क्रोध आला. त्यांनी आपले धनुष्य घेऊन त्यावर बाण चढविला. त्यावेळी ते क्रोधावेशात असल्याने त्यांच्याकडे पाहावत नव्हते. जेव्हा ऋत्विजांनी पाहिले की, असह्य पराक्रमी महाराज पृथू इंद्राचा वध करण्यासाठी तयार झाले आहेत, तेव्हा त्यांना थांबवीत ते म्हणाले, राजन, आपण मोठे बुद्धिमान आहात. यज्ञदीक्षा घेतल्यावर शास्त्रविहित यज्ञपशूखेरीज अन्य कोणाचा वध करणे योग्य नव्हे. या यज्ञकार्यात विघ्न आणणारा तुझा शत्रू इंद्र तर तुझ्या सुयशामुळेच निस्तेज झाला आहे. आम्ही अमोघ आवाहन-मंत्रांनी त्याला येथेच बोलावून घेतो आणि जबरदस्तीने त्याचे अग्नीत हवन करतो. (२६-२८)

विदुरा, यजमानांशी असा विचारविनिमय करून त्याच्या ऋत्विजांनी क्रोधाने इंद्राला आवाहन केले. ते स्रुवेतून त्याची आहुती टाकणार, एवढयात ब्रह्मदेवांनी तेथे येऊन त्यांना अडविले. ते म्हणाले, तुम्ही इंद्राचा वध करता कामा नये. कारण हा इंद्र भगवंतांची ‘यज्ञ ’ नावाची मूर्ती आहे. तुम्ही यज्ञ करून ज्या देवांची आराधना करीत आहात, ते इंद्राचेच अंग आहेत आणि त्यालाच तुम्ही यज्ञाने मारू इच्छिता. पृथूच्या या यज्ञानुष्ठानात विघ्न आणण्यासाठी इंद्रानेही जी पाखंडी रूपे घेतली, ती धर्माचे उच्चाटन करणारी आहेत, या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. त्याला आता आणखी विरोध करू नका. नाही तर तो अधिकच पाखंड-मार्गाचा प्रचार करील. पृथूचे नव्याण्णवच यज्ञ राहू द्यात. तेवढयानेच त्याची कीर्ती इंद्राहून अधिक होईल. नंतर राजर्षी पृथूला ते म्हणाले, ‘राजा, तू मोक्षधर्म जाणणारा आहेस. म्हणून आता तुला या यज्ञाच्या विधिपूर्वक अनुष्ठानांची आवश्यकता नाही. तुझे कल्याण असो. तू आणि इंद्र हे दोघेही पवित्रकीर्ती भगवान श्रीहरींचे शरीर आहात, म्हणून आपलेच स्वरूप असणार्‍या इंद्रावर तू रागावू नकोस. तुझा हा यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला नाही, म्हणून तू चिंता करू नकोस. माझ्या म्हणण्याचा आदरपूर्वक स्वीकार कर. असे पहा की, जो मनुष्य विधात्याने बिघडविलेले काम सुधारण्यासंबंधी विचार करतो, त्याचे मन अत्यंत क्रोधाने भरून जाते व तो भयंकर मोहरूप अंधारात पडतो. हा यज्ञ आता बंद कर. त्या यज्ञामुळेच इंद्राने निर्माण केलेल्या नास्तिक मतांनी धर्माचा नाश होऊ लागला आहे. कारण देव मोठे हट्टी असतात. जरा पहा तर ! जो इंद्र घोडा चोरून नेऊन आपल्या यज्ञामध्ये विघ्न उत्पन्न करीत होता, त्यानेच रचलेल्या या आकर्षक पाखंडांकडे सर्व जनता आकर्षित होऊ लागली आहे. हे वेनपुत्रा, आपण साक्षात विष्णूचे अंश आहात. वेनाच्या दुराचारामुळे धर्म लुप्त होऊ लागला होता.म्हणून कालानुसार धर्माचे रक्षण करण्यासाठीच आपण त्या शरीरातून अवतार घेतला आहे. म्हणून प्रजेचे पालनकर्ते पृथूमहाराज ! आपण या अवताराचा उद्देश विचारात घेऊन भृगू इत्यादी विश्वनिर्मात्या मुनीश्वरांचा संकल्प पूर्ण करावा. ही प्रचंड नास्तिक मतरूप इंद्राची माया अधर्माची जननी आहे. आपण ही नष्ट करून टाका.’ (२९-३८)

मैत्रेय म्हणतात - लोकगुरू भगवान ब्रह्मदेवांनी अशा प्रकारे समजावल्यावर पृथूंनी यज्ञाचा आग्रह सोडला आणि इंद्राबरोबर प्रेमपूर्वक मैत्रीही केली. यानंतर अवभृथ स्नान केलेल्या पृथूंना त्यांच्या यज्ञांनी तृप्त होऊन देवांनी इच्छित वर दिले. हे विदुरा, आदिराज पृथूंनी अत्यंत श्रद्धापूर्वक ब्राह्मणांना दक्षिणा दिली, तेव्हा ब्राह्मणांनी त्यांच्या सत्काराने संतुष्ट होऊन त्यांना सफल होणारे आशीर्वाद दिले. ते म्हणाले-"महाबाहो, आपण ज्यांना आमंत्रण दिले, ते पितर, देव, ऋषी आणि मनुष्य सर्वच आले होते, त्या सर्वांचा आपण दान-मान देऊन सत्कार केला." (३९-४२)

स्कंध चवथा - अध्याय एकोणिसावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP