श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय १७ वा

पृथूंचे पृथ्वीवर रागावणे आणि पृथ्वीकडून त्यांची स्तुती -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

मैत्रेय म्हणतात - अशा प्रकारे जेव्हा बंदीजनांनी महाराज पृथूच्या गुणांचे आणि कर्मांचे वर्णन करून त्यांची प्रशंसा केली, तेव्हा त्यांनीसुद्धा त्यांचा आदरसत्कार करून व त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना वस्तू देऊन संतुष्ट केले. त्यांनी ब्राह्मणादी चारी वर्ण, सेवक, मंत्री, पुरोहित, नगरवासी, देशवासी, भिन्न-भिन्न व्यावसायिक, तसेच आज्ञेचे पालन करणार्‍या इतरांचासुद्धा सत्कार केला. (१-२)

विदुराने विचारले- पृथ्वी तर अनेक रूपे धारण करू शकते (मग) तिने गायीचेच रूप का धारण केले ? आणि जेव्हा महाराज पृथूंनी तिचे दोहन केले, तेव्हा वासरू कोण बनले ? आणि दोहनाचे पात्र कोणते होते ? पृथ्वी स्वभावतःच उंचसखल होती. तिला त्यांनी सपाट कसे केले आणि इंद्राने त्यांचा यज्ञाचा घोडा का पळवून नेला ? ब्रह्मज्ञान्यांमध्ये श्रेष्ठ भगवान सनत्कुमारांकडून ज्ञान आणि विज्ञान प्राप्त करून घेऊन त्या राजर्षींना कोणती गती प्राप्त झाली ? सर्वेश्वर भगवान श्रीकृष्णांनीच पृथूरूपाने अवतार घेतला होता, म्हणून पुण्यकीर्ती श्रीहरींचे त्या पृथू अवताराशी संबंधित जे काही आणखी पवित्र चरित्र असेल, ते सर्व आपण मला सांगावे. मी आपला आणि श्रीकृष्णांचा प्रेमी भक्त आहे. (३-७)

सूत म्हणतात- जेव्हा विदुराने भगवान वासुदेवांची कथा सांगण्यासाठी अशी प्रेरणा दिली, तेव्हा मैत्रेय प्रसन्न चित्ताने त्यांची प्रशंसा करीत सांगू लागले. (८)

मैत्रेय म्हणतात- विदुरा ! ब्राह्मणांनी महाराज पृथूंना राज्याभिषेक करून त्यांना प्रजेचे रक्षक म्हणून जाहीर केले. त्या दिवसात पृथ्वी अन्नहीन झाली होती. म्हणून भुकेमुळे प्रजेची शरीरे अगदी सुकून किडकिडीत झाली होती. ती प्रजा आपले स्वामी पृथू यांच्याजवळ येऊन म्हणाली. राजन, ज्याप्रमाणे झाडाच्या ढोलीत धगधगणार्‍या आगीमुळे ते झाड जळून जाते, त्याचप्रमाणे आम्ही पोटात उसळलेल्या भुकेच्या आगीमुळे जळू लागलो आहोत. आपण शरणागतांचे रक्षण करणारे आहात आणि आपल्यालाच आमचे अन्नदाते प्रभू म्हणून नेमले आहे. म्हणून आम्ही आज आपल्याला शरण आलो आहोत. आपण सर्वांचे रक्षण करणारे आहात. आपणच आमची उपजीविका चालविणारे स्वामी आहात. म्हणून राजराजेश्वरा ! आम्हा क्षुधापीडितांना अन्न देण्याची आपण ताबडतोब व्यवस्था करावी. नाहीतर अन्न मिळण्यापूर्वीच आमचा अंत होईल. (९-११)

मैत्रेय म्हणतात- हे कुरुवर ! प्रजेचा करुण आक्रोश ऐकून महाराज पृथू पुष्कळ वेळपर्यंत विचार करीत राहिले. शेवटी त्यांना अन्नाचा अभाव होण्याचे कारण समजले. पृथ्वीने स्वतःच अन्न आणि औषधी वनस्पती आपल्यात लपवून ठेवल्या आहेत असा आपल्या बुद्धीने निश्चय करून त्यांनी आपले धनुष्य उचलले आणि त्रिपुरविनाशक भगवान शंकरांप्रमाणे अत्यंत क्रुद्ध होऊन पृथ्वीला लक्ष्य करून धनुष्याला बाण जोडला. त्यांनी हातात शस्त्र घेतलेले पाहून पृथ्वीचा थरकाप झाला आणि जसे व्याधाने पाठलाग केल्यावर हरीण धावते, त्याप्रमाणे ती घाबरून गाईचे रूप घेऊन पळू लागली. (१२-१४)

हे पाहून पृथूंचे डोळे रागाने लाल झाले. पृथ्वी जेथे जेथे गेली, तेथे तेथे धनुष्यावर बाण चढवून त्यांनी तिचा पाठलाग केला. दिशा, उपदिशा, स्वर्ग, पृथ्वी आणि अंतरिक्षामध्ये जेथे जेथे ती धावत जाऊ लागली, तेथे तेथे महाराज पृथू शस्त्र घेऊन आपल्या मागे येत आहेत, असे तिला दिसले. ज्याप्रमाणे मनुष्याला मृत्यूपासून कोणी वाचवू शकत नाही, त्याप्रमाणे तिला त्रैलोक्यात वेनपुत्र पृथूपासून वाचविणारा कोणीही भेटला नाही. तेव्हा ती अत्यंत भयभीत झाली आणि दुःखी अंतःकरणाने मागे फिरली. आणि महाभाग पृथूला म्हणू लागली, धर्म जाणणार्‍या शरणागतवत्सल राजन, आपण सर्व प्राण्यांचे रक्षण करण्यात तत्पर आहात. आपण माझेही रक्षण करावे. मी अत्यंत दीन आणि निरपराध आहे; आपण मला का मारू इच्छिता ? शिवाय, आपण धर्म जाणणारे आहात, मग माझ्यासारख्या स्त्रीचा वध आपण कसा करू शकाल ? स्त्रियांनी काही अपराध केला तरी साधारण जीवसुद्धा त्यांच्यावर हात उचलीत नाहीत. असे असता आपल्यासारख्या करुणामय आणि दीनवत्सल असे कसे करील ? मी एखाद्या बळकट नावेसारखी आहे. सर्व जग माझ्या आधारावरच स्थिर आहे. माझा विनाश करून आपण स्वतःला आणि आपल्या प्रजेला पाण्यावर कसे ठेवू शकाल ? (१५-२१)

पृथू म्हणाले- पृथ्वी ! तू माझ्या आज्ञेचे उल्लंघन करणारी आहेस. तू यज्ञामध्ये हविर्भाग तर घेतेस, परंतु त्याच्या बदल्यात आम्हांला अन्न देत नाहीस. म्हणून आज मी तुला मारणार. तू दररोज हिरवेगार गवत खातेस आणि आपल्या स्तनातून दूध मात्र देत नाहीस. असा दुष्टपणा करीत असल्यामुळे तुला दंड देणे हे अनुचित मानता येणार नाही. तू मूर्खपणाने पूर्वी ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेल्या अन्न इत्यादींच्या बीजांना आपल्यामध्ये दडवून ठेवले आहेस आणि आताही माझी पर्वा न करता ते आपल्या पोटातून बाहेर काढीत नाहीस. आता मी माझ्या बाणांनी तुला छिन्न-विच्छिन्न करून तुझ्या चरबीने, भुकेने व्याकूळ झालेल्या दुःखी प्रजाजनांचा करुण आक्रोश शांत करीन. जो दुष्ट (फक्त) आपलेच पोषण करणारा आणि इतर प्राण्यांच्या बाबतीत निर्दय असेल, मग तो पुरुष, स्त्री, किंवा नपुंसक कोणीही असो, त्याला राजाने मारणे अयोग्य नाही. तू मोठी गर्विष्ठ आणि मदोन्मत्त आहेस. यावेळी मायेनेच हे तू गायीचे रूप धारण केले आहेस. मी बाणांनी तुझे तुकडे तुकडे करून आपल्या योगबलाने प्रजेला धारण करीन. (२२-२७)

यावेळी महाराज पृथूंनी काळाप्रमाणे क्रुद्ध रूप धारण केले होते. त्यांचे हे शब्द ऐकून पृथ्वीचा थरकाप झाला आणि अत्यंत नम्रतेने हात जोडून ती म्हणाली. (२८)

पृथ्वी म्हणाली- आपण साक्षात परमपुरुष आहात आणि आपल्या मायेने अनेक प्रकारची शरीरे धारण करून गुणमय असल्याचे भासविता. वास्तविक आत्मानुभवाच्या द्वारा आपण अधिभूत, अध्यात्म आणि अधिदैवासंबंधी अभिमान आणि त्यातून उत्पन्न झालेल्या राग-द्वेषादिकांपासून अलिप्त आहात. मी आपणास वारंवार नमस्कार करीत आहे. आपण संपूर्ण विश्वाचे निर्माते आहात. आपणच ही त्रिगुणात्मक सृष्टी रचली आहे आणि मला सर्व जीवांचे आश्रयस्थान बनविले आहे. आपण सर्वथा स्वतंत्र आहात. प्रभो, आपणच जर शस्त्र घेऊन मला मारण्यासाठी सज्ज झालात, तर मी आणखी कोणाला शरण जाऊ ? कल्पाच्या आरंभी आपणच आपल्या आश्रयाने राहाणार्‍या अनिर्वचनीय मायेने या चराचर जगाची उत्पत्ती केली होती आणि त्या मायेच्या योगानेच आपण हिचे पालन करण्यासाठी तयार झाला आहात. आपण धर्मपरायण आहात. असे असता गायीचे रूप धारण केलेल्या मला कसे मारू इच्छिता ? आपण एक असूनही मायेमुळे अनेकरूप आहात, असे वाटते. आपण स्वतः ब्रह्मदेवाला उत्पन्न करून त्याच्याकडून विश्वाची निर्मिती केली आहे. आपण साक्षात सर्वेश्वर आहात. जितेंद्रिय नसलेले लोक आपल्या लीला कसे जाणू शकतील ? त्यांची बुद्धी आपल्या न समजणार्‍या मायेने मूढ झाली आहे. आपणच पंचमहाभूते, इंद्रिये, त्यांच्या अधिष्ठात्री देवता, बुद्धी आणि अहंकाररूप आपल्या शक्तींच्या द्वारा क्रमशः जगाची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करीत आहात. वेगवेगळ्या कार्यांसाठी वेळोवेळी आपल्या शक्तींचा आविर्भाव-तिरोभाव होतो. आपण साक्षात परमपुरुष आणि जगद्‌विधाते आहात. आपणास माझा नमस्कार असो. हे अजन्मा प्रभो, आपणच रचलेले पंचमहाभूते, इंद्रिये आणि अंतःकरणरूप जग ठेवण्यासाठी आदिवराहरूप होऊन मला रसातळातून पाण्याच्या बाहेर काढले होते. अशा प्रकारे एक वेळ माझा उद्धार करून आपण ‘धराधर ’ हे नाव मिळविले होते. आज तेच आपण वीरमूर्ती, पाण्यावर नावेप्रमाणे स्थिर राहून माझ्याच आश्रयाने राहाणार्‍या प्रजेचे रक्षण करण्यासाठी तीक्ष्ण धार असलेले बाण घेऊन दूध न देण्याच्या माझ्या अपराधासाठी मला मारू इच्छिता. या त्रिगुणात्मक सृष्टीची रचना करणार्‍या आपल्या मायेने माझ्यासारख्या साधारण जीवांचे चित्त भ्रमित होते. असे लोक आपल्या भक्तांच्या लीलांचासुद्धा आशय समजू शकत नाहीत, तर मग आपल्या एखाद्या क्रियेचा उद्देश समजला नाही, तर त्यात आश्चर्य कसले ? अशा आपल्या जितेंद्रिय भक्तांच्या यशाचा विस्तार करणार्‍या, आपल्या भक्तांना नमस्कार असो. (२९-३६)

स्कंध चवथा - अध्याय सतरावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP