|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ४ था - अध्याय १६ वा
बंदीजनांकडून महाराज पृथूंची स्तुती - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] मैत्रेय म्हणतात - महाराज पृथू जेव्हा असे म्हणाले, तेव्हा त्यांच्या वचनामृताचा आस्वाद घेऊन सूत इत्यादी गायक प्रसन्न झाले. नंतर मुनींच्या प्रेरणेने त्यांची ते याप्रकारे स्तुती करू लागले. "आपण साक्षात देवश्रेष्ठ श्रीनारायणच आपल्या मायेने अवतीर्ण झाला आहात. आम्ही आपला महिमा वर्णन करण्यास समर्थ नाही. आपण जन्म तर राजा वेनाच्या शरीरापासून घेतला आहे. परंतु आपल्या पुरुषार्थाचे वर्णन करताना ब्रह्मदेवासारख्यांची बुद्धीसुद्धा चक्रावून जाते. परंतु आपल्या कथामृताच्या आस्वादनामध्ये आदरबुद्धी ठेवून मुनींच्या उपदेशानुसार त्यांच्याच प्रेरणेने आम्ही आपल्या प्रशंसनीय कर्मांचा थोडा विस्तार करू इच्छितो. आपण साक्षात श्रीहरींचा कलावतार आहात आणि आपली कीर्ती मोठी आहे. (१-३) हे धर्म धारण करणार्यांमध्ये श्रेष्ठ महाराज पृथू लोकांना धर्माचरणात प्रवृत्त करून धर्ममर्यादेचे रक्षण करतील. तसेच धर्मविरोधकांना शासन करतील. हे एकटेच वेळोवेळी प्रजेचे पालन, पोषण, आणि मनोरंजन इत्यादी कार्यांनुसार आपल्या शरीरात भिन्न-भिन्न लोकपालांच्या मूर्ती धारण करतील. तसेच यज्ञ इत्यादींनी स्वर्गलोक आणि पर्जन्यवृष्टीने भूलोक- अशा दोघांचेही हित करतील. सर्वांच्या ठिकाणी समदर्शी असणारे हे, ज्याप्रमाणे सूर्य आठ महिने तापून पाणी शोषून घेतो आणि पावसाळ्यात त्याचा वर्षाव करतो, तसेच हे योग्य वेळी कर घेतील आणि योग्यवेळी प्रजेच्या हितासाठी तो खर्च करतील. हे दुःखितांच्या बाबतीत दयाळू असतील. जर कधी एखाद्याने यांच्या बाबतीत गैरवर्तन केले तरी हे पृथ्वीप्रमाणे त्याचा तो अनुचित व्यवहार क्षमाशीलपणे सहन करतील. जर कधी पाऊस पडला नाही आणि प्रजेचे प्राण संकटात सापडले, तर त्यावेळी राजवेषधारी हे श्रीहरी इंद्राप्रमाणे जलवर्षाव करून तिचे सहज रक्षण करतील. हे आपल्या अमृतमय मुखचंद्रावरील मनोहर हास्य आणि प्रेमपूर्ण नजरेने सर्व लोकांना आनंदमय करतील. यांचे मनोगत कोणाला समजणार नाही. यांची कार्येही गुप्त राहतील. तसेच ती करण्याची यांची पद्धतही गूढ असेल. यांचे धन नेहमी सुरक्षित राहील. हे अनंत माहात्म्य आणि गुणांचे एकमेव आश्रय असतील. अशा प्रकारे मनस्वी पृथू साक्षात वरुणासारखेच असतील. (४-१०) महाराज पृथू वेनरूप अरणीच्या मंथनातून प्रगट झालेल्या अग्नीप्रमाणे आहेत. शत्रूंना हे अजिंक्य आणि दुःसह होतील. हे त्यांच्याजवळ राहूनसुद्धा पुष्कळ लांब असल्यासारखे राहातील. शत्रू यांचा कधीच पराभव करू शकणार नाहीत. जसा प्राण्यांच्या शरीरात राहणारा प्राणरूप सूत्रात्मा शरीराच्या आतबाहेरील सर्व व्यवहार पाहात असूनसुद्धा उदासीन असतो, त्याप्रमाणे हे गुप्तहेरांच्या द्वारा प्राण्यांचे गुप्त आणि प्रगट सर्व प्रकारचे व्यवहार पाहूनसुद्धा त्याविषयी उदासीन राहातील. हे धर्ममार्गात स्थिर राहून दंडनीय नसेल तर आपल्या शत्रूच्या मुलालासुद्धा दंड देणार नाहीत. आणि दंडनीय असेल तर आपल्या पुत्रालाही दंड देतील. भगवान सूर्य मानसोत्तर पर्वतापर्यंत जितका प्रदेश आपल्या किरणांनी प्रकाशित करतो, त्या संपूर्ण प्रदेशावर यांचे निष्कंटक राज्य राहील. हे आपल्या कार्यांनी सर्व लोकांना सुखी करतील, त्यांचे मनोरंजन करतील. त्यांच्या या मनोरंजनात्मक व्यवहारांमुळे प्रजा त्यांना खर्या अर्थाने राजा म्हणेल. हे दृढसंकल्प, सत्यप्रतिज्ञ, ब्राह्मणभक्त, वृद्धांची सेवा करणारे, शरणागतवत्सल, सर्व प्राण्यांना मान देणारे आणि दीनांवर दया करणारे होतील. हे परस्त्रीमध्ये मातेप्रमाणे भक्ती ठेवतील. पत्नीला आपले अर्धे अंग मानतील. प्रजेवर पित्याप्रमाणे प्रेम करतील आणि वेदवेत्त्यांचे सेवक होतील. सर्व प्राणी आपल्या शरीराप्रमाणे यांच्यावर प्रेम करतील. हे सुहृदांचा आनंद वाढवतील. हे नेहमी वैराग्यशील पुरुषांवर विशेष प्रेम करतील आणि दुष्टांना दंडपाणी यमराजाप्रमाणे नेहमी दंड देण्यासाठी उद्युक्त राहातील. (११-१८) तिन्ही गुणांचे अधिष्ठाता आणि निर्विकार साक्षात श्रीनारायणांनीच यांच्या रूपाने आपल्या अंशापासून अवतार घेतला आहे. ज्ञानी लोक अविद्येमुळे यांच्या ठिकाणी प्रतीत होणार्या अनेकत्वाला मिथ्याच समजतात. हे अद्वितीय वीर आणि एकछत्री सम्राट होऊन एकटेच उदयाचलापर्यंत सर्व भूमंडळाचे रक्षण करतील आणि आपल्या विजयी रथात बसून हातात धनुष्य घेऊन, सूर्याप्रमाणे सगळीकडे भ्रमण करतील. त्यावेळी ठिकठिकाणचे सर्व लोकपाल आणि राजे यांना भेटी अर्पण करतील, त्यांच्या पत्न्या यांचे गुणगान करतील आणि या आदिराजाला साक्षात श्रीहरीच समजतील. हे प्रजापालक राजाधिराज होऊन प्रजेच्या जीवन-निर्वाहासाठी गोरूपधारिणी पृथ्वीचे दोहन करतील आणि इंद्राप्रमाणे आपल्या धनुष्याच्या टोकाने पर्वत सहज फोडून पृथ्वी सपाट करतील. रणभूमीवर कोणीही यांचा वेग सहन करू शकणार नाही. ज्यावेळी हे जंगलामध्ये शेपूट उंचावून फिरणार्या सिंहाप्रमाणे आपल्या आजगव धनुष्याचा टणत्कार करीत पृथ्वीवर संचार करतील, त्यावेळी दुष्टांचा मागमूसही राहाणार नाही. हे सरस्वती नदीच्या उगमस्थानावर शंभर अश्वमेध यज्ञ करतील, तेव्हा शेवटच्या यज्ञानुष्ठानाच्या वेळी इंद्र यांचा घोडा पळवील. आपल्या महालाच्या बागेत यांची एक वेळ भगवान सनत्कुमारांशी गाठ पडेल. त्यांची हे एकटेच भक्तिपूर्वक सेवा करून अशा निर्मल ज्ञानाची प्राप्ती करून घेतील की ज्यामुळे परब्रह्माची प्राप्ती होते. अशा प्रकारे जेव्हा यांचा पराक्रम जनतेच्या समोर येईल, तेव्हा हे परम पराक्रमी महाराज जिकडे-तिकडे आपल्या चरित्राचीच चर्चा चाललेली ऐकतील. यांची आज्ञा कोणीच मोडू शकणार नाही. तसेच हे चारी दिशा जिंकून आपल्या तेजाने प्रजेचा क्लेशरूप काटा काढून टाकून सर्व भूमंडळाचे शासक होतील. त्यावेळी देव आणि असुरसुद्धा यांच्या अतीव प्रभावाचे वर्णन करतील. (१९-२७) स्कंध चवथा - अध्याय सोळावा समाप्त |