श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय १५ वा

महाराज पृथूचा आविर्भाव आणि राज्याभिषेक -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

मैत्रेय म्हणतात - नंतर ब्राह्मणांनी पुत्रहीन राजा वेनाच्या बाहूंचे मंथन केले. तेव्हा त्यातून एक स्त्री-पुरुष जोडी उत्पन्न झाली. ब्रह्मवादी ऋषींनी ती जोडी उत्पन्न झालेली पाहून आणि ते भगवंतांचे अंश आहेत असे जाणून ते फार प्रसन्न झाले आणि म्हणाले. (१-२)

ऋषी म्हणाले - हा पुरुष भगवान विष्णूंच्या विश्वपालक कलेपासून प्रगट झाला आहे आणि ही स्त्री म्हणजे परम पुरुषाची त्याच्यापासून कधीही वेगळी न राहणारी लक्ष्मी हिचा अवतार आहे. यांपैकी जो पुरुष आहे, तो आपल्या सुयशाचा विस्तार करणार असल्यामुळे परम यशस्वी पृथू नावाचा सम्राट होईल. राजांमध्ये हाच प्रथम असेल. ही सुंदर दंतपंक्ती असलेली तसेच गुण आणि अलंकारांनाही विभूषित करणारी सुंदरी या पृथूलाच पती म्हणून वरेल. हिचे नाव अर्ची असेल. पृथूच्या रूपाने साक्षात श्रीहरींच्या अंशानेच या जगाचे रक्षण करण्यासाठी अवतार घेतला आहे आणि अर्चीच्या रूपाने निरंतर भगवंतांच्या सेवेत राहणारी त्यांची नित्य सहचारिणी श्रीलक्ष्मी प्रगट झाली आहे. (३-६)

मैत्रेय म्हणतात - त्यावेळी ब्राह्मण पृथूची स्तुती करू लागले. श्रेष्ठ गंधर्व गुणगायन करू लागले. सिद्ध पुष्पवर्षाव करू लागले. अप्सरा नाचू लागल्या. आकाशामध्ये शंख, तुतार्‍या, मृदंग, दुंदुभी आदी वाद्ये वाजू लागली. सर्व देव, ऋषी आणि पितर आपापल्या लोकांमधून तेथे आले. जगद्गुरू ब्रह्मदेव, देव आणि देवेश्वरांसह आले. त्यांनी वेनकुमार पृथूच्या उजव्या हातावर भगवान विष्णूंच्या हस्तरेषा आणि चरणांवर कमळाचे चिह्न पाहून ते त्याला श्रीहरींचाच अंश समजले. कारण ज्याच्या हातावर दुसर्‍या रेषांनी न तुटलेल्या चक्राचे चिह्न असते, तो भगवंतांचाच अंश असतो. (७-१०)

वेदवेत्त्या ब्राह्मणांनी पृथूच्या अभिषेकाची तयारी केली. लोकांनी सगळीकडून अभिषेकाचे साहित्य आणले. त्यावेळी नद्या, समुद्र, पर्वत, नाग, गायी, पक्षी, पशू, स्वर्ग, पृथ्वी तसेच अन्य सर्व प्राण्यांनी त्यांना नजराणे आणले. सुंदर वस्त्रे आणि अलंकारांनी अलंकृत महाराज पृथूचा विधीनुसार राज्याभिषेक झाला. त्यावेळी अनेक अलंकारांनी शृंगारलेली महाराणी अर्ची हिच्याबरोबर ते दुसर्‍या अग्निदेवाप्रमाणे दिसत होते. (११-१३)

हे वीर विदुरा, त्यांना कुबेराने अतिशय सुंदर सुवर्णसिंहासन दिले. तसेच वरुणाने चंद्रासारखे प्रकाशमय आणि ज्यातून सदैव पाण्याचे तुषार उडत होते, असे छत्र दिले. वायूने दोन चवर्‍या, धर्माने कीर्तिमय माळ, इंद्राने मनोहर मुकुट, यमाने दमन करणारा दंड, ब्रह्मदेवाने वेदमय कवच, सरस्वतीने सुंदर हार, विष्णूंनी सुदर्शन चक्र, लक्ष्मीने स्थिर संपत्ती, रुद्राने दहा चंद्राकार चिह्नांनी युक्त अशी म्यानासह तलवार, पार्वतीने शंभर चंद्राकार चिह्नांची ढाल, चंद्राने अमृतमय घोडे, विश्वकर्म्याने सुंदर रथ, अग्नीने बोकड आणि बैल यांच्या शिंगांपासून बनविलेले सुदृढ धनुष्य, सूर्याने तेजोमय बाण, पृथ्वीने पायात घालताच अपेक्षित ठिकाणी पोहोचविणार्‍या योगमय पादुका, आकाशाने न कोमेजणारी फुलांची माळ, आकाशात विहार करणार्‍या सिद्ध-गंधर्व आदींनी नाच-गाणे, वाजवणे आणि अंतर्धान पावण्याची शक्ती, ऋषींनी अमोघ आशीर्वाद, समुद्राने आपल्यापासून उत्पन्न झालेला शंख, तसेच सात समुद्र, पर्वत आणि नद्यांनी त्यांच्या रथासाठी निष्कंटक मार्ग, भेट म्हणून दिले. त्यानंतर सूत, मागध आणि बंदीजन त्यांची स्तुती करण्यासाठी उपस्थित झाले. तेव्हा त्यांची स्तुती करण्याचा हेतू ओळखून वेनपुत्र परमप्रतापी महाराज पृथू हसत-हसत मेघाप्रमाणे गंभीर वाणीने म्हणाले. (१४-२१)

पृथू म्हणाले - हे सूत, मागध आणि बंदीजन हो ! अजून तर लोकांत माझा कोणताही गुण प्रगट झाला नाही. तर मग तुम्ही कोणत्या गुणांबद्दल माझी प्रशंसा करणार ? माझ्या बाबतीत तुमची वाणी व्यर्थ होता कामा नये. म्हणून माझ्याऐवजी दुसर्‍या कोणाची तरी स्तुती करा. हे मृदुभाषिकांनो, कालांतराने जेव्हा माझे अप्रगट गुण प्रगट होतील, तेव्हा आपल्या मृदू वाणीने माझी भरपूर स्तुती करा. असे पहा, शिष्ट लोक पवित्रकीर्ती श्रीहरींच्या गुणानुवादाशिवाय तुच्छ माणसांची स्तुती करीत नाहीत. श्रेष्ठ गुण धारण करण्याचे सामर्थ्य असूनही असा कोण बुद्धिमान पुरुष आहे की, जो ते गुण नसतानाही केवळ शक्यता म्हणून स्तुती करणार्‍याकडून आपली स्तुती करून घेईल ? अशा स्तुतीमुळे माणसाची फसवणूक होते, हे तो मंदबुद्धी समजू शकत नाही. याप्रकारे लोक त्याचा उपहासच करीत असतात. ज्याप्रमाणे लज्जावान उदार पुरुष आपल्या एखाद्या निंद्य पराक्रमाची चर्चा होणे हे वाईट समजतात, त्याचप्रमाणे लोकविख्यात पुरुष आपल्या स्तुतीलासुद्धा निंदा समजतात. सूतगणहो ! सध्या तर आम्ही आपल्या श्रेष्ठ कर्मांच्या योगाने लोकांमध्ये प्रसिद्ध झालो नाही. आम्ही आजपर्यंत कोणतेही असे काम केले नाही की, ज्याची प्रशंसा केली जावी. तर मग लहान मुलांप्रमाणे तुमच्याकडून आपल्या कीर्तीचे गान कोणत्या तर्‍हेने करून घ्यावे ? (२२-२६)

स्कंध चवथा - अध्याय पंधरावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP