श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय १४ वा

वेनराजाची कथा -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

मैत्रेय म्हणतात - वीरवर विदुरा, सर्व लोकांचे कल्याण इच्छिणार्‍या भृगू आदी मुनींनी पाहिले की, अंग निघून गेल्यानंतर पृथ्वीचे रक्षण करणारा कोणी राहिला नाही. त्यामुळे सर्व लोक पशूंप्रमाणे उच्छृंखल होऊ लागले आहेत. तेव्हा त्यांनी माता सुनीथाच्या संमतीने मंत्र्यांची संमती नसतानाही वेनाला पृथ्वीचा राज्याभिषेक केला. वेन फारच कठोर प्रशासक होता. चोर-डाकूंनी जेव्हा ऐकले की, तोच राजसिंहासनावर बसला आहे, तेव्हा सापामुळे भ्यालेल्या उंदरांप्रमाणे ते सर्वजण लगेच इकडे तिकडे जाऊन लपून राहिले. राज्य मिळाल्याबरोबर वेन आठही लोकपालांचे सामर्थ्य मिळाल्यामुळे उन्मत्त झाला आणि अभिमानाने स्वतःलाच सर्वश्रेष्ठ समजून महापुरुषांचा अपमान करू लागला. तो ऐश्वर्यमदाने आंधळा झाला आणि रथात बसून निरंकुश हत्तीप्रमाणे पृथ्वी आणि आकाशाचा जणू थरकाप उडवीत सगळीकडे संचार करू लागला. "कोणत्याही त्रैवर्णिकाने कधीही कोणत्याही प्रकारचा यज्ञ, दान, आणि हवन करू नये," अशी आपल्या राज्यात दवंडी पिटवून त्याने सर्व धर्मकर्मे बंद केली. (१-६)

दुष्ट वेनाचा असा अत्याचार पाहून मुनी एकत्र आले आणि जगावर संकट आल्याचे समजून करूणेने आपापसात म्हणू लागले. "अहो ! जसे दोन्ही बाजूंनी जळणार्‍या लाकडाच्या मध्ये राहणारे जीव संकटात सापडतात, त्याचप्रमाणे यावेळी सगळी प्रजा एकीकडून राजाच्या आणि दुसरीकडून चोर-डाकूंच्या अत्याचाराने मोठया संकटात सापडली आहे. अराजक माजेल, या भीतीनेच आम्ही, अयोग्य असूनसुद्धा वेनाला राजा बनविले. परंतु आता त्याच्यापासूनच प्रजेला भय निर्माण झाले आहे. अशा अवस्थेत प्रजेला कसे सुख मिळणार ? सुनीथाच्या कुशीतून उत्पन्न झालेला हा वेन स्वभावतःच दुष्ट आहे. म्हणून सापाला दूध पाजल्याप्रमाणे याचे पालन करणे हे पालनकर्त्याच्याच अनर्थाला कारण झाले आहे. आम्ही याला प्रजेचे रक्षण करण्यासाठी नियुक्त केले होते आणि आज हाच त्यांना नष्ट करण्यास सज्ज झाला आहे. अशावेळी आम्ही त्याला अवश्य समजाविले पाहिजे. अशा रीतीने आपले कर्तव्य केल्याने याने केलेल्या पापांचा आम्हांला स्पर्श होणार नाही. आम्ही जाणून-बुजूनच दुराचारी वेनाला राजा केले होते. परंतु जर समजावल्यानंतरही याने आमचे म्हणणे मानले नाही, तर लोकांच्या धिक्काराने दग्ध झालेल्या या दुष्टाला आम्ही आपल्या तेजाने भस्म करून टाकू. असा विचार करून मुनी वेनाजवळ गेले आणि आपला क्रोध लपवून गोड बोलून समजावीत त्याला म्हणू लागले. (७-१३)

मुनी म्हणाले - राजन, आम्ही आता तुला जे सांगतो, त्याकडे लक्ष दे. त्यामुळे तुझे आयुष्य, ऐश्वर्य, बल आणि कीर्ती वृद्धिंगत होईल. मनुष्याने मन, वाणी, शरीर, आणि बुद्धीने धर्माचे आचरण केले तर त्याला स्वर्गादी शोकरहित लोकांची प्राप्ती होते आणि जर त्याचा निष्कामभाव असेल तर तोच धर्म त्याला अनंत मोक्षपदावर पोहोचवितो. म्हणून वीरवर, प्रजेचा कल्याणरूप तो धर्म आपल्यामुळे नष्ट होता कामा नये. धर्म नष्ट झाल्याने राजासुद्धा ऐश्वर्यापासून च्युत होतो. जो राजा दुष्ट मंत्री आणि चोर इत्यादींपासून आपल्या प्रजेचे रक्षण करून योग्य कर घेतो, तो या लोकात आणि परलोकात सुख मिळवितो. हे महाभाग, ज्याच्या राज्यामध्ये किंवा नगरामध्ये वर्णाश्रमधर्माचे पालन करणारे पुरुष स्वधर्मपालनाच्या द्वारे भगवान यज्ञपुरुषांची आराधना करतात, त्या आपल्या आज्ञेचे पालन करणार्‍या राजावर भगवान प्रसन्न असतात. कारण तेच सार्‍या विश्वाचा आत्मा आणि सर्व भूतांचे रक्षणकर्ते आहेत. राजांचेही ईश्वर प्रसन्न झाल्यावर कोणतीच वस्तू दुर्लभ असत नाही. म्हणूनच इंद्रादी लोकपालांसहित सर्व लोक त्यांना मोठया आदराने पूजा-उपहार समर्पण करतात. राजन, भगवान श्रीहरी सर्व लोक, लोकपाल आणि यज्ञांचे नियामक आहेत. ते वेदत्रयीरूप, द्रव्यरूप आणि तपःस्वरूप आहेत. म्हणून आपले जे देशवासी आपल्या उन्नतीसाठी अनेक प्रकारच्या यज्ञांनी भगवंतांचे यजन करतात, त्यांना अनुकूलच आपण राहिले पाहिजे. जेव्हा आपल्या राज्यात ब्राह्मणलोक यज्ञांचे अनुष्ठान करतील, तेव्हा त्यांच्या पूजेने प्रसन्न होऊन भगवंतांच्या अंशस्वरूप देवता आपल्याला मनोवांछित फळ देतील. म्हणून वीरवर ! आपण देवतांचा तिरस्कार करता कामा नये(१४-२२)

वेन म्हणाला - तुम्ही लोक किती मूर्ख आहात ! तुम्ही अधर्मालाच धर्म मानता याचा मला खेद होतो. जे तुम्ही तुमचा जीवननिर्वाह चालविणार्‍या मला-साक्षात पतीला-सोडून कोणत्या तरी दुसर्‍या जारपतीच्या नादी लागला आहात. जे लोक मूर्खपणामुळे राजारूप परमेश्वराचा अनादर करतात, त्यांना या लोकी तर सुख मिळत नाहीच आणि परलोकातही मिळत नाही. अरे ! ज्यामध्ये तुम्हा लोकांची एवढी भक्ती आहे, तो यज्ञपुरुष कोण आहे ? कुलटा स्त्री आपल्या विवाहित पतीवर प्रेम न करता एखाद्या परपुरुषामध्ये आसक्त होते, तसे हे झाले. विष्णू, ब्रह्मदेव, महादेव, इंद्र, वायू, यम, सूर्य, मेघ, कुबेर, चंद्र, पृथ्वी, अग्नी आणि वरुण तसेच यांच्याव्यतिरिक्त जे दुसरे वर आणि शाप देण्यास समर्थ आहेत, ते सर्व राजाच्या शरीरात राहातात. म्हणून राजा सर्वदेवमय आहे. म्हणून ब्राह्मणांनो, तुम्ही मत्सर सोडून आपल्या सर्व कर्मांच्या द्वारा फक्त माझेच पूजन करा आणि मलाच नैवेद्य समर्पण करा. हे पहा, माझ्याशिवाय दुसरा कोण अग्रपूजेचा अधिकारी होऊ शकतो ? (२३-२८)

मैत्रेय म्हणतात - अशा प्रकारे विपरीत बुद्धी झाल्यामुळे तो अत्यंत पापी आणि कुमार्गाकडे जाणारा असा झाला. त्याचे पुण्य अगदी क्षीण झाले होते, म्हणून मुनींनी पुष्कळ नम्रतापूर्वक प्रार्थना करून सुद्धा त्याने त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष दिले नाही. हे विदुरा, स्वतःला शहाणा समजणार्‍या वेनाने जेव्हा त्या मुनींचा अशा प्रकारे अपमान केला, तेव्हा आपली लोकहिताची विनंती धुडकावली गेली, असे पाहून ते त्याच्यावर संतापले. मारून टाका ! दुष्ट स्वभावाच्या या नीचाला मारून टाका ! हा जिवंत राहिला तर काही दिवसातच जगाचे खात्रीने भस्म करून टाकील. हा दुराचारी कोणत्याही प्रकारे राजसिंहासनासाठी योग्य नाही. कारण हा निर्लज्ज, साक्षात यज्ञपती श्रीविष्णूंची निंदा करीत आहे. अहो, ज्यांच्या कृपेमुळे याला हे ऐश्वर्य मिळाले आहे, त्या श्रीहरींची निंदा अभागी वेनाशिवाय आणखी कोण करू शकेल ? (२९-३३)

अशा प्रकारे आपला लपविलेला क्रोध प्रगट करून त्यांनी त्याला मारण्याचा निश्चय केला. तो तर भगवंतांची निंदा केल्याकारणाने अगोदरच मरणप्राय झाला होता. म्हणून केवळ हुंकारानेच त्यांनी त्याला मारले. जेव्हा मुनी आपापल्या आश्रमाकडे गेले, तेव्हा इकडे वेनाची शोकाकुल माता सुनीथा मंत्रसामर्थ्याने तसेच अन्य युक्तींनी आपल्या पुत्राच्या शवाचे रक्षण करू लागली. (३४-३५)

एक दिवस ते मुनी सरस्वतीच्या पवित्र जलात स्नान करून अग्नीत हवन करून नदीच्या तीरावर बसून हरिकथा करीत होते. त्या दिवसांत लोकांच्यामध्ये हाहाकार माजविणार्‍या पुष्कळशा घटना घडत आहेत असे पाहून ते आपापसात म्हणू लागले. "आजकाल पृथ्वीचा रक्षणकर्ता कोणी राहिलेला नाही. म्हणून चोर-डाकूंच्यामुळे काही अशुभ तर होणार नाही ना ?" ऋषिलोक असा विचार करीत होते, तेवढयात सर्व दिशांकडून हल्ला करणार्‍य़ा चोर आणि डाकूंच्यामुळे उडालेली फार मोठी धूळ त्यांनी पाहिली. ते पाहाताच त्यांच्या लक्षात आले की, राजा वेनाचा मृत्यू झाल्यामुळे देशात अराजकता माजली आहे. राज्य शक्तिहीन झाले आहे आणि चोर-डाकूंची संख्या वाढली आहे. हा सर्व उपद्रव लोकांचे धन लुटणार्‍या तसेच एक-दुसर्‍याच्या रक्तासाठी तहानलेल्या लुटारूंमुळेच होत आहे. आपल्या तेजाने किंवा तपोबलाने लोकांच्या अशा कुप्रवृत्तीला रोखण्याचे सामर्थ्य असूनही असे करण्यामध्ये हिंसादी दोष आहेत, असे पाहून त्यांनी त्याचे काहीच निवारण केले नाही. त्यांनी पुन्हा असा विचार केला की, ब्राह्मण जरी समदर्शी आणि शांत स्वभावाचे असले, तरी दीनांची उपेक्षा केल्याने त्यांचे तप फुटलेल्या घडयातून पाणी वाहून जावे तसे नष्ट होते. शिवाय राजर्षी अंगाचा वंश नष्ट होता कामा नये. कारण त्याच वंशात अनेक अमोघशक्ती आणि भगवत्परायण राजे होऊन गेले आहेत. असा निश्चय करून त्यांनी मृत राजाची मांडी जोरजोराने घुसळली, तेव्हा त्यातून एक बुटका पुरुष उत्पन्न झाला. तो कावळ्याप्रमाणे काळ्या वर्णाचा होता. त्याचे सर्व अंग विशेषतः हात फारच लहान होते. जबडे पुष्कळ मोठे, पाय लहान, नाक चपटे, डोळे लाल, आणि केस तांबूस रंगाचे होते. त्याने मोठया दीनतेने आणि नम्रतेने विचारले की, "मी काय करू ?" तेव्हा ऋषी म्हणाले, ‘निषीद(बस.)’ म्हणून त्याला निषाद म्हणू लागले. त्याने जन्माला येताच राजा वेनाची भयंकर पापे आपल्या शिरावर घेतली म्हणून त्याचे वंशज निषाद हेसुद्धा हिंसा, लूटमार इत्यादी पापकर्मांमध्ये व्यग्र असतात, म्हणून ते गाव किंवा नगरात न राहाता वन आणि पर्वतराजींमध्येच निवास करतात. (३६-४६)

स्कंध चवथा - अध्याय चवदावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP