श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय १३ वा

ध्रुववंशाचे वर्णन व अंगराजाचे चरित्र -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

सूत म्हणतात - शौनका, मैत्रेय मुनींनी वर्णन केलेला ध्रुवाचा विष्णुपदावर आरूढ होण्याचा वृत्तांत ऐकून विदुराच्या हृदयात भगवान विष्णूंच्या भक्तीचा उद्रेक झाला आणि त्याने पुन्हा मैत्रेयांना प्रश्न विचारण्यास आरंभ केला. (१)

विदुराने विचारले - भगवत्परायण मुने ! हे प्रचेता कोण होते ? कोणाचे पुत्र होते ? कोणाच्या वंशामध्ये प्रसिद्ध होते आणि त्यांनी कुठे यज्ञ केला होता ? भगवंतांच्या दर्शनामुळे नारद परम भागवत आहेत, असे मी मानतो. त्यांनी ‘पांचरात्र ’ ग्रंथाची निर्मिती करून श्रीहरींच्या पूजापद्धतिरूप क्रिया-योगाचा उपदेश केला आहे. ज्यावेळी प्रचेतागण स्वधर्माचे आचरण करता करता भगवान यज्ञेश्वरांची आराधना करीत होते, त्यावेळी भक्तश्रेष्ठ नारदांनी ध्रुवाचे गुणगान केले होते. ब्रह्मन, तेथे त्यांनी भगवंतांच्या ज्या ज्या लीलाकथांचे वर्णन केले होते, ते संपूर्ण मला ऐकवा. ते ऐकण्याची माझी इच्छा आहे. (२-५)

मैत्रेय म्हणाले - महाराज ध्रुव वनात निघून गेल्यानंतर त्याचा पुत्र उत्कल याने आपल्या पित्याचे सार्वभौ‌म वैभव आणि राजसिंहासन यांचा स्वीकार केला नाही. तो जन्मापासूनच शांतचित्त, आसक्तिशून्य आणि समदर्शी होता. तसेच तो संपूर्ण लोकांना आपल्या आत्म्यामध्ये आणि आपल्या आत्म्याला संपूर्ण लोकांमध्ये व्याप्त असल्याचे पाहात असे. त्याच्या अंतःकरणातील वासनारूप मळ अखंड योगाग्नीने भस्म झाला होता. म्हणून तो आपल्या आत्म्याला विशुद्ध ज्ञानरूप, आनंदमय आणि सर्वव्यापी पाहात होता. त्यावेळी तो स्वरूपात लीन झाल्यामुळे त्याला आपल्या आत्म्याहून वेगळे असे काहीच दिसत नव्हते. तो अज्ञानी लोकांना रस्त्यात, मंद आगीप्रमाणे, मूर्ख, आंधळा, बहिरा, वेडा किंवा मुका वाटत होता. परंतु वास्तविक तो तसा नव्हता. म्हणून कुलातील ज्येष्ठांनी तसेच मंत्र्यांनी त्याला मूर्ख आणि वेडा समजून त्याचा लहान भाऊ भ्रमिपुत्र वत्सर याला राजा बनविले. (६-११)

वत्सराची प्रिय पत्नी स्वर्वीथी हिला पुष्पार्ण, तिग्मकेतू, इष, ऊर्ज, वसू आणि जय नावाचे सहा पुत्र झाले. पुष्पार्णाला प्रभा(दिवस) आणि दोषा (रात्र) नावाच्या दोन पत्न्या होत्या, त्यांपैकी प्रभेला प्रातः (सकाळ) मध्यंदिन (दुपार) आणि सायं असे तीन पुत्र झाले. दोषाला प्रदोष (तिन्हीसांज) निशीथ (मध्यरात्र) आणि व्युष्ट (पहाट) असे तीन पुत्र झाले. व्युष्टाला पत्नी पुष्करिणीपासून सर्वतेज (सूर्य) नावाचा पुत्र झाला. त्यालाच आकूती नावाच्या पत्नीपासून चक्षू नावाचा पुत्र झाला. (चाक्षुष मन्वन्तरामध्ये तोच मनू झाला.) चक्षू मनूची पत्नी नड्वला हिला पुरू, कुत्स, त्रित, द्युम्न, सत्यवान, ऋत, व्रत, अग्निष्टोम, अतिरात्र, प्रद्युम्न, शिबी आणि उल्मुक असे बारा सत्त्वगुणी पुत्र झाले. त्यांपैकी उल्मुकाला पत्नी पुष्करिणीपासून अंग, सुमना, ख्याती, क्रतू, अंगिरा आणि गय असे सहा पुत्र झाले. अंगाची पत्नी सुनीथाने क्रूरकर्मा वेन याला जन्म दिला. त्याच्या दुष्टपणामुळे उद्विग्न होऊन राजर्षी अंग नगर सोडून निघून गेला. विदुरा, मुनींनी रागाने वेनाला शाप दिला आणि त्यांच्या वाणीरूप वज्राने जेव्हा तो मरण पावला, तेव्हा कोणीच राजा नसल्याने चोर-दरोडेखोरांचा प्रजेला फार त्रास होऊ लागला. हे पाहून त्यांनी वेनाच्या उजव्या हाताचे मंथन केले. त्यापासून भगवान विष्णूंचा अंशावतार आदिसम्राट महाराज पृथू प्रगट झाला. (१२-२०)

विदुराने विचारले - ब्रह्मन, महाराज अंग मोठा शीलसंपन्न, सज्जन, ब्राह्मणभक्त आणि महात्मा होता. अशा अंगाला वेनासारखा दुष्ट पुत्र कसा झाला ? ज्यामुळे दुःखी होऊन त्याला नगर सोडावे लागले ? धर्मज्ञ मुनीश्वरांनी शापरूप ब्रह्मदंडाचा प्रयोग करावा असा राजदंड धारण करणार्‍या वेनाचा तरी कोणता अपराध होता ? राजा आपल्या अंगी आठ लोकपालांचे तेज धारण करीत असतो. म्हणून प्रजापालक राजाने काहीही पाप केले तरीसुद्धा प्रजेने त्याचा तिरस्कार करू नये. ब्रह्मन, आपण भूत-भविष्यकाळातील गोष्टी जाणणार्‍यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहात. म्हणून आपण श्रद्धाळू, भक्त अशा मला सुनीथाचा पुत्र वेन याची सर्व कृत्ये सांगावीत. (२१-२४)

मैत्रेय म्हणतात - विदुरा ! एकदा राजर्षी अंगाने अश्वमेध महायज्ञ केला. तेव्हा वेदज्ञ ब्राह्मणांनी आवाहन करूनही त्या यज्ञात आपला भाग घेण्यासाठी देव आले नाहीत. तेव्हा ऋत्विज आश्चर्यचकित होऊन यजमान अंगाला म्हणाले, राजन, आम्ही आहुतींच्या रूपाने जे घृत इत्यादी पदार्थ हवन करीत आहोत, त्याचा देव स्वीकार करीत नाहीत. राजा, आपली होमसामग्री दूषित नाही. कारण आपण ती मोठया श्रद्धेने जमविली आहे. तसेच वेदमंत्रसुद्धा कोणत्याही प्रकारे बलहीन नाहीत. कारण त्यांचा प्रयोग करणारे ऋत्विज यज्ञ करणार्‍याला आवश्यक अशा सर्व नियमांचे पूर्णपणे पालन करीत आहेत. या यज्ञात देवांचा जरासाही अपराध झाल्याचे आम्हांला दिसत नाही. असे असतानाही कर्माध्यक्ष देव स्वतःचा भाग का बरे घेत नाहीत ? (२५-२८)

मैत्रेय म्हणतात - ऋत्विजांचे म्हणणे ऐकल्यानंतर यजमान अंगाला फार वाईट वाटले. त्याने याजकांच्या संमतीने मौन सोडून सदस्यांना विचारले."सदस्यहो ! आवाहन करूनही देव यज्ञात का येत नाहीत आणि आहुती ग्रहण का करीत नाहीत ? माझ्याकडून असा कोणता अपराध घडला आहे, हे आपण सांगावे." (२९-३०)

सदस्य म्हणाले - राजन, या जन्मी आपल्याकडून कोणतेही पाप घडलेले नाही. पण पूर्वजन्मीचे काही पाप अवश्य असावे. त्यामुळे आपण सर्वगुणसंपन्न असूनही निपुत्रिक आहात. आपले कल्याण असो. प्रथम आपण सुपुत्र होण्यासाठी काही उपाय कारावा. आपण जर पुत्रकामनेच्या इच्छेने यज्ञ केलात, तर भगवान यज्ञेश्वर आपल्याला अवश्य पुत्र देतील. जर संतानासाठी साक्षात यज्ञपुरुष श्रीहरींना आवाहन केले, तर देव आपणहून आपापला यज्ञभाग ग्रहण करतील. भक्त जी जी इच्छा करतो ती ती श्रीहरी त्याला देतात. त्यांची ज्याप्रकारे आराधना केली जाते, त्याप्रमाणे उपासकाला फळसुद्धा मिळते. (३१-३४)

असे सांगून राजा अंगाला पुत्रप्राप्ती होण्यासाठी ऋत्विजांनी शिपिविष्टनामक श्रीविष्णूंना पुरोडाश समर्पण केला. अग्नीमध्ये आहुती देताच अग्निकुंडातून सोन्याचा हार आणि शुभ्र वस्त्रांनी विभूषित एक पुरुष प्रगट झाला. त्याने एका सुवर्णपात्रात सिद्ध झालेली खीर घेतलेली होती. उदारबुद्धी राजा अंगाने याजकांच्या अनुमतीने आपल्या ओंजळीत ती खीर घेतली आणि स्वतः तिचा वास घेऊन आनंदाने आपल्या पत्नीला दिली. पुत्र नसलेल्या राणीने ती पुत्रप्रदायिनी खीर खाऊन आपल्या पतीच्या सहवासाने गर्भ धारण केला. त्यामुळे यथासमय तिला एक पुत्र झाला. तो बालक बाल्यावस्थेपासूनच अधर्माच्या वंशात उत्पन्न झालेल्या आपल्या आजोबांच्या, मृत्यूच्या वळणावर गेला होता. सुनीथा मृत्यूचीच कन्या होती, म्हणून तोही अधार्मिकच झाला. (३५-३९)

तो दुष्ट पुत्र धनुष्यावर बाण चढवून वनात जात असे आणि व्याधाप्रमाणे बिचार्‍या पशूंची हत्या करीत असे. त्याला पाहाताच लोक ‘वेन आला ! वेन आला ! ’ असे म्हणून ओरडत असत. तो असा क्रूर आणि निर्दय होता की मैदानात खेळताना आपल्या बरोबरीच्या मुलांना तो पशूंप्रमाणे निर्दयपणे मारीत असे. वेनाची अशी दुष्ट प्रवृत्ती पाहून महाराज अंगाने त्याला विविध प्रकारे सुधारण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्याला सन्मार्गावर आणू न शकल्याने त्याला फार दुःख झाले. (तो मनात म्हणू लागला.) ज्या गृहस्थांना पुत्र नाही, त्यांनी निश्चितपणे पूर्वजन्मी श्रीहरींची आराधना केली असली पाहिजे. म्हणूनच त्यांना कुपुत्राच्या दुष्कृत्यांनी होणारे असह्य क्लेश सहन करावे लागत नाहीत. ज्याच्या करणीमुळे माता-पित्याचे सर्व यश धुळीला मिळते, अधर्माचा भागीदार व्हावे लागते, सगळ्यांकडून विरोध सहन करावा लागतो, कधीही न संपणारी चिंता लागून राहाते आणि घरही दुःखदायी होते, अशा आत्म्याचे मोहमय बंधन असणार्‍या फक्त नावाच्या संतानासाठी कोणता शहाणा पुरुष लालचावेल ? मी तर सुपुत्रापेक्षा कुपुत्रालाच चांगला समजतो. कारण सुपुत्राला सोडताना फार क्लेश होतात. कुपुत्र घराचा नरक बनवितो. म्हणून त्याच्यापासून सहजच सुटका होते. (४०-४६)

अशा प्रकारे विचार करता करता महाराज अंगाला रात्री झोप आली नाही. त्याचे चित्त घराला कंटाळले. तो मध्यरात्री उठला आणि गाढ झोपलेल्या वेनाच्या आईला सोडून कोणालाही कळू न देता, ऐश्वर्याने भरलेल्या राजमहालातून बाहेर पडून वनात गेला. महाराज विरक्त होऊन घरातून निघून गेले, हे समजल्यानंतर सर्व प्रजाजन, पुरोहित, मंत्री, सुहृद्‌गण आदी अत्यंत शोकाकुल होऊन पृथ्वीवर सगळीकडे त्यांचा शोध घेऊ लागले. जसे योगाचे रहस्य न जाणणारे पुरुष आपल्या हृदयात लपलेल्या भगवंतांचा बाहेर शोध घेतात. हे विदुरा, जेव्हा त्यांना आपल्या स्वामींचा कोठेच शोध लागला नाही, तेव्हा ते निराश होऊन नगरात परतले आणि तेथे जे मुनिजन एकत्रित झाले होते, त्यांना त्यांनी प्रणाम करून अश्रुभरल्या नेत्रांनी महाराज न सापडल्याचा वृत्तांत सांगितला. (४७-४९)

स्कंध चवथा - अध्याय तेरावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP