श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय १२ वा

ध्रुवाला कुबेराचे वरदान आणि विष्णुलोकाची प्राप्ती -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

मैत्रेय म्हणतात - ध्रुवाचा क्रोध शांत झाला आणि त्याने यक्षांना मारणे बंद केले हे पाहून भगवान कुबेर तेथे आले. त्यावेळी यक्ष, चारण आणि किन्नर त्यांची स्तुती करीत होते. त्यांना पाहाताच ध्रुव हात जोडून उभा राहिला, तेव्हा कुबेर म्हणाले. (१)

कुबेर म्हणाले- हे निष्पाप क्षत्रियकुमारा, तू आपल्या आजोबांच्या उपदेशानुसार सोडण्यास कठीण वैर सोडून दिलेस, त्यामुळे मी तुझ्यावर संतुष्ट झालो आहे. वास्तविक तू यक्षांना किंवा यक्षांनी तुझ्या भावाला मारले नाही. सर्व जीवांची उत्पत्त्ती आणि विनाश याला कारण तो एकमात्र कालच आहे. जीवाला अज्ञानामुळे स्वप्नाप्रमाणे शरीरालाच आत्मा मानल्यामुळे ‘मी-तू ’ ही मिथ्याबुद्धी उत्पन्न होते. यामुळेच मनुष्याला बंधन आणि दुःख प्राप्त होतात. (२-४)

म्हणून ध्रुवा, आता तू जा. भगवान तुझे मंगल करोत. तू संसारपाशातून मुक्त होण्यासाठी सर्व जीवांचे बाबतीत समदृष्टी ठेवून चराचररूप भगवान श्रीहरींचे भजन कर. ते संसारपाश छेदणारे आहेत. तसेच विश्वाची उत्पत्ती आदी करण्यासाठी आपल्या त्रिगुणात्मक मायाशक्तीने युक्त होऊन सुद्धा तिच्यापासून अलिप्त आहेत. त्यांचे चरणकमलच सर्वांना भजन करण्यास योग्य आहेत. हे उत्तानपाद-पुत्र राजा, आम्ही असे ऐकले आहे की, तू नेहमी भगवान कमलनाभांच्या चरणांजवळ राहणारा आहेस .म्हणूनच तू वर मिळविण्यास योग्य आहेस. ध्रुवा, तुला ज्या वराची इच्छा असेल, तो माझ्याकडून निःसंकोचपणे खुशाल मागून घे. (५-७)

मैत्रेय म्हणतात- कुबेराने जेव्हा अशा रीतीने वर मागण्याचा आग्रह केला, तेव्हा महाभागवत महाबुद्धिमान ध्रुवाने त्याच्याकडून हेच मागितले की, ज्यामुळे मनुष्य सहजपणे हा दुस्तर संसारसागर पार करतो, ते श्रीहरिस्मरण मला नित्य राहो. कुबेराने प्रसन्न मनाने त्याला भगवत्स्मृतीचा वर देऊन तो त्यांच्या देखतच अंतर्धान पावला. त्यानंतर ध्रुवसुद्धा आपल्या राजधानीला परतला. तेथे राहात असताना त्यांनी मोठमोठया दक्षिणांनी युक्त असणार्‍या यज्ञांनी भगवान यज्ञपुरुषांची आराधना केली. कारण भगवंतच द्रव्य, क्रिया व देवतासंबंधीचे कर्म आणि त्याचे फळ देणारे आहेत. सर्वोपाधिशून्य सर्वात्मा श्रीअच्युतांचे ठिकाणी निःसीम भक्तिभाव ठेवून ध्रुव आपल्यात आणि सर्व प्राण्यांमध्ये सर्वव्यापक श्रीहरीच विराजमान असल्याचे पाहू लागला. शीलसंपन्न, ब्राह्मणभक्त, दीनवत्सल आणि धर्ममर्यादांचे रक्षण करणार्‍या ध्रुवाला त्याची प्रजा साक्षात पित्यासमान मानीत होती. अशा प्रकारे निरनिराळ्या ऐश्वर्यभोगांद्वारे पुण्याचा आणि त्यागपूर्वक यज्ञादी कर्मांच्या अनुष्ठानाने पापाचा क्षय करीत त्याने छत्तीस हजार वर्षांपर्यंत पृथ्वीचे राज्य केले. जितेंद्रिय महात्म्या ध्रुवाने अशा प्रकारे धर्म, अर्थ आणि काम यांचे पालन करीत पुष्कळ वर्षे घालविली आणि त्यानंतर आपला पुत्र उत्कल याच्यावर राज्य सोपविले. हे संपूर्ण विश्व अविद्यारचित स्वप्न किंवा गंधर्वनगरासमान मायेने आपल्यातच कल्पना केलेले आहे, असे त्याने मानले. तसेच शरीर, स्त्री, पुत्र, मित्र, सेना, भरलेला खजिना, जनानखाना, सुरम्य विहारभूमी आणि समुद्रापर्यंत पसरलेले भूमंडलाचे राज्य हे सर्व काळाच्या गर्तेत सापडले आहे, असे समजून तो बदरिकाश्रमाकडे निघून गेला. (८-१६)

तेथे त्याने पवित्र जलामध्ये स्नान करून देह व इंद्रिये शुद्ध केली. नंतर स्थिर आसनावर बसून प्राणायामाने प्राणवायूला स्वाधीन केले. त्यापाठोपाठ मनाच्या द्वारा इंद्रियांना बाह्य विषयांपासून दूर करून भगवंतांच्या स्थूल विराट स्वरूपामध्ये स्थिर केले. त्याच विराट स्वरूपाचे चिंतन करीत करीत शेवटी निर्विकल्प समाधीत लीन होऊन त्याच अवस्थेत त्याने विराट रूपाचाही त्याग केला. अशा प्रकारे भगवान श्रीहरींच्या ठिकाणी निरंतर भक्तिभावाचा प्रवाह चालू राहिल्याने त्याच्या डोळ्यांतून वारंवार आनंदाश्रूंचा पूर येऊ लागला. त्यामुळे त्याचे हृदय द्रवीभूत झाले आणि शरीरावर रोमांच येऊ लागले. नंतर देहाभिमान गळून गेल्याने त्याला ‘मी ध्रुव आहे ’ याचीसुद्धा आठवण राहिली नाही. (१७-१८)

त्याच वेळी ध्रुवाने आकाशातून एक अतिशय सुंदर विमान खाली उतरताना पाहिले. त्याने आपल्या प्रकाशाने दाही दिशा उजळून टाकल्या होत्या. जणू पौर्णिमेच्या चंद्राचा उदयच झाला होता. त्यानंतर दोन श्रेष्ठ देव त्याने पाहिले. त्यांच्या हातात गदा होत्या. त्यांना (प्रत्येकी) चार हात होते, सुंदर श्याम वर्ण होता. किशोर अवस्था होती. तांबूस कमलाप्रमाणे नेत्र होते. त्यांनी सुंदर वस्त्रे, किरीट, हार, बाजूबंद आणि अतिशय मनोहर कुंडले धारण केली होती. ते पुण्यश्लोक श्रीहरींचे सेवक आहेत, असे जाणून ध्रुव गोंधळून जाऊन पूजा वगैरे करण्याचे विसरून ताबडतोब उठून उभा राहिला आणि भगवंतांच्या पार्षदांमध्ये हे प्रमुख आहेत असे समजून त्याने श्रीमधुसूदनांच्या नामाचे कीर्तन करीत त्यांना हात जोडून नमस्कार केला. ध्रुवाचे मन भगवंतांच्या चरणकमलांपाशी तल्लीन झाले असून तो हात जोडून मोठया नम्रपणे मान खाली घालून उभा राहिलेला आहे, हे पाहून श्रीहरींचे प्रिय पार्षद सुनंद आणि नंद त्याच्याजवळ जाऊन हास्यमुखाने म्हणाले. (१९-२२)

सुनंद आणि नंद म्हणू लागले- राजन, आपले कल्याण असो. आपण लक्षपूर्वक आमचे म्हणणे ऐका. आपण पाच वर्षांचे असतानाच तपश्चर्या करून सर्वेश्वर भगवंतांना प्रसन्न करून घेतले होते. आम्ही त्याच संपूर्ण जगन्नियंत्या शा पाणी भगवान विष्णूंचे सेवक आहोत आणि आपल्याला भगवंतांच्या धामामध्ये नेण्यासाठी येथे आलो आहोत. आपण अति दुर्लभ विष्णुलोक प्राप्त केला आहे, परमज्ञानी सप्तर्षीसुद्धा तेथे पोहोचू शकले नाहीत, तर ते खालून फक्त तिकडे पाहात आहेत. सूर्य, चंद्र इत्यादी ग्रह, नक्षत्रे आणि तारागणसुद्धा त्याला प्रदक्षिणा घालतात. चला, आपण त्याच विष्णुधामात निवास करावा. हे राजन, आजपर्यंत आपले पूर्वज किंवा आणखी कोणीही त्या पदापर्यंत कधी पोहोचू शकले नाहीत. भगवान विष्णूंचे ते परमधाम सार्‍या जगाला वंदनीय आहे. आपण तेथे येऊन विराजमान व्हावे. हे चिरंजीव, हे श्रेष्ठ विमान पुण्यश्लोक शिखामणी श्रीहरींनी आपल्यासाठी पाठविले आहे. आपण यात बसावे. (२३-२७)

मैत्रेय म्हणतात- भगवंतांच्या प्रमुख पार्षदांची ही अमृतमय वाणी ऐकून ध्रुवाने स्नान केले. नंतर संध्या-वंदनादी नित्य कर्मे आटोपून मंगल अलंकार धारण केले. नंतर बदरिकाश्रमात राहणार्‍या मुनींना प्रणाम करून त्यांचा आशिर्वाद घेतला. यानंतर त्या श्रेष्ठ विमानाची पूजा करून त्याला प्रदक्षिणा घातली आणि पार्षदांना प्रणाम करून सुवर्णाप्रमाणे कांतिमान रूप धारण करून त्यावर चढण्यासाठी तो तयार झाला. इतक्यात ध्रुवाने पाहिले की, काळ प्रत्यक्ष त्याच्या समोर उभा आहे. तेव्हा त्या मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून त्या अद्‌भुत विमानात तो चढला. त्यावेळी आकाशात दुंदुभी, मृदंग, ढोल इत्यादी वाद्ये वाजू लागली. श्रेष्ठ गंधर्व गाऊ लागले आणि फुलांचा वर्षाव होऊ लागला. (२८-३१)

विमानात बसून जेव्हा भगवंतांच्या धामाकडे जाण्यासाठी ध्रुव तयार झाला, तेव्हा त्याला लगेच आपली माता सुनीती हिची आठवण झाली. तो विचार करू लागला. बिचार्‍या आईला सोडून मी एकटाच दुर्लभ वैकुंठधामाला कसा जाऊ ? (३२)

नंद आणि सुनंद यांनी ध्रुवाच्या मनातील गोष्ट जाणली आणि त्याला दाखविले की, देवी सुनीती दुसर्‍या विमानातून पुढे जात आहे.(३३)

त्याने क्रमाने सर्व ग्रह पाहिले. वाटेत प्रत्येक ठिकाणी विमानात बसलेले देव त्याची प्रशंसा करीत फुलांचा वर्षाव करीत जात होते. त्या दिव्य विमानात बसून ध्रुव त्रैलोक्य पार करून सप्तर्षिमंडळाच्याही वर भगवान विष्णूंच्या नित्यधामात पोहोचला. अशा प्रकारे त्याने अढळ पद मिळविले. हे दिव्य धाम स्वयंप्रकाशानेच प्रकाशित आहे. याच्या प्रकाशाने तिन्ही लोक प्रकाशित झाले आहेत. जीवांवर दया न करणारी माणसे येथे जाऊ शकत नाहीत. जे रात्रंदिवस प्राण्यांचे कल्याण करतात, तेच येथे जाऊ शकतात. जे शांत, समदर्शी, शुद्ध, आणि सर्व प्राण्यांना प्रसन्न ठेवणारे आहेत, तसेच भगवद्भक्तांनाच एकमात्र खरा सुहृद मानतात, असे लोकच सहजतेने या भगवद्धामाची प्राप्ती करून घेतात. (३४-३७)

अशा प्रकारे उत्तानपादाचा पुत्र ध्रुव तिन्ही लोकांच्या वर त्यावरील तेजस्वी चूडामण्याप्रमाणे विराजमान झाला. कुरुनंदना, ज्याप्रमाणे खांबाच्या सर्व बाजूंनी बैल वेगाने फिरतात, त्याचप्रमाणे हे अत्यंत वेगवान ज्योतिश्चक्र, त्या अविनाशी लोकाच्या आश्रयानेच नेहमी फिरत असते. त्याचा हा महिमा पाहून देवर्षी नारदांनी प्रचेतांच्या यज्ञात वीणा वाजवून हे तीन श्लोक म्हटले होते. (३८-४०)

नारद म्हणाले- पतिपरायण सुनीतीचा पुत्र ध्रुव याने तपश्चर्येच्या प्रभावाने जी गती मिळविली, ती भागवतधर्म जाणणारे वेदवेत्ते ब्रह्मर्षीसुद्धा मिळवू शकत नाहीत; मग अन्य राजांची गोष्ट तर दूरच ! जो पाच वर्षांचा मुलगा सावत्र मातेच्या वाग्बाणांनी विद्ध होऊन दुःखी हृदयाने वनात निघून गेला आणि मी केलेल्या उपदेशानुसार आचरण करून ज्याने केवळ आपल्या भक्तांच्या गुणांनीच जिंकल्या जाणार्‍या त्या अजिंक्य प्रभूंना आपलेसे केले. (४१-४२)

पाच-सहा वर्षांचा असतानाच ज्याने काही दिवसांच्या तपश्चर्येनेच भगवंतांना प्रसन्न करून घेऊन त्यांचे परमपद प्राप्त करून घेतले, ते अढळ पद या पृथ्वीवर दुसरा कोणी क्षत्रिय अनेक वर्षे तपश्चर्या करूनही मिळविण्याची इच्छा तरी धरू शकेल काय ? (मिळविणे तर दूरच !) (४३)

मैत्रेय म्हणतात- विदुरा, तू मला उदारकीर्ती ध्रुवाच्या चरित्राविषयी विचारले होते, ते मी तुला इत्थंभूत ऐकविले. साधुपुरुष या चरित्राची फारच प्रशंसा करतात. हे धन, यश, आयुष्य यांची वृद्धी करणारे, परम पवित्र आणि मंगलमय आहे. यामुळे स्वर्ग आणि अविनाशी पदसुद्धा प्राप्त होऊ शकते. हे देवत्वाची प्राप्ती करून देणारे अतिशय प्रशंसा करण्यायोग्य आणि सर्व पापांचा नाश करणारे आहे. भगवद्भक्त ध्रुवाचे हे पवित्र चरित्र जो श्रद्धापूर्वक वारंवार ऐकतो, त्याला भगवंतांची भक्ती प्राप्त होते आणि त्यामुळे त्याच्या सर्व दुःखांचा नाश होतो. हे श्रवण करणार्‍याला शील इत्यादी गुणांची प्राप्ती होते. ज्यांना महत्व मिळविण्याची इच्छा आहे, त्यांना महत्त्व मिळण्याच्या स्थानाची प्राप्ती होते, ज्यांना तेज पाहिजे त्यांना तेज प्राप्त होते आणि मान हवा असणार्‍या लोकांचा मान वाढतो. पवित्रकीर्ती ध्रुवाच्या या महान चरित्राचे सकाळी आणि संध्याकाळी द्विजांच्या समाजामध्ये एकाग्र चित्ताने कीर्तन करावे. भगवंतांच्या परम पवित्र चरणांना शरण जाणारा जो पुरुष हे चरित्र निष्काम भावाने पौर्णिमा, अमावास्या, द्वादशी, श्रवण नक्षत्र, तिथिक्षय, व्यतीपात, संक्रांत किंवा रविवारच्या दिवशी श्रद्धाळू पुरुषांना ऐकवितो, तो स्वतः आपल्या आत्म्यामध्येच संतुष्ट राहू लागतो आणि सिद्ध होतो. हे साक्षात भगवद्‌विषयक अमृतमय ज्ञान आहे. जे लोक भगवन्मार्गाचे मर्म जाणत नाहीत, त्यांना जो कोणी हे प्रदान करील, त्या दीनवत्सल कृपाळू पुरुषावर देवता अनुग्रह करतात. (४४-५१)

ध्रुवाचे कर्म सर्वत्र प्रसिद्ध आणि परम पवित्र आहे. त्याने आपल्या बाल्यावस्थेतच आईचे घर आणि खेळणी यांचा मोह सोडून तो भगवान श्रीविष्णूंना शरण गेला. कुरुश्रेष्ठा, त्याचे हे पवित्र चरित्र मी तुला सांगितले. (५२)

स्कंध चवथा - अध्याय बारावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP