श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय ११ वा

स्वायंभुव मनूने ध्रुवाला युद्ध बंद करण्यासाठी समजाविणे -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

मैत्रेय म्हणाले - ऋषींचे हे बोलणे ऐकून ध्रुवाने आचमन करून नारायणास्त्र आपल्या धनुष्यावर चढविले. तो बाण योजताच यक्षांनी रचलेल्या माया त्याच क्षणी नष्ट झाल्या. जसे ज्ञानाचा उदय होताच अविद्यादी क्लेश नष्ट होतात. नारायणास्त्र धनुष्यावर चढविताच त्यातून राजहंसासारखे पंख आणि सोन्याचे फाळ असलेले तीक्ष्ण बाण बाहेर पडले आणि ज्याप्रमाणे मोर ओरडत वनामध्ये प्रवेश करतात, त्याप्रमाणे भयानक सूं-सूं आवाज करीत शत्रुसेनेत घुसले. त्या तीक्ष्ण धारेच्या बाणांनी शत्रूंना बेचैन केले. तेव्हा त्या रणांगणात अनेक यक्षांनी अत्यंत रागाने आपापली शस्त्रास्त्रे उगारली आणि ज्याप्रमाणे मोठमोठे साप फणा उभारून गरुडाकडे धाव घेतात, त्याप्रमाणे ते चहूबाजूंनी ध्रुवावर तुटून पडले. त्यांना समोरून येताना पाहून ध्रुवाने आपल्या बाणांनी त्यांचे हात, मांडया खांदे, पोट इत्यादी अवयव छिन्न-विच्छिन्न करून त्यांना जेथे ऊर्ध्वरेता मुनिगण सूर्यमंडलाचा भेद करून जातात, त्या सर्वश्रेष्ठ सत्यलोकात पाठविले. पितामह स्वायंभुव मनूंनी जेव्हा हे पाहिले की, दिव्य रथावर आरूढ झालेला ध्रुव अनेक निरपराध यक्षांना मारत आहे, तेव्हा त्यांना त्यांची दया आली. ते पुष्कळ ऋषींना बरोबर घेऊन तेथे आले आणि आपला नातू ध्रुव याला समजावू लागले. (१-६)

मनू म्हणाले- वत्सा, पुरे, पुरे. इतका क्रोध करणे बरे नव्हे. कारण हे पापी नरकाचे दार आहे. याच्याच अधीन होऊन तू या निरपराध यक्षांचा वध केला आहेस. बाबा रे ! तू जो हा निर्दोष यक्षांचा संहार करीत आहेस, ते आपल्या कुलाला शोभणारे कर्म नाही. साधुपुरुष याची निंदा करतात. मुला, तुझे आपल्या भावावर फार प्रेम होते, म्हणून त्याच्या वधाने संतप्त होऊन तू एका यक्षाने अपराध केल्याबरोबर त्यानिमित्ताने पुष्कळांची हत्या केलीस. या जड शरीरालाच आत्मा समजून याच्यासाठी पशूंप्रमाणे प्राण्यांची हिंसा करणे हा भगवत्सेवा करणार्‍य़ा साधूंचा मार्ग नव्हे.प्रभूंची आराधना करणे फार कठीण आहे. परंतु तू बालपणीच संपूर्ण भूतांचे आश्रयस्थान अशा श्रीहरींची सर्वभूतात्मभावाने आराधना करून त्यांचे परमपद प्राप्त करून घेतले आहेस. तुला तर प्रभू आपला प्रिय भक्त समजतात आणि भक्तजनसुद्धा तुझा आदर करतात. तू साधुजनांचा मार्गदर्शक आहेस; तरीसुद्धा तू असे निंद्य कर्म कसे केलेस ? सर्वात्मा श्रीहरी आपल्यापेक्षा ज्येष्ठ पुरुषांबाबत सहनशीलता, कनिष्ठांच्याबद्दल दया, बरोबरीच्या लोकांबद्दल मित्रता आणि सर्वांशी समतेने वागण्यानेच प्रसन्न होतात. आणि प्रभू प्रसन्न झाल्यावर पुरुष सत्त्वादी गुण आणि त्याचे कार्यरूप लिंगशरीर यांपासून मुक्त होऊन परमानंदस्वरूप अशा ब्रह्मपदाची प्राप्ती करून घेतो. (७-१४)

देहरूपात परिणत झालेल्या पंचमहाभूतांपासूनच या जगात स्त्री-पुरुष उत्पन्न होतात आणि पुन्हा त्यांच्या परस्पर समागमाने दुसर्‍या स्त्री-पुरुषांची उत्पत्ती होते. अशा प्रकारे भगवंतांच्या मायेपासून सत्त्वादी गुणांमध्ये कमीजास्तपणा झाल्याने जशी भूतांतून शरीरांची रचना होते, त्याचप्रमाणे त्यांची स्थिती आणि प्रलयसुद्धा होतो. निर्गुण परमात्मा तर यांमध्ये केवळ निमित्तमात्र आहे. त्याच्या आश्रयानेच हे कार्य-कारणात्मक जग चुंबकाच्या सान्निध्याने लोखंड फिरावे तसे फिरत राहाते. काल-शक्तीमुळे क्रमशः सत्त्वादी गुणांमध्ये क्षोभ झाल्याने भगवंतांची शक्तीसुद्धा सृष्टी इत्यादी रूपांमध्ये व्यक्त होते. म्हणून भगवंत अकर्ता असूनही जगाची निर्मिती करतात आणि संहार करणारे नसूनही याचा संहार करतात. खरोखर त्या अनंत प्रभूंची लीला सर्वथैव अचिंतनीय आहे. कालस्वरूप अव्यय परमात्माच स्वतः अंतरहित असूनही जगाचा अंत करणारे आणि अनादी असूनही सर्वांचे आदिकर्ता आहेत. तेच एका जीवापासून दुसर्‍या जीवाला उत्पन्न करून सृष्टी निर्माण करतात. तसेच मृत्यूच्या द्वारा मारणार्‍यालासुद्धा मारून तिचा संहार करतात. ते कालभगवान संपूर्ण सृष्टीमध्ये समानरूपाने प्रविष्ट झालेले आहेत. त्यांचा कोणी मित्र नाही की कोणी शत्रू नाही. ज्याप्रमाणे वारा वाहू लागल्यानंतर त्याच्या मागोमाग धूळही उडते, त्याचप्रमाणे सर्व जीव आपापल्या कर्मांच्या अधीन होऊन कालाच्या मागोमाग धावत असतात. (१५-२०)

सर्वसमर्थ श्रीहरी कर्मबंधनाने बांधलेल्या जीवाच्या आयुष्याची वृद्धी आणि क्षय करतात; परंतु ते स्वतः या दोहोंपासून अलिप्त आणि आपल्या स्वरूपात स्थित आहेत. हे राजा, या परमात्म्यालाच मीमांसक कर्म, चार्वाक स्वभाव, वैशेषिक काल, ज्योतिषी दैव, आणि कामशास्त्रज्ञ काम म्हणतात. बाळा, ते भगवान कोणतेही इंद्रिय किंवा प्रमाण याचे विषय नाहीत. महदादी अनेक शक्तीसुद्धा त्यांच्यापासूनच प्रगट झालेल्या आहेत. ते काय करू इच्छितात, ही गोष्ट या जगात कोणालाच माहीत नाही; तर आपले मूळ कारण असणार्‍या त्या प्रभूंना कोण जाणू शकेल ? (२१-२३)

पुत्रा, हे कुबेराचे सेवक तुझ्या भावाला मारणारे नव्हेत; कारण मनुष्याच्या जन्म-मरणाचे वास्तविक कारण ईश्वरच आहे. तेच विश्वाचे निर्माते, पालनकर्ते आणि संहार करणारे आहेत. परंतु ते अहंकारशून्य असल्यामुळे गुण आणि कर्मांपासून नेहमी अलिप्त असतात. सर्व प्राण्यांचा अंतरात्मा, नियंता आणि रक्षण करणारे प्रभूच आपल्या मायाशक्तीने युक्त होऊन सर्व जीवांची उत्पत्ती पालन आणि संहार करतात. ज्याप्रमाणे नाकांत वेसण घातलेले बैल आपल्या मालकाचे ओझे वाहतात,त्याचप्रमाणे जगाची रचना करणारे ब्रह्मदेव इत्यादी नामरूप दोरीने बांधलेले त्यांच्याच आज्ञेचे पालन करतात. ते अभक्तांना मृत्युरूप आणि भक्तांना अमृतरूप आहेत. तसेच विश्वाचे एकमात्र आधार आहेत. बाळा, तू सर्वस्वी त्या परमात्म्यालाच शरण जा. हे बाळा, तू पाच वर्षांचा असतानाच आपल्या सावत्र मातेच्या कठोर वचनांनी व्यथित होऊन आईची मांडी सोडून वनामध्ये गेला होतास. तेथे तपश्चर्या करून ज्या हृषीकेश भगवंतांची आराधना करून तू त्रैलोक्याच्याही वरचे ध्रुवपद प्राप्त केलेस आणि जे तुझ्या वैरभाव नसलेल्या सरळ हृदयामध्ये वात्सल्याने विशेषरूपाने विराजमान झाले होते, त्या निर्गुण, अद्वितीय, अविनाशी आणि नित्यमुक्त परमात्म्याचा अध्यात्मदृष्टीने आपल्या अंतःकरणात शोध घे. हा भेदभावमय प्रपंच वस्तुतः नसतानाही त्यांच्यामध्ये प्रतीत होत आहे. असे केल्याने सर्वशक्तिसंपन्न परमानंदस्वरूप सर्वांतर्यामी भगवान अनंतांमध्ये तुझी दृढ भक्ती उत्पन्न होईल आणि तिच्या प्रभावाने तू "मी-माझे" या रूपाने दृढ झालेल्या अविद्यारूपी गाठीला छेदून टाकशील. (२४-३०)

राजन, ज्याप्रमाणे औषधाने रोग बरा केला जातो, त्याचप्रमाणे मी तुला जो काही उपदेश केला आहे, त्यावर विचार करून आपला क्रोध आवर. कल्याणमार्गाला क्रोध हा अत्यंत विरोधी आहे. भगवान तुझे मंगल करोत. क्रोधाधीन पुरुषाचे सर्वांना मोठे भय वाटते. म्हणून जो बुद्धिमान पुरुष असे इच्छितो की आपल्यापासून कोणत्याही प्राण्याला भय असू नये आणि स्वतःलाही कोणापासून भय असू नये, त्याने क्रोधाच्या अधीन कधीच होऊ नये. हे माझ्या भावाला मारणारे आहेत असे समजून तू इतक्या यक्षांचा संहार केलास, त्यामुळे तुझ्याकडून भगवान शंकरांचा सखा कुबेर याचा मोठा अपराध झाला आहे. म्हणून पुत्रा, जोपर्यंत महापुरुषांचे तेज आमच्या कुलावर आघात करीत नाही, तोवरच विनम्र भाषण आणि विनय यांच्याद्वारा ताबडतोब त्यांना प्रसन्न करून घे. (३१-३४)

अशा प्रकारे स्वायंभुव मनूंनी आपला नातू ध्रुव याला उपदेश केला. तेव्हा ध्रुवाने त्यांना नमस्कार केला. त्यानंतर ते महर्षींसह आपल्या लोकी गेले. (३५)

स्कंध चवथा - अध्याय अकरावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP