|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ४ था - अध्याय १० वा
यक्षांकडून उत्तमाचा वध व ध्रुवाचे यक्षांबरोबर युद्ध - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] मैत्रेय म्हणतात - ध्रुवाने प्रजापती शिशुमाराची कन्या भ्रमी हिच्याशी विवाह केला. तिच्यापासून त्याला कल्प आणि वत्सर नावाचे दोन पुत्र झाले. महाबली ध्रुवाची दुसरी पत्नी वायुपुत्री इला होती. तिच्यापासून तिला उत्कल नावाचा पुत्र आणि एक कन्यारत्न झाले. उत्तमाचा अजून विवाह झाला नव्हता. एक दिवस शिकार करतेवेळी त्याला हिमालय पर्वतावर एका बलवान यक्षाने मारले. त्याच्याबरोबर त्याची माता सुद्धा परलोकवासी झाली. (१-३) बंधू मारला गेल्याचा वृत्तांत जेव्हा ध्रुवाला समजला, तेव्हा क्रोध, असहिष्णुता आणि शोक यांनी व्याप्त होऊन तो एका विजयी रथावर स्वार होऊन यक्षांच्या देशात गेला. त्याने उत्तर दिशेकडे जाऊन हिमालयाच्या घाटीतील यक्षांनी भरलेली अलकापुरी पाहिली. तेथे अनेक भूत, प्रेत, पिशाच्च इत्यादी रुद्राचे गण राहात होते. हे विदुरा, तेथे पोहोचल्यावर महाबाहू ध्रुवाने आपला शंख फुंकला. त्यामुळे सर्व आकाश आणि दिशा दुमदुमून गेल्या. त्या शंखध्वनीमुळे यक्षांच्या पत्न्या फारच घाबरल्या. भयाने त्यांचे डोळे सैरभैर झाले. (४-६) बलवान यक्षवीरांना तो शंखनाद सहन झाला नाही. म्हणून ते निरनिराळी शस्त्रास्त्रे घेऊन नगराच्या बाहेर आले आणि ध्रुवावर तुटून पडले. महारथी, प्रचंड धनुष्य घेतलेल्या शूर ध्रुवाने एकाच वेळी त्यांच्यापैकी प्रत्येकाला तीन तीन बाण मारले. जेव्हा त्या सर्वांनी आपापल्या कपाळाला तीन तीन बाण लागलेले पाहिले, तेव्हा त्यांची खात्री पटली की, आपण निश्चितपणे हरणार ! त्यांनी त्याच्या पराक्रमाची प्रशंसा केली. नंतर सर्प जसा कोणाच्या पायाचा आघात सहन करीत नाही, त्याचप्रमाणे ध्रुवाचा हा पराक्रम सहन न होऊन त्यांनीसुद्धा त्या बाणांना प्रत्युत्तर म्हणून एकाच वेळी त्याच्या दुप्पट - सहा सहा बाण सोडले. यक्षांची संख्या एक लक्ष तीस हजार इतकी होती. त्यांनी ध्रुवाचा बदला घेण्यासाठी संतापून रथ आणि सारथ्यासहित त्याच्यावर परिघ, खड्ग, प्रास, त्रिशूळ, फरशी, शक्ती, ऋष्टी, भुशुंडी तसेच चित्र-विचित्र टोकदार बाणांचा वर्षाव केला. या भीषण शस्त्रवर्षावाने ध्रुव पूर्णपणे झाकला गेला. ज्याप्रमाणे मुसळधार पावसामुळे पर्वत दिसत नाही, त्याप्रमाणे त्यांना ध्रुव दिसेनासा झाला. त्यावेळी जे सिद्धगण आकाशातून हे दृश्य पाहात होते, ते सर्व हाय हाय करीत म्हणू लागले, ‘आज यक्षसेनारूप समुद्रात बुडून या मानवसूर्याचा अस्त झाला.’ यक्षसमूह आपल्या विजयाची गर्जना करीत आहेत, तोच ध्रुवाचा रथ एकाएकी धुक्यातून सूर्य प्रगट व्हावा, तसा दिसू लागला. (७-१५) ध्रुवाने आपल्या दिव्य धनुष्याचा टणत्कार करून शत्रूंना भयभीत केले आणि वार्याने ढगांची दाणादाण उडवावी, तशी बाणांचा वर्षाव करून त्यांची अस्त्रे छिन्न-विच्छिन्न केली. त्यांच्या धनुष्यातून सुटलेले तीक्ष्ण बाण, यक्ष-राक्षसांची कवचे छेदून त्यांच्या शरीरात, इंद्राने सोडलेले वज्र पर्वतांमध्ये घुसावे तसे घुसले. ध्रुवाच्या बाणांनी तुटलेल्या सुंदर कुंडलमंडित मस्तकांनी, ताल-वृक्षांसारख्या मांडयांनी, वलयविभूषित हातांनी, हार, बाजूबंद, मुकुट, आणि मौल्यवान पगडयांनी आच्छादिलेली आणि वीरांचे मन वेधून घेणारी ती समरभूमी सुशोभित झाली. जे यक्ष जिवंत रहिले, ते क्षत्रियश्रेष्ठ ध्रुवाच्या बाणांनी अवयव छिन्न-विच्छिन्न होऊन रणांगण सोडून पळून गेले. जसे सिंहाच्या पराक्रमाने पराभूत झालेले हत्ती. (१६-२०) नरश्रेष्ठ ध्रुवाने त्या विस्तृत रणभूमीवर एकही शस्त्रधारी शत्रू पाहिला नाही, तेव्हा त्याला अलकापुरी पाहाण्याची इच्छा झाली. परंतु तो नगरात गेला नाही. ‘हे मायावी काय करतील याचा माणसाला पत्ता लागत नाही.’ असे सारथ्याला म्हणून तो आपल्या अद्भुत रथात बसून राहिला. पण शत्रू नव्याने आक्रमण करतील, या शंकेने सावध राहिला. इतक्यात त्याला समुद्राच्या गर्जनेप्रमाणे झंझावाताचा भीषण आवाज ऐकू आला आणि सर्व दिशांना उडालेली धूळ दिसू लागली. (२१-२२) एका क्षणात सर्व आकाश मेघांनी आच्छादून गेले. सगळीकडे भयंकर गडगडाट होऊन विजा चमकू लागल्या. हे विदुरा, त्या ढगातून रक्ताच्या धारा, पू, विष्ठा, मूत्र व चरबीचा वर्षाव होऊ लागला. तसेच ध्रुवाच्या समोरच आकाशातून धडे पडू लागली. नंतर आकाशात एक पर्वत दिसू लागला. सर्व दिशांतून दगड, गदा, परिघ, तलवारी आणि मुसळे यांचा वर्षाव होऊ लगला. त्याला असे दिसले की, साप वज्राप्रमाणे फूत्कार करीत रागीट डोळ्यांनी आगीच्या ठिणग्या ओकत येत आहेत. तसेच मदोन्मत्त हत्ती, सिंह, आणि वाघ यांच्या झुंडीच्या झुंडी धावत आपल्याकडे येत आहेत. प्रलयकालाप्रमाणे भयंकर गर्जना करीत समुद्र आपल्या उत्तुंग लाटांनी पृथ्वीला सर्व बाजूंनी बुडवीत आपल्याकडे येत आहे. क्रूर स्वभावाच्या असुरांनी आपल्या आसुरी मायेने असे पुष्कळ खेळ दाखविले की ज्यामुळे भित्र्या लोकांची मने थरथर कापावी. ध्रुवावर असुरांनी आपली दुस्तर माया पसरली आहे, हे पाहून तेथे आलेल्या मुनींनी त्याच्यासाठी शुभचिंतन केले. (२३-२९) मुनी म्हणाले - हे उत्तानपादनंदन, ध्रुवा, शरणागतांचे भय नाहीसे करणारे शारङ्गपाणी भगवान तुझ्या शत्रूंचा संहार करोत ! भगवंतांचे नाव घेतल्याने किंबहुना ऐकल्याने मनुष्य दुस्तर मृत्यूच्या जबडयातून अनायासे वाचतो. (३०) स्कंध चवथा - अध्याय दहावा समाप्त |