|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ४ था - अध्याय ९ वा
वर मिळवून ध्रुवाचे घरी परतणे - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] मैत्रेय म्हणतात - भगवंतांनी अशा प्रकारे आश्वासन दिल्यानंतर देवतांचे भय नाहीसे झाले आणि त्यांना प्रणाम करून ते स्वर्गलोकात गेले. त्यानंतर विराटस्वरूप भगवान गरुडावर आरूढ होऊन आपल्या भक्ताला भेटण्यासाठी मधुवनात आले. त्यावेळी ध्रुव तीव्र योगाभ्यासाने एकाग्र झालेल्या बुद्धीने भगवंतांच्या विजेसारख्या दैदीप्यमान अशा ज्या मूर्तीचे आपल्या हृदयकमलात ध्यान करीत होता, ती एकाएकी अदृश्य झालेली पाहून त्याने जेव्हा डोळे उघडले, तेव्हा लगेच भगवंतांचे तेच रूप त्याने बाहेर आपल्यासमोर पाहिले. प्रभूंचे दर्शन झाल्याने ध्रुव गडबडून गेला. त्याने जमिनीवर साष्टांग लोटांगण घातले. नंतर तो अशा प्रकारे प्रेमपूर्ण दृष्टीने त्यांच्याकडे पाहू लागला की, जणू नेत्रांनी त्यांना पिऊन टाकावे, मुखाने त्यांचे चुंबन घ्यावे आणि हातांनी त्यांना आलिंगन द्यावे. तो हात जोडून प्रभूंच्या समोर उभा होता आणि त्यांची स्तुती करावी, असेही त्याला वाटत होते; परंतु ती कशी करावी हे त्याला कळत नव्हते. सर्वांतर्यामी हरींनी त्याचे मनोगत जाणले आणि कृपापूर्वक आपल्या वेदमय शंखाचा त्याच्या गालाला स्पर्श केला. भविष्यकाळात अढळ पद प्राप्त होणार असलेल्या ध्रुवाला त्याचक्षणी दिव्य वाणी प्राप्त झाली. जीव आणि ब्रह्म यांच्या स्वरूपाविषयी निश्चय झाला. तो अत्यंत भक्तिभावाने विश्वविख्यात, कीर्तिमान श्रीहरींची स्तुती करू लागला. (१-५) ध्रुव म्हणाला - प्रभो ! आपण सर्वशक्तिसंपन्न आहात. आपणच माझ्या अंतःकरणात प्रवेश करून आपल्या तेजाने माझ्या या सुप्त वाणीला जागृत केले. जे हात, पाय, कान, त्वचा इत्यादी निरनिराळ्या इंद्रियांना तसेच प्राणांनाही चेतना देतात, त्या आपणा अंतर्यामी भगवंतांना मी प्रणाम करतो. भगवन, आपण एकटेच आपल्या अनंत गुणमय मायाशक्तीने या महदादी संपूर्ण प्रपंचाची रचना करून अंतर्यामीरूपाने त्यात प्रवेश करता आणि पुन्हा त्याच्या इंद्रियादी विनाशी गुणांमध्ये त्यांच्या अधिष्ठानरूप देवतांच्या रूपात राहून अनेकरूपाने भासता. जसा निरनिराळ्या आकाराच्या लाकडांत प्रगट झालेला अग्नी आपल्या उपाधीनुसार वेगवेगळ्या रूपांत भासतो, अगदी त्याप्रमाणे. हे नाथ ! सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवांनी सुद्धा आपल्याला शरण येऊन आपण दिलेल्या ज्ञानाच्या प्रभावानेच झोपेतून उठलेल्या पुरुषाप्रमाणे हे विश्व पाहिले होते. हे दीनबंधो, त्याच आपल्या चरणतलाचा मुक्त पुरुषसुद्धा आश्रय घेतात. कोणत्याही कृतज्ञ पुरुषाला त्यांचे विस्मरण कसे होईल ? या प्रेतवत शरीराच्या द्वारा भोगले जाणारे, इंद्रिये आणि विषयांच्या संसर्गाने उत्पन्न झालेले सुख तर मनुष्याला नरकातही मिळू शकते. जे लोक त्या विषयसुखासाठी जन्म-मरणाच्या बंधनातून सोडविणार्या, कल्पतरुस्वरूप आपली आराधना आपल्या प्राप्तीखेरीज अन्य उद्देशाने करतात, त्यांच्या बुद्धीला निश्चितच आपल्या मायेने फसविलेले असते. हे नाथ ! आपल्या चरणकमलांचे ध्यान करण्याने आणि आपल्या भक्तांची पवित्र चरित्रे ऐकल्याने प्राण्यांना जो आनंद प्राप्त होतो, तो निजानंदस्वरूप ब्रह्मचिंतनातही मिळत नाही. तर मग ज्यांना कालरूपी तलवार कापून टाकते, त्या स्वर्गीय विमानातून पडणार्या पुरुषांना ते सुख कसे बरे मिळू शकेल ? (६-१०) हे अनंता, मला आपण ज्यांचा आपल्यामध्ये अखंड भक्तिभाव आहे, त्या विशुद्धहृदय महात्म्या भक्तांचा संग द्या. त्यांच्या संगतीत मी आपल्या गुण आणि लीलांचे कथामृत पिऊन पिऊन धुंद होऊन जाईन आणि सहजपणे या अनेक प्रकारच्या दुःखांनी पूर्ण, भयंकर, संसारसागराच्या पैलतीराला पोहोचेन. हे कमलनाभा, ज्यांचे चित्त आपल्या चरणकमलांच्या सुगंधामध्ये तल्लीन झाले आहे, त्या महानुभावांची जे लोक संगती करतात, त्यांना आपल्याला अत्यंत प्रिय असणारे हे शरीर आणि त्याच्याशी संबंधित पुत्र, मित्र, घर, द्रव्य, पत्नी, इत्यादींची आठवणही होत नाही. हे अजन्मा परमेश्वरा ! मी पशू, वृक्ष, पर्वत, पक्षी, सरपटणारे प्राणी, देव, दैत्य, मनुष्य आदींनी परिपूर्ण तसेच महदादी अनेक कारणांनी उत्पन्न झालेल्या आपल्या या स्थूल विश्वरूपालाच फक्त जाणतो. याच्या पलीकडे जे आपले परम स्वरूप आहे, जेथे वाणी पोहोचू शकत नाही, त्याचे मला ज्ञान नाही. (११-१३) भगवन, प्रलयकाली योगनिद्रेत स्थित असलेला जो परमपुरुष या संपूर्ण विश्वाला आपल्या उदरात लीन करून घेऊन शेषाबरोबर त्याच्याच अंगावर शयन करतो, तसेच ज्याच्या नाभि-समुद्रातून प्रकट झालेल्या सर्वलोकमय सुवर्णवर्ण कमलापासून परम तेजोमय ब्रह्मदेव उत्पन्न झाले, ते भगवंत आपणच आहात. मी आपल्याला नमस्कार करतो. (१४) प्रभो, आपण आपल्या अखंड चिन्मय दृष्टीने बुद्धीच्या सर्व अवस्थांचे साक्षी आहात. तसेच नित्यमुक्त, शुद्धसत्त्वमय, सर्वज्ञ, परमात्मस्वरूप, निर्विकार, आदिपुरुष, षडैश्वर्यसंपन्न आणि तिन्ही गुणांचे अधीश्वर आहात. आपण जीवापासून सर्वथैव वेगळे आहात. तसेच विश्वाच्या स्थितीसाठी यज्ञाचा अधिष्ठाता अशा विष्णुरूपाने विराजमान आहात. आपल्या ठिकाणीच विद्या-अविद्या इत्यादी विरुद्ध गती असणार्या अनेक शक्ती क्रमाने निरंतर प्रगट होत असता, आपण मात्र जगाचे कारण, अखंड, अनादी, अनंत, आनंदमय, निर्विकार ब्रह्मस्वरूप आहात. मी आपणांस शरण आलो आहे. भगवन, आपण परमानंदमूर्ती आहात, असे समजून जे लोक निष्काम भावाने आपले निरंतर भजन करतात, त्यांच्यासाठी, राज्यादी भोगांपेक्षाही आपल्या चरणकमलांची प्राप्ती हे भजनाचे खरे फळ आहे. स्वामिन, असे असले तरी जशी गाय आपल्या नुकत्याच जन्मलेल्या वासराला दूध पाजते आणि वाघ इत्यादींपासून त्याचा बचाव करते, त्याचप्रमाणे आपणही भक्तांवर कृपा करण्यासाठी नेहमी उत्सुक असल्यामुळे आमच्यासारख्या सकाम जीवांच्याही इच्छा पूर्ण करून त्यांचे संसारभयापासून रक्षण करीत असता. (१५-१७) मैत्रेय म्हणतात- जेव्हा शुभसंकल्प असणार्या बुद्धिमान ध्रुवाने याप्रमाणे स्तुती केली, तेव्हा भक्तवत्सल भगवान त्याची प्रशंसा करीत म्हणाले. (१८) श्रीभगवान म्हणाले - व्रताचे उत्तम पालन करणार्या राजकुमारा, मी तुझ्या हृदयातील संकल्प जाणतो. त्या पदाची प्राप्ती होणे जरी दुरापास्त आहे, तरीसुद्धा मी तुला ते देतो. तुझे कल्याण असो. (१९) बाळा, ज्या तेजोमय अविनाशी लोकाला आजपर्यंत कोणी प्राप्त केले नाही, ज्याच्या चारी बाजूंनी ग्रह, नक्षत्र, आणि तारांगणयुक्त ज्योतिश्चक्र अशा प्रकारे प्रदक्षिणा करीत असते की, ज्याप्रमाणे धान्यमळणीखुंटयाच्या चारी बाजूंनी बैल फिरत असतो, अवांतर कल्पापर्यंत राहाणार्या अन्य लोकांचा नाश झाल्यानंतरही जो स्थिर राहातो, तसेच तारागणांसहित धर्म, अग्नी, कश्यप, आणि शुक्र आदी नक्षत्रे तसेच सप्तर्षिगण ज्याची प्रदक्षिणा करतात, तो ध्रुवलोक मी तुला देतो. (२०-२१) येथेसुद्धा जेव्हा तुझे वडील तुला राज्य देऊन वनात जातील, तेव्हा तू छत्तीस हजार वर्षांपर्यंत धर्मपूर्वक पृथ्वीचे पालन करशील. तुझ्या इंद्रियांची शक्ती जशीच्या तशी कायम राहील. पुढे जेव्हा तुझा भाऊ उत्तम शिकार खेळताना मारला जाईल, तेव्हा त्याची माता सुरुची पुत्रप्रेमाने वेडी होऊन जंगलात त्याचा शोध करीत असताना अग्नीमध्ये प्रवेश करील. यज्ञ माझी प्रिय मूर्ती आहे. तू अनेक मोठमोठया दक्षिणा द्याव्या लागणार्या यज्ञांनी माझे पूजन करशील आणि येथे उत्तमोत्तम भोग भोगून शेवटी माझे स्मरण करशील. यामुळे तू शेवटी संपूर्ण लोकांना वंदनीय आणि सप्तर्षींच्याही वर असलेल्या माझ्या निजधामाला जाशील. तेथे गेल्यावर पुन्हा संसारात यावे लागत नाही. (२२-२५) मैत्रेय म्हणतात- ध्रुवाकडून अशा प्रकारे पूजित झालेले भगवान श्रीगरुडध्वज त्याला आपले पद प्रदान करून तो पाहात असतानाच आपल्या लोकी गेले. प्रभूंच्या चरणसेवेने संकल्पित वस्तू प्राप्त झाल्यामुळे जरी ध्रुवाची इच्छा पूर्ण झाली, तरी काहीशा अप्रसन्न चित्ताने तो आपल्या नगराकडे परत आला. (२६-२७) विदुराने विचारले- ब्रह्मन ! मायापती श्रीहरींचे परमपद अत्यंत दुर्लभ आहे आणि त्यांच्या चरणकमलांच्या उपासनेमुळेच तर ते मिळते. सारासार जाणणार्या ध्रुवाला एका जन्मातच ते परमपद मिळूनसुद्धा तो स्वतःला अकृतार्थ का मानत होता ? (२८) मैत्रेय म्हणाले- आपल्या सावत्र मातेच्या वाग्बाणांनी ध्रुवाचे हृदय घायाळ झाले होते. त्याचे स्मरण होऊन त्याने मुक्तिदात्या श्रीहरीकडे मुक्ती मागितली नाही. म्हणून त्याला आपल्या या चुकीबद्दल पश्चात्ताप झाला. (२९) ध्रुव मनात म्हणू लागला- सनकादी नैष्ठिक ब्रह्मचारी सुद्धा जे पद समाधीने अनेक जन्मांनंतर प्राप्त करतात, ती भगवच्चरणांची छाया मी सहा महिन्यांतच प्राप्त केली. परंतु चित्तामध्ये दुसरी वासना असल्यामुळे मी पुन्हा त्या पदापासून दूर गेलो. (३०) अहो ! मज अभाग्याचा केवढा हा मूर्खपणा ! मी संसारातून सोडविणार्या प्रभूंच्या चरणांजवळ पोहोचूनसुद्धा त्यांच्याकडे नाशवान वस्तूचीच याचना केली. देवांना सुद्धा स्वर्गातील भोग भोगल्यानंतर पुन्हा पृथ्वीतलावर यावे लागते, म्हणून त्यांना माझी भगवत्प्राप्तिरूप उच्च स्थिती सहन झाली नाही. म्हणूनच त्यांनी माझी बुद्धी भ्रष्ट केली. त्यामुळेच तर मी दुष्टाने नारदांचे यथार्थ म्हणणे मानले नाही. जरी जगामध्ये आत्म्याशिवाय दुसरा कोणी नाही, तरीसुद्धा जसे झोपलेला मनुष्य स्वप्नात आपणच झालेल्या वस्तूंना आपल्याहून निराळ्या मानतो; त्याचप्रमाणे मीसुद्धा भगवंतांच्या मायेने मोहित होऊन भावालाच शत्रू मानले आणि व्यर्थ द्वेषरूपी मानसिक पीडेने जळू लागलो. ज्यांना प्रसन्न करणे अत्यंत कठीण आहे, त्या विश्वात्मा श्रीहरींना तपश्चर्येने प्रसन्न करून घेऊन मी जे काही मागितले, ते सर्व आयुष्य संपलेल्या माणसाचे रोगनिदान व्यर्थ जावे, तसे व्यर्थ आहे. केवढा मी अभागी ! संसारबंधनाचा नाश करणार्या प्रभूकडे मी संसारच मागितला. ज्याप्रमाणे एखाद्या दरिद्री माणसाने चक्रवर्ती सम्राटाकडे कोंडा असलेल्या तांदळाच्या कण्या मागाव्यात, त्याप्रमाणे पुण्यहीन अशा मीसुद्धा आत्मानंद प्रदान करणार्या श्रीहरींकडून अभिमान वाढविणारे पद मागितले. (३१-३५) मैत्रेय म्हणतात - बाबा रे, तुझ्याप्रमाणे जे लोक श्रीमुकुंदाच्या चरणकमलरजांचेच सेवन करतात आणि ज्यांचे मन आपोआप आलेल्या सर्व परिस्थितींमध्ये संतुष्ट राहाते, ते भगवंतांकडून त्यांच्या सेवेशिवाय आपल्यासाठी दुसरा कोणताही पदार्थ मागत नाहीत. (३६) इकडे जेव्हा राजाने ऐकले की, आपला पुत्र ध्रुव घरी परत येतो आहे, तेव्हा त्याचा या गोष्टीवर जसा यमलोकाहून कोणी परत आला आहे, या गोष्टीवर विश्वास बसत नाही, तसा विश्वास बसला नाही. त्याने असा विचार केला की,"मज अभाग्याचे एवढे भाग्य कोठून असणार ?" परंतु त्याचा देवर्षी नारदांच्या सांगण्यावर विश्वास असल्यामुळे तो आनंदाने वेडा झाला. त्याने अत्यंत प्रसन्न होऊन ही बातमी आणणार्याला एक बहुमूल्य रत्नहार दिला. राजा उत्तानपादाने पुत्राचे मुख पाहाण्यासाठी उत्सुक होऊन पुष्कळसे ब्राह्मण, कुलातील वडील मंडळी, मंत्री. आणि बंधुजनांना बरोबर घेतले आणि एका उत्तम घोडयांच्या सुवर्णजडित रथावर स्वार होऊन तो तातडीने नगराच्या बाहेर आला. त्याच्यापुढे वेदमंत्रघोष होत होता. तसेच शंख, दुंदुभी, बासरी अशी अनेक मंगल वाद्ये वाजत होती. त्याच्या दोन्ही राण्या सुनीती आणि सुरुची सुवर्णमय अलंकारांनी नटून राजकुमार उत्तमाबरोबर पालखीत बसून चालल्या होत्या. ध्रुव उपवनाजवळ येऊन पोहोचला, तेव्हा त्याला पाहाताच राजा लगेच रथातून खाली उतरला. पुत्राला पाहाण्यासाठी तो पुष्कळ दिवसांपासून उत्कंठित होता. त्याने लगेच पुढे होऊन, प्रेमभराने निश्वास टाकीत ध्रुवाला आपल्या मिठीत घेतले. कारण आता प्रभूच्या चरणस्पर्शाने ध्रुवाचे सर्व पाप-बंधन नष्ट झाले होते. राजाची एक मोठी इच्छा पूर्ण झाली होती. त्याने पुन्हा पुन्हा पुत्राच्या मस्तकाचे अवघ्राण केले आणि प्रेमामुळे आलेल्या थंड आसवांनी त्याला न्हाऊ घातले. (३७-४४) त्यानंतर सज्जनांमध्ये अग्रगण्य असणार्या ध्रुवाने पित्याच्या चरणांना नमस्कार केला आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्याकडून संमानित झालेल्या त्याने दोन्ही मातांना प्रणाम केला. सुरुचीने आपल्या चरणांना वंदन करणार्या त्या बालकाला उठवून छातीशी धरले आणि अश्रुगद्गद वाणीने "चिरंजीव हो" असा आशीर्वाद दिला. जसे पाणी स्वतःच उताराकडे धावते, त्याचप्रमाणे मैत्री आदी गुणांमुळे ज्याच्यावर भगवान प्रसन्न होतात, त्याच्याकडे सर्व जीव ओढ घेतात. इकडे उत्तम आणि ध्रुव दोघेही प्रेमभरित अंतःकरणाने एकमेकांना भेटले. एकमेकांच्या अंगाचा स्पर्श झाल्याने दोघांच्याही शरीरावर रोमांच उभे राहिले आणि नेत्रांतून वारंवार अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ध्रुवाची आई सुनीती आपल्या प्राणाहूनही प्रिय मुलाला मिठी मारून सगळे दुःख विसरली. त्याच्या अंगाच्या स्पर्शानेच तिला मोठा आनंद झाला. हे वीरवरा, सुनीतीच्या नेत्रांतून वाहाणार्या मंगल आनंदाश्रूंनी त्या वीरमातेचे स्तन भिजून गेले आणि त्यांतून वारंवार दुधाच्या धारा वाहू लागल्या. त्यावेळी नगरवासी लोक तिची प्रशंसा करीत म्हणू लागले."महाराणी ! आपला पुत्र पुष्कळ दिवस हरवला होता, मोठया भाग्याने तो आता परत आला आहे. हा आम्हां सगळ्यांचे दुःख दूर करील. दीर्घकाळपर्यंत हा भूमंडळाचे रक्षण करील. आपण निश्चितच शरणागतांचे दुःख दूर करणार्या श्रीहरींची उपासना केली आहे. त्यांचे निरंतर ध्यान करणारे धैर्यवान परम दुर्जय अशा मृत्यूवरही जय मिळवितात. (४५-५२) अशा प्रकारे सर्व लोक ध्रुवाबद्दल आपले प्रेम प्रगट करीत होते. भाऊ उत्तमासह ध्रुवाला हत्तिणीवर बसवून राजाने मोठया हर्षाने राजधानीत प्रवेश केला. त्यावेळी सर्व लोक त्यांची स्तुती करीत होते. (५३) नगरामध्ये जिकडे-तिकडे मगरीच्या आकाराची तोरणे बनविली होती. तसेच दारांवर फुलाफळांच्या गुच्छांसह केळीचे खांब आणि सुपारीची झाडे लावली होती. दारा-दारांवर दिव्यासहित पाण्याचे कलश ठेवले होते. ते आम्रपाने, वस्त्रे, फुलांच्या माळा आणि मोत्यांच्या लडींनी सजविले होते. ते नगर सुवर्णमंडित तट, महाद्वारे आणि महाल यांनी सुशोभित झाले होते. तसेच त्यांची कांती विमानांच्या शिखरांप्रमाणे चमकत होती. नगरातील चौक, राजमार्ग, माडया, सडका इत्यादींची झाडलोट करून त्यावर चंदनाचे पाणी शिंपडले होते. आणि जिकडे-तिकडे लाह्या, अक्षता, फुले, फळे, तांदूळ तसेच अन्य भेटसामग्री तयार ठेवली होती. ध्रुव राजमार्गावरून चालला असता जिकडे तिकडे नगरातील सुवासिनी त्याला वात्सल्यभावाने अनेक शुभाशीर्वाद देत, त्याच्यावर पांढर्या मोहर्या, अक्षता, दही, जल, दूर्वा, फुले, आणि फळांचा वर्षाव करीत होत्या.त्यांची मनोहर कवने ऐकत ध्रुवाने आपल्या पित्याच्या महालात प्रवेश केला. (५४-५९) ते श्रेष्ठ राजभवन महामूल्यवान रत्नहारांनी सजविलेले होते. तेथे पित्याच्या अतिशय लाडात, स्वर्गात देव राहातात तसा तो राहू लागला. तेथे दुधावरील फेसाप्रमाणे शुभ्र आणि कोमल शय्या, हस्तिदंती पलंग, सोनेरी पडदे, बहुमोल आसने आणि पुष्कळशी सोन्याची पात्रे वगैरे होती. तेथील स्फटिक आणि उच्च प्रतीच्या पाचूच्या भिंतीत रत्नांच्या स्त्रीमूर्तींच्या हातांत रत्नांचे दिवे झगमगत होते. त्या महालाच्या चारी बाजूंनी अनेक जातीच्या दिव्य वृक्षांनी सुशोभित अशी उद्याने होती. तेथे पक्ष्यांचा किलबिलाट आणि धुंद भुंग्यांचा गुंजारव होत होता. त्या बगीच्यांमध्ये वैडूर्य रत्नांच्या पायर्या असलेल्या लाल, निळी, आणि शुभ्र कमळे उमललेल्या पुष्करिणी होत्या. त्यात हंस, कारंडव, चक्रवाक आणि सारस पक्षी क्रीडा करीत होते. (६०-६४) राजर्षी उत्तानपादाने आपल्या पुत्राच्या अद्भुत प्रभावाची गोष्ट नारदांकडून आधीच ऐकली होती, आता तो प्रत्यक्ष पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. (६५) ध्रुव आता तरुण झाला आहे, अमात्यवर्ग त्याच्याकडे आदराने पाहात आहे, तसेच प्रजेचेही त्याच्यावर प्रेम आहे, असे पाहून राजाने त्याला राज्याभिषेक केला. आणि स्वतः आपली वृद्धावस्था झालेली जाणून आत्मस्वरूपाचे चिंतन करीत संसारातून विरक्त होऊन तो वनामध्ये गेला. (६६-६७) स्कंध चवथा - अध्याय नववा समाप्त |