श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय ६ वा

कैलासावर जाऊन ब्रह्मादी देवांकडून श्रीमहादेवांची मनधरणी -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

मैत्रेय म्हणतात - जेव्हा रुद्राच्या सेवकांनी सर्व देवांचा पराभव केला आणि त्यांची सर्व अंगे त्रिशूळ, पट्टिश, खड्ग, गदा, परिघ, आणि मुद्‌गर यांनी छिन्न-विच्छिन्न केली, तेव्हा ते देव, ऋत्विज आणि अन्य सदस्यांसह फारच भयभीत होऊन ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांना नमस्कार करून त्यांनी सर्व वृत्तांत सांगितला. भगवान ब्रह्मदेव आणि सर्वांतर्यामी श्रीनारायण आधीच हा भावी उत्पात जाणून दक्षाच्या यज्ञात गेले नव्हते. ते ऐकून ब्रह्मदेव म्हणाले,"देवांनो ! तेजस्वी पुरुषाकडून एखादा अपराध घडला, तरीसुद्धा त्याच्या प्रतीकाराचा प्रयत्‍न करणार्‍या मनुष्यांचे बहुधा कल्याण होत नाही. शिवाय तुम्ही लोकांनी तर यज्ञामधील योग्य भाग भगवान शंकरांना न देऊन त्यांचा मोठाच अपराध केला आहे. परंतु शंकर फार लवकर प्रसन्न होणारे आहेत.म्हणून तुम्ही शुद्ध हृदयाने त्यांचे पाय धरून त्यांना प्रसन्न करा. दक्षाच्या दुर्वचनांनी त्यांचे हृदय अगोदरच विद्ध झाले होते. त्यावर त्यांचा सतीशी वियोग झाला. म्हणून तुम्हांला जर तो यज्ञ पूर्ण करायचा असेल तर ताबडतोब जाऊन त्यांची क्षमायाचना करा. कारण ते कोपल्यावर लोकपालांसह या सर्व लोकांचे जगणेही अशक्य आहे. भगवान रुद्र संपूर्णपणे स्वतंत्र आहेत. त्यांचे तत्त्व, शक्ती, आणि पराक्रम यांचे प्रमाण तुम्ही, इतर ऋषि-मुनी किंवा इंद्र हे तर जाणत नाहीतच, एवढेच काय मी स्वतःही जाणत नाही. त्यामुळे त्यांना शांत करण्याचा उपाय कोण करू शकेल ?" (१-७)

देवांना असे सांगून ब्रह्मदेव त्यांना, प्रजापतींना आणि पितरांना बरोबर घेऊन आपल्या लोकातून शंकरांचे प्रिय निवासस्थान असलेल्या पर्वतश्रेष्ठ कैलासावर गेले. त्या कैलासावर वनस्पती, तप, मंत्र, आणि योग आदी उपायांनी सिद्धी प्राप्त झालेले आणि जन्मतःच सिद्ध असे देव नित्य निवास करतात. तसेच किन्नर, गंधर्व, आणि अप्सरा नेहमी तेथे असतात. त्यांची शिखरे रत्‍नजडित असून ती निरनिराळ्या धातूंमुळे रंगीबेरंगी भासतात. त्यांवर अनेक प्रकारचे वृक्ष, वेली, आणि झुडुपे आहेत. तेथे पशूंच्या झुंडीच्या झुंडी वावरतात. तेथे निर्मल पाण्याचे अनेक झरे वाहातात. पुष्कळशा गुहा आणि उंच शिखरांच्यामुळे तो पर्वत आपल्या प्रियतमांबरोबर विहार करणार्‍या सिद्ध पत्‍नींचे क्रीडास्थळ बनला आहे. तो पर्वत मोरांचे केकारव, धुंद भ्रमरांचे गुंजारव, कोकिळांचे कुहू-कुहू ध्वनी आणि पक्ष्यांचा किलबिलाट यांनी निनादून गेला आहे. तेथील कल्पवृक्ष आपल्या उंचच-उंच फांद्यारूप हातांनी जणू पक्ष्यांना बोलावीत आहेत. तसेच हत्तींच्या चालण्या-फिरण्याने तो कैलास पर्वत स्वतःच चालल्यासारखा आणि झर्‍यांच्या खळखळाटाने बोलत असल्यासारखा वाटत आहे. (८-१३)

मंदार, पारिजात, देवदारू, तमाल, आसणा, ताड, कांचन, आणि अर्जुन वृक्षांमुळे तो पर्वत रमणीय दिसत आहे. आंबा, कदंब, नागचाफा, पुन्नाग, चाफा, पाटल, अशोक, बकुळ, कुंद, कोरांटी, सोनेरी कमळे, वेलदोडा, दालचिनी, जाई, मालतीच्या सुंदर वेली, तसेच शेवंती, मोगरा, कस्तुरमोगरा, यांनी तो शोभत होता. फणस, उंबर, पिंपळ, पिंपरी, वड, निंब, भूर्ज, औषधी वनस्पती, सुपारी, मोहाची सुपारी, जांभूळ, खजूर, आंबाडा, आंबा, चार, मोहा, हिंगणबेट, वेळू, बांबू इत्यादी भिन्न-भिन्न प्रकारच्या वृक्षांनी तो मनोहर दिसत होता. तेथील सरोवरात चंद्रविकासी, निळी, पांढरी इत्यादी अनेक जातींची कमळे उमललेली होती. तसेच ती गोड किलबिल करणार्‍या पक्ष्यांच्या थव्यांनी सुंदर दिसत होती. तेथे जिकडे तिकडे हरीण, वानर, डुक्कर, सिंह, अस्वले, साळी, नीलगाय, गेंडे, वाघ, कृष्णमृग, रानरेडे, कर्णांत्र, एकपद, अश्वमुख, लांडगे, आणि कस्तुरीमृग राहात होते. आणि तेथील सरोवरांचे तट केळींनी वेढलेले असल्यामुळे सुशोभित दिसत होते. त्याच्या चारी बाजूंनी नंदा नावाची नदी वाहात होती. तिचे जल देवी सतीच्या स्नानाने अधिकच पवित्र झाले होते. भगवान भूतनाथांचे निवासस्थान असा तो कैलास पर्वत पाहून देवांना मोठे आश्चर्य वाटले. (१४-२२)

तेथे त्यांनी अलका नावाची एक सुरम्य नगरी आणि सौगंधिक वन पाहिले. तेथे सगळीकडे सुगंध पसरवणारी सौगंधिक नावाची कमळे उमललेली होती. त्या नगराच्या बाहेरच्या बाजूने नंदा आणि अलकनंदा नावाच्या दोन नद्या वाहात होत्या. त्या श्रीहरींच्या चरणरजसंयोगाने अत्यंत पवित्र झालेल्या होत्या. विदुरा, रतिविलास करून थकलेल्या देवांगना आपापल्या निवासस्थानातून येऊन तेथे जलक्रीडा करतात आणि त्यात प्रवेश करून आपल्या प्रियतमांवर पाणी उडवतात. त्यांच्या स्नानाच्या वेळी त्यांनी लावलेले केशर धुतले गेल्याने ते पाणी केशरी झाले होते. ते केशरमिश्रित जल, तहान लागलेली नसतानाही सुगंधाच्या लोभाने हत्ती स्वतः पीत आणि हत्तिणींनाही पाजीत. (२३-२६)

अलकापुरीत चांदी, सोने, आणि बहुमूल्य रत्‍ने जडवलेले शेकडो वाडे होते. त्यांमध्ये अनेक यक्षपत्‍न्या निवास करीत होत्या. त्यामुळे ही विशाल नगरी विजा आणि ढग यांनी आच्छादिलेल्या आकाशाप्रमाणे दिसत होती. यक्षराज कुबेराची राजधानी असलेल्या त्या अलकापुरीला मागे टाकून देव सौगंधिक वनात आले. ते वन रंगीबेरंगी फुले, फळे, आणि पाने असलेल्या अनेक कल्पवृक्षांनी सुशोभित होते. तेथे कोकिळ आदी पक्ष्यांचा कलकलाट आणि भ्रमरांचा गुंजारव चालला होता, तसेच राजहंसांना परमप्रिय अशी कमलकुसुमांनी सुशोभित अनेक सरोवरे होती. ते वन जंगली हत्तींच्या शरीराने घासल्या गेलेल्या हरिचंदन वृक्षांना स्पर्श करून जाणार्‍या सुगंधित वायूमुळे यक्षपत्‍न्यांचे मन वारंवार उल्हसित करीत होते. तेथील पुष्करिणींच्या पायर्‍या वैडूर्य मण्यांपासून बनविलेल्या होत्या. त्यांत पुष्कळ कमळे उमलली होती. तेथे अनेक किंपुरुष आले होते. अशा प्रकारे त्या वनाची शोभा पाहात जाता जाता देवांना जवळच एक वटवृक्ष दिसला. (२७-३१)

तो वृक्ष शंभर योजने उंच होता आणि त्याच्या फांद्या पंचाहत्तर योजने पसरलेल्या होत्या. त्याच्या चारी बाजूंना नेहमी सावली राहात असे. त्यामुळे तेथे उन्हाचा त्रास कधी होत नसे. तसेच त्यावर पक्ष्यांची घरटीही नव्हती. (३२)

त्या महायोगमय आणि मुमुक्षूंना आश्रयभूत वृक्षाच्या खाली भगवान शंकर बसलेले देवांनी पाहिले. ते क्रोधरहित कालाप्रमाणे दिसत होते. त्यांचे शरीर अतिशय शांत होते. सनन्दन आदी शांत महासिद्ध आणि यक्षराक्षसांचे स्वामी मित्र कुबेर त्यांची सेवा करीत होते. जगत्पती महादेव सर्व विश्वाचे सुहृद आहेत. स्नेहामुळे ते सर्वांचे कल्याण करणारे आहेत. ते लोकहितासाठीच उपासना, तप, समाधी इत्यादी साधनांचे आचरण करीत असतात. संध्याकालीन मेघाप्रमाणे कांती असलेल्या शरीरावर त्यांनी तपस्व्यांना आवडणारी भस्म, दंड, जटा आणि हरणाजिन ही चिह्ने तसेच मस्तकावर चंद्रकला धारण केलेली होती. ते एका दर्भासनावर बसले होते आणि अनेक साधू ऐकत असताना श्रीनारदांनी विचारल्यावरून सनातन ब्रह्माचा उपदेश करीत होते. त्यांनी डावे चरणकमल उजव्या मांडीवर ठेवलेले होते आणि डावा हात डाव्या गुडघ्यावर ठेवून मनगटात रुद्राक्षांची माळ घालून उजव्या हाताने ज्ञानमुद्रा धरून ते बसले होते. ते कुबडीचा आधार घेऊन एकाग्र चित्ताने ब्रह्मानंदाचा अनुभव घेत होते. लोकपालांसहित मुनींनी मनन करणार्‍यांत सर्वश्रेष्ठ अशा भगवान शंकरांना हात जोडून प्रणाम केला. जरी देव आणि दैत्यांचे अधिपती श्रीमहादेवांच्या चरणांना वंदन करीत असले तरी श्रीब्रह्मदेवांना आपल्याकडे आलेले पाहून ते ताबडतोब उठून उभे राहिले आणि जसे वामन‌अवतारात परमपूज्य विष्णू कश्यपांना वंदन करतात, त्याप्रमाणे मस्तक लववून त्यांनी त्यांना प्रणाम केला. शंकरांच्या चारी बाजूंनी जे महर्षींच्यासह अन्य सिद्धगण बसले होते, त्यांनीसुद्धा याप्रमाणेच ब्रह्मदेवांना प्रणाम केला. सर्वांचा नमस्कार करून झाल्यावर अजूनही हात जोडून उभे असलेल्या चंद्रमौळी भगवानांना ब्रह्मदेव हसत हसत म्हणाले. (३३-४१)

श्रीब्रह्मदेव म्हणाले- आपण संपूर्ण जगाचे स्वामी आहात, हे मी जाणतो; कारण विश्वाची योनी प्रकृती आणि त्याचे बीज असणारे शिव यांच्या पलीकडे असणारे जे अद्वितीय परब्रह्म ते आपणच आहात. भगवन, आपण कोळ्याप्रमाणे आपल्या स्वरूपभूत शिव-शक्तीच्या रूपात क्रीडा करता करता लीलया या संसाराची उत्पत्ती, पालन, आणि संहार करीत आहात. आपणच धर्म आणि अर्थाची प्राप्ती करून देणार्‍या वेदांच्या रक्षणासाठी दक्षाला निमित्त करून यज्ञाला प्रगट केले आहे. आपणच घालून दिलेल्या ज्या वर्णाश्रमाच्या मर्यादा आहेत, त्यांचे नियमनिष्ठ ब्राह्मण श्रद्धापूर्वक पालन करतात. मंगलमय महेश्वरा, आपण शुभ कर्म करणार्‍यांना स्वर्गलोक किंवा मोक्षपद बहाल करता. तसेच पापकर्म करणार्‍यांना घोर नरकात टाकता. असे असूनही काही-काही व्यक्तींच्या बाबतीत या कर्मांचे फळ उलटे कसे होते ? (४२-४५)

जे महानुभाव आपल्या चरणांवर स्वतःला समर्पित करतात, जे समस्त प्राण्यांना आपल्याच ठिकाणी मानतात आणि सर्व जीवांना अभेददृष्टीने आत्म्यातच पाहातात, ते पशूंप्रमाणे सहसा क्रोधाच्या अधीन होत नाहीत. जे लोक भेदबुद्धी मानणारे असून कर्मांमध्ये आसक्त आहेत, ज्यांचे मन चांगले नाही, दुसर्‍यांची उन्नती पाहून ज्यांचे चित्त रात्रंदिवस कुढत असते आणि जे मर्मभेद करणार्‍या आपल्या दुर्वचनांनी दुसर्‍यांचे चित्त दुखवितात, त्यांनासुद्धा आपण मारणे उचित नाही. कारण त्यांना त्यांच्या नशिबाने आधीच मारलेले असते. नारायणांच्या प्रबळ मायेने मोहित झाल्यामुळे जरी एखाद्या पुरुषाची कधी एखाद्या ठिकाणी भेदबुद्धी झाली, तरी साधु पुरुष आपल्या प्रेमळ स्वभावामुळे त्याच्यावर कृपाच करतात. दैवामुळे आपल्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्‍न ते करीत नाहीत. (४६-४८)

प्रभो, आपण सर्वज्ञ आहात. परम पुरुष भगवंतांच्या दुस्तर मायेने आपल्या बुद्धीला स्पर्शही केलेला नाही. म्हणून ज्यांचे चित्त मायेमुळे कर्ममार्गात आसक्त झाले आहे, त्यांच्याकडून अपराध घडला, तरी त्यांच्यावर आपण कृपाच केली पाहिजे. हे भगवन, आपण सर्वांचे मूळ आहात, आपणच सर्व यज्ञ पूर्ण करणारे आहात. यज्ञभाग मिळण्याचा आपला अधिकार असूनही या बुद्धिहीन यज्ञकर्त्यांनी तो आपल्याला दिला नाही, म्हणून हा यज्ञ आपल्याकडून उध्वस्त झाला. तरी आपणच या मारल्या गेलेल्या दक्षाच्या अपूर्ण यज्ञाचा पुनरुद्धार करण्याची कृपा करावी. हे प्रभो, हा यजमान दक्ष पुन्हा जिवंत होऊ दे. भगदेवतेला नेत्र येऊ देत. भृगूंना दाढी-मिशा येऊ देत आणि पूषाला पहिल्याप्रमाणे दात येऊ देत. हे रुद्रदेवा, शस्त्रास्त्रांनी आणि दगडांच्या मार्‍याने ज्या देवता आणि ऋत्विज यांची शरीरे घायाळ झाली, ते आपल्या कृपेने पुन्हा बरे होवोत. यज्ञ पूर्ण झाल्यावर जो भाग शिल्लक राहील, तो सर्व आपलाच असेल. हे यज्ञविध्वंसक, आज हा यज्ञ आपल्याच भागाने पूर्ण होवो. (४९-५३)

स्कंध चवथा - अध्याय सहावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP