|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ४ था - अध्याय ७ वा
दक्षयज्ञाची पूर्तता - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] मैत्रेय म्हणतात - हे पराक्रमी विदुरा, ब्रह्मदेवांनी अशी प्रार्थना केल्यावर भगवान शंकर प्रसन्नतेने जे हसत म्हणाले ते ऐक. (१) श्रीमहादेव म्हणाले - हे प्रजापते, भगवंतांच्या मायेने मोहित झालेल्या दक्षासारख्या अज्ञानी लोकांनी केलेल्या अपराधाची मी चर्चा करीत नाही की आठवणही करीत नाही. मी केवळ सावध करण्यासाठी त्यांना थोडी शिक्षा केली. दक्षप्रजापतीचे डोके जळाले आहे. म्हणून त्याला बकर्याचे डोके लावावे. भगदेव मित्रदेवतेच्या डोळ्यांनी आपला यज्ञभाग पाहील. पीठ खाणार्या पूषाने यजमानाच्या दातांनी भक्षण करावे. तसेच इतर सर्व देवांची शरीरे पूर्वीप्रमाणे होतील. कारण त्यांनी यज्ञातील शिल्लक राहिलेले पदार्थ माझा भाग म्हणून निश्चित केले आहेत. अध्वर्यू इत्यादी याज्ञिकांपैकी ज्यांचे बाहू तुटले आहेत, त्यांनी अश्विनीकुमारांच्या बाहूंनी आणि ज्यांचे हात तुटले आहेत, त्यांनी पूषाच्या हातांनी काम करावे. तसेच भृगूंच्या दाढी-मिशा बकर्यासारख्या होवोत. (२-५) मैत्रेय म्हणतात- वत्स विदुरा, तेव्हा भगवान शंकरांचे बोल ऐकून सर्व लोक प्रसन्न चित्ताने ‘छान, छान’म्हणू लागले. नंतर सर्व देवांनी आणि ऋषींनी दक्षाच्या यज्ञशाळेत येण्याची महादेवांना प्रार्थना केली आणि त्यांना व ब्रह्मदेवांना बरोबर घेऊन ते तेथे गेले. तेथे जसजसे भगवान शंकरांनी सांगितले होते, त्याप्रमाणे सर्व कार्य करून त्यांनी दक्षाच्या धडाला यज्ञपशूचे डोके जोडून दिले. डोके जोडले गेल्यावर रुद्रांची दृष्टी पडताच दक्ष ताबडतोब झोपेतून जागा झाल्याप्रमाणे उठला आणि आपल्या समोर भगवान शिवांना त्याने पाहिले. शंकरांच्या द्वेषाने कलुषित झालेले दक्षाचे हृदय त्यांचे दर्शन होताच शरदकाळातील सरोवराप्रमाणे स्वच्छ झाले. त्याला महादेवांची स्तुती करावी असे वाटले. परंतु आपल्या मृत झालेल्या कन्येचे-सतीचे स्मरण होऊन स्नेह आणि उत्कंठा यांमुळे त्याच्या डोळ्यांत अश्रू आले. त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडेना. प्रेमाने विव्हळ, परम बुद्धिमान प्रजापतीने कसातरी आपल्या हृदयातील दुःखावेग आवरून विशुद्ध भावनेने भगवान शिवांची स्तुती करण्यास प्रारंभ केला. (६-१२) दक्ष म्हणाला - भगवन, जरी मी आपला अपराध केला होता, तरी आपण त्यासाठी मला शिक्षा करून माझ्यावर मोठाच अनुग्रह केला आहे. अहो, आपण आणि श्रीहरी आचारहीन, नाममात्र ब्राह्मण असलेल्यांची सुद्धा उपेक्षा करीत नाहीत, तर आमच्यासारख्या यज्ञयाग करणार्यांची उपेक्षा कशी कराल ? विभो, आपण ब्रह्मदेव होऊन सर्वप्रथम आत्मज्ञानाचे रक्षण करण्यासाठी आपल्या मुखापासून विद्या, तप, आणि व्रतादी धारण करणार्या ब्राह्मणांना उत्पन्न केले. म्हणूनच जसा गुराखी काठी हातात घेऊन गायींचे रक्षण करतो त्याप्रमाणे आपण त्या ब्राह्मणांचे सर्व संकटांपासून रक्षण करीत असता.मी आपल्या स्वरूपाला जाणत नव्हतो; म्हणूनच मी आपल्याला भर सभेमध्ये माझ्या वाग्बाणांनी घायाळ केले. परंतु माझा अपराध आपण मनावर घेतला नाही. आपल्यासारख्या पूज्यतमाचा अपराध केल्यामुळे मी नरकादे नीच योनीत जाऊन पडणार होतो, परंतु आपण आपल्या करुणामय दृष्टीने मला वाचविले. आता आपणच आपल्या औदार्यपूर्ण वर्तनाने माझ्यावर प्रसन्न व्हावे. (१३-१५) मैत्रेय म्हणतात - अशा प्रकारे शंकरांची क्षमा मागून दक्षाने ब्रह्मदेवाच्या अनुमतीने उपाध्याय, ऋत्विज इत्यादींच्या साहाय्याने यज्ञ सुरू केला. तेव्हा श्रेष्ठ ब्राह्मणांनी यज्ञ संपन्न करण्याच्या उद्देशाने भूत-पिशाच्चांच्या येण्यामुळे उत्पन्न झालेल्या दोषांच्या शांतीसाठी विष्णुदेवतेला उद्देशून तीन पात्रांमध्ये तयार केलेल्या पुरोडाश नावाच्या चरूचे हवन केले.हे विदुरा, तो हवी हातात घेऊन उभ्या राहिलेल्या अध्वर्यूच्या समवेत यजमान दक्षाने जेव्हा विशुद्ध चित्ताने श्रीहरीचे ध्यान केले, तेव्हा लगेच भगवान तेथे प्रगट झाले. ‘बृहत्’ आणि ‘रथंतर’ नावाचे साम-स्तोत्र ज्याचे पंख आहेत, त्या गरुडावर बसून आलेल्या भगवंतांनी दाही दिशा प्रकाशित करीत आपल्या अंगकांतीने सर्वांना निस्तेज केले. त्यांचा श्यामवर्ण होता; कमरेला सुवर्णाचा कमरपट्टा होता. डोक्यावर सूर्याप्रमाणे दैदीप्यमान मुगुट होता, मुखकमल भ्रमराप्रमाणे काळ्या कुरळ्या केसांच्या बटा आणि कांतिमय कुंडलांनी शोभायमान दिसत होते. सुवर्णमय अलंकारांनी विभूषित, भक्त-रक्षणासाठी सदा उद्युक्त असे आठ हात होते. त्या आठही हातांमध्ये शंख, पद्म, चक्र, बाण, धनुष्य, गदा, खड्ग आणि ढाल घेतलेली होती. यांमुळे ते पांगार्याच्या झाडाप्रमाणे दिसत होते. प्रभूंच्या वक्षःस्थलावर लक्ष्मी विराजमान होती आणि सुंदर वनमाला शोभून दिसत होती. ते आपल्या सुंदर हास्ययुक्त कटाक्षांनी सार्या विश्वाला आनंदविभोर करीत होते. दोन्ही बाजूंना पार्षद राजहंसाप्रमाणे असणारे शुभ्र पंखे आणि चवर्या ढाळीत होते. ते वर चंद्राप्रमाणे शुभ्र असणार्या छत्राने शोभून दिसत होते. (१६-२१) भगवानांना आलेले पाहून इंद्र, ब्रह्मदेव आणि महादेव आदी देवेश्वरांसह सर्व देवादिकांनी ताबडतोब उभे राहून त्यांना प्रणाम केला. त्यांच्या तेजापुढे सर्वांचे तेज फिके पडले, जीभ अडखळू लागली. ते गोंधळून गेले. अशा स्थितीत ते सर्वजण मस्तकावर हात जोडून भगवंतांची स्तुती करू लागले. जरी ब्रह्मदेवादी भगवंतांचा महिमा जाणत नव्हते, तरीसुद्धा भक्तांवर कृपा करण्यासाठी दिव्यरूपाने प्रगट झालेल्या श्रीहरींची ते आपापल्या बुद्धीनुसार स्तुती करू लागले. सर्वप्रथम प्रजापती दक्ष एका उत्तम पात्रात पूजेची सामग्री घेऊन नंद-सुनंद इत्यादी पार्षदांसह असलेल्या प्रजापतींचे परम गुरू भगवान यज्ञेश्वरांच्याजवळ गेले आणि आनंदाने एकाग्रचित्त होऊन हात जोडून प्रार्थना करीत प्रभूंना शरण गेले. (२२-२५) दक्ष म्हणाले - भगवन, आपल्या मूळ स्वरूपात मायारहित होऊन आपण बुद्धीच्या जागृती इत्यादी अवस्थारहित, शुद्ध, चिन्मय, अद्वितीय आणि निर्भय असता. तथापि, स्वतंत्र असूनही जेव्हा मायेनेच जीवभावाला स्वीकारून आपण त्याच मायेत राहाता, तेव्हा मात्र अज्ञानी असल्यासारखे दिसता. (२६) ऋत्विज म्हणाले- हे उपाधिरहित प्रभो, रुद्राच्या (नंदीश्वराच्या) शापामुळे आमची बुद्धी केवळ कर्मकांड करण्यातच गुंतली आहे, म्हणून आम्ही आपले तत्त्व जाणत नाही. परंतु ज्यामध्ये अमुक कर्माची अमुक देवता अशी व्यवस्था आहे, त्या वेदत्रयीने प्रतिपादन केलेल्या धर्मरूप यज्ञालाच आम्ही आपले स्वरूप समजतो. (२७) सदस्य म्हणाले- हे जीवांना आश्रय देणार्या प्रभो, जो अनेक प्रकारच्या क्लेशांमुळे अत्यंत दुर्गम आहे, ज्यात कालरूप भयंकर सर्प वाट पाहात बसला आहे, जेथे सुखदुःखादी द्वंद्वरूप अनेक खड्डे आहेत, दुर्जनरूप जंगली जीवांचे भय आहे, जेथे शोकरूप दावाग्नी धगधगत आहे, अशा विश्रांतिस्थळ नसलेल्या संसारमार्गामध्ये जो अज्ञानी जीव कामनांमुळे पीडित होऊन विषयरूप मृगजळासाठीच देह-घराचा अवजड बोजा डोक्यावर घेऊन चालला आहे, तो आपल्या चरणकमलांना केव्हा बरे शरण येईल ? (२८) रुद्र म्हणाले- वरदायक प्रभो, आपले श्रेष्ठ चरण या जगात सकाम पुरुषांना संपूर्ण पुरुषार्थाची प्राप्ती करून देणारे आहेत आणि निष्काम मुनिजनसुद्धा ज्यांचे आदरपूर्वक पूजन करतात, त्यामध्येच माझे चित्त लागून राहिल्यामुळे अज्ञानी लोक मला आचारभ्रष्ट म्हणत असले तरी आपल्या परम अनुग्रहामुळे मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. (२९) भृगू म्हणाले- आपल्या गहन मायेमुळे आत्मज्ञान लुप्त होऊन जे अज्ञाननिद्रेमध्ये झोपलेले आहेत, ते ब्रह्मदेव इत्यादी देहधारी आत्मज्ञानासाठी उपयुक्त अशा आपल्या तत्त्वाला अजून जाणू शकले नाहीत. असे असूनसुद्धा आपण आपल्या शरणागत भक्तांचे आत्मा आणि सुहृद आहात. म्हणून आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे. (३०) ब्रह्मदेव म्हणाले- प्रभो, वेगवेगळ्या पदार्थांना जाणणार्या इंद्रियांच्या द्वारा पुरुष जे काही पाहातो, ते आपले स्वरूप नाही. कारण आपण ज्ञान, विषय, आणि इंद्रियांचे अधिष्ठान आहात. हे सर्व आपल्यामुळे भासतात. पण आपण मात्र मायामय प्रपंचापासून सर्वथैव वेगळे आहात. (३१) इंद्र म्हणाला- अच्युता, आपले हे जगाला प्रकाशित करणारे रूप दैत्यांचा संहार करण्यासाठी आयुधे धारण करणार्या आठ हातांनी सुशोभित आहे. हे रूपही आमचे मन आणि नेत्रांना परम आनंद देणारे आहे. (३२) याज्ञिकांच्या पत्न्या म्हणाल्या- भगवन, ब्रह्मदेवांनी आपले पूजन करण्यासाठीच हा यज्ञ केला होता, परंतु दक्षावर रागावल्यामुळे पशुपतींनी हा नष्ट केला. हे यज्ञमूर्ते, स्मशानभूमीप्रमाणे उत्सवहीन झालेल्या आमच्या या यज्ञाला आपण आपल्या निळ्या कमळाप्रमाणे असलेल्या नेत्रांनी पाहून पवित्र करावे. (३३) ऋषी म्हणाले- भगवन, आपली लीला अनाकलनीय आहे; कारण आपण कर्म करीत असूनसुद्धा त्यामुळे लिप्त होत नाही. दुसरे लोक वैभवाच्या लालसेने ज्या लक्ष्मीची उपासना करतात, ती स्वतः आपल्या सेवेत निमग्न असते; तरीसुद्धा आपण तिच्याविषयी निःस्पृह राहाता. (३४) सिद्ध म्हणाले- प्रभो, हा आमचा मनोरूप हत्ती क्लेशरूप वणव्याने होरपळलेला असल्यामुळे तहानेने व्याकूळ होऊन आपल्या कथारूप अमृतमय नदीत शिरून डुंबत आहे. तेथे ब्रह्मानंदामध्ये निमग्न झाल्यामुळे त्याला (संसाररूप) दावाग्नीचे स्मरणही नाही आणि तो त्या नदीच्या बाहेरही पडत नाही. (३५) यजमानपत्नी म्हणाली- सर्वसमर्थ परमेश्वरा, आपले स्वागत असो. मी आपल्याला नमस्कार करते. आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे. हे लक्ष्मीपते, प्रिय पत्नी लक्ष्मीसहित आपण आमचे रक्षण करावे. यज्ञेश्वरा, ज्याप्रमाणे डोक्याशिवाय मनुष्याचे धड चांगले दिसत नाही, त्याप्रमाणे अन्य अंगांनी पूर्ण असूनही आपल्याशिवाय यज्ञाला शोभा नाही. (३६) लोकपाल म्हणाले- अनंत परमात्मन, आपण सर्वांच्या अंतःकरणाचे साक्षी आहात. हे सर्व जग आपल्यामुळेच पाहिले जाते. तर मग मायिक पदार्थांना ग्रहण करणार्या आमच्या या डोळे आदी इंद्रियांना आपण कधी तरी प्रत्यक्ष दिसू शकाल काय ? खरे पाहाता, आपण पंचमहाभूतांपासून वेगळे आहात, तरीसुद्धा पंचमहाभूतात्मक शरीरांशी जो आपला संबंध प्रतीत होतो, ती आपली मायाच होय. (३७) योगेश्वर म्हणाले- प्रभो, जो मनुष्य संपूर्ण विश्वाचा आत्मा असलेल्या आपल्यात आणि स्वतःत काही भेद पाहात नाही, त्याच्यापेक्षा अधिक प्रिय आपल्याला कोणी नाही. तथापि हे भक्तवत्सल, जे लोक आपल्या ठिकाणी स्वामिभाव ठेवून अनन्य भक्तीने आपली सेवा करतात, त्यांच्यावरही आपण कृपा करावी. जीवांच्या अदृष्टामुळे ज्यांच्या सत्त्वादी गुणांमध्ये मोठा फरक जाणवतो, त्या आपल्या मायेच्या द्वारा जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय यांसाठी ब्रह्मादी वेगवेगळी रूपे धारण करून आपण भेदबुद्धी उत्पन्न करता; परंतु स्वरूपस्थितीमुळे ते भेदज्ञान आणि त्याचे कारण असलेल्या सत्त्वादी गुणांपासून सर्वथैव दूर असणार्या आपल्याला आमचा नमस्कार असो. (३८-३९) वेद म्हणाले - आपण धर्मादींच्या उत्पत्तीसाठी शुद्ध सत्त्वाचा स्वीकार करता आणि आपण निर्गुणही आहात. म्हणून आपले तत्त्व मी किंवा इतर कोणीही जाणत नाही. अशा आपल्याला नमस्कार असो. (४०) अग्निदेव म्हणाला - भगवन, आपल्याच तेजाने प्रज्वलित होऊन मी श्रेष्ठ यज्ञांमध्ये तूपयुक्त हवी देवतांपर्यंत पोहोचवितो. आपण साक्षात यज्ञपुरुष आणि यज्ञाचे रक्षण करणारे आहात. अग्निहोत्र, दर्श, पौर्णमास, चातुर्मास्य आणि पशु-सोम हे पाच प्रकारचे यज्ञ आपलेच स्वरूप आहेत. तसेच ‘आश्रावय,’‘अस्तु श्रौषट्’, ‘यजे’, ‘ये यजामहे’ आणि ‘वषट्’ या पाच प्रकारच्या यजुर्मंत्रांनी आपलेच पूजन होते. मी आपल्याला नमस्कार करीत आहे. (४१) देव म्हणाले - आपण आदिपुरुष आहात. पूर्वी प्रलय झाल्यावर आपल्या कार्यरूप या विश्वाला उदरात लीन करून घेऊन आपणच प्रलयकालीन पाण्यामध्ये शेषनागाच्या उत्तम शय्येवर शयन केले होते. आपल्या आध्यात्मिक स्वरूपाचे सिद्धगण स्वतःच्या हृदयात चिंतन करतात. तेच आपण आज आमच्या नेत्रांचा विषय होऊन आम्हां भक्तांचे रक्षण करीत आहात. (४२) गंधर्व म्हणाले - देवा, मरीची आदी ऋषी आणि हे ब्रह्मदेव, इंद्र तसेच रुद्रादी देवगण, आपल्या अंशांचेही अंश आहेत. हे महत्तम, हे संपूर्ण विश्व आपल्या लीलेची सामग्री आहे. हे नाथ, अशा आपल्याला आम्ही सदैव नमस्कार करीत आहोत. (४३) विद्याधर म्हणाले - हे प्रभो, मोक्षाच्या प्राप्तीचे साधन असलेला हा मानवदेह मिळूनसुद्धा जीव आपल्या मायेने मोहित होऊन यामध्ये मी-माझे असा अभिमान धरतो. नंतर हा दुर्बुद्धी जीव आपल्या आप्तेष्टांकडून तिरस्कृत होऊनसुद्धा त्याच विनाशी विषयांचीच लालसा करीत राहातो. परंतु अशा अवस्थेतसुद्धा जो आपल्या कथामृताचे सेवन करतो, तो या अंतःकरणातील मोहाचा पूर्णपणे त्याग करतो. (४४) ब्राह्मण म्हणाले- भगवन, आपणच यज्ञ, हवनाचे द्रव्य, अग्नी, आणि मंत्र आहात. आपणच समिधा,दर्भ,आणि यज्ञपात्रे आहात. तसेच आपणच सदस्य, ऋत्विज, यजमान, आणि त्याची धर्मपत्नी, देवता, अग्निहोत्र, स्वधा, सोमरस, तूप आणि यज्ञासाठीचा पशू आहात. हे वेदमूर्ते, यज्ञ आणि त्याचा संकल्प दोन्हीही आपण आहात. पूर्वी आपणच अतिविशाल वराहरूप धारण करून रसातळात बुडलेल्या पृथ्वीला सहजपणे आपल्या दाढेवर ठेवून अशाप्रकारे वर आणले होते की जणू काही हत्तीने कमलपुष्प उचलले आहे. त्यावेळी आपण धीरगंभीर गर्जना करीत होता आणि योगिजन आपला हा अलौकिक पुरुषार्थ पाहून आपली स्तुती करीत होते. यज्ञेश्वरा, जेव्हा लोक आपल्या नामाचे कीर्तन करतात, तेव्हा यज्ञातील सर्व विघ्ने नष्ट होतात. आता आमचे हे यज्ञरूप सत्कर्म नष्ट झाले होते. म्हणून आम्ही आपल्या दर्शनाची इच्छा करीत होतो. आता आपण आमच्यावर प्रसन्न व्हावे. आपल्याला नमस्कार असो. (४५-४७) मैत्रेय म्हणतात- हे विदुरा, जेव्हा अशा प्रकारे सर्वजण यज्ञरक्षक भगवान हृषीकेशांची स्तुती करू लागले, तेव्हा ज्ञानी दक्षाने वीरभद्राने उध्वस्त केलेल्या यज्ञाला पुन्हा प्रारंभ केला. सर्वांतर्यामी श्रीहरी सर्वच यज्ञभागांचे भोक्ते आहेत. तथापि पुरोडाशरूप आपल्या भागाने अधिकच प्रसन्न झाल्याप्रमाणे होऊन दक्षाला संबोधून म्हणाले. (४८-४९) श्रीभगवान म्हणाले- जगाचे परम कारण मीच ब्रह्मदेव आणि महादेव आहे. मीच सर्वांचा आत्मा, ईश्वर आणि साक्षी आहे. तसेच स्वयंप्रकाश आणि उपाधिशून्य आहे. विप्रवर, आपल्या त्रिगुणात्मक मायेचा स्वीकार करून मीच जगाची उत्पत्ती, पालन आणि संहार करीत असतो आणि मीच त्या कर्मांना अनुरूप ब्रह्मा, विष्णू आणि शंकर ही नावे धारण केली आहेत. (५०-५१) असा जो अद्वितीय, विशुद्ध, परब्रह्मस्वरूप मी, त्यालाच अज्ञानी मनुष्य, ब्रह्मा, रुद्र, व जीव अशा विभिन्न रूपात पाहातो. जसे, मनुष्य आपले डोके, हात इत्यादी अंगांना हे आपल्यापासून वेगळे आहेत, असे कधी मानत नाही, त्याचप्रमाणे माझा भक्त प्राणिमात्रांना माझ्याहून वेगळे मानत नाही. हे ब्राह्मणा, सर्व जीवांचे आत्मा असणार्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांच्यात जो भेद मानत नाही, तोच शांती प्राप्त करून घेतो. (५२-५४) मैत्रेय म्हणतात- भगवंतांनी अशा प्रकारे आज्ञा दिल्यानंतर प्रजापतींचा नायक दक्ष याने त्यांचे यज्ञाने पूजन करून नंतर अंगभूत आणि प्रधान अशा दोन्ही प्रकारच्या यज्ञांनी अन्य देवतांना उद्देशून हवन केले. नंतर एकाग्रचित्ताने शंकरांना त्यांचा भाग अर्पण केला. नंतर उदवसान नावाच्या कर्माने सोमपायी व इतर देवतांचे यजन करून यज्ञाची समाप्ती केली व शेवटी ऋत्विजांसह अवभृथ-स्नान केले. नंतर ज्याला आपल्या पुरुषार्थाच्या जोरावरच सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त झाल्या होत्या, त्या दक्षप्रजापतीला "तुझी नेहमी धर्मामध्ये बुद्धी राहील." असा आशीर्वाद देऊन सर्व देव स्वर्गलोकी गेले. (५५-५७) विदुरा, असे ऐकले आहे की, दक्षकन्या सतीने पूर्वीच्या शरीराचा त्याग करून पुन्हा हिमालयाची पत्नी मेना हिच्या पोटी जन्म घेतला. ज्याप्रमाणे प्रलयकालात सुप्त असलेली शक्ती सृष्टीच्या आरंभी पुन्हा ईश्वराचाच आश्रय घेते, त्याचप्रमाणे अनन्यचित्त अंबिकेने त्याही जन्मी आपले एकमात्र आश्रय आणि प्रियतम अशा भगवान शंकरांनाच वरले. विदुरा, दक्षयज्ञाचा विध्वंस करणार्या भगवान शिवांचे हे चरित्र मी बृहस्पतीचे शिष्य परम भागवत उद्धव यांच्या तोंडून ऐकले होते. हे कुरुनंदना, श्रीमहादेवांचे हे परम पावन चरित्र, यश आणि आयुष्य वाढविणारे तसेच पापराशी नष्ट करणारे आहे. जो पुरुष भक्तिभावाने याचे नियमितपणे श्रवण आणि कीर्तन करतो, तो आपल्या पापराशींचा नाश करतो. (५८-६१) स्कंध चवथा - अध्याय सातवा समाप्त |