|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ४ था - अध्याय ५ वा
वीरभद्राकडून दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस आणि दक्षवध - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] मैत्रेय म्हणतात - जेव्हा महादेवांनी देवर्षी नारदांच्या तोंडून ऐकले की, दक्षाकडून अपमानित झालेल्या सतीने प्राणत्याग केला आणि त्याच्या यज्ञातून प्रगट झालेल्या ऋभूंनी आपल्या पार्षदांच्या सेनेला पिटाळून लावले, तेव्हा त्यांना अतिशय क्रोध आला.त्यांनी उग्र रूप धारण करून क्रोधाने दातओठ चावीत वीज आणि अग्नीच्या लोळाप्रमाणे चमकणारी आपली एक जटा उपटली. आणि एकदम उभे राहून मोठयाने हसण्याचा गडगडाट करीत ती पृथ्वीवर आपटली. त्यातून एक मोठा अक्राळ-विक्राळ पुरुष उत्पन्न झाला. त्याचे शरीर एवढे विशाल होते की, तो स्वर्गाला स्पर्श करीत होता. त्याला एक हजार हात होते. त्याचा मेघासारखा श्यामवर्ण होता, त्याला सूर्यासारखे तेजस्वी तीन डोळे होते, विक्राळ दाढा होत्या आणि अग्नीच्या ज्वाळांप्रमाणे लाल लाल जटा होत्या. त्याच्या गळ्यात प्रेताच्या मुंडक्यांच्या माळा होत्या आणि हातांमध्ये निरनिराळी शस्त्रास्त्रे होती. जेव्हा त्याने हात जोडून विचारले की "भगवन, मी काय करू ?" तेव्हा भगवान भूतनाथ म्हणाले, "वीर रुद्रा, तू माझा अंश आहेस; म्हणून माझ्या पार्षदांचा सेनापती होऊन तू दक्ष व त्याच्या यज्ञाचा विध्वंस करून टाक." (१-४) जेव्हा देवाधिदेव भगवान शंकरांनी क्रोधसंतप्त होऊन अशी आज्ञा केली, तेव्हा वीरभद्राने त्यांना प्रदक्षिणा घातली आणि जाण्यासाठी तो तयार झाला. त्यावेळी त्याला असे वाटत होते की, माझ्या वेगाशी बरोबरी करणारा या जगात कोणीच नाही आणि मी मोठमोठया वीरांचेही बळ सहन करू शकतो. तो भयंकर गर्जना करीत, संसारसंहारक मृत्यूचाही संहार करण्यास समर्थ असा त्रिशूळ हातात घेऊन दक्षाच्या यज्ञमंडपाकडे धावला. त्यावेळी त्याच्या पायांतील वाळ्यांचाही प्रचंड आवाज होत होता. रुद्रांचे आणखीही पुष्कळसे गण गर्जना करीत त्याच्या पाठोपाठ धावले. (५-६) इकडे यज्ञशाळेत बसलेले ऋत्विज, यजमान, सदस्य, तसेच अन्य ब्राह्मण आणि ब्राह्मण-स्त्रिया यांनी जेव्हा उत्तर दिशेकडून उडणारी धूळ पाहिली, तेव्हा ते विचार करू लागले की "अरे, हा अंधार कसा ? ही धूळ कोठून आली ? यावेळी तर वावटळ आलेली नाही किंवा डाकूही आलेले नाहीत. कारण अपराध्यांना कठोर शासन करणारा राजा प्राचीनबर्ही अद्याप जिवंत आहे. अजून गाई रानातून परतण्याचीही वेळ झालेली नाही, मग ही धूळ कोठून आली ? यावेळी जगाचा प्रलय तर होणार नाही ना ?" (७-८) तेव्हा दक्षपत्नी प्रसूती आणि इतर स्त्रिया व्याकूळ होऊन म्हणाल्या की, प्रजापती दक्षाने आपल्या सर्व कन्यांच्या देखत बिचार्या निरपराध सतीचा तिरस्कार केला होता, त्याच पापाचे हे फळ आहे. (किंवा हा संहारमूर्ती भगवान रुद्रांच्या अनादराचाही परिणाम असावा.) प्रलयकालाच्यावेळी ते आपल्या जटा विस्कटून शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असे आपले हात झेंडयाप्रमाणे फडकवून तांडवनृत्य करतात, त्यावेळी त्यांच्या त्रिशूळांच्या पात्यांनी दिग्गज जखमी होतात आणि मेघगर्जनेसारख्या भयंकर खिदळण्याने दिशा विदीर्ण होऊन जातात. असह्य तेज असणार्या व रागाने भुवया चढवल्याने ज्यांच्याकडे पाहाणेही कठीण, अशा त्यांच्या अक्राळ-विक्राळ दाढांमुळे तारेही अस्ताव्यस्त होऊन जातात, अशा भगवान शंकरांना वारंवार राग आणणारा पुरुष साक्षात विधाता जरी असला तरी त्याचे कधी कल्याण होऊ शकेल काय ? (९-११) महात्म्या दक्षाच्या यज्ञामध्ये असलेले लोक भयभीत दृष्टीने एकमेकांकडे पाहात असे काहीबाही बोलत आहेत, तोच आकाशात आणि पृथ्वीवर सगळीकडे हजारो भयंकर अपशकुन होऊ लागले. विदुरा ! त्यावेळी धावत आलेल्या रुद्रगणांनी त्या महान यज्ञमंडपाला सर्व बाजूंनी गराडा घातला. त्या सर्वांनी निरनिराळी शस्त्रास्त्रे घेतलेली होती. त्यांच्यामध्ये कोणी बुटके, कोणी भुर्या रंगाचे, कोणी पिवळे आणि काहीजण मगरीसारखे पोट आणि तोंड असलेले होते. त्यांपैकी काहींनी यज्ञशाळेच्या पूर्व आणि पश्चिमेकडील खांबांच्या मध्ये आडवे ठेवलेले बांबू तोडून टाकले, कोणी पत्नीशाळा नष्ट केली. कोणी सभामंडप, तर कोणी आग्नीध्रशाळा तोडून टाकली. तर काहीजणांनी यजमानगृह आणि पाकशाळा उध्वस्त करून टाकली. (१२-१४) काहींनी यज्ञाची भांडी फोडली, काहींनी अग्नी विझविले, काहींनी यज्ञकुंडांत लघ्वी केली, तर काहींनी यज्ञवेदीच्या सीमांना बांधलेल्या दोर्या तोडून टाकल्या.काहीजण मुनींना त्रास देऊ लागले. काहीजण स्त्रियांना धमकावू लागले आणि काहींनी आपल्याजवळून पळून जाणार्या देवतांना पकडले. मणिमानाने भृगू ऋषींना बांधले. वीरभद्राने प्रजापती दक्षाला कैद केले. चंडीशाने पूषाला आणि नंदीश्वराने भग देवतेला पकडले. (१५-१७) भगवान शंकरांच्या पार्षदांचे हे भयंकर प्रताप पाहून तसेच दगडांच्या मारांनी अतिशय घायकुतीला येऊन तेथील ऋत्विज, सदस्य, देव इत्यादी सर्वजण इतस्ततः पळून गेले. भृगूमुनी हातात स्रुवा (पळी) घेऊन हवन करीत होते. वीरभद्राने त्यांच्या दाढी-मिशा उपटल्या. कारण त्यांनी प्रजापतींच्या सभेमध्ये मिशांवर पीळ देत महादेवांचा उपहास केला होता. त्याने क्रोधाविष्ट होऊन भग देवाला पृथ्वीवर आपटले आणि त्याचे डोळे काढले. कारण जेव्हा दक्ष देवसभेमध्ये श्रीमहादेवांची निंदा करीत होता, त्यावेळी यानेच दक्षाला डोळ्य़ांनी खूण करून प्रोत्साहन दिले होते. यानंतर जसे अनिरुद्धाच्या विवाहाच्या प्रसंगी बलरामाने कलिंगराजाचे दात उपटले होते, तसेच त्याने पूषाचे दात तोडले. कारण जेव्हा दक्षाने महादेवांना शिव्या दिल्या, त्यावेळी हाच दात काढून हसत होता. नंतर तो दक्षाच्या छातीवर बसून एका धारदार तलवारीने त्याचे मुंडके तोडू लागला, परंतु पुष्कळ प्रयत्न करूनही ते तुटेना. जेव्हा कोणत्याही प्रकारच्या शस्त्रास्त्राने दक्षाची त्वचा फाटली नाही, तेव्हा वीरभद्राला मोठेच आश्चर्य वाटले आणि तो बराच वेळ विचार करीत राहिला. तेव्हा त्याने यज्ञमंडपात यज्ञपशूंना जसे मारले जाते, ते पाहून त्याचप्रमाणे दक्षरूप त्या यजमानपशूचे डोके धडापासून वेगळे केले. हे पाहून भूत, प्रेत, पिशाचादी त्याच्या या कृत्याची प्रशंसा करीत वाहवा करू लागले आणि दक्षाच्या बाजूकडील लोकांत हाहाकार माजला. वीरभद्राने अत्यंत संतापून दक्षाचे डोके यज्ञाच्या दक्षिणाग्नीत टाकले आणि त्या यज्ञशाळेला आग लावून यज्ञाचा विध्वंस करून तो कैलासपर्वताकडे परत गेला. (१८-२६) स्कंध चवथा - अध्याय पाचवा समाप्त |