श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय ४ था

सतीचा अग्निप्रवेश -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

मैत्रेय म्हणतात - एवढे बोलून भगवान शंकर स्तब्ध बसले. त्यांनी पाहिले की, दक्षाकडे जाऊ दिल्याने किंवा जाण्यास मनाई केल्याने दोन्ही बाबतीत सती प्राणत्याग करण्याची शक्यता आहे. इकडे सती एकदा बंधुजनांना पाहाण्यासाठी जाण्याच्या इच्छेने बाहेर येई तर कधी भगवान शंकर रुष्ट होतील या शंकेने परत फिरत असे. अशा प्रकारे कोणताही एक निर्णय घेऊ न शकल्याने तिची मनःस्थिती द्विधा झाली. बंधुजनांना भेटण्याच्या इच्छेत बाधा आल्याने ती अतिशय विमनस्क झाली. स्वजनांच्या स्नेहाने तिचे हृदय भरून आले आणि डोळ्यात अश्रू येऊन अत्यंत व्याकूळ होऊन ती रडू लागली. तिचे शरीर थरथर कापू लागले आणि ती पुरुषोत्तम भगवान शंकरांच्याकडे अशी रागाने पाहू लागली की, जणू त्यांना भस्म करून टाकील. शोक आणि क्रोधाने तिचे चित्त बेचैन करून टाकले. स्त्रीस्वभावानुसार तिची बुद्धी चालेनाशी झाली. ज्यांनी प्रेमाने आपले अर्धे अंग तिला दिले होते, त्या सत्पुरुषांना प्रिय असलेल्या भगवान शंकरांना सोडून सुस्कारे टाकीत ती आपल्या माता-पित्यांच्या घरी निघाली. सती तावातावाने एकटीच निघालेली पाहून श्रीमहादेवांचे मनोगत ओळखून मणिमान, मद इत्यादी हजारो शिवगण नंदीला पुढे घालून आणि यक्षांना बरोबर घेऊन मोठया वेगाने निर्भयपणे तिच्या पाठोपाठ निघाले. त्यांनी सतीला नंदीवर बसविले. मैना, चेंडू, आरसा, आणि कमळ ह्या मनोरंजनाच्या वस्तू तिला दिल्या. शुभ्र छत्र-चामरे, माळ इत्यादी राजचिह्ने बरोबर घेतली आणि नगारे, शंख, बासरी इत्यादी वाद्ये वाजवत ते तिच्याबरोबर चालू लागले. (१-५)

त्यानंतर सती यज्ञमंडपात पोहोचली. तेथे मंत्रपठण करणार्‍या ब्राह्मणांमध्ये मोठयाने मंत्र म्हणण्याची जणू स्पर्धा लागली होती. सगळीकडे ब्रह्मर्षी आणि देव विराजमान झाले होते. तसेच इकडे तिकडे माती, लाकूड, लोखंड, सोने यांची पात्रे व दर्भासने, हरिणाजिने इत्यादी आसने होती. तेथे पोहोचल्यावर पित्याने सतीची अवहेलना केली. हे पाहून यज्ञकर्त्या दक्षाच्या भीतीने सतीची माता आणि बहिणींशिवाय दुसर्‍या कोणीही तिचा आदर केला नाही. तिची माता आणि बहिणी यांनी मात्र प्रेमाने सद्‌गदित होऊन सतीला आदराने मिठया मारल्या. परंतु पित्याकडून अनादर झाल्यामुळे सतीने बहिणींनी केलेला कुशलप्रश्नसहित प्रेमपूर्ण वार्तालाप, माता आणि मावश्या यांनी सन्मानपूर्वक दिलेल्या भेटी, तसेच सुंदर आसन इत्यादींचा स्वीकार केला नाही. (६-८)

सर्वलोकेश्वरी देवी सतीचा तर यज्ञमंडपात अनादर झालेला होताच. तिला असेही दिसले की, त्या यज्ञात भगवान शंकरांच्यासाठी यज्ञभाग न देऊन तिच्या वडिलांनी त्यांचा अपमान केलेला आहे. हे पाहून तिच्या अंगाचा तिळपापड झाला. त्यावेळी असे वाटत होते की, ती आपल्या रागाने संपूर्ण लोक भस्म करून टाकील. कर्ममार्गाच्या अभ्यासामुळे गर्व झालेला दक्ष शंकरांचा द्वेष करीत आहे, असे पाहून भूतगण त्याला मारण्यासाठी उद्युक्त झाले. तेव्हा सतीने त्यांना आपल्या प्रभावाने आवरले आणि सर्वांच्या समक्ष अडखळणार्‍या शब्दांत ती पित्याची निर्भर्त्सना करू लागली. (९-१०)

श्रीदेवी म्हणाली - या संसारात भगवान शंकरांपेक्षा कोणीही मोठा नाही. ते सर्व देह धारण करणार्‍यांचा प्रिय आत्मा आहेत. त्यांना कोणी प्रिय नाही, की कोणी अप्रिय नाही, म्हणून त्यांचे कोणाही प्राण्याशी वैर नाही. ते सर्वांचे कारण आणि सर्वरूप आहेत. त्यांना विरोध करणारा आपल्याशिवाय दुसरा कोण आहे ? हे द्विजवर, आपल्यासारखे लोक दुसर्‍यांच्या गुणांमध्येही दोष पाहतात, परंतु कोणी साधुपुरुष असे करीत नाहीत. जे लोक दुसर्‍यांच्या थोडयाशा गुणांनाही मोठेच समजतात, ते सर्वांत श्रेष्ठ होत. आपण अशा महापुरुषांनाच दोष दिलेला आहे. दुष्ट लोक या शवरूप जडशरीरालाच आत्मा मानून ईर्ष्येने नेहमी महापुरुषांची निंदा करतात, यात काही आश्चर्य नाही; कारण महापुरुष त्यांनी केलेल्या निंदेकडे लक्ष देत नाहीत. परंतु त्यांच्या चरणांची धूळच अशांचा हा अपराध सहन न करून त्यांचे तेज नष्ट करते. म्हणून असे कार्य त्या दुष्ट पुरुषांनाच शोभून दिसते. ज्यांचे शिव हे दोन अक्षरी नाव प्रसंगवशात एकदा जरी मुखातून निघाले, तरी ते मनुष्याचे सर्व पाप तत्काळ नष्ट करते. आणि अहो, ज्यांच्या आज्ञेचे कोणीच उल्लंघन करू शकत नाही, त्या पवित्रकीर्ती मंगलमय भगवान शंकरांचाच अमंगळ असे तुम्ही द्वेष करीत आहात. अहो ! महापुरुषांचे मनरूपी मधुकर ब्रह्मानंदमय रसाचे पान करण्याच्या इच्छेने ज्यांच्या चरणकमलांचे नित्य सेवन करतात आणि ज्यांचे चरणारविंद सकाम पुरुषांना त्यांचे इष्ट भोगही देतात, त्या विश्वबंधू भगवान शिवांशी आपण वैर करीत आहात. (११-१५)

ते केवळ नावाचे ‘शिव’ आहेत. वास्तविक ते ‘अशिव,’ अमंगळ आहेत ही गोष्ट आपल्याशिवाय दुसरे कोणी मानत नाहीत. नाहीतर जे भगवान शिव स्मशानभूमीतील प्रेतांच्या मुंडक्यांच्या माळा, चितेतील भस्म, आणि हाडे अंगावर घालून, अस्ताव्यस्त जटा पसरून भूत-पिशाचांच्या बरोबर स्मशानात निवास करतात, त्यांच्याच चरणांवरून पडलेले निर्माल्य ब्रह्मदेव आदी देवांनी आपल्या शिरावर का धारण केले असते ! जर बेताल माणूस धर्ममर्यादांचे रक्षण करणार्‍या आपल्या पूजनीय स्वामीची निंदा करील आणि आपल्यात त्याला दंड देण्याची शक्ती नसेल तर त्याने कान बंद करून तेथून निघून जावे आणि शक्ती असेल तर त्याला ताकदीने पकडून ती बकवास करणारी अमंगळ दुष्ट जीभ छाटून टाकावी. किंबहुना आपले प्राणसुद्धा द्यावेत, हाच धर्म आहे. आपण भगवान नीलकंठांची निंदा करणारे आहात; म्हणून आपल्यापासून उत्पन्न झालेले हे शरीर मी आता ठेवू इच्छित नाही. चुकून जरी एखादी अयोग्य वस्तू खाल्ली गेली, तर ओकारी करून ती काढून टाकल्यामुळेच मनुष्याची शुद्धी होते, असे म्हटले जाते. जो महामुनी नेहमी आपल्या स्वरूपातच रममाण झालेला असतो, त्याला वेदांची विधि-निषेधमय वाक्ये मुळीच लागू होत नाहीत. जसा देव आणि मनुष्य़ांच्या राहाण्याच्या नियमांमध्ये फरक असतो, तसाच ज्ञानी व अज्ञानी यांच्या व्यवहारात फरक असतो. यासाठी आपल्याच धर्माप्रमाणे वागणार्‍यानेही दुसर्‍याच्या मार्गाची निंदा करू नये. प्रवृत्ती (यज्ञ-याग इत्यादी) आणि निवृत्ती (शम-दम इत्यादी) अशी दोन्ही प्रकारची कर्मे योग्य आहेत. वेदांमध्ये त्यांचे रागी आणि विरागी असे दोन प्रकारचे वेगवेगळे अधिकारी सांगितले आहेत. ती कर्मे परस्परविरोधी असल्याकारणाने दोन्ही प्रकारच्या कर्मांचे अनुष्ठान एकाच वेळी एकाच पुरुषाकडून होणे शक्य नाही. भगवान शंकर तर परब्रह्म परमात्मा आहेत, त्यांना या दोन्हींपैकी कोणतेच कर्म करण्याची आवश्यकता नाही. (१६-२०)

तात, आमचे ऐश्वर्य अव्यक्त आहे. आत्मज्ञानी महापुरुषच त्याचे सेवन करू शकतात. आपल्याजवळ ते ऐश्वर्य नाही आणि यज्ञातील अन्नाने तृप्त होऊन प्राणपोषण करणारे यज्ञशाळांतील कर्मठ त्याची प्रशंसा करीत नाहीत. आपण भगवान शंकरांचा अपराध करणारे आहात. म्हणून आपल्या शरीरापासून उत्पन्न झालेल्या निंद्य देहाला ठेवून मी काय करू ? आपल्यासारख्या दुर्जनाशी संबंध असल्याची मला लाज वाटते. जो महापुरुषांचा अपराध करतो, त्याच्यापासून होणा‍र्‍या जन्माचाही धिक्कार असो. ज्यावेळी भगवान शिव आपल्याशी माझा संबंध दाखविताना थट्टेने मला ‘दाक्षायणी’(दक्षकुमारी) या नावाने पुकारतील, तेव्हा थट्टेऐवजी मला ते लज्जास्पद वाटेल आणि खेद होईल. म्हणून त्याअगोदरच मी आपल्या अंगापासून उत्पन्न झालेल्या या शवतुल्य देहाचा त्याग करीन. (२१-२३)

मैत्रेय म्हणतात - हे शत्रुंजय विदुरा ! त्या यज्ञमंडपात दक्षाला एवढे बोलून सतीने मौन स्वीकारले आणि उत्तर दिशेकडे ती जमिनीवर बसली. पिवळे वस्त्र परिधान केलेल्या तिने आचमन करून डोळे बंद करून ती योगमार्गात प्रविष्ट झाली. तिने आसन स्थिर करून प्राणायामाने प्राण आणि अपानाला एकरूप करून नाभिचक्रामध्ये स्थिर केले. नंतर उदानवायूला नाभिचक्रातून वर आणून हळू हळू बुद्धीसह हृदयात स्थापन केले. त्यानंतर पूज्य सतीने त्या हृदयस्थित वायूला कंठमार्गाने भ्रुकुटींच्यामध्ये आणले. अशा प्रकारे, ज्या शरीराला महापुरुषांनासुद्धा पूजनीय भगवान शंकरांनी कित्येक वेळा मोठया आदराने आपल्या मांडीवर बसविले होते, त्याचा दक्षावरील रागाने त्याग करण्याच्या इच्छेने महामनस्विनी सतीने आपल्या संपूर्ण अंगामध्ये वायू आणि अग्नीची धारणा केली. आपले पती जगद्‌गुरू भगवान शंकरांच्या चरणकमलमकरंदाचे चिंतन करीत सतीने इतर विचार सोडून दिले. यामुळे सर्वथा निर्दोष झालेल्या तिचे शरीर ताबडतोब योगाग्नीने जळून गेले. (२४-२७)

त्यावेळी तेथे आलेल्या देव, ऋषी आदींनी जेव्हा हे महान आश्चर्य पाहिले, तेव्हा आकाशात आणि पृथ्वीवर सगळीकडे हाहाकार माजला. ते म्हणू लागले."अरेरे ! दक्षाच्या दुर्वर्तनाने रागावून महादेवांच्या प्राणप्रिय सतीने प्राणत्याग केला ! पहा ना ! सर्व चराचर जीव या दक्ष प्रजापतीचीच संताने आहेत. तरीसुद्धा याने केवढे दुष्कर्म केले ! याची कन्या शुद्धहृदया सती नेहमीच सन्मानासाठी पात्र होती; परंतु याने तिचा अनादर केल्यामुळे तिने प्राणांचा त्याग केला. हा फारच अहंकारी आणि ब्रह्मद्रोही असल्याने याची सगळीकडे मोठीच अपकीर्ती होईल. जेव्हा याची कन्या याने केलेल्या अपराधामुळे प्राणत्याग करावयास तयार झाली, तेव्हासुद्धा, शंकरांचा द्रोह करणार्‍या याने तिला अडविले नाही." (२८-३०)

ज्यावेळी सर्वजण लोक असे बोलत होते, त्याचवेळी शंकरांचे गण सतीचा हा अद्‌भुत प्राणत्याग पाहून शस्त्रास्त्रे घेऊन दक्षाला मारण्यासाठी उठून उभे राहिले. त्यांच्या आक्रमणाचा आवेश पाहून भगवान भृगूंनी यज्ञात विघ्न उत्पन्न करणार्‍यांचा नाश करण्यासाठी "अपहतं रक्ष...." इ. मंत्रांचे उच्चारण करीत दक्षिणाग्नीमध्ये आहुती दिली. अध्वर्यू भृगूने आहुती टाकताच यज्ञकुंडातून ‘ऋभू’ नावाचे हजारो तेजस्वी देव प्रगट झाले. यांनी आपल्या तपःप्रभावाने चंद्रलोक प्राप्त केला होता. त्या ब्रह्मतेजसंपन्न देवतांनी जळत्या लाकडांनिशी जेव्हा आक्रमण केले, तेव्हा सर्व गुह्यक आणि प्रमथगण इतस्ततः पळाले. (३१-३४)

स्कंध चवथा - अध्याय चवथा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP