|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ४ था - अध्याय ३ रा
सतीचा पित्याकडे यज्ञोत्सवात जाण्यासाठी आग्रह - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] मैत्रेय म्हणतात - अशा प्रकारे ते श्वशुर-जामाता आपापसात वैर करीत असतानाच पुष्कळ काळ निघून गेला. जेव्हा ब्रह्मदेवांनी दक्षाला सर्व प्रजापतींचा अधिपती नियुक्त केले, तेव्हा तर त्याचा गर्व आणखीच वाढला. त्याने भगवान शंकर आदी ब्रह्मनिष्ठांना यज्ञभाग न देता त्यांचा तिरस्कार करीत प्रथम वाजपेय यज्ञ केला आणि नंतर बृहस्पतिसव नावाच्या महायज्ञाला आरंभ केला. त्या यज्ञोत्सवात सर्व ब्रह्मर्षी, देवर्षी, पितर, देव इत्यादी आपापल्या पत्नींसहित आले. तेव्हा दक्षांनी त्या सर्वांचे स्वागत केले. (१-४) त्यावेळी आकाशमार्गाने जाताना देव आपापसात त्या यज्ञाची चर्चा करीत चालले होते. त्यांच्या तोंडून दक्षकुमारी सतीने आपल्या पित्याच्या घरी होणार्या यज्ञाची गोष्ट ऐकली. तिने पाहिले की, आपले निवासस्थान असलेल्या कैलास पर्वताजवळून सर्व बाजूंनी गंधर्व आणि यक्ष यांच्या सुंदर पत्न्या झगमगणारी कुंडले आणि हार घालून, खूप नटून-थटून आपापल्या पतींच्यासह विमानात बसून त्या यज्ञोत्सवाला जात आहेत. त्यामुळे तिलाही मोठी उत्सुकता निर्माण झाली आणि ती आपले पती भगवान भूतनाथांना म्हणाली. (५-७) सती म्हणाली - हे वामदेव, यावेळी आपले श्वशुर दक्ष प्रजापतींकडे फार मोठा यज्ञोत्सव चालू आहे असे मी ऐकले आहे. पाहा ! या सर्व देवता तिकडेच जात आहेत. आपली इच्छा असेल तर आपणही जाऊ. यावेळी आपल्या आप्तांना भेटण्यासाठी माझ्या बहिणीसुद्धा आपापल्या पतींसह तिथे अवश्य येतील. मलाही असे वाटते की, आपल्याबरोबर तेथे जाऊन माता-पित्यांनी दिलेले दागिने, कपडे इत्यादी भेटी स्वीकाराव्यात. तेथे आपल्या पतींसह आलेल्या बहिणी, मावश्या आणि प्रेमळ माता यांना पाहण्यासाठी बर्याच दिवसांपासून मी उत्सुक आहे. हे कल्याणमय ! याखेरीज तेथे महर्षींनी आरंभलेला श्रेष्ठ यज्ञसुद्धा पाहावयास मिळेल. हे अजन्मा प्रभो, आपल्या मायेने रचलेले हे परम आश्चर्यमय त्रिगुणात्मक जग आपल्यातच भासत आहे. पण मी सामान्य स्त्री असल्यामुळे आपल्या स्वरूपाविषयी अनभिज्ञ आहे. म्हणून आपली जन्मभूमी पाहाण्यासाठी मी उत्सुक आहे. हे जन्मरहित नीलकंठ ! पहा ना ! यांत कितीतरी दक्षाशी संबंध नसलेल्यासुद्धा स्त्रिया आपापल्या पतींसह नटून-थटून गटागटांनी तेथे जात आहेत. तेथे जाणार्या या देवांगनांच्या राजहंसाप्रमाणे शुभ्र विमानांनी आकाशमंडल कसे सुशोभित झाले आहे. सुरश्रेष्ठ, अशा स्थितीत आपल्या पित्याकडे होत असलेल्या उत्सवाची बातमी ऐकून त्यांची कन्या तेथे जाण्यासाठी का बरे उतावीळ होणार नाही ? पती, गुरू, माता-पिता इत्यादी आप्तेष्टांच्या घरी न बोलावताही जाता येते. म्हणून देवा, आपण माझ्य़ावर प्रसन्न व्हावे. आपण माझी ही इच्छा अवश्य पूर्ण केली पाहिजे. आपण मोठे करुणामय आहात; म्हणून तर परम ज्ञानी असूनसुद्धा आपण मला आपल्या अर्धांगीचे स्थान दिले आहे. आता माझ्या या विनंतीकडे लक्ष देऊन मला अनुगृहीत करावे. (८-१४) मैत्रेय म्हणतात - आपल्या प्रिय सतीने याप्रकारे प्रार्थना केल्यावर आत्मीयांचे प्रिय करणार्या भगवान शंकरांना दक्षप्रजापतीच्या, त्या सर्व प्रजापतींच्या देखत बोललेल्या मर्मभेदी दुर्वचनरूप बाणांचे स्मरण झाले, तेव्हा ते हसून म्हणाले. (१५) श्रीभगवान म्हणाले - हे सुंदरी, तू जे म्हणालीस की, आपल्या बंधुजनांकडे न बोलावताही जाता येते, ते योग्यच आहे. परंतु जेव्हा त्यांची दृष्टी अतिशय प्रबळ देहाभिमानाने उत्पन्न झालेल्या मद आणि क्रोध यांमुळे द्वेषयुक्त नसेल तेव्हाच. विद्या, तप, धन, सुदृढ शरीर, तारुण्य, आणि उच्च कुल हे सहा सत्पुरुषांचे गुण आहेत; परंतु नीच पुरुषांमध्ये हेच अवगुण होऊन जातात. कारण या गुणांमुळे त्यांचा अभिमान वाढतो आणि दृष्टी दोषयुक्त होते. त्यामुळे विवेकशक्ती नष्ट होते. याच कारणांमुळे ते महापुरुषांचा प्रभाव जाणू शकत नाहीत. म्हणूनच जे आपल्याकडे आलेल्यांना कुटिल बुद्धीने भुवया चढवून रागाने पाहातात, त्या चंचल मनाच्या लोकांच्या घरी केवळ बांधव समजून जाणे बरे नव्हे. आपल्या कुटिलबुद्धी स्वजनांच्या कठोर वचनांनी जशी व्यथा होते, तशी शत्रूच्या बाणांनी घायाळ झाल्यानेही होत नाही. कारण बाणांनी शरीर छिन्न-भिन्न झाल्यावर ग्लानीमुळे झोप येते; परंतु, स्वजनांच्या कुटिल वाक्यांनी मर्मस्थानी आघात झाल्याने मनुष्य रात्रंदिवस बेचैन राहातो. (१६-१९) हे सुंदरी, परमोच्च पदावर चढलेल्या दक्ष प्रजापतीला आपल्या कन्यांमध्ये तू सर्वांत जास्त प्रिय आहेस, हे मी जाणतो; तथापि माझ्या संबंधामुळे तुला आपल्या पित्याकडून मान मिळणार नाही. कारण त्याचा माझ्यावर अतिशय राग आहे. जीवांच्या चित्तवृत्तीचे साक्षी असणार्या अहंकारशून्य महापुरुषांच्या (पारमार्थिक) समृद्धीला पाहून ज्यांच्या हृदयात संताप आणि इंद्रियांना व्यथा होते, तो पुरुष त्यांचे पद सहजतया प्राप्त करू शकत नाही. दैत्य श्रीहरींचा जसा द्वेष करतात, तसाच ते त्यांचा मत्सर करतात. (२०-२१) हे प्रिये, सामोरे जाणे, नम्रता दाखविणे, प्रणाम करणे इत्यादी क्रिया ज्या लोकव्यवहारामध्ये परस्परांत केल्या जातात, त्याच तत्त्वज्ञान्यांच्या द्वारा फार चांगल्या रीतीने केल्या जातात. ते अंतर्यामीरूपाने सर्वांच्या अंतःकरणात असलेल्या परमपुरुष वासुदेवालाच प्रणाम इत्यादी करतात; देहाभिमानी पुरुषांना करीत नाहीत. विशुद्ध अंतःकरणाचे नावच वसुदेव आहे, कारण तेथेच भगवान वासुदेवांचा प्रत्यक्ष अनुभव येतो. त्या शुद्ध चित्तात असणार्या इंद्रियातीत भगवान वासुदेवांनाच मी नमस्कार करतो. म्हणून हे प्रिये, ज्याने प्रजापतींच्या यज्ञात माझा काहीही अपराध नसताना कटुवाक्यांनी तिरस्कार केला होता, तो दक्ष जरी तुला शरीर देणारा तुझा पिता असला तरी माझ्याशी शत्रुत्व असल्यामुळे तू त्याला किंवा त्याच्या अनुयायांना पाहाण्याचासुद्धा विचार करू नकोस. तू माझे न ऐकता तेथे जाशील तर तुझे त्यात हित होणार नाही. कारण जेव्हा एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचा आपल्या आप्तजनांकडून अपमान होतो, तेव्हा तो तत्काळ त्याच्या मृत्यूचे कारण होतो. (२२-२५) स्कंध चवथा - अध्याय तिसरा समाप्त |