श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय २ रा

भगवान शिव आणि दक्ष प्रजापती यांचा द्वेष -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

विदुरांनी विचारले - ब्रह्मन, प्रजापती दक्ष यांचे तर कन्यांवर प्रेम होते. मग त्यांनी आपली कन्या सती हिचा अनादर करून शीलवानांमध्ये सर्वश्रेष्ठ श्रीमहादेवांचा द्वेष का केला ? महादेव तर चराचराचे गुरू, वैररहित, शांतमूर्ती, आत्माराम आणि जगाचे परम आराध्य दैवत आहेत. त्यांच्याशी कोण आणि का बरे वैर करील ? (१-२)

भगवन, त्या श्वशुर आणि जामात यांच्यामध्ये इतका विद्वेष कसा उत्पन्न झाला, ज्यामुळे सतीने आपल्या सोडण्यास कठीण अशा प्राणांचाही त्याग केला ? हे आपण मला सांगावे. (३)

मैत्रेय म्हणाले - विदुरा, पूर्वी एकदा प्रजापतींच्या यज्ञात सर्व मोठमोठे ऋषी, देवता, मुनी आणि अग्नी आपापल्या अनुयायांसह एकत्र आले होते. त्यावेळी आपल्या तेजाने सूर्याप्रमाणे प्रकाशमान असल्यामुळे त्या विशाल सभाभवनातील अंधार दूर करणार्‍या दक्षांना आलेले पाहून ब्रह्मदेव आणि महादेवाव्यतिरिक्त ऋषी, अग्नी इत्यादी सर्व सभासद त्यांच्या तेजाने प्रभावित होऊन आपापल्या आसनावरून उठून उभे राहिले. अशा प्रकारे सर्व सभासदांच्याकडून चांगल्याप्रकारे सन्मान प्राप्त झालेले तेजस्वी दक्ष जगत्पिता ब्रह्मदेवांना प्रणाम करून त्यांच्या आज्ञेने आपल्या आसनावर बसले. (४-७)

परंतु महादेवांना पहिल्यापासूनच बसून राहिलेले पाहून आपला अनादर केला असे वाटून दक्षांना त्यांचा हा व्यवहार सहन झाला नाही. त्यांनी त्यांच्याकडे तिरप्या नजरेने अशा रीतीने पाहिले की, जणू त्यांना ते क्रोधाग्नीने जाळून टाकतील. नंतर ते म्हणाले. "देव आणि अग्नींसहित समस्त ब्रह्मर्षिगण हो, माझे म्हणणे ऐका. मी हे अज्ञानाने किंवा द्वेषाने म्हणत नाही; परंतु शिष्टाचार काय आहे ते सांगतो. हा निर्लज्ज, लोकपालांच्या पवित्र कीर्तीला धुळीला मिळवीत आहे. या घमेंडखोराने सत्पुरुषांनी आचरलेल्या मार्गाला लांछन लावले आहे. मर्कटासारखे डोळे असलेल्या याने सत्पुरुषांप्रमाणे माझ्या सावित्रीसारख्या मृगनयना पवित्र कन्येचे अग्नी आणि ब्राह्मणांच्या समक्ष पाणिग्रहण केले होते. त्यामुळे हा मला पुत्रासमान आहे. याने उठून उभे राहून मला प्रणाम करायला हवा होता; परंतु याने वाणीनेसुद्धा माझा सत्कार केला नाही. अरेरे ! शूद्राला वेद शिकवावेत, त्याप्रमाणे मी इच्छा नसतानाही याला आपली सुकुमार कन्या दिली. हा तर सत्कर्मे न करणारा, नेहमी अपवित्र राहणारा, घमेंडखोर आणि धर्माची मर्यादा ओलांडणारा आहे. हा भयंकर स्मशानात भूत-प्रेतांना बरोबर घेऊन वेडयाप्रमाणे, डोक्यावरील केस अस्ताव्यस्त टाकून कधी हसत, कधी रडत, नागडा-उघडा भटकत असतो. याने सर्व शरीरावर चितेवरील अपवित्र भस्म लावलेले असते. गळ्यामध्ये माणसांच्या मुंडक्यांच्या माळा आणि शरीरावर हाडांचे दागिने घातलेले असतात. हा तर केवळ नावाचाच शिव आहे. प्रत्यक्षात अ शिव(अमंगलरूप), स्वतः वेडा असून वेडयांनाच प्रिय वाटणारा आहे. भूत-प्रेत-पिशाच्च आदी केवळ तमोगुणी जीवांचा हा नेता आहे. अहो ! मी केवळ ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून अशा भूतांचा सरदार, आचारहीन आणि दुष्ट स्वभाव असणार्‍याला माझी सुंदर कन्या दिली. (८-१६)

मैत्रेय म्हणाले - विदुरा, दक्षांनी याप्रकारे महादेवांची फार निंदा केली, तथापि त्यांनी कोणताच प्रतिकार केला नाही. यामुळे दक्षांच्या क्रोधाचा पारा आणखी चढला आणि पाणी हातात घेऊन ते त्यांना शाप देण्यास तयार झाले. दक्ष म्हणाले, "हा महादेव देवांमध्ये अत्यंत अधम आहे. आता याला इंद्र-उपेंद्र इत्यादी देवतांच्या बरोबरीने यज्ञातील भाग न मिळो." हे विदुरा, मुख्य सभासदांनी त्यांना असे करण्यास मनाई केली, तरी महादेवांना शाप देऊन ते रागारागाने सभेच्या बाहेर पडून आपल्या घरी निघून गेले. (१७-१९)

श्रीशंकरांच्या गणांमध्ये अग्रगण्य असणार्‍या नंदीश्वराला जेव्हा दक्षाने शाप दिलेला कळला, तेव्हा तो अतिशय संतापला आणि त्याने दक्षाला तसेच दक्षाच्या दुर्वचनांना मान्यता देणार्‍या ब्राह्मणांना भयंकर शाप दिला. तो म्हणाला - "जो या मर्त्य शरीराचा अभिमान बाळगून कोणाचाही द्रोह न करणार्‍या भगवान शंकरांचा द्वेष करतो, तो भेद-बुद्धीचा मूर्ख दक्ष तत्त्वज्ञानाला विन्मुख राहील. हा ’चातुर्मास्य यज्ञ करणार्‍याला अक्षय पुण्य प्राप्त होते’ इत्यादी अर्थवादरूप वेदवाक्यांनी मोहित आणि विवेकभ्रष्ट होऊन विषयसुखाच्या इच्छेने क्षुद्र धर्ममय अशा गृहस्थाश्रमात आसक्त राहून कर्मकांडातच मग्न असतो. याची बुद्धी देहादिकांमध्येच आत्मभाव मानणारी असल्याने हा आत्मस्वरूपाला विसरलेला पशू आहे. हा अत्यंत स्त्री-लंपट होऊन लवकरच त्याचे तोंड बोकडासारखे होईल. कर्ममय अविद्येलाच विद्या समजणारा हा मूर्ख आणि जे याच्या मागे लागून भगवान शंकरांचा अपमान करणारे आहेत, ते सर्व जन्म-मरणरूप संसारचक्रात पडून राहोत. वेदांच्या फलश्रुतिरूप फुलांनी सुशोभित आणि कर्मफलरूप मनमोहक सुगंधाने ज्यांचे चित्त मोहित झाले आहे, असे शंकरद्रोही कर्माच्या जाळ्यातच अडकून राहोत. हे ब्राह्मण लोक भक्ष्य-अभक्ष्याचा विचार सोडून केवळ पोट भरण्यासाठीच विद्या, तप, आणि व्रतादिकांचा आश्रय घेऊन तसेच धन, शरीर, आणि इंद्रियांच्या सुखालाच सुख मानून त्यांचे गुलाम होऊन जगात भीक मागत भटकत राहोत." (२०-२६)

नंदीने अशा प्रकारे ब्राह्मणकुलाला दिलेला शाप ऐकून भृगूंनी त्याला दुस्तर प्रतिशापरूप ब्रह्मदंड दिला. "जे लोक शैवपंथी आहेत आणि जे त्यांचे अनुयायी आहेत, ते सत्-शास्त्रांच्या विरुद्ध आचरण करणारे आणि पाखंडी होवोत. पवित्र आचाररहित, मंदबुद्धी, जटा, राख, आणि हाडे धारण करणारे, तसेच मद्याला पवित्र मानणारेच, शैव संप्रदायाचे अनुयायी होवोत. तुम्ही धर्ममर्यादेचे संस्थापक आणि वर्णाश्रमांचे रक्षक असणार्‍या वेद आणि ब्राह्मणांची निंदा करीत आहात, यावरून तुम्ही पाखंडमताचा आश्रय घेतला आहे, हे सिद्ध होते. हा वेदमार्गच लोकांसाठी कल्याणकारक आणि सनातन मार्ग आहे. याच मार्गावरून पूर्वज चालत आले आहेत आणि याचे मूळ साक्षात श्रीविष्णू आहेत. तुम्ही सत्पुरुषांच्या परमपवित्र आणि सनातन मार्गस्वरूप वेदाची निंदा करीत आहात. म्हणून जिथे भूतांचे स्वामी तुमचे इष्टदेव आहेत, त्या पाखंडमार्गाने जा." (२७-३२)

मैत्रेय म्हणतात, भृगुऋषींनी असा शाप दिल्यामुळे भगवान शंकर काहीसे खिन्न झाले आणि आपल्या अनुयायांसहित तेथून निघून गेले. तेथे प्रजापतिलोक जो यज्ञ करीत होते, त्यात पुरुषोत्तम श्रीहरीच उपास्यदेव होते. आणि तो यज्ञ एक हजार वर्षांनी पूर्ण होणार होता. तो पूर्ण करून त्या प्रजापतींनी श्रीगंगा-यमुनेच्या संगमात यज्ञपूर्तीनंतर करावयाचे अवभृथ स्नान केले. आणि मग प्रसन्न मनाने ते आपापल्या ठिकाणी निघून गेले. (३३-३५)

स्कंध चवथा - अध्याय दुसरा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP