श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय १ ला

स्वायंभुव मनूच्या कन्यांच्या वंशाचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

मैत्रेय म्हणतात - विदुरा, स्वायंभुव मनूला महाराणी शतरूपेपासून प्रियव्रत आणि उत्तानपाद या दोन पुत्रांखेरीज तीन कन्यासुद्धा झाल्या. त्या आकूती, देवहूती आणि प्रसूती नावांनी विख्यात होत्या. आकूतीला जरी भाऊ होते, तरी शतरूपेच्या अनुमतीने राजाने आकूतीचा विवाह ‘पुत्रिकाधर्मानुसार’ रुची प्रजापतीबरोबर लावून दिला. (१-२)

भगवंतांचे अनन्य चिंतन करीत असल्याकारणाने प्रजापती रुची ब्रह्मतेजाने संपन्न होते. त्यांनी आकूतीपासून एक पुरुष आणि एक स्त्री अशी जोडी उत्पन्न केली. त्यांपैकी जो पुरुष होता, तो साक्षात यज्ञस्वरूपी भगवान विष्णू होते, आणि जी स्त्री होती, ती भगवंतांपासून कधीही विभक्त न राहाणारी लक्ष्मीची अंशस्वरूप ‘दक्षिणा’ होती. स्वायंभुव मनूने आकूतीच्या त्या परमतेजस्वी पुत्राला आनंदाने आपल्या घरी आणले आणि दक्षिणेला रुची प्रजापतीने आपल्याजवळ ठेवले. जेव्हा दक्षिणा विवाहयोग्य झाली, तेव्हा तिने यज्ञ भगवानांनाच पतिरूपाने प्राप्त करण्याची इच्छा केली. तेव्हा भगवान यज्ञपुरुषांनी तिच्याशी विवाह केला. यामुळे भगवंतांनी प्रसन्न होऊन आनंदित झालेल्या दक्षिणेपासून बारा पुत्र उत्पन्न केले. त्यांची नावे अशी - तोष, प्रतोष, संतोष, भद्र, शांती, इडस्पती, इध्म, कवी, विभू, स्वह्न, सुदेव, आणि रोचन. हेच स्वायंभुव मन्वन्तरात ‘तुषित’ नावाचे देव झाले. त्या मन्वन्तरात मरीची आदी सप्तर्षी होते. भगवान यज्ञच इंद्र होता आणि महान प्रभावशाली प्रियव्रत आणि उत्तानपाद हे मनुपुत्र होते. ते मन्वन्तर त्या दोघांचे पुत्र, नातू, पणतू, यांच्या वंशाने भरून गेले. (३-९)

प्रिय विदुरा, मनूंनी आपली दुसरी कन्या देवहूती ही कर्दमांना दिली. त्यासंबंधीची सर्व माहिती आपण माझ्याकडून ऐकलेली आहेच. भगवान मनूंनी आपली तिसरी कन्या प्रसूती ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष प्रजापतीला दिली. त्याची विशाल वंशपरंपरा सर्व त्रैलोक्यात पसरली आहे. (१०-११)

कर्दमांच्या ज्या नऊ कन्या नऊ ब्रह्मर्षींच्या पत्‍नी होत्या, त्यांच्या वंशपरंपरेचे वर्णन ऐक. मरीची ऋषींची पत्‍नी म्हणजेच कर्दमांची कन्या कला हिच्यापासून कश्यप आणि पूर्णिमा नावाची दोन अपत्ये झाली. त्यांच्या वंशांनी हे जग भरलेले आहे. हे शत्रुंजय विदुरा, पूर्णिमेला विरज आणि विश्वग नावाची दोन मुले आणि देवकुल्या नावाची एक कन्या झाली. हीच पुढच्या जन्मात श्रीहरींच्या चरणतीर्थापासून देवनदी गंगेच्या रूपाने प्रगट झाली. अत्रींची पत्‍नी अनसूया हिला दत्तात्रेय, दुर्वास, आणि चंद्र नावाचे तीन परम यशस्वी पुत्र झाले. हे अनुक्रमे विष्णू, शंकर आणि ब्रह्मदेव यांचे अवतार होते. (१२-१५)

विदुराने विचारले - गुरुवर्य ! जगाची उत्पत्ती, स्थिती आणि अंत करणार्‍या या सर्वश्रेष्ठ देवांनी अत्रिमुनींच्या घरी काय करण्याच्या इच्छेने अवतार घेतला, हे मला सांगा. (१६)

मैत्रेय म्हणाले - जेव्हा ब्रह्मदेवांनी ब्रह्मज्ञान्यांमध्ये श्रेष्ठ असणार्‍या अत्रींना संतती उत्पन्न करण्याची आज्ञा दिली, तेव्हा ते आपल्या पत्‍नीसह तप करण्यासाठी ऋक्ष नावाच्या कुलपर्वतावर गेले. तेथे फुलांच्या गुच्छांनी लहडलेले पलाश आणि अशोक वृक्षांचे वन होते. तसेच तेथे सगळीकडे निर्विन्ध्या नदीच्या पाण्याचा खळखळाट मधुर ध्वनी करीत होता. त्या वनात ते मुनी प्राणायामाने चित्ताला वश करून शंभर वर्षेंपर्यंत केवळ वायू भक्षण करून थंडी-उष्णता इत्यादी द्वंद्वांची पर्वा न करता एका पायावर उभे होते. त्यावेळी ते मनोमन अशी प्रार्थना करीत होते की, "जो कोणी संपूर्ण जगाचा ईश्वर आहे, त्याला मी शरण आलो आहे. त्याने मला स्वतःसारखेच संतान द्यावे." (१७-२०)

प्राणायामरूपी इंधनाने प्रज्वलित झालेले अत्रिमुनींचे तेज त्यांच्या मस्तकातून निघून तिन्ही लोकांना तप्त करीत आहे, असे पाहून ब्रह्मा, विष्णू, आणि महादेव हे तिन्ही जगत्पती त्यांच्या आश्रमात आले. त्यावेळी अप्सरा, मुनी, गंधर्व, सिद्ध, विद्याधर आणि नाग त्यांचे सुयश गात होते. त्या तिघांचे एकाच वेळी आगमन झाल्याने अत्रिमुनींचे अंतःकरण प्रकाशमय झाले. त्यांनी एका पायावर उभे असतानाच त्या देवदेवांचे दर्शन घेतले आणि नंतर जमिनीवर साष्टांग प्रणाम करून अर्घ्य, फुले, इत्यादी पूजेची सामग्री हातात घेऊनच त्यांचे पूजन केले. ते तिघेही हंस, गरुड, आणि नंदी या वाहनांवर बसले होते. तसेच आपल्या हातातील कमंडलू, चक्र, त्रिशूल, इत्यादी चिह्नांनी युक्त होते. त्यांच्या डोळ्यांतून कृपेचा वर्षाव होत होता. त्यांच्या मुखावर मंद हास्य विलसत होते. त्यांच्या तेजाने दिपून जाऊन मुनींनी आपले डोळे झाकून घेतले. त्यांनी आपले चित्त त्यांच्यावर एकाग्र केले आणि हात जोडून अतिमधुर आणि सुंदर भावपूर्ण वचनांनी लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ अशा त्या तिन्ही देवांची स्तुती करण्यास सुरुवात केली. (२१-२६)

अत्रिमुनी म्हणाले - भगवन, प्रत्येक कल्पाच्या आरंभी जगाची उत्पत्ती, स्थिती, आणि लय यासाठी जे मायेच्या सत्त्वादी तीन गुणांचे विभाग करून भिन्न-भिन्न शरीरे धारण करतात, ते ब्रह्मा, विष्णू, आणि महादेव आपणच आहात. मी आपणांस प्रणाम करतो. मी ज्यांचे आवाहन केले होते, ते आपल्यापैकी कोण आहेत ? कारण मी तर संतानप्राप्तीच्या इच्छेने केवळ एका भगवान सुरेश्वरांचेच चिंतन केले होते. असे असता आपण तिघे येथे कसे आलात ? आपल्यापर्यंत तर देहधारी लोकांच्या मनाचीही गती असत नाही, म्हणून मला याविषयी मोठेच आश्चर्य वाटत आहे. आपण कृपा करून मला याचे रहस्य सांगावे. (२७-२८)

मैत्रेय म्हणाले - विदुरा, अत्रिमुनींचे वचन ऐकून ते तिन्ही देव हसले, आणि मधुर वाणीने त्यांना सांगू लागले. (२९)

देव म्हणाले - ब्रह्मन, आपण सत्यसंकल्प आहात. म्हणून तुम्ही जसा संकल्प केलात तसेच झाले पाहिजे. त्याच्या विपरीत कसे होऊ शकेल ? तुम्ही ज्याचे ध्यान करीत होतात, तेच आम्ही आहोत. प्रिय महर्षी, तुमचे कल्याण असो. तुम्हांला आमचेच अंशस्वरूप तीन जगद्‌विख्यात पुत्र उत्पन्न होतील आणि तुमच्या उत्तम यशाचा ते विस्तार करतील. (३०-३१)

त्या दंपतीला अशा प्रकारे अभीष्ट वर देऊन त्यांनी उत्तम प्रकारे पूजन केल्यावर ते पाहात असतानाच ते तीन सुरेश्वर आपापल्या लोकी गेले. ब्रह्मदेवाच्या अंशापासून चंद्र, विष्णूच्या अंशापासून योगवेत्ते दत्तात्रेय आणि महादेवाच्या अंशापासून दुर्वास ऋषी झाले. आता अंगिरा ऋषींच्या संतानाचे वर्णन ऐक. (३२-३३)

अंगिरांची पत्‍नी श्रद्धा हिने सिनीवाली, कुहू, राका, आणि अनुमती या चार कन्यांना जन्म दिला. यांच्याशिवाय साक्षात भगवान उतथ्य आणि ब्रह्मनिष्ठ बृहस्पती असे तिला दोन पुत्र झाले, ते स्वारोचिष मन्वन्तरात प्रख्यात जाले. पुलस्त्य यांना त्यांची पत्‍नी हविर्भूपासून महर्षी अगस्त्य आणि महातपस्वी विश्रवा असे दोन पुत्र झाले. यांतील अगस्त्य पुढील जन्मात जठराग्नी झाले. विश्रवा मुनींना इडविडेपासून यक्षराज कुबेर झाला आणि त्यांची दुसरी पत्‍नी केशिनीपासून रावण, कुंभकर्ण, आणि बिभीषण उत्पन्न झाले(३४-३७)

महामते, महर्षी पुलहांची पत्‍नी साध्वी गतीपासून कर्मश्रेष्ठ, वरीयान, आणि सहिष्णू असे तीन पुत्र झाले. याचप्रमाणे क्रतूची पत्‍नी क्रिया हिने ब्रह्मतेजाने तळपणार्‍या साठ हजार वालखिल्य ऋषींना जन्म दिला. शत्रुतापन विदुरा, वसिष्ठांची पत्‍नी ऊर्जा(अरुन्धती) हिच्यापासून चित्रकेतू इत्यादी सात विशुद्धचित्त ब्रह्मर्षींचा जन्म झाला. त्यांची नावे चित्रकेतू, सुरोची, विरजा, मित्र, उल्बण, वसुभृद्यान, आणि द्युमान अशी होती. याशिवाय त्यांच्या दुसर्‍या पत्‍नीला शक्ती इत्यादी आणखी काही पुत्र होते. अथर्व मुनींची पत्‍नी चित्ती हिला दधीची नावाचा एक तपोनिष्ठ पुत्र झाला. त्याचे दुसरे नाव अश्वशिरा असेही होते. आता भृगूच्या वंशाचे वर्णन ऐक. (३८-४२)

भाग्यवान भृगूंना ख्याती नावाच्या पत्‍नीपासून धाता आणि विधाता नावाचे पुत्र आणि श्री नावाची एक भगवत्परायण कन्या झाली. मेरुऋषींनी आपल्या आयती आणि नियती नावांच्या कन्या धाता आणि विधाता यांना दिल्या. त्यांच्यापासून त्यांना मृकण्ड आणि प्राण नावाचे पुत्र झाले. (४३-४४)

त्यांच्यापैकी मृकण्डापासून मार्कंडेय आणि प्राणापासून मुनिवर वेदशिरा यांचा जन्म झाला. भृगूंचा एक कवी नावाचा पुत्र होता. त्याचाच पुत्र भगवान शुक्राचार्य होय. विदुरा, या सर्व मुनीश्वरांनी संतती उत्पन्न करून सृष्टीचा विस्तार केला. अशा प्रकारे मी तुला हे कर्दमांच्या वंशांतील संतानांचे वर्णन सांगितले. जो पुरुष हे श्रद्धापूर्वक ऐकेल, त्यांची मोठी पापे हे कथानक तत्काळ नाहीसे करील. (४५-४६)

ब्रह्मदेवाचा पुत्र दक्षप्रजापतीने मनुपुत्री प्रसूतीशी विवाह केला. त्याने तिच्यापासून सुंदर डोळ्यांच्या सोळा कन्या उत्पन्न केल्या. दक्षाने त्यांपैकी तेरा धर्माला, एक अग्नीला, एक एकचित्त असणार्‍या पितृगणांना आणि एक, संसाराचा संहार करणार्‍या तसेच जन्म-मृत्यूपासून सोडविणार्‍या भगवान शंकरांना दिली. श्रद्धा, मैत्री, दया, शांती, तुष्टी, पुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धी, मेधा, तितिक्षा, ह्री आणि मूर्ती या धर्माच्या पत्‍नी होत. त्यांपैकी श्रद्धेने शुभ, मैत्रीने प्रसाद, दयेने अभय, शांतीने सुख, तुष्टीने आनंद, आणि पुष्टीने अहंकार यांना जन्म दिला. क्रियेने योग, उन्नतीने गर्व, बुद्धीने अर्थ, मेधेने स्मृती, तितिक्षेने क्षेम, आणि ह्रीने प्रश्रय नावाच्या पुत्राला जन्म दिला. सर्व गुणांची खाण असणार्‍या मूर्तिदेवीने नर-नारायण ऋषींना जन्म दिला. यांचा जन्म झाल्याबरोबर हे संपूर्ण विश्व अत्यंत आनंदित होऊन प्रसन्न झाले. त्यावेळी लोकांची मने, दिशा, वायू, नदी, आणि पर्वत प्रसन्न झाले. आकाशात मंगल वाद्ये वाजू लागली. देवता फुलांचा वर्षाव करू लागल्या. मुनी प्रसन्न होऊन स्तुती करू लागले. गंधर्व आणि किन्नर गाऊ लागले. अप्सरा नाचू लागल्या. अशा प्रकारे त्यावेळी मोठाच आनंदोत्सव झाला आणि ब्रह्मादिक सर्व देव स्तोत्रांनी त्यांची स्तुती करू लागले. (४७-५५)

देव म्हणाले - ज्याप्रमाणे आकाशात निरनिराळ्या रूपांची कल्पना केली जाते, त्याप्रमाणे ज्यांनी आपल्या मायेने आपल्याच स्वरूपामध्ये या विश्वाची रचना केली, आणि आपल्या त्या स्वरूपाला प्रकाशित करण्यासाठी यावेळी या धर्माच्या घरी ऋषिरूपाने स्वतःला प्रगट केले, त्या परम पुरुषाला आमचा नमस्कार असो. ज्यांच्या तत्त्वाचे शास्त्राच्या आधारावर केवळ अनुमान केले जाते, त्याच भगवंतांनी विश्वाच्या व्यवहारात कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये, यासाठी आम्हां देवतांना सत्त्वगुणापासून उत्पन्न केले आहे. आता त्यांनी सौंदर्याचे निवासस्थान असलेल्या निर्मळ कमळालासुद्धा खाली पाहावयास लावणार्‍या आपल्या कारुण्यमय दृष्टीने आमच्याकडे पाहावे. (५६-५७)

विदुरा, प्रभूंचे दर्शन झालेल्या देवतांनी अशा प्रकारे स्तुती केलेले भगवान नर-नारायण दोघेही गंधमादन पर्वतावर गेले. भगवान श्रीहरींचे अंशभूत असे हे तेच नर-नारायण पृथ्वीचा भार उतरविण्यासाठी यदुकुलभूषण श्रीकृष्ण आणि त्यांच्याचसारखे श्यामवर्ण कुरुकुलतिलक अर्जुन या रूपांनी येथे अवतीर्ण झाले आहेत. (५८-५९)

अग्नीची पत्‍नी स्वाहाने अग्नीचेच अभिमानी असणारे पावक, पवमान, आणि शुची हे तीन पुत्र उत्पन्न केले. हे तिघेही हवन केलेल्या पदार्थांचे भक्षण करणारे आहेत. या तिघांपासून आणखी पंचेचाळीस प्रकारचे अग्नी उत्पन्न झाले. हेच आपले तीन पिता आणि एक पितामह यांच्यासह एकोणपन्नास अग्नी म्हणविले जातात. वेदज्ञ ब्राह्मण वैदिक यज्ञकर्मांमध्ये ज्या एकोणपन्नास अग्नींच्या नावांनी आग्नेयी इष्टी करतात, ते हेच होत. (६०-६२)

अग्निष्वात्त, बर्हिषद, सोमप, आणि आज्यप हे पितर होत. त्यांमध्ये साग्निक आणि निरग्निक आहेत. या सर्व पितरांची पत्‍नी दक्षकुमारी स्वधा आहे. या पितरांपासून स्वधेला धारिणी आणि वयुना नावाच्या दोन कन्या झाल्या. त्या दोघीही ज्ञान-विज्ञानात पारंगत आणि ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणार्‍या झाल्या. महादेवांची पत्‍नी सती होती. ती सर्व प्रकारे पतिदेवांच्या सेवेमध्ये व्यग्र राहणारी होती. परंतु तिचे स्वतःचे गुण आणि शील यांना अनुरूप कोणी पुत्र झाला नाही. कारण सतीच्या पित्याने दक्षाने कोणताही अपराध नसताना भगवान शंकरांना प्रतिकूल असे आचरण केले होते. त्यामुळे सतीने तारुण्यावस्थेतच रागामुळे, योगाने स्वतःच आपल्या शरीराचा त्याग केला होता. (६३-६६)

स्कंध चवथा - अध्याय पहिला समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP