|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ३ रा - अध्याय ३३ वा
देवहूतीला तत्त्वज्ञान आणि मोक्षपदाची प्राप्ती - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] मैत्रेय म्हणतात- श्रीकपिलांचा हा उपदेश ऐकून कर्दमांची प्रिय पत्नी देवहूतीचा मोहाचा पडदा दूर झाला आणि तिने सांख्यतत्त्वज्ञानाचे प्रवर्तक असलेल्या श्रीकपिलांना प्रणाम केला आणि ती त्यांची स्तुति करू लागली. (१) देवहूती म्हणाली- ज्यांच्या नाभिकमलातून ब्रह्मदेव प्रगट झाले होते, त्यांनीही प्रलयकालीन जलात शयन करणार्या आपल्या पंचभूते, इंद्रिये, शब्दादी विषय आणि मन यांनी युक्त, सत्त्वादी गुणमय कार्य व कारण अशा दोन्हींचे बीज असणार्या आपल्या व्यक्त स्वरूपाचे केवळ चिंतन केले होते. (ते प्रत्यक्ष पाहिले नव्हते.) आपण निष्क्रिय, सत्यसंकल्प, संपूर्ण जीवांचे प्रभू तसेच हजारो अचिंत्य शक्तींनी संपन्न आहात. आपल्या शक्तीला गुणप्रवाहरूपाने ब्रह्मादी अनंत मूर्तींमध्ये विभक्त करून त्यांच्याद्वारा आपण स्वतःच विश्वाची उत्पत्ती इत्यादी करीत आहात. नाथ, प्रलयकाल आल्यावर ज्यांच्या पोटात हे सारे विश्व लीन होऊन जाते आणि जे कल्पांताच्या वेळी मायामय बालकाचे रूप धारण करून आपल्या पायाचा अंगठा चोखीत एकटेच वटवृक्षाच्या पानावर शयन करतात, त्या तुम्हांला मी गर्भामध्ये कसे काय धारण केले ?(हीही आपलीच माया नव्हे का ?) हे विभो, आपण पापी लोकांना शासन आणि आज्ञाधारक भक्तांचे कल्याण करण्यासाठी स्वेच्छेने देह धारण करता. म्हणून जसे त्यासाठी आपले वराह आदी अवतार झाले, त्याचप्रमाणे हा कपिलावतारसुद्धा मुमुक्षूंना ज्ञानमार्ग दाखविण्यासाठी झाला आहे. हे भगवन, आपल्या नावाचे श्रवणकीर्तन करण्याने किंवा चुकून-माकून आपल्याला नमस्कार अथवा आपले स्मरण करण्याने सुद्धा चांडाळ देखील तत्काळ सोमयागाला पात्र होऊ शकतो, तर मग आपले दर्शन घेण्याने मनुष्य कृतकृत्य होईल, यात काय शंका ! ज्याच्या जिभेवर आपले नाव आहे, तो चांडाळसुद्धा यामुळेच श्रेष्ठ होय. जे श्रेष्ठ पुरुष आपल्या नामाचे उच्चारण करतात, त्यांनी तप, हवन, तीर्थस्थान, सदाचारपालन आणि वेदाध्ययन असे सर्व काही केले, (असेच समजावे.) आपण साक्षात परब्रह्म आहात; आपणच परमपुरुष आहात, वृत्तींचा प्रवाह अंतर्मुख करून अंतःकरणात आपलेच चिंतन केले जाते. आपण आपल्या तेजाने मायेच्या गुणप्रवाहाला शांत करता. आपल्यातच वेद समाविष्ट आहेत. अशा साक्षात विष्णुस्वरूप कपिलांना मी प्रणाम करते. (२-८) मैत्रेय म्हणतात- मातेने अशा प्रकारे स्तुती केल्यानंतर मातृवत्सल परमपुरुष भगवान कपिलदेव तिला गंभीर वाणीने म्हणाले. (९) श्रीकपिल म्हणाले- माते, मी तुला जो हा सुलभ मार्ग सांगितला आहे, त्याचे अनुष्ठान केल्याने लवकरच तू परमपदाला जाशील. माझ्या या मतावर तू विश्वास ठेव. ब्रह्मवादी लोकांनी याचे अनुकरण केले आहे. याद्वारा तू माझ्या, जन्ममरणरहित स्वरूपाला प्राप्त करून घेशील. जे लोक माझे हे मत मानीत नाहीत, ते जन्म-मृत्यूच्या फेर्यात अडकतात. (१०-११) मैत्रेय म्हणतात- अशा प्रकारे आत्मज्ञानाचा उपदेश करून श्रीकपिलदेव आपल्या ब्रह्मज्ञानी मातेची अनुमती घेऊन तेथून निघून गेले. तेव्हा देवहूतीसुद्धा सरस्वतीचा मुकुट शोभेल अशा आपल्या आश्रमात पुत्राने केलेल्या योगसाधनेने योगाभ्यास करीत समाधीत मग्न झाली. त्रिकाल स्नान करण्याने तिच्या कुरळ्या केसांचे भुरकट जटांमध्ये रूपांतर झाले. तसेच वल्कलांनी झाकलेले शरीर उग्र तपस्येमुळे कृश झाले. तिने प्रजापती कर्दमांच्या तपश्चर्या आणि योगबलाने प्राप्त झालेल्या, देवांनी इच्छा करावी अशा अनुपम गृहस्थसुखाचा त्याग केला. जेथे दुधाच्या फेसाप्रमाणे स्वच्छ आणि कोमल शय्यांनी युक्त हस्तिदंती पलंग, सुवर्णपात्रे, सोन्याचे सिंहासन, त्यावर अतिकोमल गाद्या अंथरलेल्या आहेत, तसेच ज्याच्यामध्ये स्वच्छ स्फटिकमणी आणि उच्च प्रकारचे पाचू लावलेल्या भिंतीमध्ये रत्नजडित रमणीय मूर्तींसहित मणिमय दिवे झगमगत आहेत, जे फुलांनी लहडलेल्या अनेक दिव्य वृक्षांनी सुशोभित आहेत, ज्यामध्ये अनेक प्रकारच्या पक्ष्यांचा किलबिलाट आणि धुंद भ्रमरांचा गुंजारव होत आहे, जेथील कमलगंधांनी सुवासित सरोवरात कर्दमांच्या सहवासात त्यांचे प्रेम प्राप्त करून घेऊन क्रीडेसाठी प्रवेश केल्यावर जिचे गंधर्वगण गुणगान करीत असत आणि जे मिळविण्यासाठी इंद्रपत्न्या सुद्धा इच्छुक असत, अशा गृहोद्यानाची ममता तिने सोडून दिली. परंतु पुत्रवियोगाने व्याकूळ झाल्यामुळे तिचे वदन काहीसे उदास झाले. (१२-२०) पती वनात गेल्यानंतर पुत्राचाही वियोग झाल्याने ती आत्मज्ञानसंपन्न असूनही वासराचा वियोग झाल्यावर हंबरणार्या गाईसारखी व्याकूळ झाली. विदुरा, आपला पुत्र कपिलदेवरूप भगवान हरीचेच चिंतन करता करता लवकरच तिला अशा ऐश्वर्यसंपन्न घराबद्दलसुद्धा उपरती झाली, नंतर कपिलदेवांनी भगवंतांच्या ज्या ध्यान करण्यायोग्य प्रसन्नवदनारविंदयुक्त स्वरूपाचे वर्णन केले होते, त्याच्या एकेक अवयवाचे तसेच त्याच्या समग्र स्वरूपाचे चिंतन करीत ती ध्यानमग्न जाली. भगवद्भक्तीचा प्रवाह, प्रबळ वैराग्य आणि यथोचित कर्मानुष्ठानामुळे उत्पन्न झालेल्या ब्रह्मसाक्षात्कार करून देणार्या ज्ञानाने शुद्ध झाल्याने ती त्या सर्वव्यापक आत्म्याच्या ध्यानामध्ये मग्न झाली, जो आपल्या स्वरूपाच्या प्रकाशाने मायाजनित आवरण दूर करतो. अशा प्रकारे जीवाचे अधिष्ठानभूत परब्रह्म श्रीभगवंतांमध्ये बुद्धी स्थिर झाल्यामुळे तिचा जीवभाव नाहीसा झाला आणि ती सर्व क्लेशांपासून मुक्त होऊन परमानंदात निमग्न झाली.आता निरंतर समाधिस्थ राहिल्याकारणाने तिचा विषयांच्या खरेपणाबद्दलचा भ्रम नाहीसा झाला आणि तिला आपल्या शरीराचीसुद्धा शुद्ध राहिली नाही. जसे जागा झालेल्या माणसाला आपण स्वप्नात पाहिलेल्या शरीराची शुद्ध राहात नाही. तिच्या शरीराचे पोषणसुद्धा दुसर्यांकडून होत होते. परंतु कोणत्याही प्रकारचे मानसिक क्लेश नसल्याने शरीर दुर्बळ झाले नाही. तिचे तेज आणखीच वाढले, परंतु ते धुळीने माखल्यामुळे धुराने व्याप्त अग्नीप्रमाणे दिसू लागले. तिचे केस अस्ताव्यस्त विखुरले आणि वस्त्रही गळाले. परंतु नेहमी श्रीभगवंतांमध्ये चित्त लागून राहिल्यामुळे तिला आपल्या तपोयोगमय शरीराची काहीच शुद्ध राहिली नाही. केवळ प्रारब्धच त्याचे रक्षण करीत होते. (२१-२९) अशा प्रकारे देवहूतीने कपिलांनी सांगितलेल्या मार्गाने थोडयाच दिवसात नित्यमुक्त, परमात्मस्वरूप, श्रीभगवंतांना प्राप्त करून घेतले. वीरवर, ज्या स्थानावर तिला सिद्धी प्राप्त झाली, ते परम पवित्र क्षेत्र त्रैलोक्यात ‘सिद्धपद ’(सिद्धपूर) नावाने प्रख्यात झाले. विदुरा, योगसाधनेने तिच्या शरीराचा सर्व मळ नाहीसा झाला आणि एका नदीच्या रूपात परिणत झाला, तीच सिद्धगणांकडून सेवन केली जाणारी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी श्रेष्ठ नदी ठरली. (३०-३२) महायोगी भगवान कपिलसुद्धा मातेची आज्ञा घेऊन पित्याच्या आश्रमातून ईशान्य दिशेकडे निघून गेले. तेथे स्वतः समुद्राने त्यांचे पूजन करून त्यांना स्थान दिले. ते तिन्ही लोकांना शांती प्रदान करण्यासाठी योगमार्गाचा अवलंब करून समाधीमध्ये स्थिर झाले. सिद्ध, चारण, गंधर्व, मुनी आणि अप्सरागण त्यांची स्तुती करतात. तसेच सांख्याचार्य सुद्धा त्यांचे सर्व प्रकरे स्तवन करीत असतात. (३३-३५) हे निष्पाप विदुरा, तू विचारल्यावरून तुला हा कपिल आणि देवहूतीचा परम पवित्र संवाद ऐकविला. हे कपिलदेवांचे मत अध्यात्मयोगाचे गूढ रहस्य आहे. जो पुरुष याचे श्रवण किंवा वर्णन करतो, तो भगवान गरुडध्वजांच्या भक्तीने युक्त होऊन लवकरच श्रीहरींच्या चरणारविंदांना प्राप्त करतो. स्कंध तिसरा - अध्याय तेहतिसावा समाप्त |