|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ३ रा - अध्याय ३२ वा
धूममार्ग आणि अर्चिरादी मार्गाने जाणार्यांच्या गतीचे आणि भक्तियोगाच्या उत्कृष्टतेचे वर्णन - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीकपिल म्हणतात- हे माते, जो पुरुष घरातच राहून सकामभावाने गृहस्थ धर्माचे पालन करतो आणि त्याचे फळ म्हणून अर्थ आणि काम यांचा उपभोग घेऊन पुन्हा पुन्हा तेच करीत राहातो, तो निरनिराळ्या कामनांनी मोहित झाल्याकारणाने भगवध्दर्मापासून विन्मुख होतो आणि श्रद्धेने यज्ञांनी देव आणि पितर यांचीच आराधना करीत राहातो. त्याची बुद्धी त्याच प्रकारच्या श्रद्धेशी निगडित राहाते. देव आणि पितर हेच त्याचे उपास्य होत. म्हणून तो चंद्रलोकात जाऊन सोमपान करतो आणि पुन्हा पुण्य क्षीण झाल्यावर या लोकात परत येतो. ज्यावेळी प्रलयकाळात शेषशायी भगवान शेषशय्येवर शयन करतात, त्यावेळी गृहस्थाश्रमातील सकाम लोकांना प्राप्त होणारे हे सर्व लोकही लयाला जातात. (१-४) जे विवेकी मनुष्य आपल्या धर्मांचा अर्थ आणि भोगासाठी उपयोग करीत नाहीत, तर भगवंतांच्या प्रसन्नतेसाठीच त्यांचे पालन करतात, ते अनासक्त, प्रशांत, शुद्धचित्त, निवृत्तिधर्मपरायण, ममतारहित आणि अहंकारशून्य पुरुष स्वधर्मपालनरूप सत्त्वगुणामुळे पूर्णपणे शुद्धचित्त होतात. ते शेवटी सूर्यमार्गाने(अर्चिमार्ग किंवा देवयान मार्ग) सर्वव्यापी कार्यकारणरूप जगाचा नियंता, संसाराचे उपादान-कारण आणि त्याची उत्पत्ती, पालन व संहार करणार्या पूर्णपुरुषालाच प्राप्त होतात. जे लोक परमात्मदृष्टीने हिरण्यगर्भाची उपासना करतात, ते दोन परार्धांनी होणार्या ब्रह्मदेवाच्या प्रलयापर्यंत त्यांच्या सत्यलोकातच राहातात. ज्यावेळी देवतांपेक्षाही श्रेष्ठ ब्रह्मदेव आपल्या दोन परार्ध कालपर्यंत अधिकार भोगून पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, इंद्रिये, त्यांचे विषय आणि अहंकारादिसहित संपूर्ण विश्वाचा संहार करण्याच्या इच्छेने त्रिगुणात्मक प्रकृतीबरोबर एकरूप होऊन निर्विशेष परमात्म्यामध्ये लीन होऊन जातो, त्यावेळी प्राण आणि मन यांना जिंकलेले ते विरक्त योगीजनसुद्धा देहाचा त्याग करून त्या भगवान ब्रह्मदेवातच प्रवेश करतात. आणि पुन्हा त्यांच्याच बरोबर परमानंदस्वरूप पुराणपुरुष परब्रह्मामध्ये लीन होऊन जातात. त्याअगोदर ते भगवंतात लीन होत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये अहंकार शिल्लक असतो. म्हणून हे माते, आता तूसुद्धा अत्यंत भक्तिभावाने समस्त प्राण्यांच्या हृदयकमलांत असणार्या त्या श्रीहरींच्याच चरणांना शरण जा. तूसुद्धा माझ्याकडून त्यांचा प्रभाव ऐकलाच आहेस. वेदांचे अंतरंग जाणणारे, सर्व स्थावर-जंगम प्राण्यांचे आदिकारण ब्रह्मदेवसुद्धा मरीची आदी ऋषी, योगेश्वर, सनकादिक तसेच योगप्रवर्तक सिद्धांसहित निष्काम कर्मांमुळे आदिपुरुष पुरुषश्रेष्ठ सगुण ब्रह्माला प्राप्त होऊनसुद्धा भेददृष्टी आणि कर्तृत्वाभिमान यांमुळे भगवद्-इच्छेने, जेव्हा सृष्टी उत्पन्न होण्याची वेळ येते, तेव्हा कालरूप ईश्वराच्या प्रेरणेने गुणांमध्ये क्षोभ झाल्याने पुन्हा पूर्ववत प्रगट होतात. अशा प्रकारे पूर्वोक्त ऋषीसुद्धा आपापल्या कर्मानुसार ब्रह्मलोकाचे ऐश्वर्य उपभोगून भगवद्-इच्छेने गुणांमध्ये क्षोभ झाल्याने पुन्हा या लोकात जन्म घेतात. (५-१५) जे या लोकात कर्मांमध्ये आसक्त राहून श्रद्धेने वेदात सांगितलेल्या काम्य आणि नित्य कर्मांचे सांगोपांग अनुष्ठान करतात, रजोगुणामुळे ज्याची बुद्धी (विवेकाविषयी) कुंठित होते, ज्यांच्या हृदयामध्ये कामना असतात, आणि इंद्रिये ज्यांच्या स्वाधीन नसतात, ते आपल्या घरातच आसक्त होऊन नेहमी पितरांची पूजा करतात. हे लोक धर्म, अर्थ, आणि काम यांमध्येच आसक्त असतात. म्हणून ज्यांचे महान पराक्रम अत्यंत कीर्तनीय आहेत, त्या भवभयहारी श्रीमधुसूदन भगवंतांच्या कथांविषयी विन्मुखच असतात. विष्ठा खाणारी कुत्री-डुकरे इत्यादी जशी विष्ठेचीच अपेक्षा करतात, त्याप्रमाणे जे मनुष्य भगवत्कथामृत सोडून निंदनीय विषय-वार्ताच ऐकतात, ते निश्चितच दुर्दैवी होत. गर्भाधानापासून अंत्येष्टीपर्यंत सर्व संस्कार करणारे हे लोक दक्षिण दिशेकडील पितृयान किंवा धूममार्गाने पितरांचे ईश्वर असणार्या अर्यमाच्या लोकात जातात आणि पुन्हा आपल्याच संततीच्या वंशामध्ये उत्पन्न होतात. हे माते, पितृलोकातील भोग भोगल्यानंतर जेव्हा यांचे पुण्य क्षीण होते, तेव्हा देवता त्यांना तेथील ऐश्वर्यापासून दूर करतात आणि पुन्हा त्यांना लाचार होऊन ताबडतोब याच लोकात येऊन पडावे लागते. म्हणून हे माते, ज्यांचे चरणकमल नेहमी भजन-पूजन करण्यायोग्य आहेत, त्या भगवंतांचेच तू त्यांच्या गुणांचा आश्रय करणार्या भक्तीने सर्वभावाने भजन कर. भगवान वासुदेवांविषयीचा भक्तियोग ताबडतोब वैराग्य आणि ब्रह्मसाक्षात्काररूप ज्ञानाची प्राप्ती करून देतो. जेव्हा इंद्रियांच्या वृत्तींमुळे भगवद्भक्ताचे चित्त सम राहून प्रिय-अप्रिय अशा विषमतेचा अनुभव करीत नाही, त्यावेळीच तो भक्त निःसंग, सर्वांमध्ये समान असणार्या, त्याग आणि ग्रहण यांनी रहित अशा ब्रह्मपदावर आपण आरूढ झाल्याचा साक्षात्कार करून घेतो. तोच ज्ञानस्वरूप, तोच परब्रह्म, तोच परमात्मा, तोच ईश्वर, तोच पुरुष, तोच एक भगवंत, स्वतः जीव, शरीर, विषय, इंद्रिये इत्यादी अनेक रूपांत प्रतीत होतो. या संसाराविषयी आसक्तीचा संपूर्ण नाश होणे, हेच योग्यांच्या सर्व प्रकारच्या योगसाधनेचे एकमात्र इष्ट फळ आहे. ब्रह्म एक आहे, ज्ञानस्वरूप आणि निर्गुण आहे, तरीसुद्धा ते बाहेर धावणार्या इंद्रियांमुळे भ्रमाने शब्द इत्यादी पदार्थांच्या रूपात भासते. ज्याप्रमाणे एकच परब्रह्म महत्तत्त्व, सात्त्विक, राजस, आणि तामस असा तीन प्रकारचा अहंकार, पंचमहाभूते आणि अकरा इंद्रिये या रूपांनी बनले आहे आणि तेच स्वयंप्रकाशी जीव आहे. त्याचप्रमाणे त्या जीवाचे शरीररूप हे ब्रह्मांडसुद्धा ब्रह्मच आहे. कारण ब्रह्मापासूनच याची उत्पत्ती झाली आहे. परंतु जो श्रद्धा, भक्ती आणि वैराग्य तसेच निरंतर योगाभ्यास यांमुळे एकाग्रचित्त आणि अनासक्त झालेला आहे, तोच याला ब्रह्मरूपात पाहू शकतो. (१६-३०) हे पूजनीय माते, मी तुला हे ब्रह्मसाक्षात्काराचे साधनरूप ज्ञान ऐकविले. याच्याद्वारा प्रकृती आणि पुरुषाच्या यथार्थस्वरूपाचा बोध होतो. हे देवी, निर्गुण-ब्रह्मविषयक ज्ञानयोग आणि माझ्य़ाविषयीचा भक्तियोग, या दोन्हींचे फळ एकच आहे. त्यालाच भगवंत म्हणतात. जसे रूप, रस, गंध इत्यादी अनेक गुणांचा आश्रय असणारा एकच पदार्थ भिन्न-भिन्न इंद्रियांच्याद्वारा विभिन्नरूपाने अनुभवास येतो, तसेच शास्त्राच्या वेगवेगळ्या मार्गांनी एकाच भगवंतांची अनेक प्रकारांनी अनुभूती येते. अनेक प्रकारची कर्मे, यज्ञ, दान, तप, वेदाध्ययन, वेदविचार, मन आणि इंद्रियांचा संयम, कर्मांचा त्याग, विविध अंगे असलेला योग, भक्तियोग, प्रवृत्तिमार्ग, आणि निवृत्तिमार्ग(असे) दोन्ही प्रकारचे धर्म, आत्मतत्त्वाचे ज्ञान आणि दृढ वैराग्य या सर्व साधनमार्गांनी सगुण-निर्गुणरूप स्वयंप्रकाश भगवंतालाच प्राप्त केले जाते. (३१-३६) सात्त्विक, राजस, तामस आणि निर्गुणभेदाने चार प्रकारच्या भक्तियोगाचे आणि जो प्राण्यांच्या जन्मादी विकारांचा हेतू आहे, तसेच ज्याची गती जाणता येत नाही, त्या काळाचे स्वरूप मी तुला सांगितले. हे देवी, अज्ञानाने कर्मे केल्याने जीवाला ज्या अनेक गती प्राप्त होतात, तेथे गेला असता तो आपल्या स्वरूपाला जाणू शकत नाही. मी तुला जो ज्ञानाचा उपदेश केला आहे, तो दुष्ट, उद्धट, घमेंडखोर, दुराचारी आणि दांभिक पुरुषांना कधीही करू नये. जो विषयलोलुप आहे, गृहासक्त आहे, माझा भक्त नाही किंवा माझ्या भक्तांचा द्वेष करणारा आहे, त्याला सुद्धा याचा उपदेश कधी करू नये. जो अत्यंत श्रद्धाळू, भक्त, विनयशील, दुसर्यांविषयी दोषदृष्टी न ठेवणारा, सर्व प्राण्यांशी मैत्री असणारा, गुरुसेवेमध्ये तत्पर, बाह्य विषयांमध्ये अनासक्त, शांतचित्त, मत्सरशून्य आणि पवित्रचित्त असेल, तसेच मला परम प्रियतम मानणारा असेल, त्याला याचा उपदेश करावा. माते, जो पुरुष माझे ठिकाणी चित्त ठेवून याचे श्रद्धापूर्वक एक वेळ का होईना श्रवण किंवा कथन करील, तो माझ्या परमपदाला प्राप्त होईल. (३७-४३) स्कंध तिसरा - अध्याय बत्तिसावा समाप्त |