|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ३ रा - अध्याय ३१ वा
मनुष्ययोनी प्राप्त झालेल्या जीवाच्या गतीचे वर्णन - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीभगवान म्हणतात - जीव मनुष्यशरीरात जन्म घेण्यासाठी भगवंतांच्या प्रेरणेने आपल्या पूर्वकर्मांनुसार पुरुषाच्या वीर्यकणाच्या आश्रयाने स्त्रीच्या उदरात प्रवेश करतो. तेथे वीर्यकण एका रात्रीत स्त्रीच्या रजामध्ये मिसळून एकरूप बनतो. पाच रात्रीत बुडबुडयासारखा होतो. दहा दिवसात बोरासारखा थोडासा कठीण होतो. आणि त्यानंतर मांसपेशी किंवा अंडज प्राण्यांमधील अंडयाच्या रूपात त्याचे रूपांतर होते. एक महिन्यात त्याला डोके उत्पन्न होते, दोन महिन्यात हात, पाय इत्यादी अवयव तयार होतात आणि तीन महिन्यात नखे, रोम, हाडे, चामडे, उत्सर्जक इंद्रिये तसेच अन्य छिद्रे उत्पन्न होतात. चार महिन्यात त्यात मांसादी सात धातू उत्पन्न होतात. पाचव्या महिन्यात तहान-भूक लागू लागते आणि सहाव्या महिन्यात पापुद्रयाने लपेटला जाऊन तो उजव्या कुशीत फिरू लागतो. त्यावेळी मातेने खाल्लेल्या अन्नपाणी इत्यादीपासून त्याच्या शरीरातील सर्व धातू पुष्ट होऊ लागतात आणि तो कृमिकीटकांचे उत्पत्तिस्थान असलेल्या निकृष्ट मलमूत्राच्या खड्डयात पडून राहातो. तो कोमल असतो, म्हणून जेव्हा तेथील भूक लागलेले किडे त्याच्या अंगप्रत्यंगाला टोचे मारू लागतात, तेव्हा अत्यंत क्लेश होऊन तो क्षणोक्षणी मूर्च्छित होतो. मातेने खाल्लेल्या कडवट, तिखट, गरम, खारट, कोरडे, आंबट इत्यादी उग्र पदार्थांच्या स्पर्शाने त्याच्या सर्व शरीराला पीडा होऊ लागते. (१-७) तो जीव मातेच्या गर्भाशयात पापुद्रयाने झाकलेला आणि आंतडयांनी वेढलेला असतो. त्याचे डोके पोटाकडे आणि पाठ व मान गोलाकार झालेली असते. (८) पिंजर्यात बंद असलेल्या पक्ष्याप्रमाणे तो पराधीन आणि अवयवांची हालचाल करण्यास असमर्थ असतो. यावेळी अदृष्टामुळे त्याला स्मरणशक्ती प्राप्त होते. तेव्हा आपली शेकडो जन्मातील कर्मे आठवून तो बेचैन होतो. श्वास कोंडलेल्या अवस्थेत त्याला कसली शांती मिळणार ? सातवा महिना सुरू झाल्यानंतर त्याच्यात ज्ञानशक्तीचा उगम होतो, परंतु प्रसूतिवायूच्या हालचालीमुळे तो त्या पोटात उत्पन्न झालेल्या विष्ठेतील किडयांप्रमाणे एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. तेव्हा सातधातुमय स्थूल शरीराने बांधलेला तो, देह व आत्मा यांना वेगळेपणाने जाणणारा, भयभीत होऊन दीनवाणीने कृपायाचना करीत हात जोडून, ज्याने त्याला मातेच्या गर्भामध्ये टाकले, त्या प्रभूची स्तुती करतो. (९-११) जीव म्हणतो- मी मोठाच अधम आहे. भगवंतांनी मला जी ही गती दाखविली, ती योग्यच आहे. ते आपल्याला शरण आलेल्या या नश्वर जगताचे रक्षण करण्यासाठीच अनेक प्रकारची रूपे धारण करतात. म्हणून मीसुद्धा भूतलावर वावरणार्या त्यांच्या निर्भय चरणांना शरण आलो आहे. जो या मातेच्या उदरात देह, इंद्रिये आणि अंतःकरणरूप मायेचा आश्रय घेऊन पुण्य-पापरूप कर्मांनी आच्छादित राहिल्याकारणाने बद्ध असल्यासारखा वाटतो, तोच मी आपल्या संतप्त हृदयामध्ये स्फुरित होणार्या त्या विशुद्ध अविकारी आणि अखंड बोधस्वरूप परमात्म्याला नमस्कार करतो. जो शरीरापासून वेगळा असूनही पंचभूतात्मक शरीराने बद्ध दिसतो आणि म्हणून इंद्रिये, गुण, शब्दादी विषय आणि अहंकाररूप असा जाणवतो, तोच मी या शरीरादी आवरणाने ज्याचा महिमा कुंठित झाला नाही, अशा प्रकृती आणि पुरुषाचा श्रेष्ठ नियंता असणार्या सर्वज्ञ अशा परमपुरुषाला वंदन करतो. त्याच्याच मायेने आपल्या स्वरूपाची स्मृती नाहीशी झाल्याकारणाने अनेक प्रकारच्या सत्त्वादी गुण आणि कर्माच्या बंधनांनी युक्त अशा या संसारमार्गावर निरनिराळे कष्ट झेलीत जो जीव भटकत राहातो, त्याला त्या परमपुरुष परमात्म्याच्या कृपेविना आणखी कोणत्या मार्गाने आपल्या स्वरूपाचे ज्ञान होऊ शकेल बरे ? मला जे हे त्रिकालज्ञान झाले आहे, तेसुद्धा त्यांच्याशिवाय आणखी कोणी दिले बरे ? कारण स्थावर-जंगम सर्व प्राण्याच्या अंतर्यामी तेच अंशरूपाने आहेत. म्हणून कर्मजनित जीवरूप धारण करणारे आम्ही त्रिविध तापांच्या शांतीसाठी त्यांचेच भजन करीत आहोत. हा देहधारी जीव दुसर्या देहाच्या पोटातील मल, मूत्र आणि रक्ताच्या कुंडात पडलेला आहे, त्या देहातील जठराग्नीने याचे शरीर पोळत आहे. त्यातून बाहेर पडण्याची इच्छा करणारा हा आपले महिने मोजीत आहे. भगवन, आता या दीन जीवाला येथून आपण केव्हा बाहेर काढणार ? स्वामी, आपण फार दयाळू आहात. आपल्यासारख्या उदार प्रभूनेच या दहा महिन्यांच्या जीवाला असे उत्कृष्ट ज्ञान दिले आहे. दीनबंधो, या आपण केलेल्या उपकारानेच आपण प्रसन्न व्हा; कारण कोणीही आपल्याला हात जोडण्याखेरीज दुसर्या कशाने या उपकाराची परतफेड करू शकेल ? (१२-१८) संसारातील हे पशु-पक्षी इत्यादी अन्य जीव तर आपल्या मूढ बुद्धीनुसार आपल्या शरीराला होणार्या सुख दुःखांचाच अनुभव घेतात; परंतु मी तर आपल्या कृपेने शम-दमादी साधनसंपन्न शरीराने युक्त आहे, म्हणून आपण दिलेल्या विवेकी बुद्धीने पुराणपुरुषाचा आपल्या शरीराच्या आत-बाहेर अहंकारयुक्त आत्म्याप्रमाणे प्रत्यक्ष अनुभव घेत आहे. भगवन, अत्यंत दुःखाने भरलेल्या या गर्भाशयात मी मोठया कष्टानेच राहात आहे; तरीसुद्धा यातून बाहेर निघून संसाररूप अंधार्या विहिरीत पडण्याची माझी इच्छा नाही. कारण तेथे जाणार्या जीवाला आपली माया वेढून टाकते. ज्यामुळे त्याच्या शरीरात अहंबुद्धी निर्माण होते आणि परिणामतः त्याला पुन्हा या संसारचक्रातच पडावे लागते. म्हणून मी व्याकुळता टाकून देऊन हृदयामध्ये भगवान श्रीविष्णूंचे चरण स्थापन करून आपल्या बुद्धीच्या साहाय्याने स्वतःचा अगदी लवकरच या संसारातून उद्धार करून घेईन. ज्यामुळे मला अनेक प्रकारच्या दोषांनी युक्त असे हे संसारदुःख पुन्हा प्राप्त न होवो. (१९-२१) कपिलदेव म्हणतात- तो दहा महिन्यांचा जीव गर्भातच जेव्हा अशा प्रकारे विवेकसंपन्न होऊन भगवंतांची स्तुती करतो, तेव्हा त्या अधोमुख बालकाला प्रसूतीचे कारण वायू तत्काळ बाहेर येण्यासाठी ढकलून देतो. त्याच्या ताबडतोब ढकलण्याने ते बालक अत्यंत व्याकूळ होऊन खाली डोके करून मोठया कष्टाने बाहेर येते. त्यावेळी त्याची श्वासाची गती थांबते आणि त्याची पूर्वस्मृती नष्ट होते.मातेच्या रक्त आणि मूत्रात जमिनीवर पडलेले ते बालक विष्ठेतील किडयाप्रमाणे तडफडते. त्याचे गर्भवासाच्या वेळचे सर्व ज्ञान नष्ट होते आणि ते देहाभिमानरूप अज्ञान-दशा प्राप्त होऊन वारंवार जोरजोराने रडू लागते. (२२-२४) नंतर जे लोक त्याचा मनोदय समजू शकत नाहीत, त्यांच्या द्वारा त्याचे पालन-पोषण होते. अशा अवस्थेत त्याला जी प्रतिकूलता प्राप्त होते, तिचा निषेध करण्याची शक्तिसुद्धा त्याच्यात असत नाही. जेव्हा त्या शिशु-अवस्थेतील जीवाला मळकट बाजेवर झोपविले जाते, जेथे ढेकूण इत्यादी स्वेदज जीव चिकटलेले असतात, तेव्हा त्या शरीराला खाजविणे, उठून बसणे किंवा कुशी बदलण्याचेही सामर्थ्य नसल्याने फार कष्ट होतात. त्याची त्वचा अतिशय कोमल असते. त्याला डास, चिलटे, आणि ढेकूण असे चावतात की जसे मोठे किडे लहान किडयाला (चावतात). अशा वेळी त्याचे गर्भावस्थेतील सर्व ज्ञान नाहीसे होते आणि ते रडण्याखेरीज दुसरे काही करू शकत नाही. (२५-२७) अशा प्रकारे कुमार आणि पौगंड अवस्थेतील दुःख भोगून ते बालक युवावस्थेत पोहोचते. यावेळी त्याला इच्छित भोग मिळाले नाहीत तर, अज्ञानाने ते क्रुद्ध होऊन शोकाकुलही होते. देहाबरोबरच अभिमान आणि क्रोध वाढल्याकारणाने कामाच्या अधीन झालेला तो जीव आपलाच नाश करण्यासाठी दुसर्या कामी पुरुषांशी वैर करतो. खोटी बुद्धी धारण करणारा तो अज्ञानी जीव पंचमहाभूतांनी तयार केलेल्या या देहात चुकीच्या समजुतीने नेहमी मी-माझे असा अभिमान धरू लागतो. जे शरीर याला वृद्धावस्था इत्यादी अनेक प्रकारचे कष्ट देते तसेच अविद्या आणि कर्म यांनी बद्ध झाले असल्याकारणाने याचा पिच्छा सोडीत नाही, त्याच्याचसाठी हा निरनिराळी कर्मे करीत राहातो, ज्याच्या बंधनामुळे याला वारंवार संसारचक्रात पडावे लागते. सन्मार्गाने चालणार्या या जीवाची एखाद्या जिह्वा आणि उपस्थ इंद्रियांच्या भोगात रममाण झालेल्या विषयी पुरुषाशी गाठ पडली आणि हाही त्यात आस्था ठेवून त्याचे अनुकरण करू लागला तर पहिल्याप्रमाणे तो पुन्हा नारकी योनींमध्ये पडतो. ज्यांच्या संगतीमुळे सत्य, अंतर्बाह्य पवित्रता, दया, वाणीचा संयम, बुद्धी, धन-संपत्ती, लज्जा, यश, क्षमा, मन आणि इंद्रियांचा संयम, ऐश्वर्य इत्यादी सर्व सद्गुण नष्ट होतात. म्हणून त्या अत्यंत शोचनीय, स्त्रियांच्या हातातील बाहुले बनलेल्या अशांत, मूर्ख, आणि आत्मघात करणार्या असत्पुरुषांची संगत कधीच करू नये. कारण या जीवाला जसे स्त्री आणि स्त्रियांच्या संगतीत राहाणार्यांशी संगत केल्याने मोह आणि बंधन प्राप्त होते, तसे अन्य कोणाचीही संगत केल्याने होत नाही. एकदा आपली कन्या सरस्वतीला पाहून ब्रह्मदेवसुद्धा तिच्या रूप-लावण्यावर मोहित झाले होते आणि ती हरिणी होऊन पळत असताना तिच्यामागे निर्लज्जपणे हरीण होऊन पळू लागले. त्याच ब्रह्मदेवांनी मरीची इत्यादी प्रजापतींची तसेच मरीची इत्यादींनी कश्यप आदी आणि कश्यप आदींनी देव-मनुष्यादी प्राण्यांची सृष्टी (निर्माण) केली, म्हणून यांपैकी एकमेव ऋषिप्रवर नारायण सोडून असा कोणता पुरुष आहे की ज्याची बुद्धी स्त्रीरूपी मायेने मोहित होत नाही. अहो, माझ्या या स्त्रीरूपी मायेचे सामर्थ्य तर पाहा. जी आपल्या नेत्रकटाक्षाने मोठमोठया दिग्विजयी वीरांना पायदळी तुडविते. (२८-३८) जो पुरुष योगाच्या उच्च पदावर आरूढ होऊ इच्छितो किंवा ज्याला माझ्या सेवेच्या प्रभावाने आत्मा-अनात्माचा विवेक उत्पन्न झाला आहे, त्याने स्त्रियांचा संग कधीही करू नये. कारण स्त्रियांना अशा पुरुषांसाठी नरकाचे उघडलेले दार म्हटले आहे. भगवंतांनी रचलेली ही स्त्रीरूपिणी माया जेव्हा हळू हळू कोणत्याही निमित्ताने जवळ येते, तेव्हा तिला गवताने झाकलेल्या विहिरीप्रमाणे आपला मृत्यूच समजले पाहिजे. (३९-४०) स्त्रीमध्ये आसक्त राहिल्याकारणाने तसेच अंतसमयी स्त्रीचेच चिंतन करीत राहिल्याने जीवाला स्त्रीयोनी प्राप्त होते. अशा प्रकारे स्त्रीयोनीला प्राप्त झालेला जीव पुरुषरूपात असलेल्या माझ्या मायेला धन, पुत्र, घर, इत्यादी देणारा आपला पती मानतो. अशा रीतीने जसे शिकार्याचे गाणे हरिणाच्या नाशाला कारणीभूत होते, त्याचप्रमाणे स्त्रीने त्या पुत्र, पती, गृह इत्यादींना विधात्याने आपल्यासाठी निश्चित केलेला मृत्यूच समजावा. जीवाचा उपाधी असणार्या लिंगदेहाने जीव एका लोकातून दुसर्या लोकात जातो आणि आपल्या प्रारब्ध कर्मांना भोगीत निरंतर दुसर्या देहाच्या प्राप्तीसाठी दुसरी कर्मे करीत राहातो. जीवाचे भूत, इंद्रिये, मनरूप लिंगशरीर (मोक्षापर्यंत) त्याच्यासमवेत राहाते. तसेच कार्यरूप स्थूलशरीर त्याच्या भोगाचे अधिष्ठान आहे. या दोघांनी एकमेकांशी संगठित होऊन कार्य न करणे हाच प्राण्याचा मृत्यू आहे. आणि दोघांनी बरोबर प्रगट होणे यालाच जन्म म्हणतात. पदार्थांच्या उपलब्धीचे स्थान असणार्या या स्थूल शरीरात जेव्हा ते ग्रहण करण्याची योग्यता राहात नाही, ते त्याचे मरण होय आणि हे स्थूल शरीर म्हणजेच मी आहे, अशा अभिमानाने त्याला पाहाणे हाच त्याचा जन्म होय. एखाद्या दोषामुळे जेव्हा डोळ्यांमध्ये रूप इत्यादी पाहाण्याची योग्यता असत नाही, तेव्हा त्यात राहाणारे चक्षु-इंद्रियसुद्धा रूप पाहाण्यास असमर्थ होते, आणि जेव्हा डोळे आणि त्यात राहाणारे इंद्रिय दोघेही रूप पाहाण्यास असमर्थ होतात, तेव्हा या दोघांचा साक्षी असलेल्या जीवामध्येसुद्धा ती योग्यता राहात नाही. म्हणून मुमुक्षू पुरुषाला मरणाची भीती, दीनता, किंवा मोह असता कामा नये. त्याने जीवाचे स्वरूप जाणून धैर्यपूर्वक निःसंगभावाने येथील व्यवहार करावे. तसेच या मायामय संसारात योग-वैराग्याने युक्त असणार्या सम्यक ज्ञानमय बुद्धीने शरीर ही ठेव समजून त्याच्याबद्दल अनासक्त राहून व्यवहार करावे. (४१-४८) स्कंध तिसरा - अध्याय एकतिसावा समाप्त |