श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय ३० वा

देहासक्त पुरुषांच्या अधोगतीचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीकपिलदेव म्हणतात- जसा वार्‍य़ाने उडून जाणारा मेघांचा समूह त्याची ताकद जाणत नाही, त्याचप्रमाणे हा जीवसुद्धा बलवान काळाच्या प्रेरणेने निरनिराळ्या अवस्था व योनींमध्ये भ्रमण करीत राहातो; परंतु त्याचा महान पराक्रम जाणत नाही. जीव सुखाच्या अभिलाषेने ज्या ज्या वस्तू मोठया कष्टाने मिळवितो, त्या त्या भगवान काल नष्ट करतो.त्यामुळे त्याला अत्यंत दुःख होते. याचे कारण हेच की, हा मंदमती जीव मोहामुळे आपले हे नाशवान शरीर व त्याच्याशी संबंधित घर, शेत, धन, इत्यादी नित्य आहे, असे मानतो. या संसारात हा जीव ज्या ज्या योनीत जन्म घेतो, त्यातच आनंद मानू लागतो आणि त्यापासून विरक्त होत नाही. हा भगवंतांच्या मायेने असा मोहित होतो की, कर्माप्रमाणे नरकातल्या योनींमध्ये जन्म घेऊनही तेथील विष्ठा आदी तुच्छ भोगांमध्येच सुख मानल्याकारणाने ती योनी सोडू इच्छित नाही. हा मूर्ख आपले शरीर, स्त्री, पुत्र, गृह, पशू, धन, आणि बांधवांमध्ये आसक्त होऊन त्यांच्या संबंधात अनेक प्रकारचे मनोरथ करीत स्वतःला मोठा भाग्यशाली समजतो. त्यांच्या पालन-पोषणाच्या चिंतेने याचे संपूर्ण अंग काळजीने जळत असते, तरी दुर्वासनांमुळे हृदय दूषित झाल्याकारणाने हा मूर्ख नेहमी यांच्यासाठी निरनिराळी पापे करीत राहातो. कुलटा स्त्रियांनीही एकांतात दाखविलेल्या कपटपूर्ण प्रेमामुळे आणि मुलांशी गोड गोड गोष्टी बोलण्यात मन आणि इंद्रिये गुंतल्याने, गृहस्थ घरातील दुःखप्रधान तुच्छ कर्मांमध्ये लिप्त होऊन जातो. त्यावेळी सावध होऊन जर त्याला एखाद्या दुःखाचा प्रतिकार करण्यात यश मिळाले तर तो त्यालाच सुखासारखे मानतो. इथून तिथून भयानक हिंसावृत्तीने धनाचा संचय करून अशा लोकांचे पोषण करतो की, ज्यांचे पोषण करण्यामुळे हा नरकात जातो. स्वतः तर त्यांच्या खाण्या-पिण्यातून उरलेले अन्न खाऊनच राहातो. वारंवार प्रयत्‍न करूनही जेव्हा याची उपजीविका चालत नाही, तेव्हा हा लोभाने अधीर होऊन दुसर्‍याच्या धनाची इच्छा करू लागतो. जेव्हा दुर्दैवाने याचे कोणतेही प्रयत्‍न सफल होत नाहीत आणि हा मंदबुद्धी निर्धन होऊन कुटुंबाचे भरण-पोषण करण्यास असमर्थ होतो, तेव्हा अत्यंत दीन आणि चिंतातुर होऊन दीर्घ सुस्कारे सोडू लागतो. (१-१२)

हा आपले पालन-पोषण करण्यास असमर्थ आहे असे पाहून ते स्त्री-पुत्रादी याचा पहिल्यासारखा आदर करीत नाहीत, जसे कंजूष शेतकरी म्हातार्‍या बैलाची उपेक्षा करतात. एवढे होऊनही त्याला वैराग्य येत नाही. ज्यांचे याने स्वतः पालन केले होते, तेच आता याचे पालन करतात. वृद्धावस्था आल्याकारणाने हा कुरूप होतो. शरीर रोगी बनते. जठराग्नी मंद होतो, भोजन आणि पुरुषार्थ दोन्हीही कमी होतात. तो मरणोन्मुख अवस्थेत घरी पडून राहातो आणि कुत्र्याप्रमाणे स्त्री-पुत्रादिकांनी अपमानपूर्वक दिलेले अन्न खाऊन उदरनिर्वाह करतो. मृत्युसमय जवळ आल्याकारणाने वाताचे उत्क्रमण होऊन डोळ्यांची बुबुळे बाहेर येतात, श्वासनलिका कफामुळे चोंदून जाते, खोकताना आणि श्वासोच्छ्वास करताना याला मोठे कष्ट होतात. तसेच कफ वाढल्याने कंठामध्ये घरघर होऊ लागते. शोकाकुल नातलगांनी घेरलेला हा पडून राहातो आणि मृत्युपाशात बांधला गेल्याने त्यांनी बोलवूनही काही बोलत नाही. (१३-१७)

अशा प्रकारे जो मूर्ख मनुष्य इंद्रियांवर विजय न मिळविता नेहमी कुटुंबाचे पालन-पोषण करण्यातच व्यग्र राहातो, तो रडणार्‍या स्वजनांच्यामध्ये अत्यंत वेदनांनी बेशुद्ध होऊन मृत्यूला प्राप्त होतो.यावेळी त्याला नेण्यासाठी अतिभयंकर आणि रागाने डोळे लाल झालेले जे दोन यमदूत येतात, त्यांना बघून हा भयाने मल-मूत्र-त्याग करू लागतो. ते यमदूत त्याला यातनादेहात टाकतात आणि नंतर शिपाई एखाद्या अपराध्याला घेऊन जातात, त्याप्रमाणे त्याच्या गळ्यात दोरी बांधून बळजबरीने यमलोकीच्या दीर्घ सफरीवर त्याला घेऊन जातात. त्यांच्या दरडावण्याने याचे हृदय विदीर्ण होते आणि शरीर थरथरा कापू लागते. वाटेत कुत्री त्याचे लचके तोडतात. त्यावेळी आपण केलेल्या पापांचे स्मरण करून तो व्याकूळ होतो. तहान-भुकेने तो व्याकूळ होतो, तसेच घाम, आगीचा वणवा व गरम वार्‍याची झळ यांमुळे तो तप्त होऊन जातो. पाणी नाही, विश्रांती नाही, अशा स्थितीत तो तापलेल्या वाळूच्या मार्गातून जात असता एक पाऊलही पुढे टाकण्याची त्याला शक्ती नसते. यमदूत त्याच्या पाठीवर चाबकाचे फटकारे मारतात, तेव्हा मोठया कष्टाने तो चालू लागतो. तो ठिकठिकाणी जमिनीवर पडतो, त्याला मूर्च्छा येते, तरतरी आल्यावर तो पुन्हा उठतो. अशा प्रकारे अतिशय दुःखमय अंधार्‍या मार्गाने, यमदूत त्याला यमपुरीला घेऊन जातात. यमलोकाकडे जाणारा मार्ग नव्याण्णव हजार योजने आहे. इतका लांबचा मार्ग पाचसहा घटकांत चालत जाऊन तो नरकातील अनेक प्रकारच्या यातना भोगतो. तेथे त्याच्या शरीराला धगधगत्या आगीत टाकून जाळले जाते, कधी स्वतः तर कधी दुसर्‍यांनी त्यांचे तुकडे तुकडे करून त्याचेच मांस त्याला खाऊ घातले जाते. यमपुरीतील कुत्री अगर गिधाडे यांच्याकडून जिवंतपणीच त्याची आतडी बाहेर खेचली जातात.साप, विंचू आणि डास अशा चावणार्‍या किंवा डंख मारणार्‍या जीवांकडून त्याला पीडित केले जाते. शरीर कापून त्याचे तुकडे तुकडे केले जातात. त्याला हत्तीकडून तुडविले जाते. पर्वतशिखरांवरून खाली ढकलले जाते किंवा पाणी आणि खड्डयात टाकून त्याला बुजवून टाकले जाते. या सर्व यातना तसेच अशा प्रकारच्या तामिस्त्र, अंध-तामिस्त्र, रौरव इत्यादी नरकांच्या अनेक यातना, स्त्री असो वा पुरुष, त्या जीवाला परस्परांच्या संसर्गाने होणार्‍या पापांमुळे भोगाव्याच लागतात. हे माते, काही लोकांचे असे म्हणणे आहे की, स्वर्ग आणि नरक तर याच लोकी आहे. कारण ज्या नरकयातना आहेत, त्या येथेही दिसतात. (१८-२९)

अशा प्रकारे अनेक कष्ट भोगून आपल्या कुटुंबाचे पालन करणारा किंवा फक्त आपलेच पोट भरणारा पुरुष ते कुटुंब आणि शरीर या दोघांनाही सोडून आपण केलेल्या पापांचे मेल्यानंतर असे फळ भोगतो. आपले शरीर येथेच सोडून देऊन प्राण्यांचा द्वेष केल्याने एकत्रितपणे केलेली पापरूप शिदोरी बरोबर घेऊन तो एकटाच नरकात जातो. मनुष्य आपल्या कुटुंबाचे पोषण करण्यासाठी जे पाप करतो, त्याचे दैवाने दिलेले अनिष्ट फळ तो नरकात जाऊन भोगतो. त्यावेळी तो इतका व्याकूळ होतो की, जणू त्याचे सर्वस्व लुटले गेले आहे. जो मनुष्य फक्त पापकर्मे करूनच आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करण्यात व्यस्त राहातो, तो नरकांमधील सर्वांत कष्टप्रद स्थान असलेल्या अंधतामिस्त्र नरकात जातो. मनुष्यजन्म मिळण्यापूर्वी जितक्या यातना भोगाव्या लागतात तसेच डुक्कर-कुत्रा इत्यादी योनींमध्ये जितके कष्ट आहेत, ते सर्व क्रमाक्रमाने भोगून शुद्ध झाल्यानंतर पुन्हा मनुष्य योनीमध्ये जन्म होतो. (३०-३४)

स्कंध तिसरा - अध्याय तिसावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP