|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ३ रा - अध्याय २९ वा
भक्तीचे मर्म आणि कालाचा महिमा - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] देवहूतीने विचारले- प्रभो ! प्रकृती, पुरुष आणि महत्तत्त्वादींचे जे लक्षण सांख्यशास्त्रात सांगितले आहे, तसेच ज्या शास्त्राने त्यांचे वास्तविक स्वरूप वेगवेगळे जाणले जाते आणि भक्तियोग हेच ज्याचे प्रयोजन सांगितले जाते ते शास्त्र आपण मला कथन केले. आता भक्तियोगाचा मार्ग मला विस्तारपूर्वक सांगावा. हे भगवन, याशिवाय जीवाच्या जन्म-मरणरूप अनेक प्रकारच्या गतींचे सुद्धा वर्णन करावे. जे ऐकल्यामुळे जीवाला सर्व प्रकारच्या वस्तूंविषयी वैराग्य निर्माण होते. तसेच ज्याच्या भयामुळे लोक शुभकर्मांना प्रवृत्त होतात आणि जो ब्रह्मादिकांहूनही श्रेष्ठ आहे, त्या सर्वसमर्थ अशा काळाचे स्वरूपही आपण मला सांगावे. ज्ञानदृष्टी लुप्त झाल्यामुळे देहादी मिथ्या वस्तूंमध्ये ज्यांना आत्माभिमान झाला आहे, तसेच बुद्धी कर्मासक्त राहिल्याकारणाने अत्यंत श्रम घेऊनही जे पुष्कळ काळापासून अपार अंधकारमय अशा संसारात निद्रिस्त झाले आहेत, त्यांना जागविण्यासाठी आपण(जणू) योगप्रकाशक सूर्यच झाला आहात. (१-५) मैत्रेय म्हणतात- कुरुश्रेष्ठ विदुरा, मातेचे हे मनोहर वचन ऐकून महामुनी कपिलांनी तिची स्तुति केली आणि दयेने कळवळा येऊन अत्यंत प्रसन्नतेने ते तिला म्हणाले.(६) श्रीभगवान म्हणाले- हे माते, साधकांच्या भावानुसार भक्तियोग अनेक प्रकारे प्रगट झाला आहे. कारण स्वभाव आणि गुणांच्या भेदामुळे मनुष्याच्या भावनांमध्ये भिन्नता असते. प्राणी व ईश्वर यांच्यात भेद पाहणारा जो क्रोधी पुरुष हृदयात हिंसा, दंभ किंवा मत्सर असा भाव ठेवून माझ्यावर प्रेम करतो, तो माझा तामस भक्त होय. जो पुरुष विषय, यश आणि ऐश्वर्य (मिळविण्याच्या) कामनेने प्रतिमा इत्यादींमध्ये भेदभाव बाळगून माझे पूजन करतो, तो राजस भक्त होय. जो मनुष्य पापांचा क्षय करण्यासाठी किंवा परमात्म्याला अर्पण करण्यासाठी पूजन करणे आपले कर्तव्य समजून भेदबुद्धीने माझे पूजन करतो, तो सात्त्विक भक्त होय. ज्याप्रमाणे गंगेचा प्रवाह अखंडपणे समुद्राकडे वाहात जातो, त्याचप्रमाणे माझ्या गुणांच्या केवळ श्रवणाने ज्याच्या मनाची वृत्ती तेलाच्या धारेप्रमाणे अखंड सर्वांतर्यामी असणार्या माझ्याकडे असते, तसेच पुरुषोत्तम अशा माझ्याबद्दल जे निष्काम आणि अनन्य प्रेम असते, ते निर्गुण भक्तियोगाचे लक्षण सांगितले गेले आहे. असे निष्काम भक्त, मी देण्यास तयार असतानाही माझी सेवा सोडून सलोकता, सार्ष्टी, समीपता, सरूपता आणि सायुज्य मुक्तीसुद्धा घेत नाहीत. हाच भक्तियोग परम पुरुषार्थ मानला गेला आहे. याच्या योगाने मनुष्य तिन्ही गुणांना ओलांडून माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. (७-१४) निष्काम भावाने श्रद्धापूर्वक आपल्या नित्य-नैमित्तिक कर्तव्यांचे पालन करणे, नियमितपणे हिंसारहित उत्तम शास्त्रविहित उपासना करणे, माझ्या प्रतिमेचे दर्शन, चरणस्पर्श, पूजा, स्तुती, आणि वंदन करणे, प्राण्यांच्या मध्ये माझी भावना करणे, धैर्य आणि वैराग्य धारण करणे, महापुरुषांना मान देणे, दीनांवर दया करणे, आणि आपल्यासारखीच स्थिती असणार्य़ांबरोबर मित्रत्वाने वागणे, यम-नियमांचे पालन, अध्यात्मशास्त्रांचे श्रवण, नामसंकीर्तन, मनाची सरलता, सत्पुरुषांची संगती, अहंकाराचा त्याग याप्रकारे माझ्या भागवतधर्माचे अनुष्ठान करणार्या भक्तांचे चित्त अत्यंत शुद्ध होऊन माझ्या गुणांच्या केवळ श्रवणाने अनायासे माझ्याकडे लागते. (१५-१९) ज्याप्रमाणे वार्याने उडून जाणारा वास आपला आश्रय असलेल्या फुलातून नाकापर्यंत पोहोचतो, त्याचप्रमाणे भक्तियोगात तत्पर आणि राग-द्वेषादी विकाररहित चित्त परमात्म्याकडेच ओढ घेते. मी आत्मरूपाने सर्व जीवांमध्ये राहतो. त्या मज परमात्म्याचा अनादर करून जे प्रतिमारूपातच माझी पूजा करतात, त्यांची ती पूजा म्हणजे केवळ देखावा होय. सर्व भूतमात्रांमध्ये स्थित, सर्वांचा आत्मा, परमेश्वर अशा माझी मूर्खपणाने उपेक्षा करून केवळ प्रतिमा-पूजनातच जो गढलेला असतो, तो जणू अग्नी सोडून भस्मामध्येच हवन करतो. जो भेदबुद्धीने पाहणारा अहंकारी मनुष्य दुसर्या जीवांशी वैर करतो आणि अशा प्रकारे त्यांच्या शरीरात असणार्या माझाच द्वेष करतो, त्याच्या मनाला कधीच शांती मिळत नाही. हे माते, जो दुसर्या जीवांचा अपमान करतो आणि श्रेष्ठ-कनिष्ठ पदार्थांनी माझ्या मूर्तीचे पूजन करतो, त्याच्यावर मी प्रसन्न होत नाही. मनुष्याने आपल्या धर्माचे अनुष्ठान करीत तोपर्यंतच मज ईश्वराची प्रतिमा आदींमध्ये पूजा करीत राहावे, जोपर्यंत त्याला आपल्या हृदयात, तसेच संपूर्ण प्राण्यात स्थित असलेल्या परमात्म्याचा अनुभव येत नाही. जी व्यक्ती आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये थोडे सुद्धा अंतर आहे असे समजते, त्या भेददर्शी व्यक्तीला मी मृत्युरूप मोठे भय उत्पन्न करतो. म्हणून सर्व प्राण्यांमध्ये घर करून त्या प्राण्यांच्याच रूपात असलेल्या मज परमात्म्याचे यथायोग्य दान, मान, मैत्रीपूर्ण व्यवहार आणि समदृष्टी याद्वारे पूजन केले पाहिजे. (२०-२७) हे माते, पाषाणादी अचेतनांपेक्षा वृक्षादी जीव श्रेष्ठ आहेत. त्यांच्यापेक्षा श्वास घेणारे प्राणी श्रेष्ठ आहेत. त्यातसुद्धा मन असणारे प्राणी उत्तम आणि त्यांच्याहीपेक्षा इंद्रियवृत्तींनी युक्त प्राणी श्रेष्ठ होत. इंद्रियवृत्तियुक्त प्राण्यांमध्ये सुद्धा केवळ स्पर्शाचा अनुभव करणार्यांपेक्षा रसाचे ग्रहण करू शकणारे मासे वगैरे उत्कृष्ट आहेत. तसेच रसवेत्त्यांपेक्षा गंधाचा अनुभव घेणारे भ्रमर आदी आणि गंध ग्रहण करणार्यांपेक्षासुद्धा शब्द ग्रहण करणारे श्रेष्ठ आहेत. त्यांच्याहीपेक्षा रूपाचा अनुभव घेणारे कावळे इत्यादी उत्तम आहेत. त्यांच्यापेक्षा ज्यांना तोंडामध्ये वर-खाली दोन्ही बाजूस दात असतात, ते जीव श्रेष्ठ आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा पाय नसणार्यांपेक्षा पुष्कळ पाय असणारे श्रेष्ठ होत. तसेच पुष्कळ पाय असणार्यांपेक्षा चार पाय असणारे आणि चार पाय असणार्यांपेक्षासुद्धा दोन पाय असणारा मनुष्य श्रेष्ठ आहे. मनुष्यांमध्ये सुद्धा चार वर्ण श्रेष्ठ आहेत. त्यांमध्ये सुद्धा ब्राह्मण श्रेष्ठ होत. ब्राह्मणांमध्येही वेद म्हणणारा उत्तम होय आणि वेद म्हणणार्यांमध्येसुद्धा वेदांचा अर्थ जाणणारा श्रेष्ठ आहे. अर्थ जाणणार्यांपेक्षा संशयनिवृत्ती करणारा श्रेष्ठ होय. त्यापेक्षा वर्णाश्रमानुसार कर्म करणारा श्रेष्ठ होय. त्याच्यापेक्षा आस सोडून आपल्या धर्माचे निष्काम भावाने आचरण करणारा अधिक श्रेष्ठ आहे. त्याच्याहीपेक्षा जो आपली सर्व कर्मे, त्यांची फळे तसेच आपले शरीरही मला अर्पण करून आत्मा-परमात्म्यात भेद न मानता माझी उपासना करतो तो श्रेष्ठ आहे. अशा कर्तेपण सोडणार्या समदर्शी पुरुषापेक्षा मला दुसरा कोणी श्रेष्ठ मनुष्य दिसत नाही. म्हणून जीवरूप आपल्या अंशाने साक्षात भगवंतच सर्वांमध्ये राहात आहेत, असे मानून सर्व प्राण्यांना मोठया आदराने मनाने नमस्कार करावा. (२८-३४) हे माते, मी तुला असा हा भक्तियोग आणि अष्टांगयोग सांगितला. यांपैकी एक योग करण्यानेही जीव भगवंतांना प्राप्त होऊ शकतो. भगवान परमात्मा परब्रह्माचा अद्भुत प्रभावसंपन्न, तसेच जगातील पदार्थांच्या नानाविध वैचित्र्याला कारण असणारा स्वरूपविशेषच ‘काल ’ या नावाने प्रसिद्ध आहे. प्रकृती आणि पुरुष याचीच रूपे आहेत. तसेच ही त्याच्यापासून वेगळी सुद्धा आहेत. नाना प्रकारच्या कर्मांचे मूळ अदृष्ट तो हाच होय आणि याच्यापासून महत्तत्त्वादींच्या अभिमानी भेददर्शी प्राण्यांना नेहमी भय असते. जो सर्वांचा आश्रय असल्याकारणाने सर्व प्राण्यांमध्ये प्रविष्ट होऊन भूतांच्या द्वारेच त्यांचा संहार करतो, तो जग चालविणार्या ब्रह्मदेवादिकांचाही प्रभू भगवान कालच यज्ञांचे फळ देणारा विष्णू होय. हा काल कोणाचा मित्र नाही, कोणाचा शत्रू नाही आणि कोणाचा सगासोयराही नाही. हा नेहमी सावध राहातो आणि आपल्या स्वरूपभूत अशा श्रीभगवंतांचे विस्मरण होऊन भोगरूपी प्रमादात पडलेल्या प्राण्यांवर आक्रमण करून त्यांचा संहार करतो. याच्या भीतीनेच वारा वाहातो. याच्या भयानेच सूर्य तापतो, याच्या भयाने इंद्र वर्षाव करतो आणि याच्याच भयाने तारे चमकतात. याच्या भयानेच वनस्पती वेली इत्यादी योग्य वेळी फुले-फळे धारण करतात.याच्याच भीतीने नद्या वाहातात आणि समुद्र किनार्याच्या बाहेर जात नाहीत. याच्या भयाने अग्नी प्रज्वलित होतो आणि पर्वतांसह पृथ्वी पाण्यात बुडत नाही. याच्या आज्ञेनेच आकाश जिवंत प्राण्यांना अवकाश देते आणि महत्तत्त्व अहंकाररूप शरीराचा सात आवरणांनी युक्त अशा ब्रह्मांडाच्या रूपाने विस्तार करते. या कालाच्याच भयाने सत्त्वादी गुणांचे अभिमानी विष्णू आदी देव ज्यांच्या अधीन हे सर्व चराचर जग आहे, आपल्या जगत रचना इत्यादी कार्यांत युगक्रमानुसार तत्पर असतात. अविनाशी काल स्वतः अनादी, परंतु दुसर्यांना उत्पन्न करणारा आहे. तसेच स्वतः अनंत असूनही दुसर्यांचा अंत करणारा आहे. हा पित्यापासून पुत्राची उत्पत्ती करीत सर्व जगाची निर्मिती करतो आणि आपली संहारशक्ती जो मृत्यू त्याच्याकडून यमराजाला सुद्धा मारून त्याचा अंत करतो. (३५-४५) स्कंध तिसरा - अध्याय एकोणतिसावा समाप्त |