श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय २८ वा

अष्टांगयोगाचा विधी -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीभगवान म्हणतात - हे माते, आता मी तुला सबीज (ध्येयस्वरूपाच्या आलंबनाने युक्त) योगाचे लक्षण सांगतो, त्यामुळे चित्त प्रसन्न होऊन परमात्ममार्गाकडे प्रवृत्त होते. शास्त्राने सांगितलेल्या स्वधर्माचे यथाशक्ती पालन करणे, शास्त्राविरुद्ध आचरणाचा त्याग करणे, प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्यात संतुष्ट राहाणे, आत्मज्ञानी लोकांच्या सान्निध्यात राहाणे, विषयवासना वाढविणार्‍या कर्मांपासून दूर राहणे, संसारातून मुक्त करणार्‍या धर्मावर प्रेम करणे, पवित्र आणि परिमित आहार घेणे, नेहमी एकांत आणि निर्भय अशा स्थानी राहाणे, मन, वाणी, आणि शरीराने कोणत्याही जीवाला त्रास न देणे, सत्य बोलणे, चोरी न करणे, आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तूंचा संग्रह न करणे, ब्रह्मचर्याचे पालन करणे, तपश्चर्या करणे, अंतर्बाह्य पवित्र राहाणे, शास्त्रांचे अध्ययन करणे, भगवंतांची पूजा करणे, मौन पाळणे, उत्तम आसनांचा अभ्यास करून स्थिर बसणे, हळू हळू प्राणायामाने श्वासावर नियंत्रण ठेवणे, मनाच्या साहाय्याने इंद्रियांना विषयांपासून दूर करून हृदयात आणणे, मूलाधार इत्यादी कोणत्याही एका चक्रात मनासहित प्राणाला स्थिर करणे, नेहमी भगवंतांच्या लीलांचे चिंतन करणे आणि चित्ताला सम राखणे, तसेच व्रतदानादी दुसर्‍या साधनांनीसुद्धा सावधानतेने प्राणांवर नियंत्रण ठेवून बुद्धीच्या द्वारा आपल्या कुमार्गाकडे धावणार्‍या चित्ताला हळू हळू एकाग्र करून परमात्म्याच्या ध्यानामध्ये लावावे. (१-७)

प्रथम आसनजय साधावा. नंतर प्राणायामाच्या अभ्यासासाठी पवित्र ठिकाणी आसन तयार करावे. त्याच्यावर शरीर सरळ आणि स्थिर ठेवून सुखपूर्वक बसून अभ्यास करावा. प्रथम डाव्या नाकपुडीने पूरक करून कुंभक करावा आणि उजव्या नाकपुडीने रेचक करावा. किंवा याउलट उजव्या नाकपुडीने पूरक करून कुंभक करावा आणि डाव्या नाकपुडीने रेचक करावा. यामुळे प्राणमार्ग शुद्ध होऊन चित्त स्थिर आणि निश्चल होईल. (८-९)

जसे वायू आणि अग्नीने तापविलेले सोने आपल्यातील मळ बाहेर काढून टाकते, त्याचप्रमाणे जो योगी प्राणवायूला जिंकतो, त्याचे मन अतिशय लवकर शुद्ध होते. म्हणून योग्याने प्राणायामाने वात-पित्तादी दोषांना, धारणेने पापाला, प्रत्याहाराने विषयांच्या संबंधाला आणि ध्यानाने भगवद्‌विमुख करणार्‍या राग-द्वेषादी दुर्गुणांना दूर करावे. जेव्हा योगाचा अभ्यास करता करता चित्त निर्मल आणि एकाग्र होईल, तेव्हा नाकाच्या टोकावर दृष्टी स्थिर करून भगवंतांच्या मूर्तीचे असे ध्यान करावे. (१०-१२)

भगवंतांचे मुखकमल आनंदाने प्रफुल्लित आहे, नेत्र कमलकोशाप्रमाणे लालसर आहेत, शरीर नीलकमलदलाप्रमाणे श्यामवर्णाचे आहे. त्यांनी हातामध्ये शंख, चक्र, आणि गदा धारण केली आहे. कमलातील केसराप्रमाणे त्यांचे पिवळे रेशमी वस्त्र शोभत आहे. वक्षःस्थळावर श्रीवत्सचिह्न आहे आणि गळ्यामध्ये कौस्तुभमणी झगमगत आहे. वनमाला पायापर्यंत रुळत आहे, तिच्या चारी बाजूंनी भ्रमर सुगंधाने मोहित होऊन मधुर गुंजारव करीत आहेत. अंग-प्रत्यंगांवर मौल्यवान हार, कंकणे, किरीट, बाजूबंद, आणि नूपुरे इत्यादी अलंकार विराजमान आहेत.कमरेला कमरपट्टयाच्या लडी त्यांची शोभा वाढवीत आहेत. भक्तांचे हृदयकमल हेच त्यांचे आसन आहे. त्यांचे अतिशय दर्शनीय श्यामसुंदर शांत स्वरूप मन व नेत्रांना आनंदित करणारे आहे. त्यांची अत्यंत सुंदर अशी किशोर अवस्था आहे. ते भक्तांच्यावर कृपा करण्यासाठी आतुर झालेले आहेत.मोठी मनोहर मूर्ती आहे. नेहमी सर्व लोकांनी त्यांना वंदन केले आहे. त्यांचे पवित्र यश परम कीर्तनीय आहे आणि ते पुण्यश्लोक भक्तांचेही यश वाढविणारे आहेत. अशा प्रकारे श्री नारायण देवांचे संपूर्ण अंगांसहित, जोपर्यंत मन(चित्त) तेथून हटत नाही, तोपर्यंत ध्यान करावे. भगवंतांच्या सर्व लीला अतिशय दर्शनीय आहेत, म्हणून आपल्या आवडीनुसार उभे असलेले, चालत असलेले, बसलेले, पहुडलेले किंवा अंतःकरणात स्थित असलेले अशा त्यांच्या स्वरूपाचे विशुद्ध, भावयुक्त चित्ताने चिंतन करावे. अशा प्रकारे योग्याची जेव्हा खात्री होईल की, भगवत्स्वरूपात चित्त स्थिर झाले आहे, तेव्हा त्यांच्या सर्व अवयवांमध्ये लागलेल्या चित्ताला विशेष रूपाने एकेका अवयवांमध्ये लावावे. (१३-२०)

(प्रथम) भगवंतांच्या चरणकमलांचे ध्यान करावे. ती वज्र, अंकुश,ध्वज आणि कमल या मंगल चिह्नांनी युक्त आहेत. तसेच ती आपल्या उंच व लाल-लाल शोभामय नखचंद्रमंडलाच्या चंद्रिकेने भक्तांच्या हृदयातील अज्ञानरूप घोर अंधकार दूर करतात. ही चरणकमले धुतलेल्या पाण्यापासूनच जी नद्यांमधील श्रेष्ठ गंगा नदी प्रगट झाली होती, तिचे पवित्र जल मस्तकावर धारण केल्यामुळे श्रीमहादेव अधिक मंगलमय झाले. ती ध्यान करणार्‍यांसाठी पापरूप पर्वतावर सोडलेल्या इंद्राच्या वज्राप्रमाणे आहेत. भगवंतांच्या अशा चरणकमलांचे चिरकालपर्यंत चिंतन करावे. (२१-२२)

(नंतर) भवभयहारी, अजन्मा श्रीहरीच्या दोन्ही पिंडर्‍या तसेच गुडघ्यांचे ध्यान करावे, ज्यांना विश्वविधाता ब्रह्मदेवाची माता, सुरांनी वंदिलेली कमललोचना लक्ष्मी आपल्या मांडयावर ठेवून आपल्या कांतिमान हातरूप पल्लवांनी हळुवारपणे चुरत असते. अळशीच्या फुलाप्रमाणे नीलवर्ण आणि बलवान अशा, गरुडाच्या खांद्यावर शोभणार्‍या भगवंतांच्या मांडयाचे ध्यान करावे. त्यानंतर ज्यावर सोन्याचा कमरपट्टा शोभत आहे. अशा टाचेपर्यंत नेसलेल्या पीतांबराने आच्छादित नितंबाचे ध्यान करावे. (२३-२४)

नंतर जेथून ब्रह्मदेवाला आधारभूत सर्वलोकमय कमळ प्रगट झाले अशा, संपूर्ण लोकांचे आश्रयस्थान असलेल्या भगवंतांच्या पोटावर असणार्‍या नाभिसरोवराचे ध्यान करावे. नंतर प्रभूंच्या श्रेष्ठ अशा पाचूच्या मण्याप्रमाणे असणार्‍या दोन्ही स्तनांचे चिंतन करावे. जे वक्षःस्थळावर पडलेल्या शुभ्र मोत्यांच्या हाराच्या किरणांमुळे गौरवर्णाचे दिसतात. यानंतर महालक्ष्मीचे निवासस्थान आणि लोकांचे मन व नेत्रांना आनंद देणार्‍या पुरुषोत्तम भगवंतांच्या वक्षःस्थळाचे ध्यान करावे. मग सर्व लोकांना वंदनीय भगवंतांच्या कौस्तुभमण्याला सुशोभित करणार्‍या गळ्याचे चिंतन करावे. (२५-२६)

समस्त लोकपालांना आश्रयभूत अशा भगवंतांच्या चारी भुजांचे ध्यान करावे. ज्यामध्ये धारण केलेले कंकण इत्यादी अलंकार समुद्रमंथनाच्या वेळी मंदर पर्वताच्या घुसळण्याने अधिकच तेजस्वी झाले आहेत. तसेच ज्याचे तेज असह्य आहे, त्या सहस्त्र आर्‍यांच्या सुदर्शन चक्राचे आणि त्यांच्या करकमळात राजहंसाप्रमाणे विराजमान असणार्‍या शंखाचे चिंतन करावे. मग प्रभूच्या शत्रूंच्या रक्ताने माखलेल्या आवडत्या कौ‌मोदकी गदेचे, भ्रमरांच्या गुंजारवाने निनादित वनमालेचे आणि त्यांच्या कंठातील सुशोभित अशा सर्व जीवांच्या निर्मलतत्त्वरूप कौस्तुभमण्याचे ध्यान करावे. (२७-२८)

त्यानंतर भक्तांवर कृपा करण्यासाठीच येथे साकाररूप धारण करणार्‍या श्रीहरींच्या सुडौल नासिकेने शोभणार्‍या आणि झगमगणार्‍या मकरकुंडलांच्या हलण्याने अतिशय चमकणारे निर्मळ गाल असणार्‍या मुखकमलाचे ध्यान करावे. काळ्याभोर कुरळ्या केसांनी मंडित असे मुखकमल आपल्या सौंदर्याने भ्रमरांनी सेवन केलेल्या व माशाच्या जोडीने युक्त अशा कमलपुष्पाला सुद्धा फिके करीत आहे, अशा उन्नत भुवयांनी सुशोभित असणार्‍या भगवंतांच्या मनोहर मुखारविंदाची मनामध्ये धारणाकरून उत्साहाने त्याचे ध्यान करावे.(२९-३०)

भगवंतांच्या कृपापूर्ण हास्ययुक्त अमर्याद प्रसादाचा वर्षाव करणार्‍या आणि भक्तजनांच्या अत्यंत घोर अशा तिन्ही तापांना शांत करण्यासाठीच प्रगट झालेल्या दृष्टीचे भक्तिभावाने अंतःकरणात दीर्घकाळ ध्यान करावे. श्रीहरींचे हास्य शरणागत भक्तांच्या शोकाने उत्पन्न होणार्‍या अश्रूंना सुकविते. तसेच मुनिजनांच्या हितासाठी कामदेवाला मोहित करण्यासाठीच श्रीहरींनी आपल्या मायेने रचलेल्या विशाल भुवयांचे ध्यान करावे. ध्यानासाठी योग्य, तसेच ओठांवरील अत्यधिक लालसर रंगामुळे कुंदकळ्यांसारख्या शुभ्र छोटया छोटया दातांवर लाली शोभणार्‍या, आपल्या हृदयात विराजमान असणार्‍या श्रीहरींच्या खळखळून हसण्याचे अत्यंत प्रेमाने ध्यान करावे. अशा प्रकारे ध्यानात तन्मय होऊन त्याशिवाय दुसरा कोणताही पदार्थ पाहाण्याची इच्छा करू नये. (३१-३३)

अशा प्रकारे ध्यानाच्या अभ्यासाने साधकाचे श्रीहरींविषयी प्रेम उत्पन्न होते. त्याचे हृदय भक्तीने भरून येते. आनंदातिरेकाने शरीर रोमांचित होऊ लागते. उत्कंठाजनित प्रेमाश्रूंच्या धारांत तो वारंवार आपल्या शरीराला न्हाऊ घालतो आणि नंतर मासे पकडण्याच्या गळाप्रमाणे श्रीहरींना आपल्याकडे आकर्षित करण्याचे साधन असलेल्या आपल्या चित्तालाही हळू हळू ध्येय वस्तूपासून बाजूला सारतो. जसे तेल संपल्यानंतर दिव्याची ज्योत आपल्या कारणरूप तेजतत्त्वामध्ये लीन होऊन जाते. त्याचप्रमाणे आश्रय, विषय, आणि आसक्तिरहित होऊन मन शांत ब्रह्माकार होते. ही अवस्था प्राप्त झाल्यावर जीव गुणप्रवाहरूप देहादी उपाधीपासून वेगळा झाल्यामुळे एका परमात्म्यालाच सगळीकडे व्यापून असलेला पाहतो. योगाभ्यासाने प्राप्त झालेल्या चित्ताची अविद्यारहित लयरूप निवृत्ती झाल्याने आपल्या सुख-दुःखविरहित ब्रह्मरूप स्थितीत स्थिर होऊन परमात्मतत्त्वाचा साक्षात्कार करून घेतल्यावर तो योगी, ज्या सुख-दुःख भोगण्याला प्रथम अज्ञानाने आपले स्वरूप समजत होता, त्याला आता तो अविद्यारूपी अहंकारात पाहातो. जसे मदिरेने धुंद झालेल्या पुरुषाला आपल्या कमरेवरच्या वस्त्राची शुद्ध राहात नाही, तसे अंतिम अवस्थेला प्राप्त झालेल्या योग्यालाही आपल्या देहाचे उठणे-बसणे किंवा दैववशात कुठे जाणे किंवा परत येणे याविषयी काहीच ज्ञान नसते. कारण तो परमानंदमय स्वरूपात स्थिर असतो. त्याचे शरीर पूर्वजन्मींच्या संस्कारांच्या अधीन असते. म्हणून जोपर्यंत त्याचे पूर्वीचे प्रारब्ध शिल्लक आहे, तोपर्यंत तो इंद्रियांसह जिवंत असतो; परंतु ज्याला समाधिपर्यंत योगाची स्थिती प्राप्त झाली आहे आणि ज्याने परमात्मतत्त्वाला चांगल्याप्रकारे जाणले आहे, तो सिद्धपुरुष सार्‍या प्रपंचासह या शरीराचा स्वप्नात जाणवणार्‍या शरीराप्रंमाणे पुन्हा स्वीकार करीत नाही.(पुन्हा त्यात ‘मी-माझेपण ’ ठेवीत नाही.) (३४-३८)

जसे (अत्यंत स्नेहामुळे) पुत्र आणि धनामध्ये वाटणारा आपलेपणा विचारांती नाहीसा होऊन मनुष्य त्यांच्यापासून स्वतःला वेगळा मानतो, त्याप्रमाणे योगी ज्या देहाला आपला आत्मा मानत होता, त्यापेक्षा आपण वेगळाच असल्याचे जाणतो. जसे कोलीत,ठिणगी किंवा स्वतःपासून उत्पन्न झालेला धूर तसेच अग्निरूप झालेले लाकूड यांहून अग्नी वेगळा आहे, त्याचप्रमाणे भूत, इंद्रिये, अंतःकरण, जीव आणि प्रकृती यांहून साक्षी असलेला ब्रह्मसंज्ञक पुरुषोत्तम वेगळा आहे. जसे देहदृष्टीने जरायुज, अंडज, स्वेदज, आणि उद्‌भिज्ज चारी प्रकारचे प्राणी पंचभूतमात्र आहेत, तसेच संपूर्ण जीवांमध्ये आत्म्याला आणि आत्म्यामध्ये सर्व जीवांना अनन्यभावाने व्यापलेले पाहावे. जसा एकच पक्षी निरनिराळ्या लाकडांत त्यांच्या वेगळेपणामुळे निरनिराळ्या आकाराचा दिसतो, तसेच देव-मनुष्यादी शरीरात राहाणारा एकच आत्मा आपल्या आश्रयांच्या गुणभेदामुळे भिन्न-भिन्न प्रकारचा भासतो. म्हणून भगवंतांचा भक्त, जीवाच्या स्वरूपाला झाकणार्‍या कार्यकारणरूपाने परिणामाला प्राप्त झालेल्या भगवंतांच्या या अचिंत्य शक्तिमय मायेला भगवंतांच्या कृपेनेच जिंकून आपल्या वास्तविक स्वरूपात-ब्रह्मरूपात स्थित होतो. (३९-४४)

स्कंध तिसरा - अध्याय अठ्ठाविसावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP