श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय २७ वा

प्रकृति-पुरुषाच्या विवेकाने मोक्षप्राप्तीचे वर्णन -

श्रीभगवान म्हणाले - ज्याप्रमाणे पाण्यात प्रतिबिंबित झालेल्या सूर्याचा पाण्याची शीतलता, चंचलता आदी गुणांशी संबंध येत नाही, त्याचप्रमाणे प्रकृतीचे कार्य असणार्‍या शरीरात राहूनही आत्मा त्याच्या सुख-दुःखादी धर्मांनी लिप्त होत नाही. कारण तो निर्विकार, अकर्ता, आणि निर्गुण आहे. परंतु जेव्हा तो प्रकृतीच्या गुणांशी आपला संबंध जोडतो, तेव्हा अहंकाराने मोहित होऊन ‘मी कर्ता ’असे मानू लागतो. त्यामुळे तो देहाच्या संबंधाने केलेल्या पुण्य-पापरूप कर्मांच्या दोषांमुळे आपले स्वातंत्र्य आणि शांती गमावून बसतो आणि उत्तम, मध्यम, आणि नीच योनींमध्ये जन्म घेऊन संसारचक्रात फिरत राहातो. ज्याप्रमाणे स्वप्नातील भयशोकाचे काहीही कारण नसतानासुद्धा स्वप्नातील पदार्थांशी संबंध जोडल्यामुळे सुख-दुःख भोगावे लागते, त्याचप्रमाणे संसाराचे अस्तित्व नसून सुद्धा अज्ञानाने विषयांचे चिंतन करीत राहिल्याने जीवाची संसारचक्रातून कधी सुटका होत नाही. म्हणूनच मनुष्याने विषयचिंतनाच्या मार्गात गुंतलेल्या चित्ताला तीव्र भक्तियोग आणि वैराग्य यांच्या योगाने हळू हळू आपल्या स्वाधीन करून घ्यावे.(१-५)

यम इत्यादी योगसाधनांच्या द्वारा श्रद्धापूर्वक चित्ताला वारंवार एकाग्र करीत माझ्यामध्ये खरीखुरी भक्ती ठेवणे, माझ्या कथा श्रवण करणे, सर्व प्राण्यांविषयी समभाव ठेवणे, कोणाशी वैर न करणे, आसक्तीचा त्याग करणे, ब्रह्मचर्य, मौनव्रत, आणि निष्ठेने केलेल्या स्वधर्माचरणाने, प्रारब्धानुसार जे काही मिळते त्यात संतुष्ट राहण्याने,शरीररक्षणाला आवश्यक तितकेच भोजन करण्याने,नेहमी एकांतात राहण्याने, शांत स्वभावाने, सर्वांचा मित्र बनून दयाळू व धैर्यवान राहण्याने, प्रकृती आणि पुरुषाच्या वास्तविक स्वरूपाच्या अनुभवाने प्राप्त झालेल्या तत्त्वज्ञानामुळे स्त्री-पुत्रादी संबंधितांसह या देहाबद्दल मी-माझे असा खोटा अभिमान धारण न करण्याने, बुद्धीच्या जागृती इत्यादी अवस्थांपासून अलिप्त राहण्याने, तसेच परमात्म्याशिवाय दुसरी कोणतीच वस्तू न पाहण्याने, आत्मदर्शी मुनी डोळ्यांनी सूर्य पाहावा तसा आपल्या शुद्ध अंतःकरणाने परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतो, आणि जे देहादी उपाधींपासून वेगळे, अहंकारादी, खोटया गोष्टीमध्ये सत्यरूपाने भासणारे जगाचे कारण असलेल्या प्रकृतीचे अधिष्ठान, महदादी कार्यवर्गाचे प्रकाशक आणि कार्य-कारणरूप संपूर्ण पदार्थांमध्ये व्यापलेले आहे, त्या अद्वितीय ब्रह्मपदाला प्राप्त होतो. (६-११)

ज्याप्रमाणे पाण्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब भिंतीवर पडलेल्या कवडशामुळे पाहिले जाते आणि पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबामुळे आकाशातील सूर्याचे ज्ञान होते, त्याप्रमाणे वैकारिक आदी भेदांमुळे तीन प्रकारचा अहंकार, देह, इंद्रिय आणि मन यांत असलेल्या आपल्या प्रतिबिंबामुळे जाणला जातो आणि पुन्हा परमात्म्याच्या प्रतिबिंबामुळे त्या अहंकाराच्या द्वारा सत्यज्ञानस्वरूप त्या परमात्म्याचे दर्शन होते. जो गाढ झोपेत शब्दादी सूक्ष्म भूते, इंद्रिये, मनबुद्धी इत्यादी प्रकृतीत लीन झालेल्यावेळी स्वतः जागा राहतो आणि सर्वथा अहंकारशून्य असतो. ज्याप्रमाणे धनाचा नाश झाल्यानंतर मनुष्य आपणच नष्ट झालो असे मानून अत्यंत व्याकूळ होतो,त्याचप्रमाणे हा द्रष्टा आत्मासुद्धा सुषुप्ती-अवस्थेत आपल्या उपाधिभूत अहंकाराचा नाश झाल्याकारणाने भ्रमाने आपणच नष्ट झालो, असे समजतो. या सर्व गोष्टींचे मनन करून विवेकी पुरुष जो अहंकारासहित सर्व तत्त्वांचे अधिष्ठान आणि प्रकाशक आहे, त्या आपल्या आत्म्याचा अनुभव घेतो. (१२-१६)

देवहूतीने विचारले - प्रभो ! पुरुष आणि प्रकृती दोन्हीही नित्य आणि एकमेकांच्या आश्रयाने राहाणारी आहेत. म्हणून प्रकृती तर पुरुषाला कधीच सोडू शकत नाही. जसे गंध आणि पृथ्वी, रस आणि पाणी ही एकमेकांपासून वेगळी राहात नाहीत, त्याचप्रमाणे पुरुष आणि प्रकृतीसुद्धा एक-दुसर्‍याला सोडून राहात नाहीत. म्हणून जिच्या आश्रयाने अकर्त्या पुरुषाला हे कर्मबंधन प्राप्त झाले आहे, त्या प्रकृतीचे गुण शिल्लक असताना पुरुषाला कैवल्यपद कसे प्राप्त होईल ? जरी तत्त्वांचा विचार केल्याने एखादे वेळी हे संसारबंधनाचे तीव्र भय नाहीसे झाले, तरी त्याला कारण असणार्‍या प्रकृतीच्या गुणांचा नाश न झाल्याने ते भय पुन्हा उपस्थित होऊ शकते. (१७-२०)

श्रीभगवान म्हणाले - ज्याप्रमाणे अग्नीचे उत्पत्तिस्थान असलेले लाकूड आपणच उत्पन्न केलेल्या अग्नीपासून जळून भस्म होते, त्याचप्रमाणे निष्कामभावाने केलेल्या स्वधर्मपालनाने अंतःकरण शुद्ध झाल्यामुळे, पुष्कळ काळपर्यंत भगवत्कथा श्रवणामुळे वाढलेल्या माझ्या तीव्र भक्तीने, तत्त्वसाक्षात्कार करणार्‍या ज्ञानाने, प्रबळ वैराग्याने, व्रतनियमादींसह केलेल्या ध्यानाभ्यासाने आणि चित्ताच्या प्रगाढ एकाग्रतेने पुरुषाची प्रकृती रात्रंदिवस क्षीण होत होत हळू हळू नाहीशी होते. नंतर नेहमी दोष दिसल्याने भोगून त्यागलेली ती प्रकृती आपल्या स्वरूपात स्थित आणि स्वतंत्र असलेल्या त्या पुरुषाचे काहीही बिघडवू शकत नाही. ज्याप्रमाणे निद्रिस्त पुरुषाला स्वप्न कितीही अनर्थाचा अनुभव देत असले तरी जाग आल्यावर त्याला ते कोणत्याही प्रकारे मोह उत्पन्न करीत नाही. त्याचप्रमाणे ज्याला तत्त्वज्ञान झाले आहे आणि जो नेहमी माझ्यामध्येच मन लावून राहतो, त्या आत्माराम मुनीचे प्रकृती काहीही बिघडवू शकत नाही. जेव्हा मनुष्य अनेक जन्मांमध्ये पुष्कळ काळापर्यंत अशा प्रकारे आत्मचिंतनातच निमग्न राहातो, तेव्हा त्याला ब्रह्मलोकापर्यंतच्या सर्व प्रकारच्या भोगांविषयी वैराग्य निर्माण होते. माझा तो धैर्यवान भक्त माझ्याच मोठया कृपेने तत्त्वज्ञान आत्मसात करून आत्मानुभावाने सर्व संशयातून मुक्त होतो आणि पुन्हा लिंगदेहाचा नाश झाल्यावर एकमात्र माझाच आश्रय असणार्‍या आपल्या स्वरूपभूत कैवल्यसंज्ञा असणार्‍या माझ्या त्या मंगलमय पदाला सहजच प्राप्त करून घेतो. तेथे गेल्यानंतर योगी पुन्हा संसारात येत नाही. हे माते, जर योग्याचे चित्त योगसाधनेमुळे वृद्धिंगत झालेल्या आणि ज्यांच्या प्राप्तीसाठी योगाखेरीज दुसरे साधन नाही अशा मायामय अणिमादी सिद्धींमध्ये अडकून पडले नाही, तर त्याला माझे ते अविनाशी पद प्राप्त होते, तेथे मृत्यूचे काहीच चालत नाही. (२१-३०)

स्कंध तिसरा - अध्याय सत्ताविसावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP