श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय २६ वा

महदादी विविध तत्त्वांच्या उत्पत्तीचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीभगवान म्हणाले - आता मी तुला प्रकृती इत्यादी सर्व तत्त्वांचे वेगवेगळे लक्षण सांगतो, जे जाणल्याने मनुष्य प्रकृतीच्या गुणांपासून मुक्त होतो. आत्मदर्शनरूप ज्ञानच पुरुषाच्या मोक्षाला कारण आहे आणि तेच त्याच्या अहंकाररूप हृदयग्रंथीचे छेदन करणारे आहे., असे पंडित म्हणतात. अशाच ज्ञानाचे मी तुला यापुढे वर्णन करून सांगतो. हे सर्व विश्व ज्याच्यामुळे व्याप्त होऊन प्रकाशित होते, तो आत्मा म्हणजेच पुरुष होय. तो अनादी, निर्गुण, प्रकृतीच्या पलीकडील, अंतःकरणात स्फुरणारा व स्वयंप्रकाशी आहे. त्या सर्वव्यापक पुरुषाने लीला-विलासपूर्वक आपल्याजवळ आलेल्या अव्यक्त आणि त्रिगुणात्मक वैष्णवी मायेचा स्वेच्छेने स्वीकार केला आहे. लीलापरायण प्रकृती आपल्या सत्त्वादी गुणांनी त्यांच्यासारख्याच प्रजेची निर्मिती करू लागली, हे पाहून ज्ञान झाकणार्‍या तिच्या आवरणशक्तीने पुरुष तत्काळ मोहित झाला आणि आपल्या स्वरूपाला विसरला. अशा प्रकारे आपल्यापेक्षा भिन्न प्रकृतीलाच आपले स्वरूप समजल्याने पुरुष, प्रकृतीच्या गुणांकडून केल्या जाणार्‍या कर्मांचा आपणच कर्ता आहोत, असे मानू लागतो. या कर्तृत्वाभिमानामुळेच अकर्ता, स्वाधीन, साक्षी आणि आनंदस्वरूप पुरुषाला जन्म-मृत्युरूप बंधन आणि पारतंत्र्य येते. कार्यरूप शरीर, कारणरूप इंद्रिये तसेच कर्तारूप इंद्रियाधिष्ठात्या देवता यांना पुरुष जो ‘मी मानतो ’ त्याला प्रकृती हेच कारण आहे, असे पंडित मानतात. तसेच वास्तविक प्रकृतीच्या पलीकडचा असूनही जो प्रकृतीमध्येच राहातो, त्या पुरुषाला सुख-दुःख भोगण्याचे कारण मानले जाते. (१-८)

देवहूती म्हणाली- हे पुरुषोत्तमा, या विश्वातील स्थूल-सूक्ष्म कार्य ज्यांचे स्वरूप आहे. तसेच जे यांचे कारण आहे, ती, प्रकृती आणि पुरुष यांची लक्षणे सुद्धा आपण मला सांगावीत. (९)

श्रीभगवान म्हणाले - जे त्रिगुणात्मक, अव्यक्त, नित्य आणि कार्य-कारणरूप आहे, तसेच अव्यक्त असूनही संपूर्ण व्यक्त पदार्थांचा आश्रय आहे, त्या प्रधान नावाच्या तत्त्वालाच प्रकृती म्हणतात. पंचमहाभूते, पाच तन्मात्रा, चार अंतःकरणे (मन, बुद्धी, चित्त, आणि अहंकार) आणि दहा इंद्रिये, या चोवीस तत्त्वांच्या समूहाला विद्वान लोक प्रकृतीचे कार्य मानतात. माझ्या मते पृथ्वी, जल, तेज, वायू, आणि आकाश ही पंचमहाभूते व गंध, रस, रूप, स्पर्श, आणि शब्द या त्यांच्या पाच तन्मात्रा आहेत. कान, त्वचा, डोळे, जीभ, नाक, (ज्ञानेंद्रिये), वाणी, हात, पाय, शिश्न, आणि गुद (कर्मेंद्रिये) ही दहा इंद्रिये होत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या चार रूपात असलेले एकच अंतःकरण आपला संकल्प, निश्चय, चिंतन आणि ‘मी ’ ची जाणीव अशा चार प्रकारच्या वृत्तींनी ओळखले जाते. अशा प्रकारे मी सगुण ब्रह्माचा आकारविशेष म्हणून ही चोवीस तत्त्वांची संख्या सांगितली. याखेरीज जो काळ आहे, ते पंचविसावे तत्त्व होय. मायेचे कार्य असलेल्या देह इत्यादींना ‘मी ’ मानून आपल्यालाच कर्ता मानणार्‍या जीवालाच ज्याचे भय वाटते, त्या काळाला (वेगळे तत्त्व न मानता) काहीजण ईश्वराची संहारक शक्ती मानतात. हे मनुपुत्री, ज्याच्या प्रेरणेमुळे गुणांची साम्यावस्थारूप अव्यक्त प्रकृतीत गती उत्पन्न होते, त्या भगवानांनाच काल म्हणतात. अशा प्रकारे जे आपल्या मायेच्या द्वारे सर्व प्राण्यांमध्ये जीवरूपाने आणि बाहेर कालरूपाने व्याप्त आहेत, ते भगवानच पंचविसावे तत्त्व आहेत. (१०-१८)

जेव्हा परमपुरुषाने जीवांच्या अदृष्टानुसार कार्यप्रवण झालेल्या, समस्त जीवांचे उत्पत्तिस्थान अशा मायेमध्ये चैतन्यरूप वीर्य स्थापित केले, तेव्हा त्यापासून तेजोमय महत्तत्त्व उत्पन्न झाले. लय-विक्षेपादिरहित तसेच जगाचे अंकुररूप या महत्तत्त्वाने आपल्यात असलेल्या विश्वाला प्रगट करण्यासाठी आपल्या स्वरूपाला आच्छादित करणार्‍या प्रलयकालीन अंधकाराला आपल्याच तेजाने नाहीसे केले. (१९-२०)

जे सत्त्वगुणमय, स्वच्छ, शांत, आणि भगवंतांच्या उपलब्धीचे स्थानरूप चित्त आहे, तेच महत्तत्त्व आहे आणि त्यालाच "वासुदेव" म्हणतात. ज्याप्रमाणे पाणी आपल्या मूळ अवस्थेमध्ये अत्यंत स्वच्छ, विकारशून्य आणि शांत असते, त्याचप्रमाणे स्वाभाविक अवस्थेत स्वच्छ, अविकारी आणि शांत असणारे ते चित्त असे हे वृत्तींसह चित्ताचे लक्षण सांगितले आहे. त्यानंतर भगवंतांच्या वीर्यरूप चित्‌शक्तीपासून उत्पन्न झालेल्या महत्तत्त्वाच्या क्रियाशील होण्याने त्यापासून क्रियाशक्तिप्रधान असा अहंकार उत्पन्न झाला. तो वैकारिक, तैजस, आणि तामस भेदाने तीन प्रकारचा आहे. त्यापासूनच क्रमशः मन, इंद्रिये, आणि पंचमहाभूतांची उत्पत्ती झाली. या भूत, इंद्रिय आणि मनरूप अहंकारालाच पंडितलोक साक्षात "संकर्षण" नावाचा एक हजार शिरे असलेला अनंतदेव म्हणतात. या अहंकाराचे देवतारूपाने कर्तृत्व, इंद्रियरूपाने करणत्व आणि पंचभूतरूपाने कार्यत्व हे लक्षण आहे. तसेच सत्त्वादी गुणांच्या संबंधाने शीतत्व, घोरत्व, आणि मूढत्व ही सुद्धा याचीच लक्षणे होत. वरील तीन प्रकारच्या अहंकारांपैकी वैकारिक अहंकार क्रियाशील झाल्याने त्यापासून मन हे तत्त्व उत्पन्न झाले. त्याच्या संकल्प-विकल्पांमुळे कामना उत्पन्न होतात. हे मनतत्त्वच इंद्रियांचा अधिष्ठाता "अनिरुद्ध" या नावाने प्रसिद्ध आहे. योगीलोक शरद ऋतूतील नीलकमळाप्रमाणे श्यामवर्णाच्या या अनिरुद्धाची पुन्हा पुन्हा मनाला वश करून आराधना करीत असतात. हे साध्वी, पुढे तेजस अहंकार क्रियाशील झाल्याने त्यापासून बुद्धितत्त्व उत्पन्न झाले. वस्तूचे स्फुरणरूप विज्ञान आणि इंद्रियांच्या कामांत साहाय्य करणे हे बुद्धीचे कार्य आहे. वृत्तींच्या भेदामुळे संशय, विपरीत ज्ञान, निश्चय, स्मृती आणि निद्रा ही बुद्धीची निरनिराळी लक्षणे होत. इंद्रिये हेसुद्धा तैजस अहंकाराचेच कार्य होय. कर्म आणि ज्ञानाच्या विभागाने त्यांचे कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये असे दोन भेद आहेत. यांमध्ये कर्म ही प्राणांची आणि ज्ञान बुद्धीची शक्ती होय. (२१-३१)

भगवंतांच्या चेतनाशक्तीच्या प्रेरणेने तामस अहंकार विकृत होऊन त्यापासून शब्दतन्मात्रेची उत्पत्ती झाली. शब्दतन्मात्रेपासून आकाश उत्पन्न झाले. शब्दाचे ज्ञान श्रोत्रेंद्रिय करून देते. शब्दाच्या अर्थाचे ज्ञान करून देणे, न दिसणार्‍याही बोलणार्‍याच्या स्थानाचे ज्ञान करून देणे आणि आकाशाचे सूक्ष्म रूप असणे हीच विद्वानांच्या मते शब्दाची लक्षणे होत. सर्व वस्तूंना पोकळी उपलब्ध करून देणे, सर्वांच्या आत-बाहेर राहाणे, तसेच प्राण, इंद्रिये आणि मन यांचा आश्रय होणे, ही आकाशाची कार्यरूप लक्षणे होत. (३२-३४)

नंतर शब्दतन्मात्रेचे कार्य असणार्‍या आकाशात कालगतीने विकार झाल्याकारणाने स्पर्शतन्मात्र उत्पन्न झाले आणि त्यापासून वायू उत्पन्न झाला. स्पर्शाचे उत्तम ज्ञान त्वचा करून देते. कोमलता, कठोरता,शीतलता, उष्णता आणि वायूचे सूक्ष्म रूप असणे ही स्पर्शाची लक्षणे होत. वृक्षाच्या फांद्या इत्यादींना हलविणे, तृण इत्यादींना एकत्रित करणे, सगळीकडे पोहोचविणे, गंधयुक्त द्रव्याला नाकाजवळ तसेच शब्दाला कानाजवळ नेणे, त्याचप्रमाणे सर्व इंद्रियांमध्ये कार्यशक्ती उत्पन्न करणे,ही वायूच्या वृत्तीची लक्षणे होत. (३५-३७)

त्यानंतर दैवाच्या प्रेरणेने स्पर्शतन्मात्रविशिष्ट वायूच्या विकृत होण्याने रूपतन्मात्र उत्पन्न झाले. तसेच त्यापासून तेज आणि रूपाला प्रगट करणार्‍या नेत्रेंद्रियाचा उगम झाला. हे साध्वी, वस्तूच्या आकाराचे ज्ञान करून देणे, पदार्थाच्या अंगरूपाने असणे, पदार्थाचा जसा आकार-प्रकार आणि परिणाम इत्यादी असेल तसेच त्याचे स्वरूप दाखविणे आणि तेजोरूप असणे ह्या सर्व रूपतन्मात्राच्या वृत्ती होत. चमकणे, पक्व करणे, थंडी दूर करणे, सुकविणे, तहान-भूक उत्पन्न करून त्यांच्या निवृत्तीकरिता भोजन करणे, पाणी पिणे या तेजाच्या वृत्ती होत. (३८-४०)

नंतर दैवाच्या प्रेरणेने रूपतन्मात्रमय तेज विकृत झाल्याने त्यापासून रसतन्मात्र उत्पन्न झाले आणि त्याच्यापासून पाणी व रसाला ग्रहण करणारी जीभ उत्पन्न झाली. एकच रस भौतिक पदार्थांशी संयोग झाल्याने तुरट, गोड, तिखट, कडू, खारट, आंबट, इत्यादी अनेक प्रकारचा होतो. भिजविणे, माती इत्यादींचा गोळा करणे, तृप्त करणे, जिवंत ठेवणे, तहान भागविणे, पदार्थांना मृदू बनविणे, उष्णता नाहीशी करणे आणि विहिरी इत्यादीतून बाहेर काढल्यावरही तेथे पुन्हा पुन्हा प्रगट होणे या पाण्याच्या वृत्ती आहेत. (४१-४३)

यानंतर दैवाने प्रेरित झाल्याने पाणी विकृत होऊन त्यापासून गंधतन्मात्र उत्पन्न झाले आणि त्यापासून पृथ्वी व वास ग्रहण करणारे नाक प्रगट झाले. परस्पर मिसळलेल्या पदार्थांच्या कमी-अधिकपणामुळे तो वास मिश्रगंध, दुर्गंध, सुगंध, मृदू, तीव्र,आंबट इत्यादी अनेक प्रकारचा होतो. प्रतिमा इत्यादी रूपांनी ब्रह्माचे साकार होणे, पाणी इत्यादी कारण तत्त्वांपासून भिन्न अशा दुसर्‍या कोणत्याही आश्रयाची अपेक्षा केल्याखेरीज राहणे, पाणी इत्यादी अन्य पदार्थांना धारण करणे, आकाश इत्यादींचे विभाग दाखविणे(घटाकाश, मठाकाश इत्यादी) तसेच सर्व प्राण्यांच्या स्त्रीत्व, पुरुषत्व, इत्यादी गुणांना प्रगट करणे ही पृथ्वीची कार्यरूप लक्षणे आहेत. (४४-४६)

आकाशाचा विशेष गुण शब्द हा ज्याचा विषय आहे, ते श्रोत्रेंद्रिय(कान) होय. वायूचा विशेष गुण स्पर्श हा ज्याचा विषय आहे, ते त्वगिंद्रिय(त्वचा) होय. तेजाचा विशेष गुण रूप हा ज्याचा विषय आहे, ते नेत्रेंद्रिय(डोळा) होय. पाण्याचा विशेष गुण रस हा ज्याचा विषय आहे ते रसनेंद्रिय(जीभ) होय आणि पृथ्वीचा विशेष गुण गंध ज्याचा विषय आहे, त्याला घ्राणेंद्रिय(नाक) म्हणतात. वायू इत्यादी कार्य-तत्त्वांमध्ये आकाशादी कारणतत्त्वे राहात असल्यामुळे त्यांचे गुण त्यात दिसतात. म्हणून सर्व महाभूतांचे गुण शब्द, स्पर्श, रूप, रस, आणि गंध केवळ पृथ्वीतच आढळतात. जेव्हा महत्तत्त्व, अहंकार आणि पंचमहाभूते- ही सात तत्त्वे एकमेकात मिसळू शकली नाहीत, तेव्हा जगाचे आदिकारण श्रीनारायणांनी काल, अदृष्ट आणि सत्त्वादी गुणांसहित त्यांमध्ये प्रवेश केला. (४७-५०)

नंतर परमात्म्याने प्रवेश केल्याने क्षुब्ध झालेल्या आणि आपापसात मिसळलेल्या त्या तत्त्वांपासून एक अचेतन अंडे उत्पन्न झाले. त्यापासून या विराट पुरुषाची उत्पत्ती झाली. या अंडयाचे नाव ‘विशेष ’ आहे. त्याच्या अंतर्गत श्रीहरींच्या स्वरूपभूत चौदाही भुवनांचा विस्तार आहे. हे सर्व बाजूंनी क्रमशः एक दुसर्‍यापेक्षा दहापट अधिक अशा पाणी, अग्नी, वायू, आकाश, अहंकार, आणि महत्तत्त्व या सहा आवरणांनी आच्छादिले आहे.या सर्वांच्या बाहेर सातवे आवरण प्रकृतीचे आहे. कारणमय पाण्यात असणार्‍या त्या तेजोमय अंडयातून उठून त्या विराट पुरुषाने पुन्हा त्यातच प्रवेश केला आणि त्यात अनेक प्रकारची छिद्रे निर्माण केली. सर्वप्रथम त्यात मुख प्रगट झाले. त्यातून वाक्-इंद्रिय आणि वाणीसह वाणीचा अधिष्ठाता अग्नी प्रविष्ट झाला. नंतर नाकाची छिद्रे प्रगट झाली. प्राणसहित घ्राणेंद्रिय उत्पन्न झाले. घ्राणेंद्रियानंतर त्याचा अधिष्ठाता वायू त्यात प्रविष्ट झाला. त्यानंतर नेत्रगोल प्रगट झाले. त्यापासून नेत्रेंद्रिय प्रगट झाले आणि तत्पश्चात त्याचा अधिष्ठाता सूर्य तेथे प्रविष्ट झाला. मग कानाची छिद्रे प्रगट झाली. त्यापासून त्याचे इंद्रिय श्रोत्र आणि त्याची अभिमानी दिशा-देवता त्यात प्रगट झाली. यानंतर त्या विराट पुरुषाला त्वचा उत्पन्न झाली. त्यापासून छिद्रे व तेथे दाढी-मिशा तसेच डोक्यावरील केस प्रगट झाले. यानंतर त्वचेची देवता औषधी उत्पन्न झाल्या. नंतर लिंग प्रगट झाले. त्यापासून वीर्य आणि वीर्यानंतर लिंगाची अभिमानी जलदेवता उत्पन्न झाली. नंतर गुदद्वार प्रगट झाले. त्यापासून अपानवायू आणि अपानानंतर त्याची अभिमानी, लोकांना भयभीत करणारी, मृत्युदेवता प्रगट झाली. त्यानंतर हात प्रगट झाले, त्यापासून बल आणि बलानंतर हस्तेंद्रियाचा अभिमानी इंद्र प्रगट झाला. नंतर चरण प्रगट झाले. त्यापासून गती (गमनाची क्रिया) आणि मग चरणांची अभिमानी विष्णुदेवता प्रगट झाली. नंतर त्या विराट पुरुषाला नाडया उत्पन्न झाल्या. त्यापासून रक्त उत्पन्न झाले आणि नंतर त्यांच्या अभिमानी देवता नद्या प्रगट झाल्या. नंतर पोट प्रगट झाले. त्यापासून तहान-भूक अभिव्यक्त झाली आणि मग उदराची अभिमानी समुद्रदेवता उत्पन्न झाली. त्यानंतर हृदय प्रगट झाले. हृदयापासून मन उत्पन्न झाले.नंतर त्याचा अभिमानी चंद्र उत्पन्न झाला. नंतर हृदयापासूनच बुद्धी आणि त्याचा अभिमानी ब्रह्मदेव प्रगट झाला. नंतर अहंकार व त्यापाठोपाठ त्याची अभिमानी रुद्रदेवता प्रगट झाली.यानंतर चित्त आणि त्याचा अभिमानी क्षेत्रज्ञ प्रगट झाला(५१-६१)

जेव्हा या क्षेत्रज्ञाव्यतिरिक्त सर्व देवता उत्पन्न होऊन सुद्धा विराट पुरुषाला उठविण्यास असमर्थ ठरल्या, तेव्हा त्याला उठवण्यासाठी त्या देवता क्रमशः पुन्हा आपापल्या उत्पत्तिस्थानांमध्ये प्रविष्ट होऊ लागल्या. अग्नीने वाणीसह मुखामध्ये प्रवेश केला, परंतु त्यामुळे विराट पुरुष उठला नाही. वायूने घ्राणेंद्रियासह नाकांच्या छिद्रात प्रवेश केला, तरीसुद्धा विराट पुरुष उठला नाही. सूर्याने चक्षूसह नेत्रात प्रवेश केला तरीपण विराट पुरुष उठला नाही. दिशांनी श्रवणेंद्रियांसहित कानांमध्ये प्रवेश केला, पण विराट पुरुष उठला नाही. औषधींनी रोमांसहित त्वचेमध्ये प्रवेश केला, पण विराट पुरुष उठला नाही. पाण्याने वीर्यासह लिंगामध्ये प्रवेश केला, तरीसुद्धा विराट पुरुष उठला नाही. मृत्यूने अपानाबरोबर गुदस्थानात प्रवेश करूनही विराट पुरुष उठला नाही. इंद्राने शक्तीसह हातांमध्ये प्रवेश केला, परंतु यानेही विराट पुरुष उठला नाही. विष्णूने गतीसह चरणांमध्ये प्रवेश केला, तरी विराट पुरुष उठला नाही. नद्यांनी रक्तासह नाडयांमध्ये प्रवेश केला, तरीही विराट पुरुष उठला नाही. समुद्राने तहान-भूकेसह उदरामध्ये प्रवेश केल्यानेही विराट पुरुष उठला नाही. चंद्राने मनासहित हृदयात प्रवेश केला, पण त्यानेही विराट पुरुष उठला नाही. ब्रह्मदेवाने बुद्धीसहित हृदयात प्रवेश केल्यानंतरही विराट पुरुष उठला नाही. रुद्राने अहंकारासहित त्याच हृदयात प्रवेश केला, पण विराट पुरुष उठला नाही. परंतु जेव्हा चित्ताचा अधिष्ठाता क्षेत्रज्ञ भगवान वासुदेव याने चित्तासहित हृदयात प्रवेश केला, त्याचवेळी विराट पुरुष पाण्यामधून उठून उभा राहिला, ज्याप्रमाणे लोकांमध्ये प्राण, इंद्रिये, मन. आणि बुद्धी चित्ताचा अधिष्ठाता असणार्‍या सहाय्याशिवाय झोपलेल्या शक्तीने उठवू शकत नाहीत, (त्याप्रमाणे विराट पुरुषालासुद्धा क्षेत्रज्ञ परमात्म्याशिवाय उठविता येत नाही.) म्हणून भक्ती, वैराग्य आणि चित्ताच्या एकाग्रतेतून प्रगट झालेल्या ज्ञानाने त्या अंतरात्मस्वरूप क्षेत्रज्ञाचे या शरीरात साक्षिरूपाने चिंतन केले पाहिजे. (६२-७२)

स्कंध तिसरा - अध्याय सव्विसावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP