श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय १८ वा

हिरण्याक्षाबरोबर वराह-भगवानांचे युद्ध -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

मैत्रेय म्हणाले - हे विदुरा, वरुणाचे हे बोलणे ऐकून तो मदोन्मत्त दैत्य अत्यंत खूष झाला. "तू त्यांच्या हातून मारला जाशील." या त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता नारदांना श्रीहरींचा ठाव-ठिकाणा विचारून तो तत्काळ रसातळात पोहोचला. तेथे त्याने विश्वविजयी वराह भगवानांना आपल्या दाढेच्या टोकावर पृथ्वीला ठेवून वरच्या बाजूला जाताना पाहिले. ते आपल्या लालभडक चमकदार डोळ्यांनी त्याचे तेज हरण करीत होते. त्यांना पाहून तो खदखदा हसू लागला आणि म्हणाला, "अरे ! हा जंगली पशू इथे पाण्यात कोठून आला ?" नंतर तो वराहांना म्हणाला, "अरे मूर्खा ! इकडे ये. या पृथ्वीला सोडून दे. विश्वविधात्या ब्रह्मदेवाने ही आम्हां रसातलवासियांच्या स्वाधीन केली आहे. अरे वराहरूपधारी सुराधमा, माझ्यादेखत तू हिला घेऊन सुखरूपपणे जाऊ शकणार नाहीस. तू मायेने लपून-छपूनच दैत्यांना जिंकतोस आणि मारून टाकतोस. आमच्या शत्रूंनी आमचा नाश करण्यासाठीच तुला पाळले आहे काय ? योगमाया हेच तुझे बळ आहे. तुझ्यात पुरुषार्थ थोडाच आहे ? मूर्खा, आज तुला नाहीसा करूनच माझ्या बांधवांचा शोक मी दूर करीन. जेव्हा माझ्या हातातून केवळ सुटलेल्या गदेच्या प्रहाराने डोके फुटून तू मरून जाशील, तेव्हा तुझी आराधना करणारे जे देव आणि ऋषी आहेत, ते सर्वजण मुळे तोडलेल्या झाडाप्रमाणे आपोआप नष्ट होऊन जातील." (१-५)

हिरण्याक्ष भगवंतांना कठोर भाषणरूप बाणांनी टोचीत होता, परंतु त्यांनी दाताच्या टोकावर स्थिर असलेली पृथ्वी भयभीत झालेली पाहून ते टोचणे सहन केले आणि ज्याप्रमाणे मगरीचा तडाखा खाऊनही हत्तिणीसह हत्ती पाण्याच्या बाहेर येतो, त्याप्रमाणे पृथ्वी घेऊन बाहेर आले. जेव्हा हिरण्याक्षाने दिलेल्या आह्वानाला प्रत्युत्तर न देता ते पाण्याच्या बाहेर येऊ लागले, तेव्हा मगर ज्याप्रमाणे हत्तीचा पाठलाग करते, त्याचप्रमाणे पिवळे केस आणि तीक्ष्ण दाढांच्या त्या दैत्याने त्यांचा पाठलाग केला आणि वज्राप्रमाणे तीक्ष्ण स्वरात तो म्हणू लागला, "निर्लज्ज दुर्जनांना न करण्यासारखी गोष्ट कोणती आहे ?" (६-७)

भगवंतांनी पृथ्वीला आणून पाण्याच्या वर व्यवहाराला योग्य ठिकाणी ठेवले आणि तीत आपली शक्ती स्थापन केली. त्यावेळी हिरण्याक्षाच्या समक्षच ब्रह्मदेवांनी त्यांची स्तुती केली आणि देवतांनी पुष्पवृष्टी केली. तेव्हा भली मोठी गदा घेऊन आपला पाठलाग करणार्‍या सोन्याचे अलंकार आणि अद्‌भुत कवच धारण केलेल्या तसेच कठोर शब्दांनी एकसारखे मर्मभेदी घाव घालणार्‍या हिरण्याक्षाला अत्यंत क्रुद्ध श्रीहरी हसत हसत म्हणाले. (८-९)

श्रीभगवान म्हणाले - "अरे ! तुझ्यासारख्या कुत्र्यांना शोधीत फिरणारे आम्ही खरोखरीच जंगली प्राणी आहोत. अरे दुष्टा ! तुझ्यासारख्या मृत्युपाशात अडकलेल्या जीवांच्या आत्मस्तुतीकडे वीर पुरुष लक्ष देत नाहीत. रसातळात राहाणार्‍यांची भूमी चोरून आणून आणि लाज सोडून तुझ्या गदेने भयभीत होऊन आम्ही येथे पळून आलो आहोत, हे बरोबर आहे. तुझ्यासारख्या अद्वितीय वीरासमोर युद्धासाठी उभे राहाण्याचे सामर्थ्य आमच्यात कुठून असणार ? परंतु आता तर आम्ही तुझ्यासमोर कसे का असेना, उभे आहोत. तुझ्यासारख्या बलवानाशी वैर करून आम्ही तरी कुठे जाऊ शकतो ? तू पायदळ वीरांचा सेनापती आहेस, तेव्हा आता निःशंकपणे कोणताही विचार न करता तत्काळ आम्हांला मारून आपल्या बांधवांचे अश्रू पूस. जो आपल्या प्रतिज्ञेचे पालन करीत नाही, तो असभ्य होय. (१०-१२)

मैत्रेय म्हणाले - विदुरा, जेव्हा भगवंतांनी क्रोधाने त्या दैत्याचा अशा प्रकारे खूप उपहास आणि तिरस्कार केला, तेव्हा पकडून खेळ केल्या जाणार्‍या सापाप्रमाणे तो क्रोधाने जळफळू लागला. तो खवळून उसासे टाकू लागला, त्याची इंद्रिये क्रोधाने क्षुब्ध झाली आणि त्या दैत्याने मोठया आवेशाने झेप घेऊन भगवंतांच्यावर गदेने प्रहार केला. ज्याप्रमाणे योगसिद्ध पुरुष मृत्यूच्या आक्रमणापासून आपला बचाव करतो, अगदी त्याप्रमाणे भगवंतांनी आपल्या छातीवर केलेला त्या शत्रूच्या गदेचा प्रहार थोडेसे बाजूला होऊन चुकविला. नंतर जेव्हा क्रोधाने दात-ओठ चावीत आपली गदा घेऊन तो वारंवार फिरवू लागला, तेव्हा रागाने लाल होऊन श्रीहरी वेगाने त्याच्यावर धावून गेले. विदुरा, तेव्हा प्रभूंनी शत्रूच्या उजव्या भुवईवर गदेचा प्रहार केला, परंतु गदायुद्धात प्रवीण असणार्‍या हिरण्याक्षाने मध्येच तो आपल्या गदेवर झेलला. अशा प्रकारे श्रीहरी आणि हिरण्याक्ष एक दुसर्‍याला जिंकण्याच्या इच्छेने अत्यंत क्रुद्ध होऊन एकमेकांवर आपल्या भारी गदांनी प्रहार करू लागले. त्यावेळी त्या दोघांमध्ये जिंकण्याची स्पर्धा लागली. दोघांचीही शरीरे गदांच्या घावांनी घायाळ झाली होती. त्या घावांतून वाहाणार्‍या रक्ताच्या वासाने दोघांचाही क्रोध वाढत होता आणि ते दोघेही वेगवेगळे पवित्रे घेत होते. एका गायीसाठी दोन वळू भांडतात, त्याप्रमाणे एका पृथ्वीसाठी त्या दोघांमध्ये एकमेकांना जिंकण्याच्या इच्छेने मोठे भयंकर युद्ध झाले. विदुरा, जेव्हा अशा प्रकारे हिरण्याक्ष आणि मायेने वराहरूप धारण करणारे भगवान यज्ञमूर्ती पृथ्वीसाठी एकमेकांशी वैर धरून युद्ध करू लागले, तेव्हा ते पाहाण्यासाठी ब्रह्मदेव ऋषींसहित तेथे आले. हजारो ऋषींबरोबर असलेल्या ब्रह्मदेवांनी जेव्हा पाहिले की, दैत्य मोठा शूर आहे, त्याच्यात भयाचे नावही नाही. तो तोंड देण्यास समर्थ आहे. त्याचा पराक्रम मोडून काढणे मोठे कठीण काम आहे. तेव्हा आदिसूकररूप नारायणांना ते म्हणाले. (१३-२१)

ब्रह्मदेव म्हणाले - "देवा ! माझ्याकडून वर मिळवून हा दुष्ट दैत्य मोठाच प्रबळ झाला आहे. यावेळी तो आपल्या चरणांना शरण आलेले देव, ब्राह्मण, गायी आणि अन्य निरपराध जीव यांना मोठी हानी पोहोचविणारा, दुःख देणारा आणि भयप्रद होऊ लागला आहे. याच्या तोडीचा कोणी योद्धा नाही. म्हणून हा महाशत्रू आपल्याशी बरोबरी करू शकणार्‍या वीराच्या शोधात सर्व लोकांमध्ये फिरत आहे. हा दुष्ट मायावी, घमेंडखोर आणि निरंकुश आहे. एखादे लहान मूल ज्याप्रमाणे क्रुद्ध झालेल्या सापाशी खेळते, तसे आपण याच्याशी खेळू नका. देवा, अच्युता, जोपर्यंत हा भयानक दैत्य आपली वेळ आल्यावर अत्यंत प्रबळ होत नाही, त्याअगोदरच आपण आपल्या योगमायेचा स्वीकार करून या पाप्याला मारून टाका. प्रभो, पहा ! लोकांचा संहार करणारी संध्याकाळची भयंकर वेळ येऊ लागली आहे. सर्वात्मन, आपण अगोदरच या असुराला मारून देवांना विजय मिळवून द्या. या वेळी अभिजित नावाचा मंगलमय मुहूर्ताचा योग आला आहे. म्हणून आपण आपले सुहृद असलेल्या आमचे कल्याण करण्यासाठी ताबडतोब या दुर्जय दैत्याला मारून टाका. प्रभो, याचा मृत्यू आपल्या हातूनच होणार आहे. आमचे मोठे भाग्य आहे की, हा स्वतः कालरूप असलेल्या आपल्याजवळ आला आहे. आपण आता युद्धात बलपूर्वक याला मारून लोकांना शांती मिळवून द्या. (२२-२८)

स्कंध तिसरा - अध्याय अठरावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP