श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय १७ वा

हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्षाचा जन्म आणि हिरण्याक्षाचा दिग्विजय -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

मैत्रेय म्हणाले - विदुरा, ब्रह्मदेवांनी सांगितल्यानंतर देवतांना अंधार होण्याचे कारण समजले आणि त्यांच्या शंकेचे निवारण झाले. नंतर ते सर्वजण स्वर्गलोकात परत आले. (१)

इकडे दितीला आपल्या पतींनी सांगितल्याप्रमाणे पुत्रांकडून लोकांना उपद्रव होईल, अशी शंका होतीच. जेव्हा शंभर वर्षे पूर्ण झाली, तेव्हा त्या साध्वीने जुळ्या पुत्रांना जन्म दिला. त्यांच्या जन्माच्या वेळी स्वर्ग, पृथ्वी आणि अंतरिक्षात अनेक अपशकुन होऊ लागले. त्यामुळे लोक अत्यंत भयभीत झाले. जिकडे तिकडे पृथ्वी आणि पर्वतांवर भूकंप होऊ लागले. सर्व दिशांमध्ये आगी लागू लागल्या. उल्कापात होऊ लागले, विजा पडू लागल्या आणि आकाशात अनिष्टसूचक धूमकेतू दिसू लागले. वारंवार सूं सूं करीत मोठमोठया वृक्षांना उन्मळून टाकीत बोचरा आणि असह्य असा वारा, वावटळी सेना आणि धुळीचे ध्वज घेऊन वाहू लागला. विजा जोरजोरात जणू हसत होत्या. मेघांनी असे रूप धारण केले होते की, सूर्य, चंद्र इत्यादी ग्रह लुप्त होऊन आकाशात अंधार पसरला होता. त्यामुळे कोठेच काही दिसत नव्हते. दुःखी मनुष्याप्रमाणे समुद्र आक्रोश करू लागला. त्यात मोठमोठया लाटा उसळू लागल्या आणि त्यात राहणार्‍या जलचरांत हलकल्लोळ उडाला. नद्या आणि जलाशयांमध्ये खळबळ माजली आणि त्यांतील कमळे सुकून गेली. राहूने ग्रासलेल्या सूर्य आणि चंद्र यांना खळी पडू लागली. आकाशात ढग नसतानाही गडगडाट होऊ लागला आणि गुहांमधून रथाच्या घडघडाटासारखा आवाज येऊ लागला. गावांमधून गिधाडे आणि घुबडे यांच्या भयानक चित्कारांबरोबरच भालू तोंडातून धगधगती आग बाहेर ओकून अमंगल ओरडू लागल्या. सगळीकडे कुत्री माना वर करून कधी गाण्यासारखे तर कधी रडण्यासारखे निरनिराळे आवाज काढू लागली. विदुरा, गाढवांच्या झुंडीच्या झुंडी आपल्या कठोर खुरांनी जमीन उकरीत व खिंकाळत मस्तवाल होऊन इकडे तिकडे धावू लागल्या. गाढवांच्या खिंकाळण्याने भयभीत होऊन पक्षी चिवचिवाट करीत आपल्या घरटयांतून उडून जाऊ लागले. गोठयात बांधलेले आणि वनात चरणारे गाय-बैल आदी पशू भीतीने मल-मूत्र करू लागले. गायी तर अशा घाबरून गेल्या की धार काढताना त्यांच्या आचळातून रक्त येऊ लागले. मेघ पुवाचा वर्षाव करू लागले. देवांच्या मूर्तींच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि वादळाशिवाय वृक्ष उन्मळून पडू लागले. शनी, राहू इत्यादी क्रूर ग्रह प्रबळ होऊन चंद्र, गुरू इत्यादी सौ‌म्य ग्रह आणि बर्‍याचशा नक्षत्रांना ओलांडून वक्र गतीने चालू लागले. तसेच आपापसात युद्ध करू लागले. असेच आणि इतरही अनेक भयंकर अपशकुन पाहून सनकादिक सोडून इतर सर्व जीव भयभीत झाले आणि त्या उत्पातांचे मर्म न कळल्यामुळे त्यांना वाटले की, जगाचा प्रलय होणार. (२-१५)

ते दोन्हीही आदिदैत्य जन्मानंतर लगेच आपल्या पोलादासारख्या कठीण शरीराने मोठे होत जाऊन विशाल पर्वतासारखे झाले. तसेच त्यांचा पूर्वीचा पराक्रमही प्रगट झाला. ते इतके उंच होते की, त्यांच्या सुवर्णमय मुकुटाचे टोक स्वर्गाला स्पर्श करीत होते आणि त्यांच्या विशाल शरीरामुळे सर्व दिशा आच्छादित झाल्या होत्या. त्यांच्या दंडांमध्ये सोन्याचे बाजूबंद चमचम करीत होते. ते जेव्हा पृथ्वीवर एक-एक पाऊल ठेवीत होते, त्यावेळी भूकंप जाणवत होता आणि ते जेव्हा उठून उभे राहात, तेव्हा त्यांच्या चमकणार्‍या कमरपट्टयाने सूर्यही निस्तेज वाटे. ते दोघे जुळे होते. प्रजापती कश्यपांनी त्यांचे नामकरण केले. त्यांच्यातील जो स्वतःच्या वीर्याने दितीच्या गर्भामध्ये प्रथम स्थापित झाला होता, त्याचे नाव हिरण्यकशिपू ठेवले, आणि जो दितीच्या उदरातून प्रथम बाहेर आला तो हिरण्याक्ष नावाने प्रसिद्ध झाला. (१६-१८)

ब्रह्मदेवाच्या वरामुळे हिरण्यकशिपू मृत्युभयापासून मुक्त झाला असल्याकारणाने मोठाच उद्धट झाला होता. त्याने आपल्या बाहुबलाच्या जोरावर लोकपालांसहित तिन्ही लोकांना वश करून घेतले होते. तो आपल्या लहान भावावर-हिरण्याक्षावर अतिशय प्रेम करीत होता आणि हाही आपल्या ज्येष्ठ बंधूला प्रिय असेल तेच करीत असे. एक दिवस तो हिरण्याक्ष हातात गदा घेऊन युद्धाची संधी शोधीत स्वर्गात जाऊन पोहोचला. त्याचा वेग असह्य होता. त्याच्या पायातील सोन्याच्या पैंजणांचा झंकार होत होता, गळ्यामध्ये विजयसूचक माळ त्याने धारण केली होती आणि खांद्यावर विशाल गदा ठेवलेली होती. मनोबल, शारीरिक बल आणि ब्रह्मदेवांनी दिलेला वर यांनी तो उन्मत्त झाला होता. त्यामुळे निरंकुश आणि निर्भय अशा त्याला पाहून, गरुडाला पाहून साप लपून बसतात, त्याप्रमाणे देव भीतीने लपून बसले. दैत्यराज हिरण्याक्षाने जेव्हा असे पाहिले की, आपल्या तेजामुळे गर्विष्ठ इंद्रादी देवही लपून बसले आहेत. तेव्हा ते न दिसल्याने तो भयंकर गर्जना करू लागला. नंतर तो महाबली दैत्य तेथून परत फिरला आणि जलक्रीडा करण्यासाठी एखाद्या उन्मत्त हत्तीप्रमाणे खोल व गरजणार्‍या समुद्रात घुसला. त्याने समुद्रात पाय ठेवला, त्याच वेळी भीतीने वरुणाचे सैनिक जलचर हबकून गेले आणि त्याने त्यांची छेड न काढताही त्याच्या धाकाने घाबरून ते खूप दूर पळून गेले. महाबली हिरण्याक्ष पुष्कळ वर्षेपर्यंत समुद्रात फिरत आणि वारंवार वायुवेगाने उडणार्‍या प्रचंड लाटांवर आपल्या पोलादी गदेचे तडाखे देत होता. हे विदुरा, अशा प्रकारे फिरत फिरत वरुणाची राजधानी असलेल्या विभावरीपुरीत तो जाऊन पोहोचला. तेथे पाताळ लोकाचे स्वामी, जलचरांचे अधिपती वरुणराजांना पाहून त्याने त्यांची खिल्ली उडविली आणि एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे प्रणाम करून थोडेसे हसून छद्मीपणाने तो म्हणाला, "महाराज, मला युद्धाची भिक्षा घाला. प्रभो, आपण तर लोकपाल, राजा आणि मोठे कीर्तिमान आहात ! जे लोक स्वतःला मोठे वीर समजत, त्यांच्या सामर्थ्याचा आपण चक्काचूर केला आणि पूर्वी आपण जगातील सर्व दैत्य-दानवांना जिंकून राजसूय यज्ञसुद्धा केला होता." (१९-२८)

त्या मदोन्मत्त शत्रूने याप्रमाणे उपहास केल्याने भगवान वरुणांना अतिशय क्रोध तर आलाच, परंतु आपल्या विवेकाने तो गिळून त्याऐवजी ते त्याला म्हणाले, "बंधो, आम्हांला आता युद्ध करण्याची इच्छाच राहिली नाही. जो तुझ्यासारख्या रणकुशल वीराला युद्धामध्ये संतुष्ट करील, असा आम्हांला भगवान पुराणपुरुषाशिवाय दुसरा कोणी दिसत नाही. दैत्यराज, तू त्यांच्याकडे जा, ते तुझी इच्छा पूर्ण करतील. तुझ्यासारखे वीर त्यांचेच गुणगान करीत असतात. ते मोठे शूर आहेत. त्यांच्याजवळ जाताच तुझा सगळा ताठा जिरून जाईल आणि तू कुत्र्यांनी घेरला जाऊन वीरशय्येवर निद्रा घेशील. ते तुझ्यासारख्या दुष्टांना मारण्यासाठी आणि सत्पुरुषांवर कृपा करण्यासाठी अनेक प्रकारची रूपे धारण करतात." (२९-३१)

स्कंध तिसरा - अध्याय सतरावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP