श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय १६ वा

जय-विजयांचे वैकुंठातून पतन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

ब्रह्मदेव म्हणाले - देवगण हो, योगनिष्ठ सनकादी मुनींनी जेव्हा अशी स्तुती केली, तेव्हा वैकुंठनिवासी श्रीहरींनी त्यांची प्रशंसा करीत म्हटले. (१)

श्रीभगवान म्हणाले - जय-विजय माझे पार्षद आहेत. माझी कोणत्याही प्रकारे पर्वा न करता यांनी आपला मोठाच अपराध केला आहे. हे मुनींनो, आपण माझे एकनिष्ठ भक्त आहात; म्हणून एका परीने त्यांनी ही माझीच अवज्ञा केल्यामुळे आपण यांना जो दंड दिला, त्याला माझी अनुमती आहे. ब्राह्मण माझे परम आराध्य-दैवत आहेत. माझ्या सेवकांकडून आपला जो अपमान झाला आहे, तो मी माझ्य़ाकडूनच झाला असे मानतो. म्हणून मी आपली क्षमा मागतो. सेवकांनी अपराध केला तर जग त्यांच्या स्वामीलाच दोष देते. ते अपयश स्वामीच्या कीर्तीला अशा प्रकारे दूषित करते की जसा चर्मरोग त्वचेला. माझ्या निर्मल सुयश-सुधेच्या श्रवणामध्ये डुंबणारे चांडालापर्यंतचे सर्व जग ताबडतोब पवित्र होते. म्हणूनच मला विकुंठ असे म्हणतात. परंतु ही पवित्र कीर्ती मला आपल्यामुळेच प्राप्त झाली आहे. म्हणून जो कोणी आपल्याविरुद्ध आचरण करील, मग तो माझा हात असला तरी, त्याला मी तोडून टाकीन. आपल्यासारख्यांची सेवा केल्यानेच माझ्य़ा चरणरजांना एवढी पवित्रता प्राप्त झाली आहे की, ती सर्व पापांना तत्काळ नष्ट करते आणि मला असा सुंदर स्वभाव प्राप्त झाला आहे की, जिच्या कृपाकटाक्षासाठी इतर देव अनेक प्रकारची व्रते करतात, ती लक्ष्मी मी उदासीन असूनही मला सोडीत नाही. जे आपले संपूर्ण कर्मफल मला अर्पण करून सदैव संतुष्ट राहातात, ते निष्काम ब्राह्मण जेव्हा तुपाने युक्त निरनिराळ्या पक्वानांचे भोजन करताना घासा-घासाला तृप्त होतात, तेव्हा त्यांच्या मुखाने मी जसा तृप्त होतो, तसा यज्ञामध्ये अग्निरूप मुखामध्ये यजमानाने दिलेल्या आहुती ग्रहण करूनही होत नाही. योगमायेचे अखंड आणि असीम ऐश्वर्य माझ्या अधीन आहे. तसेच ज्याचे चरणोदक अशी गंगा, चंद्र मस्तकावर धारण करणार्‍या शंकरांसहित सर्व लोकांना पवित्र करते असा असूनही मी ज्यांच्या पवित्र चरणरजांना माझ्या मुकुटावर धारण करतो, त्या ब्राह्मणांनी शाप दिला तरी तो कोण सहन करणार नाही ? ब्राह्मण, दुभत्या गायी आणि अनाथ प्राणी हे माझे शरीरच आहेत. पापांमुळे विवेकदृष्टी नाहीशी झाल्यामुळे जे लोक यांना माझ्यापासून वेगळे समजतात, त्यांना मी नियुक्त केलेल्या यमराजाचे गिधाडासारखे दूत, जे सापाप्रमाणे रागीट आहेत, ते अत्यंत रागाने आपल्या चोचींनी टोचतात. ब्राह्मणांनी तिरस्कार केला तरीसुद्धा जे त्यांच्यामध्ये माझी भावना करून प्रसन्नचित्ताने आणि अमृतमय हास्याने युक्त अशा चेहर्‍याने त्यांचा आदर करतात, तसेच ज्याप्रमाणे रागावलेल्या पित्याची त्याचा पुत्र आणि आपली मी, मनधरणी करतो, त्याप्रमाणे जे प्रेमपूर्ण वचनांची प्रार्थना करून त्यांना शांत करतात, ते मला त्यांच्या अधीन करून घेतात. माझ्या या सेवकांनी माझे मनोगत न समजल्याने आपला अपमान केला आहे. माझी तुम्हांला एवढीच विनंती आहे की, आपण कृपा करून यांचा हा शिक्षेचा कालावधी लवकर संपवा आणि आपल्या अपराधाला अनुसरून तत्काळ अधम गतीचा भोग घेऊन ते लवकरच माझ्याकडे येवोत. (२-१२)

ब्रह्मदेव म्हणाले - जरी क्रोधरूपी सर्पाने सनकादी मुनींना चावा घेतला होता, तरी अंतःकरणाला प्रकाशित करणारी भगवंतांची मंत्रमय सुमधुर वाणी ऐकत असता त्यांचे चित्त तृप्त झाले नाही. भगवंतांचे बोलणे मोठे मनोहर आणि थोडक्यात होते; परंतु ते इतके अर्थपूर्ण, सारयुक्त, गूढ आणि गंभीर होते की, एकाग्र चित्ताने लक्ष देऊन, ऐकून व विचार करूनसुद्धा त्यांना भगवंतांचे मनोगत समजू शकले नाही. भगवंतांच्या अशा बोलण्याने ते फार आनंदित झाले आणि त्यांचे अंग रोमांचित झाले. नंतर योगमायेच्या प्रभावाने आपल्या परम ऐश्वर्याचा प्रभाव प्रगट करणार्‍या प्रभूंना हात जोडून ते म्हणू लागले. (१३-१५)

मुनी म्हणाले - हे स्वयंप्रकाशी भगवंता, आपण सर्वेश्वर असूनसुद्धा म्हणता की, "आपण माझ्यावर अनुग्रह केला," याचा नेमका हेतू आमच्या लक्षात येत नाही. प्रभो, आपण ब्राह्मणांचे कल्य़ाण करणारे आहात म्हणून लोकशिक्षणासाठी आपण खुशाल असे म्हणा की, ब्राह्मण माझे आराध्यदैवत आहेत. खरे पाहता, ब्राह्मण आणि देवांचेही देव ब्रह्मादिक यांचे सुद्धा आपण आत्मा आणि आराध्यदैवत आहात. सनातन धर्म आपल्यापासूनच उत्पन्न झाला आहे. आपल्या अवतारांच्या द्वाराच वेळोवेळी त्याचे रक्षण होते. तसेच निर्विकारस्वरूप आपणच धर्माचे परम गुह्य रहस्य आहात, हेच शास्त्रांचे मत आहे. निवृत्तिपरायण योगीलोक आपल्या कृपेने सहजपणे या मृत्युरूप संसारसागरातून तरून जातात. असे असता दुसरा कोणी आपल्यावर कशी कृपा करू शकेल ? भगवन, दुसरे अर्थार्थी लोक जिचे चरणरज नेहमी आपल्या मस्तकांवर धारण करतात, ती लक्ष्मी नेहमी आपल्या सेवेत रत असते. तेव्हा असे वाटते की, भाग्यवान भक्तजन आपल्या चरणांवर ज्या ताज्या तुळशीच्या माळा अर्पण करतात, त्यांच्यावर गुंजारव करणार्‍या भ्रमरराजाप्रमाणे लक्ष्मीही आपल्या पादपद्मांना आपले निवासस्थान बनवू इच्छिते. परंतु आपल्या पवित्र सेवेने निरंतर आपल्या सेवेत तत्पर राहणार्‍या लक्ष्मीचाही आपण विशेष आदर करीत नाही. कारण आपण आपल्या भक्तांविषयीच विशेष प्रेम ठेवता. आपण स्वतःच संपूर्ण गुणांचे श्रेष्ठ आश्रय आहात, तर मग इकडे तिकडे हिंडणार्‍या ब्राह्मणांच्या चरणांमुळे पवित्र झालेली त्यांच्या मार्गातील धूळ आणि श्रीवत्स चिह्न आपल्याला पवित्र करू शकतील काय ? का बरे आपण त्यांचा स्वीकार केलात ? (१६-२१)

भगवन, आपण साक्षात धर्मस्वरूप आहात. सत्यादी तीन युगांमध्ये आपण प्रत्यक्ष अवतार रूपाने उपस्थित राहाता. खरोखर आपण आपल्या शुद्धसत्त्वमय वरदायिनी मूर्तिद्वारा आमच्यातील धर्मविरोधी असे रजोगुण-तमोगुण दूर करून ब्राह्मण आणि देवतांच्यासाठी तप, शौच आणि दया या आपल्या तीन चरणांनी या चराचर जगताचे रक्षण केले आहे. हे देवा, हे श्रेष्ठ ब्राह्मणकुल आपल्याकडूनच रक्षण होण्याजोगे आहे. साक्षात धर्मरूप असून सुद्धा आपण जर सुमधुर वाणी आणि पूजनाद्वारा या उत्तम कुलाचे रक्षण केले नाही तर, आपण निश्चित केलेला कल्याणमार्गच नष्ट होऊन जाईल. कारण सामान्य लोक श्रेष्ठ पुरुषांचे आचरणच प्रमाणभूत समजून ग्रहण करतात. आपण सत्त्वगुणाची खाण आहात आणि सर्व जीवांचे कल्याण करण्यासाठी उत्सुक आहात. म्हणूनच आपण आपल्या राजे आदिरूप शक्तींच्या द्वारा धर्माच्या शत्रूंचा संहार करता. कारण वेदमार्गाचा नाश जणू आपल्याला मान्य नाही. आपण त्रिलोकीनाथ आणि जगप्रतिपालक असूनही ब्राह्मणांशी नम्र राहता. यामुळे आपला प्रभाव काही कमी होत नाही. कारण ही तर आपली लीला आहे. हे सर्वेश्वरा, आपण या द्वारपालांना दंड द्यावा किंवा बक्षीस द्यावे. आम्ही सरळ मनाने ते मान्य करू किंवा आम्ही आपल्या या निरपराध सेवकांना शाप दिला आहे, यासाठी आम्हांला योग्य दंड द्यावा, तोही आम्ही आनंदाने स्वीकारू. (२२-२५)

श्रीभगवान म्हणाले - मुनींनो, आपण यांना जो शाप दिला तो माझ्या प्रेरणेनेच, असे समजा. आता यांना लवकरच दैत्ययोनी प्राप्त होईल आणि त्या योनीत क्रोधावेशाने वाढलेल्या एकाग्रतेमुळे ते माझ्याशी युक्त होऊन पुन्हा लवकरच माझ्याकडे येतील. (२६)

श्रीब्रह्मदेव म्हणाले - त्यानंतर त्या मुनिवरांनी नयनाभिराम भगवान विष्णू आणि त्यांच्या स्वयंप्रकाशी वैकुंठधामाचे दर्शन घेऊन प्रभूंना प्रदक्षिणा घातली आणि त्यांना नमस्कार करून, त्यांची आज्ञा घेऊन भगवंतांच्या ऐश्वर्याचे वर्णन करीत मोठया आनंदाने ते तिथून परत गेले. नंतर भगवान आपल्या सेवकांना म्हणाले, "जा, मनात कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नका. तुमचे कल्याण होईल. सर्व काही करण्याचे सामर्थ्य असूनही मी ब्रह्मतेज मिटवू इच्छित नाही. कारण मला असेच अभिप्रेत आहे. मी जेव्हा योगनिद्रेत रमलो होतो, तेव्हा तुम्ही प्रवेश करणार्‍या लक्ष्मीला दारातच अडविले होते. तिने क्रोधाने त्यावेळीच तुम्हांला हा शाप दिला होता. आता दैत्ययोनीमध्ये माझ्याबाबतीत सतत क्रोधमय वृत्तीत राहिल्याने तुम्ही या ब्राह्मणांच्या अपमानरूप पापातून मुक्त व्हाल आणि थोडयाच काळात माझ्याकडे परत याल." द्वारपालांना अशा प्रकारे सांगून भगवंतांनी अनेक प्रासादांनी शोभणार्‍या आपल्या सर्वाधिक वैभवाने संपन्न धामामध्ये प्रवेश केला. ते देवश्रेष्ठ जय-विजय त्या भगवद्धामातच निस्तेज होऊन त्यांचा गर्व गळून गेला. पुत्रांनो, जेव्हा ते वैकुंठलोकातून खाली येऊ लागले, तेव्हा तेथे श्रेष्ठ प्रासादांत बसलेल्या वैकुंठवासियांमध्ये मोठाच हाहाकार उडाला. यावेळी दितीच्या गर्भात जे कश्यपांचे उग्र तेज राहिले आहे, त्यात भगवंतांच्या त्या थोर पार्षदांनीच प्रवेश केला आहे. त्या जुळ्या असुरांच्या तेजामुळेच तुम्हा सर्वांचे तेज फिके पडले आहे. यावेळी भगवंतांनाच असे करावयाचे आहे. जो आदिपुरुष विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लयाला कारणीभूत आहे, ज्याची योगमाया मोठ-मोठे योगीजन सुद्धा महत्प्रयासाने पार करतात, तो सत्त्वादी तिन्ही गुणांचा नियंत्रक श्रीहरीच आमचे कल्याण करील. या विषयात आम्ही अधिक विचार करून काय लाभ होणार आहे ? (२७-३७)

स्कंध तिसरा - अध्याय सोळावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP